15 Festivals Information in Marathi

हॅलो वाचकांनो आज मी तुम्हाला 15 Maharashtra Festivals Information in Marathi – महाराष्ट्रीयन सनाबद्दल माहिती मराठीत देणार आहे तर चला बघुयात.

१. गुढीपाडवा | Gudi Padwa Information in Marathi

महिना : चैत्र
तिथी : प्रतिपदा
पक्ष : शुक्ल
Gudi Padwa Information in Marathi

धार्मिक महत्त्व : हिंदू कालगणनेनुसार चैत्र महिन्यापासून हिंदूंचे नवीन वर्ष सुरू होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. यालाच वर्षप्रतिपदा असेही म्हणतात. हा दिवस वर्षातील साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक आहे. या दिवसापासून आयुष्यातल्या अनेक चांगल्या गोष्टींचा शुभारंभ केला जातो.

दिवसाचे महत्त्व : हिंदू लोक या दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंगस्नान करतात. गृहिणी घरापुढील अंगण झाडून सडा शिंपडतात, सुंदर रांगोळी काढतात. घरातील पुरुष मंडळी दाराच्या चौकटीला आंब्याच्या झाडाच्या पानांचे तोरण बांधतात. या दिवशी बांबूची काठी घेऊन, त्या काठीला तेल लावून स्नान घालतात.

नंतर त्या काठीला हळद- कुंकू लावून, नवीन साडी किंवा नववस्त्र काठीच्या वरच्या भागास बांधून त्यावर धातूचे भांडे किंवा पाण्याचा गडू ठेवतात. फुलांचा हार, फुले, साखरेचा हार (गाठी) आणि कडुलिंबाची डहाळी बांधून गुढीची मनोभावे पूजा करून गुढी उभारतात.

धार्मिक फल : प्रतिवर्षी चैत्र महिन्यात नवीन वर्षफल श्रवण केले असता पातकांचा नाश होऊन आयुष्य, यश व लक्ष्मी यांची वृद्धी होते. या दिवशी संवत्सरफल श्रवण केल्याने रोग, दु:ख व दारिद्र्य इ. चा नाश होऊन जीवन आनंद वधनधान्ययुक्त होते.

इतर फल : वर्षातील साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त. म्हणून या दिवशी नवीन वास्तू, वाहन, सोने-चांदी आदि खरेदी करतात. व्यापारी लोक या दिवशी नवीन उद्योगधंदा सुरू करतात. वास्तुशांती करण्यासाठी हा दिवस उत्तम मानतात.

२. अक्षय तृतीय | Akshay Tritiya Information in Marathi

महिना : वैशाख.
तिथी : तृतीया
पक्ष : शुक्ल
Akshay Tritiya Information in Marathi

धार्मिक महत्त्व : हिंदू धर्मानुसार येणारा दुसरा महिना वैशाख. या महिन्यातील अक्षय्य तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून ओळखला जातो. या दिवशी दानाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी केलेले दान निरंतर म्हणजे अक्षय्य टिकते; म्हणून या तिथीला अक्षय्य तृतीया म्हणतात.

दिवसाचे महत्त्व : चैत्रात बसविलेल्या चैत्रगौरीच्या व्रताचा शेवटचा दिवस. याच दिवशी परशुरामाचा जन्म झाला. (परशुरामाची जयंती). या दिवशी आपले पितर घरी पाणी पिण्यास येतात. अशी धारणा असल्याने पाण्याचे घडे दान करण्याची प्रथा आहे. या दिवशी आपल्याला जे आवडते ते दान द्यावे.

या दिवशी त्रेतायुगास आरंभ झाला. याच दिवशी पितरांचे श्राद्ध करतात. मातीचे घट एक पाण्याने, दुसरा तांदूळ-तीळ भरून, त्यांना दोरा गुंडाळून ते धान्यावर ठेवावेत. विष्णू- शिवस्वरूपात त्यांची पूजा करून दान केल्याने पितर तृप्त होतात. दक्षिण भारतापेक्षा उत्तर भारतात याचे विशेष महत्त्व आहे.

इतर माहिती : याच दिवशी शेतकरी नांगरणीस सुरुवात करतात. या दिवशी आपण जे दान देऊ ते निरपेक्ष भावनेने, निरलस मनाने करावे. कधीही नाश न पावणारे ते अक्षय्य म्हणूनच या शुभदिवशी आपण ज्या कार्याची सुरुवात करतो त्याची प्रगतीच होत जाते, त्याचा कधीही नाश होत नाही.

विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात हा दिवस एखाद्या सणासारखा साजरा केला जातो. निसर्ग, पितर, पशु-पक्षी, भूमी यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जमेल तेवढा प्रयत्न करा, असे आपल्या संस्कृतीचे सांगणे आहे.

३. वटपौर्णिमा | Vat Purnima Information in Marathi

महिना : ज्येष्ठ
तिथी : पौर्णिमा
पक्ष : शुक्ल
Vat Purnima Information in Marathi

धार्मिक महत्त्व : पंचांगानुसार हिंदू धर्मातील तिसरा मराठी महिना म्हणजे ज्येष्ठ. या महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा होय. या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. पतीला दीर्घायुष्य मिळावे म्हणून प्रार्थना करतात.

दिवसाचे महत्त्व : वटपौर्णिमेच्याला ‘वटसावित्री पौर्णिमा’ असेही म्हणतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून ते ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेपर्यंत सुवासिनींनी उपवास करावा व वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाची पूजा करून उपवास सोडावा.

या दिवशी वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमाकडून परत मिळविले. या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी ब्रह्मा-सावित्रीचे पूजन करावे. सत्यवान-सावित्रीची कथा वाचावी किंवा ऐकावी.

आपल्या भारतीय संस्कृतीत पतिव्रता स्त्रियांना फार महत्त्व आहे. पतिव्रता स्त्रियांमध्ये सावित्रीचे स्थान फार वरचे आहे. म्हणून या दिवशी पाच-सात सुवासिनींना घरी बोलावून त्यांची आंबा व गव्हाने ओटी भरली जाते. आंबा फळाचे महत्त्व या दिवशी विशेष असते.

इतर फल : वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी वडाच्या झाडाची साग्रसंगीत पूजा करतात, वडाला सात प्रदक्षिणा घालून सात वेळा झाडाला सूत बांधतात.

पुढील सात जन्म आपल्याला हाच पती मिळावा अशी प्रार्थना करतात. सावित्रीने याच दिवशी पतीचे प्राण परत मिळवून असाध्य अशी गोष्ट साध्य केली तीच श्रद्धा आणि निष्ठा या स्त्रियांच्या मनात असते.

हा सण खास सुवासिनी स्त्रियांचाच आहे आणि अशा सणातून आणि व्रतवैकल्यांतून स्त्रियांवर नैतिकतेचे संस्कार होतात. वडाचे झाड आपल्याला छान, दाट थंडगार सावली देते. वाटसरूचे विश्रांतिस्थान असते. या दिवशी कर्नाटक प्रांतात बेंदूर म्हणजेच बैलांची पूजा केली जाते. त्याला कारदुणवी’ असे म्हणतात.

४. नागपंचमी | Nag Panchami Information in Marathi

महिना : श्रावण
तिथी : पंचमी
पक्ष : शुक्ल
Nag Panchami Information in Marathi

धार्मिक महत्त्व : मराठी महिन्यांतील पाचवा महिना म्हणजे श्रावण. सगळ्यात शुद्ध आणि सात्त्विक महिना. श्रावण महिन्यात निसर्गही फळाफुलांनी नटलेला आणि हिरवागार असतो. अशा या पवित्र महिन्यातील सणांची सुरुवात नागपंचमीपासून होते. या महिन्यात सगळे जीवजंतू आणि निसर्गही तृप्त आणि आनंदी असतो.

दिवसाचे महत्त्व : नागपंचमीच्या दिवशी सर्व स्त्रिया, लहान मुली गावाबाहेरील नागाच्या देवळात वा वारुळाला जाऊन नागाची पूजा करतात. तसेच सासुरवाशिणी माहेरी येतात. खेडेगावांत झाडाला झोके बांधून स्त्रिया व मुली झोके खेळतात.

फुगड्या, झिम्मा असे पारंपरिक खेळ खेळतात. या दिवशी पुरण व कणकेपासून बनवलेले दिंड-मोदकासारखे उकडलेले पदार्थ, ज्वारीच्या लाह्या करून नागाला नेवेद्य दाखवतात. या दिवशी काही चिरू नये. कापूनये, चुलीवर तवा ठेवू नये, तळू नये, अशी प्रथा आहे.

इतर माहिती : नाग हा मानवाचा मित्रच आहे. शेतकऱ्यांचाही हितचिंतक आहे. शेतातील उंदरासारखे प्राणी पिकांची नासधूस करत असतात. त्यांचा नाश करून शेतातील पिकाला हिरवेगार ठेवण्याचे काम नागच करतात. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे नागपंचमी. कर्नाटकात या दिवशी गूळपापडीचे लाडू करतात.

५. गोकुळाष्टमी (श्रीकृष्ण जयंती) | Gokulashtami Information in Marathi

महिना : श्रावण
तिथी : अष्टमी
पक्ष : कृष्ण
Gokulashtami Information in Marathi

धार्मिक महत्त्व : श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रात्री बारा वाजता श्रीकृष्णाचा जन्म झाला. म्हणून या तिथीला ‘श्रीकृष्ण अष्टमी’ म्हणतात.

दिवसाचे महत्त्व : या दिवशी वासुदेव व देवकी कंसराजाच्या बंदिवासात असताना रोहिणी नक्षत्राला गोकुळात श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून तो दिवस गोकुळाष्टमी म्हणूनही ओळखला जातो. संपूर्ण भारतात गोकुळाष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

इतर माहिती : श्रीकृष्ण श्रीमंत घरात जन्मला पण गोकुळात वाढताना त्याच्या गरीब, गोपालक मुलांबरोबर तो त्यांची आणि आपली सर्व शिदोरी एकत्र करून, दूध, दही एकत्र करून काला करून सर्वांबरोबर खात असे. त्याचीच आठवण म्हणून गोकुळाष्टमीच्या प्रसादाला काला करण्याची रीत आहे.

रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या आनंदात व उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी जर उपवास ठेवला तर वर्षातील बारा एकादश्या केल्याचे पुण्य मिळते. दुसऱ्या दिवशी विविध खाद्यपदार्थ, दही, दूध, लोणी एकत्र करून काला करतात. यालाच दहीकाला म्हणतात. श्रीकृष्णाचा हा अतिशय आवडता खाद्यपदार्थ.

या दिवशी चौकाचौकांत उंचच उंच दहीहंड्या बांधल्या जातात. उंच मानवी मनोरे रचून शारीरिक कौशल्याने त्या दहीहंड्या फोडल्या जातात. हा उत्सव भारतात सर्वत्र म्हणजे मथुरा, गोकुळ तसेच वृंदावन, द्वारका, पुरी या ठिकाणी मोठ्या थाटात साजरा केला जातो. प्रतिपदेपासून भागवत सप्ताह, श्रीकृष्णलीलेचे खेळ, कीर्तन, भजन हे कार्यक्रम अष्टमीपर्यंत होतात.

६. राखी पौर्णिमा (रक्षाबंधन) | Raksha Bandhan Information in Marathi

महिना : श्रावण
तिथी : पौर्णिमा
पक्ष : शुद्ध
Raksha Bandhan Information in Marathi

धार्मिक महत्त्व : रक्षाबंधन म्हणजे राखी पौर्णिमा. महाराष्ट्रामध्ये या दिवशी बहीण फक्त भावालाच राखी बांधते; परंतु इतरत्र पतीला, शत्रूला, नोकर, मालकाला राखी बांधण्याची परंपरा आहे. या दिवशी बहीण भावाला राखीचा धागा बांधते, याचा अर्थ शील, स्नेह, पावित्र्याचे रक्षण, सतत संयम ठेवणारा असा हा धागा आहे.

सामाजिक महत्त्व : हिंदू संस्कृतीमध्ये रक्ताच्या नात्यांप्रमाणेच माणसा- माणसांची मने हे सण जोडतात. ऐक्यभावना हा या सणाचा संदेश आहे. जो समाज मनाने एकमेकांशी बांधलेला असतो व ज्यांच्यात ऐक्य भावना निर्माण होते तो समाज सामर्थ्यशाली बनतो. या दिवशी गृहिणी सकाळी लवकर उठून अंगण झाडतात.

नंतर सडारांगोळी करतात. आपला भाऊ परगावाहून येणार असल्यास त्याची उत्सुकतेने वाट बघतात. भाऊ आला की, त्याला अभ्यंगस्नान घालतात. भावाच्या मस्तकावर कुंकवाचा टिळा लावून त्याला औक्षण करतात.

नंतर भावाच्या हाताला राखी किंवा धागा बांधतात. मिष्टान्नाचे भोजन करतात. भाऊ परगावी असल्यास, बहीण अगोदरच पोस्टामार्फत राखी पाठवून देते.

इतर महत्त्व : रक्षाबंधन हा सण सर्व समाजात विविध प्रकारे साजरा केला जातो. आपल्या देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानांना महिला राखी बांधतात. राखी हे समाजातील हिंसानाशाचे प्रतीक आहे.

या दिवसाला नारळी पौर्णिमा म्हणतात. पावसाळ्यात खवळलेला समुद्र पौर्णिमेपासून शांत होऊ लागतो. कोळी लोक या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून त्याची पूजा करतात व मासेमारील सुरुवात करतात.

७. पोळा/ पिठोरी अमावास्या | Pola Information in Marathi

महिना : श्रावण
तिथी : अमावास्या
पक्ष : वद्य
Pola Information in Marathi

धार्मिक महत्त्व : श्रावण वद्य अमावास्या म्हणजेच बैलपोळा. पोळा हा बैलांचा सण. या दिवशी बैलांची व चौसष्ट योगिनींची पूजा केली जाते. स्त्रिया हे व्रत करतात. त्यासाठी पिठाचेच पदार्थ करतात व नेवेद्य करून दाखवतात. म्हणूनच या अमावास्येला पिठोरी अमावास्या म्हणतात.

दिवसाचे महत्त्व : या दिवशी शेतकरी लोक बैलपोळा साजरा करतात. आपला भारत हा देश कृषिप्रधान आहे. शेतातील कामासाठी बैलांचा वापर शेतकरी करतात. वर्षभर शेतात श्रम करून थकलेल्या बैलाला वर्षातील एकच दिवस सुटी असते.

या दिवशी बैलांना स्वच्छ धुऊन त्यांना सजवतात. मग सर्वजण मिळून आपल्या बैलांची गावभर मिरवणूक काढतात. गावाच्या वेशीवर असलेल्या मारुतीच्या देवळात बैलांना घेऊन जातात;

कारण मारुती हे बुद्धी व चापल्याचे दैवत असल्याने दोन्ही गुण आपल्या बैलांत यावेत व बैलांना कोणाचीही दुष्ट बाधा होऊ नये, असा त्यामागचा हेतू असतो. घरातील स्त्रिया आपल्या बैलांना पंचारतीने ओवाळतात. बैलांना पुरणपोळीचा नेवेद्य खाऊ घालतात. आपल्या मुलाप्रमाणे शेतकरी बैलांवर प्रेम करतात.

इतर माहिती : या दिवशी बैलाची तसेच शेतीसाठी लागणाऱ्या नांगर, विळा, कोयता, खोरे वगैरे अवजारांची पूजा केली जाते. शेतकऱ्यांची उपजीविका बैलांच्या कष्टांवरच अवलंबून असते. आपल्या बैलांबद्दल कृतज्ञता, आत्मीयता व्यक्त करण्यासाठी शेतकरी पिठोरी अमावस्या अर्थात बैलपोळा हा सण साजरा करतात.

८. गणेशोत्सव | Ganesh Chaturthi Information in Marathi

महिना : भाद्रपद.
तिथी : चतुर्थी.
पक्ष :शुक्ल.
Ganesh Chaturthi Information in Marathi

धार्मिक महत्त्व : घरोघरी गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. या दिवसाबद्दल पुराणामध्ये बऱ्याच कथा आहेत. या दिवशी गणपतीचा जन्म झाला आणि याच दिवशी गजासुराचा नाश झाला.

म्हणून या दिवशी गणेश मूर्ती घरी आणल्यावर ती पूर्व-पश्चिम किंवा उत्तरेकडे तोंड करून ठेवतात. गणपतीला चंदन, दूर्वा, शेंदूर आवडतो. गणपतीला दहा दिवस दररोज दूर्वा वाहतात.

फक्त याच दिवशी गणपतीला तुळस वाहतात; इतर वेळेस गणपतीला तुळस वाहत नाहीत. गणपतीला मोदक आवडत असल्यामुळे घरोघरी या दिवशी मोदकांचा नेवेद्य दाखवितात. त्यानंतर गणपतीची आरती केली जाते.

दहा दिवस सकाळ- संध्याकाळ आरती व प्रसाद-वाटप केले जाते. घरगुती गणपती दीड दिवस, पाच, सात किंवा नऊ दिवस असे बसवून नंतर विसर्जन करतात.

सामाजिक महत्त्व : लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला यामागे सामाजिक ऐक्य निर्माण व्हावे हाच त्यांचा हेतू होता. या दहा दिवसांच्या कालावधीत सामाजिक, वैचारिक व आध्यात्मिक या दृष्टिकोनातून विविध देखावे उभारून वेगवेगळ्या विषयांद्वारे जनजागृती व्हावी असाच त्यांचा उद्देश होता.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात गणेशोत्सवाच्या निमित्ताने या सामाजिक ऐक्याचे फार मोठे महत्त्व आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत वेगवेगळ्या स्पर्धांचे व वेगवेगळ्या विषयांवरील व्याख्यानांचे तसेच संगीताचे आयोजन केले जाते.

बालगोपाळांना हा सण म्हणजे आनंदाची पर्वणीच असते. दहा दिवसांनंतर अनंतचतुर्दशीला घरोघरी व सार्वजनिक गणपतीचे नदीमध्ये किंवा तलावामध्ये किंवा समुद्रामध्ये विसर्जन केले जाते. ‘गणपती बाप्पा मोरया ! पुढच्या वर्षी लवकर या!’ अशा घोषणा देत देत श्री गणेशाला भावपूर्ण निरोप दिला जातो.

९. महालक्ष्मी (गौरी पूजन) | Mahalakshmi / Gauri Pujan Information in Marathi

महिना : भाद्रपद.
तिथी : अष्टमी.
पक्ष : शुक्ल.
Mahalakshmi Gauri Pujan Information in Marathi

धार्मिक महत्त्व : भाद्रपद महिन्यात शुद्ध अष्टमीला ज्येष्ठा व कनिष्ठा गौरी आवाहन होते. हा उत्सव तीन दिवस चालतो. महालक्ष्मी ही समृद्धीची देवता असल्याने गौरीची पूजा करतात.

नवमीला गौरीपूजन होते. गौरीला सोळा प्रकारच्या भाज्या, पंचपक्वान्नांचा नेवेद्य केला जातो. दशमीला गौरी विसर्जन होते. घरात सर्वत्र आनंदाचे, उत्साहाचे वातावरण असते. प्रत्येक जण आपल्या कुवतीनुसार गौरीपूजन करत असतो.

ज्येष्ठा गौरी म्हणजेच महालक्ष्मीचे एक रूप. श्रावणात दर शुक्रवारी हिची केली जाते. त्यालाच जिवतीपूजन म्हणतात. भाद्रपद महिन्यात भाद्रपद पूजा शुद्ध अष्टमीला ज्येष्ठा व कनिष्ठा या दोघींची पूजा केली जाते.

इतर माहिती : ज्येष्ठा व कनिष्ठा गौरी कुणाकडे उभ्या असतात; कुणाकडे तांब्यावर तर कुणाकडे धान्यराशीच्या, तर कुणाकडे खड्याच्या असतात. त्यांच्यासमोर मनमोहक आरास मांडली जाते. ज्येष्ठा व कनिष्ठा या माहेरवाशीणीच असतात.

यांची पूजा करून तू सतत आमच्या घरात वास कर आणि घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदू दे अशी आपण मनोमन प्रार्थना करतो. अष्टमीला गौरीची पूजा केली जाते म्हणून या दिवसाला दुर्गाष्टमी असेही म्हणतात.

महालक्ष्मी हे अतिशय जागृत दैवत आहे. ती समृद्धीची तसेच शौर्याची देवता मानली जाते. अशा या महालक्ष्मी देवतेचे व्रत आपल्या संस्कृतीत स्त्रिया आनंदाने व उत्साहाने करतात. या दिवशी स्त्रिया महालक्ष्मीचे मोठ्या उत्साहात पूजन करतात.

विविध प्रकारची आरास करतात. फराळाचे विविध पदार्थ देवीपुढे मांडतात. स्त्रिया दोन दिवस हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करतात. मोठ्या उत्साहाने लोक घराघरांतील आरास पाहण्यास जातात. यावरून स्त्रियांच्या कर्तृत्वाला उजाळा मिळतो. गणोशोत्सव असल्याने गौरीपूजनाचा आनंद आणखी द्विगुणित होतो.

१०. नवरात्र महोत्सव | Navratri Information in Marathi

महिना : आश्विन.
तिथी : प्रतिपदा.
पक्ष : शुक्ल.
Navratri Information in Marathi

धार्मिक महत्त्व : नवरात्र महोत्सव हा नऊ दिवस चालतो. आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन नवमीपर्यंत हा महोत्सव चालतो. या नऊ दिवसांत देवीने रात्रंदिवस युद्ध करून शुभ आणि निशुभ या राक्षसांना ठार मारले;

म्हणून नवरात्र महोत्सव साजरा करतात. नवरात्रात विविध प्रांतांत देवीची मूर्ती स्थापन केली जाते. मनमोहक आरास केली जाते. शरदऋतूच्या काळात हा उत्सव साजरा होत असल्याने याला ‘शारदीय नवरात्र’ म्हणतात.

नऊ दिवसांचे महत्त्व : आश्विन शुद्ध प्रतिपदेला घरोघरी एका पत्रावळीवर नऊ प्रकारच्या धान्यांची पेरणी केली जाते व तेलाचा एक दिवा अखंड तेवत ठेवला जातो. त्याला घटस्थापना म्हणतात.

नऊ दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतात. गरबा नृत्य साजरे केले जाते. नवरात्रात कुमारिकांना फार महत्त्व असते. ललिता पंचमी म्हणजे नवरात्राचा पाचवा दिवस होय. त्या दिवशी काही स्त्रिया उपांगललितेचे व्रत करतात. त्याने देवीची कृपादृष्टी आपल्या कुटुंबावर राहते.

तसेच सप्तमी म्हणजे नवरात्राचा सातवा दिवस. या दिवशी घरोघरी, शाळेत विद्यादेवता सरस्वतीचे पूजन केले जाते. अष्टमी हा नवरात्र महोत्सवाचा आठवा दिवस. या दिवशी सार्वजनिक ठिकाणी देवीसमोर होम-हवन, मंत्रजप केला जातो व नवमीच्या दिवशी नऊ दिवसांचे पारणे केले जाते.

इतर माहिती : भारतातील साडेतीन शक्तिपीठे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवीच्या मंदिरात नवरात्र फार मोठ्या प्रमाणात साजरे केले जाते. या नऊ दिवसात काही लोक संपूर्ण उपास ठेवतात.

तर काही एकाच धान्याचे सेवन करतात. महाराष्ट्रात तसेच गुजराथ व बंगालमध्ये नऊ दिवस हा उत्सव साजरा करतात. शौर्य, शक्ती व समृद्धीच्या या देवतेची प्रार्थना व पूजा या उत्सवात केली जाते.

११. दसरा (कोजागिरी पौर्णिमा) | Dasara Information in Marathi

महिना : आश्विन.
तिथी : दशमी.
पक्ष : शुक्ल.
Dasara Information in Marathi

नऊ दिवसांचा नवरात्र महोत्सव संपला, की आश्विन महिन्यातील शुद्ध दशमी म्हणजे दसरा होय. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त.

धार्मिक महत्त्व : दसरा हा सर्व कार्यांना अति शुभदिन मानला जातो. या दिवशी कोणतेही नवे कार्य करण्याची प्रथा आहे. या दिवशी वह्या, पुस्तके, ग्रंथ, यंत्रे, शस्त्र, हत्यारे यांची पूजा केली जाते. या दिवशी आपट्याच्या पानांची पूजा करतात व नंतर ती पाने, आपल्याजवळच्या मित्र-मैत्रिणी व नातेवाईकांना सोने म्हणून वाटतात.

दिवसाचे महत्त्व : विजयादशमीला सीमोल्लंघन, शमीपूजन व शस्त्रपूजा इत्यादींना विशेष महत्त्व असते. या दिवशी सकाळी देवघराला व घराच्या चौकटीला आंब्याच्या पानांचे तोरण बांधतात.

देवाला मिष्टान्नाचा नेवेद्य दाखवितात. दसरा हा सण विजयाचे, शौर्याचे प्रतीक मानला जातो. पूर्वी मराठेवीर याच दिवशी लढाईसाठी बाहेर पडत असत. यालाच सीमोल्लंघन असे म्हणतात.

पांडवांनी अज्ञातवास संपवून याच दिवशी कौरवांसमोर आपले खरे रूप प्रकट केले होते. याच दिवशी गावच्या वेशीबाहेर जाऊन पुरुषमंडळी शमीच्या म्हणजेच आपट्याच्या झाडाची पूजा करतात.

कारण याच दिवशी कुबेराने सुवर्ण मोहरा स्वर्गातून पृथ्वीवर ओतल्या तेव्हा त्या आपट्याच्या (शमीच्या) झाडावरून खाली पडल्या. त्यामुळे ती पाने सुवर्णरूप ठरली. या दिवशी जुनी भांडणे, तंटे विसरून, चांगल्या विचारांचे आदान-प्रदान करावे, ही भावना आपट्यांच्या झाडांची पाने वाटण्यामागे आहे, या दिवशी रावणाचा शेवट झाला.

व्यापारी दृष्ट्या महत्त्व : नवीन व्यापार-उद्योगधंद्याची सुरुवात, दुकानाची पूजा, जागा खरेदी, सोने-चांदी खरेदीसाठी हा दिवस उत्तम मानला जातो.

इतर महत्त्व : या दिवशी घरातील लहान-थोर माणसे नवीन पोशाख घालतात. या दिवशी शाळेला सुट्टी असते. साडेतीन मुहूर्तांपैकी असलेला हा सण सर्वजण आनंदाने साजरा करतात.

‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा!” हे सत्य आहे. आश्विन शुद्ध पौर्णिमेलाच ‘कोजागिरी पौर्णिमा’ म्हणतात. या दिवशी आकाश निरभ्र होऊन, पूर्ण चंद्र आकाशात चमकत असतो. चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने तो अधिक तेजस्वी दिसतो.

धार्मिक महत्त्व : कोजागिरी पौर्णिमेला जागरण केले जाते. या रात्री लक्ष्मी आणि नारायण भ्रमण करतात. को जागर म्हणजे कोण जागे आहे. या दिवशी ज्या घरातील लोक जागे असतात त्यांच्या घरी सदैव लक्ष्मीचा वास असतो अशी समजूत आहे. रात्री पाटावर लक्ष्मी व नारायण यांची पूजा करून आटीव दुधाचा नेवेद्य दाखवला जातो. सर्व नातेवाईक व मित्रमंडळींसमवेत दुधाचा आस्वाद घेतला जातो.

१२. दिवाळी | Diwali Information in Marathi

महिना : आश्विन व कार्तिक.
पक्ष : वद्य वशुद्ध.
Diwali Information in Marathi

तिथी : द्वादशी ते अमावास्या, प्रतिपदा व द्वितीया. दिवाळी हा सण आश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत असा सहा दिवस म्हणजे अनुक्रमे वसुबारस (पहिला), धनत्रयोदशी (दुसरा), नरक चतुर्दशी (तिसरा), लक्ष्मीपूजन (चौथा), बलिप्रतिपदा (पाचवा) आणि भाऊबीज (सहावा) असा साजरा केला जातो.

धार्मिक महत्त्व : दिवाळीची खरी सुरुवात वसुबारस या दिवसापासून होते. वसू म्हणून धन, बारस म्हणजे द्वादशी. या दिवशी सायंकाळी गोवत्साची म्हणजे वासरासह गाईची पूजा करून तिला नेवेद्य दाखविला जातो. या नेवेद्यात बाजरी व गूळ कुटून केलेल्या लाडवांचा घास देतात. मायलेकरांच्या दर्शनानंतर दिवाळीची खरी सुरुवात होते.

सणाचा दुसरा दिवस म्हणजे आश्विन वद्य त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी. या दिवशी यमराजाला प्रसन्न करण्यासाठी दीपदान करतात. संध्याकाळी देवापुढे धने, धान्य, धनाची म्हणजे सोने, रुपये यांची पूजा केली जाते.

या दिवशी सायंकाळी कणकेचा दिवा दक्षिणेस ज्योत करून ठेवतात व दिव्याला नमस्कार करतात. याच दिवसापासून घरातील सर्व बाजूंना, तुळशीपुढे व अंगणात पणत्या लावतात. घरासमोर आकाश कंदील लावतात.

दिवाळीचा तिसरा दिवस आश्विन वद्य चतुर्दशी म्हणजेच नरक चर्तुदशी होय. या दिवशी सर्वजण सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करतात. लहान मुले फटाक्यांची आतषबाजी करतात. श्रीकृष्णाच्या काळात नरकासूर नावाच्या राक्षसाने सुंदर सुंदर कुमारिकांना पळवून आपल्या कैदेत ठेवले.

कुमारिकांच्या नातेवाईकांनी याचना केल्याने श्रीकृष्णाने नरकासुराबरोबर घनघोर युद्ध करून, नरकासुराचा वध केला. मरताना नरकासुराने एक वर मागून घेतला, जो कोणी आजच्या तिथीला सूर्योदयापूर्वी स्नान करेल त्याला नरकवास मिळू नये. त्याचे स्मरण म्हणून या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आहे.

दिवाळीतील चौथा दिवस म्हणजे आश्विन वद्य अमावास्या म्हणजेच लक्ष्मीपूजन. या दिवशी संध्याकाळी लक्ष्मीचे व कुबेराचे पूजन केले जाते.

या दिवशी कुबेराचेही पूजन होते कारण कुबेर हा इंद्राचा खजिनदार पण अत्यंत निर्लोभी होता. हिंदू संस्कृतीत लक्ष्मी देवीला फार महत्त्वाचे स्थान आहे. व्यापारी वर्गात लक्ष्मीपूजन मोठ्या दणक्यात केले जाते.

दिवाळीचा पाचवा दिवस कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा होय. साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त म्हणून या दिवसाला खूप महत्त्व आहे. शुभकार्याची सुरुवात याच दिवसापासून सुरू होते.

बलिप्रतिपदेला दीपदान करील त्याला यमयातना होणार नाहीत. त्याच्या घरी नेहमी लक्ष्मीचा वास राहील. बलिप्रतिपदेला पत्नी पतीला ओवाळते व पती पत्नीला भेटवस्तू देतो. या दिवशी घरातील सर्व मंडळी नवा पोशाख घालतात. घरी मिष्टान्नाचे जेवण करतात.

दिवाळीचा सहावा दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजेच भाऊबीज होय. या दिवशी यमाने आपली बहीण यमीच्या घरी जाऊन वस्त्रे, अलंकार इ. भेट दिली व तिच्या घरी भोजन केले, म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे म्हणतात.

बहीण भावाला औक्षण करते व भाऊ बहिणीला वस्त्रे, अलंकार, जे शक्य असेल ते भेट म्हणून देतो. अशा प्रकारे भारतीय संस्कृतीत दिवाळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा सण उत्साहात व आनंदात साजरा केला जातो.

१३. मकर संक्रांत | Makar Sankranti Information in Marathi

महिना : पौष
तारीख : १४ किंवा १५ जानेवारी
पक्ष : शुक्ल.
Makar Sankranti Information in Marathi

शास्त्रीयदृष्ट्या महत्त्व : सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणे, यालाच संक्रमण किंवा संक्रांत असे म्हणतात. सूर्य १४ जानेवारीला किंवा कधी १५ जानेवारीला मकर राशीत प्रवेश करतो.

सूर्याभोवती परिभ्रमण करणाऱ्या पृथ्वीची स्थिती बदलते व कक्षा पालटते. या दिवसापासून दिवस थोडा थोडा वाढत जातो व रात्र लहान होते. आपल्या संस्कृतीत पृथ्वी प्रकाशमय करणारे उत्तरायण पवित्र मानले जाते. ज्ञानी, तपस्वी उत्तरायणास पवित्र मानतात.

धार्मिक महत्त्व : या दिवशी सुवासिनी स्त्रिया पाच बोळकी आणून, बोळक्यांमध्ये ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, हरभऱ्याचे डहाळे, पेरू घालतात. बोळक्यांना हळद-कुंकू लावून मनोभावे पूजा करतात. देवळामध्ये वाणवसा करण्यासाठी जातात. सुवासिनी एकमेकींना तिळगूळ आणि संसारोपयोगी वस्तू भेट देतात.

आरोग्यदृष्ट्या महत्त्व : आयुर्वेदात तिळाला फार महत्त्व आहे. तीळ व गूळ दोन्ही पदार्थ उष्णतावर्धक व पौष्टिक आहेत. तीळ औषधी असतात. तसेच या दिवसात थंड हवामान असल्यामुळे तीळगुळाच्या सेवनाने शरीरात ताकद निर्माण होते.

इतर महत्त्व : या सणाच्या दिवसात लहान मुले पतंग उडवितात. सायंकाळी तीळगूळ वाटतात. आपआपसांतील वैर, भांडण-तंटे मिटून एकमेकांमध्ये गोडी निर्माण होते.

इतर माहिती : संक्रांत हा सण भोगी, संक्रांत आणि किंक्रांत असा तीन दिवसांत विभागलेला असतो. भोगीच्या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, मुगाच्या डाळीची खिचडी, वांगी, गाजर, घेवडा व पावटा, मटार, तीळ घालून केलेली मिश्रभाजी आणि वांग्याचे भरीत हा आहार घेतला जातो.

त्या दिवशी तिळाचे तेल, उटणे लावून तीळमिश्रित पाण्याने अंघोळ केली जाते. देवदर्शन घेऊन देवाला तिळगुळाचा प्रसाद अर्पण करतात. संक्रांत हा खास करून स्त्रियांचा सण आहे.

संक्रांत ते रथसप्तमी या कालावधीत स्त्रिया घरोघरी हळदीकुंकवाचा समारंभ करतात. संक्रांतीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे करेला (किंक्रांतीला) लहान मुला- मुलींना बोरनहाण घालतात. तिळगूळ देताना ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असे म्हणतात.

१४. होळी महोत्सव | Holi Information in Marathi

महिना : फाल्गुन.
तिथी : पौर्णिमा.
पक्ष : शुक्ल.
Holi Information in Marathi

धार्मिक महत्त्व : होळीचा सण दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी अंगण साफ करून, शेणाने सारवून घेतात. त्यानंतर गोवऱ्याचा थर रचतात. तर काही ठिकाणी लाकडे रचून त्यावर गोवऱ्या रचतात.

होळीच्या मध्यभागी एरंडाच्या झाडाची फांदी उभी करतात. त्यावर फुलांच्या माळा घालतात. सायंकाळी होळी पेटवून पूजा करतात. होलिकेस प्रदक्षिणा घालून एकदा शंखध्वनी करतात.

होळीला नारळ अर्पण करून, त्या भाजलेल्या नारळाचा प्रसाद घेतात. नेवेद्य म्हणून पुरणपोळी अर्पण केली जाते. घरात त्रास देणाऱ्या जीवकिटकांच्या कणकेच्या प्रतिमा करून त्या होळीत टाकण्याची चाल आहे.

त्यामुळे ते जीवाणू नष्ट होतात, असा समज आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी होलिकेचे भस्म कपाळाला लावले जाते. राहिलेली राख एकमेकांच्या अंगाला लावतात, यालाच धूलिवंदन असे म्हणतात. नंतर नदीवर स्नान केल्याने शरीराबरोबर मनही निर्मळ होते.

दिवसाचे महत्त्व : या दिवशी मनातील दुष्ट विचार, हेवेदावे, रोगराई यांचा नाश होळीत करायचा तसेच आरोग्य, स्वच्छता व आनंद यांचे स्वागत करायचे. होळी हा सण प्रतीकात्मक आहे.

सामाजिक महत्त्व : हा सण म्हणजे आध्यात्मिक, परंतु वास्तवतेची, सत्याची जाणीव करून देणारा असा अर्थ आहे.

१५. रंगपंचमी | Rang Panchami Information in Marathi

महिना : फाल्गुन
तिथी : पंचमी
पक्ष : वद्य
Rang Panchami Information in Marathi

धार्मिक महत्त्व : होळीच्या पाचव्या दिवशी येणाऱ्या सणाला रंगपंचमी असे म्हणतात. काही ठिकाणी धूलिवंदनाच्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते.

श्रीकृष्ण गोपगोपिकांसह रंग खेळत असे; परंतु आता हा सण सार्वजनिक उत्सव म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. पूर्वी हा खेळ फार प्रतिष्ठेचा मानला जात असे. या दिवशी महालांमधून, उद्यानांमधून हा सणखेळला जात असे.

इतर महत्त्व : चित्रकार रंगपंचमीच्या दिवशी नवीन रंग तयार करण्यास सुरुवात करतात.

दिवसाचे महत्त्व : या सणानिमित्त समाजातील सर्व लोक एकत्र येतात व एकमेकांवर विविध रंगांची मनसोक्तपणे उधळण करतात. बालगोपाळांना तर ही आनंदाची पर्वणीच असते.

भारतीय संस्कृतीत सणाला किती महत्त्व आहे, दिसून येते. एकात्मता साधणे, एकजुटीने काम करणे हा अनमोल संदेश या सणाद्वारे मिळतो.

आणखी वाचा – थोर पुरुष

काय शिकलात?

आज आपण 15 Maharashtra Festivals Information in Marathi – महाराष्ट्रीयन सनाबद्दल माहिती मराठीत पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Comment