अंबरनाथाचे पुरातन शिवमंदिर

ठाणे जिल्ह्यातील कल्याण-कर्जत मार्गावर, कल्याणपासून ६ कि. मी. अंतरावर अंबरनाथ हे शहर आहे. या शहराच्या पूर्वेला सुमारे २ कि. मी. वर एक शिवमंदिर आहे. बारा ज्योर्तिलिंगाएवढेच महत्त्व असलेले एक पुरातन शिवमंदिर उल्हास नदीच्या किनाऱ्यावरील निसर्गरम्य भूमीवर विसावलेले आहे. हे मंदिर शिलाहार राजाने इ. स. ११ व्या शतकात बांधले असून या मंदिराची लांबी ८९ फूट व रुंदी ७४ फूट असून त्याच्याभोवती १०५ फूट रुंद व १५० फूट लांब प्राकार आहे.

मंदिर पश्चिमाभिमुख असून त्याला आणखीन दोन प्रवेशद्वार आहेत. सभामंडप, गर्भगृह, अंतराळ असे तीन भाग आहेत. गाभारा बराच खोल असून त्यात खडकाचा एक उंचवटा आहे. त्यालाच स्वयंभू शिवलिंग म्हणतात. सभामंडप साधारणपणे ४० बाय ४० असा असून रामायण-महाभारतकालीन कथा सांगणारी चित्रे, पाने, फुले तसेच जय-विजय, महिषासुरमर्दिनी इत्यादी चित्रे दाक्षिणात्य मंदिरांची आठवण करून देतात.

वास्त बाहेरुन नक्षत्राकृती भासते. मंदिराच्या शिखरावर अशीच तारकाकार रचना केलेली आहे. मंदिराच्या चौथऱ्यावर अनेक थर असून त्यातील एकेका थरात हत्ती, घोडे इत्यादी पशूतसेच मानवाच्या आकृत्या कोरल्या आहेत. विविध रुपातील गणराजाची अडीचशे चित्रे कोरलेली असून वरच्या पृष्ठभागावर देवता, गंधर्व, अप्सरा, यश यांच्या आकृती कोरलेल्या आहेत. भिंतीत मोठ्या देवळ्या करुन त्यात शैव देवतांच्या मूर्ती बसविल्या आहेत.

चैत्य तोरणाकृती कोनाड्यात शिवमूर्ती आहेत. गाभाऱ्याच्या दरवाज्यावर आणि गणेशपट्टीच्या वरच्या भागात देवतांच्या आणि पशूच्या आकृती कोरल्या आहेत. मंडपाच्या मध्यभागी चार स्तंभांवर आधारलेले घुमटाकृती छत आहे. छतावर कीर्तीमुखे, कमळे व लतापल्लव असे कोरीव काम आहे. मंदिराच्या भिंतीवर शिव-पार्वतीची विविध रुपे पाहावयास मिळतात. तर काही मूर्ती विष्णूच्या अवताराच्या आहेत.

उत्तरेकडील कोनाड्यात ब्रह्मदेवाची मूर्ती असून येथे नृत्यमुद्रेत महिषासुरमर्दिनीची मूर्ती व अष्टभूज कामदेवाचीही मूर्ती आहे. निर्जिव काळेभिन्न पाषाण, कलाकारांनी आपल्या जादूच्या हाताने सजीव केले, देखणे केले. प्राचीन कथेत जशा दंतकथा, आख्यायिका त्याचे वलय असते त्याला हे मंदिर कसे अपवाद ठरणार ? या मंदिरालाही आख्यायिका आहेत.

प्रभू शिवशंकर या परिसरात आले असता येथील निसर्ग सौंदर्यावर भाळले. काही दिवसानंतर हिमालयात निघून गेले. तेथे गेल्यावर त्यांना आठवण झाली की, आपण त्रिशूळ तेथेच विसरलो आहोत. येथे मात्र त्रिशूळाच्या तेजाने आजूबाजूचा परिसर पवित्र झाला. येथील प्रधानाच्या स्वप्नात येऊन शंकरांनी दृष्टांत दिला. प्रधान शंकराच्या दर्शनाने खूश झाले. त्याने आपल्या मांडलिक राजाला मंदिर बांधावयास आज्ञा दिली.

अशाप्रकारे हे मंदिर उभे राहिले. माघ वद्य चतुर्दशीला यात्रा भरते. महाशिवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी होते. दर सोमवारी व श्रावण सोमवारी भाविक मंदिरात गर्दी करतात. या शिवमंदिराचा ताबा सध्या औरंगाबाद येथील शासकीय पुरातत्त्व विभागाकडे आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या बोधचिन्हामध्ये या प्राचीन मंदिराचे स्थान आहे.

Leave a Comment