अफजलखान निघाला मृत्युकडे

शिवाजी महाराजांनी मोंगलांचे जुन्नर ठाणे लुटले. त्याच संपत्तीने स्वराज्यातील अो गदांची डागडुजी केली व तेथे आवश्यक तो शस्त्रसाठा आणि सैनिक ठेवले. राजगडाच्या राजवाड्यातून कोंढाणा सतत दिसत होता. शहाजीराजांच्या सुटकेसाठी कोंढणा विजापूरकरांना म्हणजे आदिलशाहला द्यावा लागला होता. महाराजांनी तो जिंकून पुन्हा स्वराज्यात आणला. गडावर भगवा ध्वज चढला. त्यानंतर आदिलशाही अमलाखालील कोकण किनाऱ्याचा काही प्रदेश जिंकला.

सिद्दीच्या ताब्यातील जंजिरा घेता आला नाही. त्या ऐवजी महाराज गुप्त वेशाने कल्याणच्या बाजूस कोकणात उतरले. त्यांनी आपल्या एकेका सहकाऱ्यांना एकेक कामगिरी सांगितली. सगळे सहकारी लगेच कामाला लागले. लोहगड, तुंग, तिकोन, विसापूर, राजमाची, प्रबळगड, सरसगड इत्यादी चाळीस ठाणी स्वराज्यात आली. भिवंडी व कल्याण ही दोनही महत्त्वाची ठाणी एकाच दिवशी म्हणजे २४ ऑक्टोबर १६५७ रोजी ताब्यात आली.

शत्रूचे जलदुर्ग घेण्यासाठी सुसज्ज आरमार आवश्यक आहे, हे महाराजांच्या लक्षात आले. महाराजांनी सुसज्ज आरमार उभारले. स्वराज्याचे पहिले आरमार सागरावर डौलात तरंगू लागले. स्वराज्याचा पहिला सरखेल, सागराध्यक्ष म्हणून दर्यासारंगची नेमणूक केली. याशिवाय इब्राहिमखान, दौलतखान व मायनाक भंडारी हे अत्यंत शूर, धाडसी व निष्ठावंत अधिकारी आरमारात सामील केले. त्यानंतर महाराजांनी रत्नागिरी, खारेपाटण इत्यादी ठिकाणं जिंकली व खारेपाटणजवळच समुद्रात ‘विजयदुर्ग’ या किल्ल्याचे बांधकाम सुरू केले.

महाराजांच्या या घोडदौडीमुळे त्यांच्या सहकाऱ्यांचा उत्साह शतपटीने वाढला… तो दिवसेंदिवस वाढू लागला. …पण तिकडे अली आदिलशाह व त्याची सावत्र आई बडीबेगम यांचे अवसान डळमळू लागले आणि एके दिवशी मावळातल्या कान्होजी जेध्यांना आदिलशाहचे एक फर्मान आले. ‘शिवाजीने निजामशाही कोकणातील मुसलमानांना त्रास देऊन, लूट करून पातशाही मुलखातील कित्येक किल्ले ताब्यात घेतले आहेत. त्याचा नाश व उचलबांगडी करण्यासाठी अफजलखान यास तिकडे सुभेदार म्हणून नेमले आहे. त्याच्या ताबेदारीत राहन शिवाजीला नष्ट करावे.’ अशा अर्थाचे फर्मान मावळातल्या देशमुखांना जात होते.

एक खोपडे सोडला, तर इतरांनी आदिलशाहीच्या कसल्याही आमिषाला बळी न पडता शिवरायांचे हे ‘महाष्ट राज्य’ आहे ते सर्वांनी हिंमत धरून राखावे’ असे ठरविले. शिवाजी महाराजांच्या तुफानी धुमाकुळाच्या बातम्या एका पाठोपाठ एक विजापुरात येऊन थडकत होत्या. दरबार अगदी खवळून गेला होता. रोज काही ना काही तरी गेल्याची बातमी येत होती. बादशाही महालात तर संताप संताप उडत होता. आदिलशाह व बडीबेगम भयंकर खवळले होते. शिवाजी महाराजांना उखडून टाकण्याचा बडीबेगमने अगदी निश्चयच केला, पण एकदा शहाजीराजांना त्यांच्या या उनाड, बंडखोर पोराची हरामखोरी कळवून पाहावी असा विचार करून एक दमदाटीचा खलिता राजांकडे कर्नाटकात रवाना केला.

‘तुमचा पुंड पुत्र शिवाजी याला ताबडतोब आवरा; नाहीतर आम्हाला त्याविरुद्ध कारवाई करावी लागेल.’ आपल्या शिवबाच्या पराक्रमाने विजापूर दरबार हादरून गेला आहे या कल्पनेने शहाजीराजांना अतिशय आनंद झाला. त्यांनी दरबाराला कळविले, ‘माझा पोरगा माझे ऐकत नाही. आमच्या सांगण्याचा त्याच्यावर काहीही परिणाम होणार नाही; म्हणून आपणच त्याला वठणीवर आणावे.’ हे उत्तर ऐकताच बडीबेगम भयंकर संतापली. शिवाजी आणि शहाजी दोघेही नमकहराम आहेत असे तिचे ठाम मत झाले. आता काही झाले, तरी त्या शिवाजीचा नाश करायचाच असे तिने ठरविले.

ही बडीबेगम महाकारस्थानी, कपटी, मोठी पाताळयंत्री बाई होती. खान मुहम्मद या दरबारातील बड्या सरदाराला अफजलखानाच्या सांगण्यावरून तिने ठार मारले होते. बहोलखान या सरदाराचे वर्तन निष्ठेचे नाही अशा समजुतीने त्याला छाटून टाकले होते. अशी ही अत्यंत कपटी, पाताळयंत्री बाई बडीबेगम.. काहीही करून शिवाजीचा काटा काढायचा, त्याला ठार मारायचे हे तिने मनाशी पक्के ठरविले. तिने आपल्या वजिरामार्फत सर्व सरदार मनसबदारांना दरबारात बोलावून घेतले. दरबार भरला. दरबाराचा थाट डोळे दिपविणारा होता… दरबारात पूर्ण शांतता होती… वातावरण मोठे काळजीचे होते…

बादशहा आदिलशाह दरबारात येऊन तख्तावर बसला… बडीबेगमही पडद्यात येऊन बसली… दरबारात बाजी घोरपडे, अंकुश खान, याकूब, सिद्दी हिलाल इत्यादी बडे बडे सर्व सरदार बसले होते… तख्तापुढच्या चौरंगावर एक तबक होते व त्यात विडा होता… दरबारातील वातावरण गंभीर होते… सगळे सरदार तोंड खाली करून बसले होते… कोणीही कुणाशी काहीही बोलत नव्हते…

बडीबेगम एकदम मोठ्या आवाजात म्हणाली, “आमच्या राज्यातील सुभ्यामागून सुभे, गडांमागून गड बळकावणाऱ्या त्या पुंड शिवाजीला पकडून हुजुरांपुढे हजर करण्यास जो मर्द तयार असेल, त्याने तबकातील पैजेचा विडा उचलावा.” दरबार अधिकच गंभीर झाला. भयाण स्तब्धता पसरली… सगळे सरदार मान खाली घालून उभे होते… शिवरायांबद्दल लोकांत नाना अफवा पसरल्या होत्या… ‘शिवजीला कोणी पकडावयास गेला, तर तो हैवान त्याच्यापाशी असलेल्या जादूटोणाविद्येच्या ताकदीने पटकन हवेतून नाहीसा होता; तो एकाच वेळी अनेक ठिकाणी असतो; भवानी नावाची एक भयंकर देवी त्या शिवाजीवर प्रसन्न असल्याने तिच्या जीवावर तो वाटेल ते चमत्कार करतो; तो अचानक अनेक रूपे धारण करतो.’ अशा एक ना दोन.

अनेक अफवा होत्या. त्याच्या वाटेला जाणे म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूला आमंत्रण; त्यामुळे सगळे सरदार एकमेकांकडे नुसते बघत उभे होते. बड्या साहेबिणीने पुन्हा मोठ्याने विचारले, “बताओ, कौन तैयार है शिवाजीको गिरफ्तार करनेके लिये? कौन जानकी बाजी लगाएगा? बताओ?” बडीबेगम भयंकर संतापली होती. एक क्षण गेला. ….आणि त्याच वेळी पुऱ्या सहा फूट उंचीचा, धिप्पाड शरीराचा, राक्षसी ताकदीचा, कपटनीती आणि पराक्रम याविषयी प्रसिद्ध असलेला सरदार अफजलखान उभा राहिला. त्या विडा ठेवलेल्या तबकापाशी आला.

बादशहाला सलाम करून व त्या तबकातला तो पैजेचा विडा उचलून मोठ्या आवेशाने व हिमतीने म्हणाला, “खाविंद, मैं उस सिवाजीको गिरफ्तार करके हजूरके आगे पेश करूँगा।” – अफजलखानाची ही प्रतिज्ञा ऐकताच दरबारात टाळ्यांचा कडकडाट झाला. बडीबेगम अतिशय खूश झाली. दरबार बरखास्त झाला. सगळे सरदार निघून गेले. मग बडीबेगम खानाला एकांतात म्हणाली, “खांसाहेब, त्या शिवाजीला शक्यतो जिवंतच पकडून इकडे आणा. ते नाहीच जमले, तर त्याचे मस्तक तरी आणाच.” बादशहाने खानाची एकांतात भेट घेऊन सांगितले, “तू शिवाजीला हर उपायाने दगा करून ठार मार!” असे सांगून बादशहाने स्वत:च्या गळ्यातला कंठा काढून खानाच्या गळ्यात घातला. त्याला अनेक मौल्यवान वस्तू भेट म्हणून दिल्या. त्याच प्रमाणे स्वत:ची अत्यंत तीक्ष्ण कट्यार खानाला दिली.

खान अतिशय खूश झाला. खानाची तयारी सुरू झाली. आदिलशाही दरबारातून एकामागून एक अशी फर्माने सुटू लागली. एकेका सरदाराची फौज विजापूरच्या बाहेर आठ-दहा मैलांच्या परिसरात तळ ठोकू लागली. सुमारे तीस हजार सैन्य जमा झाले. त्यात कितीतरी पायदळ, घोडदळ, हत्तीदळ, उंट, खेचरे, भरपूर धान्य, तंबू, डेरे, शामियाने यांचे सामान, तोफा, बंदुका, दारुगोळा अशी जय्यत तयारी झाली. याशिवाय मदतीला लढाईबहाद्दर सरदार, अफजलखानाचा मोठा मुलगा फाजलखान या सर्वांना घेऊन अफजलखान मोहिमेवर निघाला. शंभनिशंभाप्रमाणे अतिशय द्वेषाने पछाडलेला अफजलखान निघाला होता, शिवरायांना नेस्तनाबूद करण्यासाठी; …पण त्याला माहीत नव्हते की, तो खरोखर निघाला होता ते मृत्युकडे ! निघाला होता ते स्वत:च नेस्तनाबूद होण्यासाठी!

Leave a Comment