आता आमची बिरुदे तुम्ही घ्या

शिवाजी महाराज हे न्यायी, प्रजाप्रेमी, प्रजापालनदक्ष, भोगनिवृत्त होते; त्यामुळे प्रजेला ते धर्मात्मा, पुण्यश्लोक, प्रत्यक्ष ईश्वराचा अवतार वाटत होते. त्यांच्या ठिकाणी सर्वधर्मसमभाव होता. सर्वधर्मपंथातील संतसत्पुरुषांचा ते सदैव आदर करीत असत. मठ, मंदिरे, दर्गे, मशिदी, साधुसंतांची समाधीमंदिरे यांची ते आस्थेने विचारपूस करीत असत. ते संत सज्जनांचे सेवक होते. हिंदवी स्वराज्याचा जन्मच मुळी संतसज्जनांचे रक्षण व दुष्टदुर्जनांचे निर्दालन यासाठी झाला होता. असे असले, तरी ते अंधश्रद्धाळू नव्हते. धर्माच्या नावाखाली त्यांनी कोणाचेही फाजील देव्हारे माजविले नाहीत.

कोणाचेही बेताल वर्तन सहन केले नाही. चिंचवडच्या देवमहाराजांना प्रजेकडून सवलतीच्या दराने धान्य खरेदी करण्याचा हक्क होता. धान्याचे दर कितीही वाढले, तरीही देवमहाराज प्रजेकडून हक्काने स्वस्त दरात धान्य खरेदी करीत असत, पण यामुळे प्रजेचे नुकसान होत असे. शिवाजी महाराजांना हे समजताच त्यांनी देवमहाराजांचे हक्क काढून घेतले. शिवाजी महाराज ‘संतसेवेपेक्षा प्रजाजनांचे हित श्रेष्ठ’ असे समजत असत. एकदा एक मोठा विलक्षण प्रकार झाला. जेजुरीचा खंडोबा हे अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत.

खंडोबाच्या दर्शनासाठी, नवस फेडण्यासाठी लांबलांबचे लोक जेजुरीला येत. कुलधर्म कुलाचाराप्रमाणे खंडेरायाची पूजाअर्चा नैवेद्य करत. उभ्या महाराष्ट्राचे हे कुलदैवत असल्याने देवाचे उत्पन्नही खूप मोठे होते. जसे देवाचे उत्पन्न मोठे तसे त्या उत्पन्नात वाटे मागणाऱ्या सेवेकऱ्यांची भांडणेही मोठी. घडशी आणि गुरव हे या खंडोबाचे सेवेकरी. या दोन समाजात उत्पन्नाच्या हक्काबद्दल आणि वाटणीबद्दल मोठे वाद होत, मोठी भांडणे होत.

शिवाजी महाराजांच्या काळात हे भांडण अगदी विकोपाला गेले होते. एकदा चिंचवडचे देवमहाराज जेजुरीला आले होते. हे देवमहाराज म्हणजे त्या काळातले मोठे साधुपुरुष. त्यांचा सगळीकडे मोठा दबदबा होता. लोक त्यांना फार मान देत असत. स्वत: शिवाजी महाराजांनाही त्यांच्याबद्दल मोठा आदर होता. ते कधीकधी चिंचवडला जाऊन त्यांचे दर्शन घेत असत. शिवाजी महाराजांनी देवमहाराजांना मोठी उत्पन्ने दिली होती. देणग्याही दिल्या होत्या. चिंचवडच्या देवस्थानासाठी स्वस्त धान्याच्या खरेदीच्या सवलती दिल्या होत्या.

देवस्थानसाठी कोकणातून येणाऱ्या भात, मीठ इत्यादींवरील जकात माफ केली होती. शिवाजी महाराज देवमहाराजांना गुरुस्थानी मानत. एकंदरीत देवमहाराजांचा दबदबा फार मोठा होता. हे देवमहाराज एकदा जेजुरीला आले असता त्यांना घडशी आणि गुरव यांचा वाद समजला. देवमहाराजांना वाटले आपणच या वादाचा न्यायनिवाडा करावा. खरे तर, यात देवमहाराजांचा काहीही संबंध नव्हता. या भांडणात पडण्याचा त्यांना कसला अधिकारही नव्हता. तो तंटा मिटविण्यासाठी त्यांनी दोन्ही बाजूच्या लोकांना चिंचवडला बोलाविले. स्वत: देवमहाराजांनी न्यायाधीशाची भूमिका घेतली.

दोन्ही पक्षांचा वादविवाद सुरू झाला. दोघांनी आपापल्या हक्कांचे पुरावे पुढे मांडले. देवमहाराजांनी न्याय-अन्यायाचा कसलाही विचार न करता गुरवमंडळींना हक्क दिले. घडशी समाजावर अन्याय झाला. घडशी चिंचवडहून पळून जाऊ लागले. देवमहाराजांनी पळून जाणाऱ्या घडशी मंडळींना पकडून आणले व त्यांना बेदम मार दिला. त्यांच्या हातापायांत बेड्या घातल्या व सिंहगडाच्या किल्लेदारास सांगून या घडशींना अंधारकोठडीत डांबले.

देवमहाराजांनी विनाकारण घडशींवर अन्याय केला आणि विशेष म्हणजे असा न्यायनिवाडा करण्याचा कोणताही अधिकार देवमहाराजांना नव्हता. शिवाजी महाराज आपणास मानतात या समजुतीने देवांनी हा नसता उपद्व्याप केला होता. देवांना वाटले, आपण शिवाजी महाराजांचे गुरू आहोत; त्यामुळे असे अधिकार आपणास आपोआपच आहेत. देवमहाराजांच्या दबावाने सिंहगडच्या किल्लेदारानेही देवांचे ऐकून घडशींना अंधार कोठडीत डांबले.

काही दिवस गेले आणि हे सगळे प्रकरण व देवमहाराजांचे हे नको ते उपद्व्याप शिवाजीमहाराजांना समजले. महाराज भयंकर संतापले. ते अस्वस्थ झाले. प्रजेवर परस्पर काहीतरी भलेबुरे निवाडे लादण्याचा देवांना अधिकार कोणी दिला? हे राजाचे गुरू झाले, म्हणजे काय राजाचा अधिकार यांना मिळाला काय? शिवाजी महाराजांनी मोजक्या पण खरमरीत शब्दांत आपल्या या उपद्व्यापी गुरूंना पत्र लिहिले – ‘महाराज, तुमची बिरुदे आम्हांस द्या व आमची बिरुदे तुम्ही घ्या.

सिंहासनाधीश्वर राज्यकर्ते छत्रपती व्हा! अन् आम्ही भस्माचे पट्टे लावून चिंचवड येथे पूजाअर्चा करीत बसतो!’ या देवमहाराजांनी केलेला निवाडा शिवाजी महाराजांना अन्यायाचा वाटला. त्यांनी तो रद्द केला. सिंहगडच्या किल्लेदाराचीही चांगलीच खरडपट्टी केली. “तू नोकर कोणाचा? आमचा की चिंचवडच्या देवमहाराजांचा?” असे खडसावून त्याला चांगलीच तंबी दिली व बंदीत पडलेल्या घडशींची ताबडतोब सुटका करण्याचा हुकूम फर्माविला. शिवाजी महाराज प्रजापालन दक्ष होते. प्रजेला व राज्याला बाधक अशी संतसेवा त्यांनी कधाच कला नाहा. प्रजेवर अन्याय करणाऱ्यांची गय केली नाही. शिवाजी महाराजांचे राज्य न्यायाचे होते.

Leave a Comment