आता मीच तुझा नागोजी!

शिवाजी महाराज भागानगरच्या वाटेवर होते. त्या वेळी कर्नाटकातील हिंदुलोकांचा अतोनात छल चालला असल्याचे त्यांच्या कानांवर आले. कृष्णा आणि तुंगभद्रा या नद्यांमधील परिसर विजापूरकरांच्या ताब्यात होता. कोप्पळचा प्रसिद्ध किल्ला याच भागात होता. याच किल्ल्यावर हुसेन खान मियाना व अब्दुल रहीमान हे दोन भाऊ ठाणेदार होते. दोघेही अत्यंत क्रूर, राक्षसीवृत्तीचे होते. या दोघांनी प्रजेवर जुलूम, जबरदस्ती करून त्यांना जगणे अगदी कठीण केले होते.

गाईगुरांवर, बायकांमुलीवर हे कधीही झडप घालीत असत. बिचारी प्रजा! आपले दुःख सांगणार तरी कोणाला? 7 त्यांना ऐकून माहीत होते की, मराठी मुलखांत शिवाजी नावाचा अत्यंत पराक्रमी राजा आहे व तो अत्यंत न्यायीराजा आहे. त्याच्या राज्याला रामराज्य असे म्हणतात. खरोखर तो आला तर किती बरे होईल! आणि लोकांना कळले की, तो शिवाजीराजा कर्नाटकात येत आहे.

लोकांनी ठरविले की, त्या शिवाजीराजाला आपले दुःख सांगायचे! लोकांनी महाराजांना भेटून आपली कर्मकहाणी सांगितली व ‘आम्हाला या दुष्टांपासून वाचवा.’ अशी विनंती केली. अब्दुल रहीमानला हे समजताच तो भयंकर चिडला व त्याने तक्रार करणाऱ्या लोकांचे अगदी हालहाल केले. शिवाजी महाराजांना हे समजताच, या पठाणांना अद्दल घडविलीच पाहिजे असा निश्चय करून, त्यांनी सेनापती हंबीरराव मोहित्यांना फौजेसह या कामगिरीवर पाठविले. त्यात नागोजी जेधे व धनाजी जाधव ही दोन तरणीबांड मुले होती. नागोजी हा सर्जेराव जेध्यांचा मुलगा व कान्होजी जेध्यांचा नातू होता.

नागोजी आपल्या आजोबांप्रमाणेच मोठा धाडसी व शूर होता. सर्जेरावही या फौजेत होता. हंबीरराव लढाईला खंबीर. ते सेनापती होते. त्यांची फौज फार मोठी नव्हती, पण जे सैनिक होते ते मोठ्या निधड्या छातीचे, चिवट आणि जिद्दीचे. नागोजी हा त्या दलात आघाडीवर होता. केवळ अठरा वर्षांचा नागोजी अंगापिंडाने भरदार होता. त्याच्या भाल्याचा नेम कधीही चुकत नसे की, तलवारीचा वार फुकट जात नसे.

“सध्या कोप्पळची काय खबरबात?’ असे सर्जेरावाने हंबीररावांना विचारले. हंबीरराव म्हणाले, “कोप्पळचा हुसेन खान मियाना भयंकर पिसाळला आहे. शिवाजी महाराजांच्याकडे ज्यांनी गा-हाणे सांगितले त्यांची त्याने अगदी धूळधाण केली आहे. आता तो स्वारीची तयारी करीत आहे.” मियाना मोठा ताकदवान होता. शिवाजी महाराजांच्या सैन्याला धूळ चारावयाची अशा संतापाने तो सैन्य घेऊन निघाला होता.

हंबीरराव सेनेसह येलबुर्गापाशी आले. सर्व जण थाळी घेत होते. तोंडात घास घालणार तोच हाक उठली, ‘गनीम आला! गनीम आला!’ छावणीभर एकच गडबड उडाली. हातातला घास तोंडात गेलाच नाही. सर्वांचे हात गेले तलवारीकडे. शत्रूच्या सेनेपेक्षा हंबीररावाचे सैन्य फारच थोडे होते, पण भीती कोणालाच वाटत नव्हती. हंबीररावाने इशारा देताच मराठ्यांच्या तलवारी सपासप बाहेर पडल्या. भाल्यांची टोके टवकारली गेली. ‘हर हर महादेव!’ गर्जना झाली आणि मराठी फौज खानाच्या फौजेवर तुटून पडली. नागोजीच्या हातात धारदार भाला होता.

मराठ्यांनी खानाच्या सैन्याची जोरदार कापाकापी सुरू केली. मराठी विजेच्या चपळाईने लढत होते. सर्जेराव जेधे एका बाजूस हाणामारी करीत होते. नागोजीचा भाला आणि तलवार शत्रूला कापीत होती. खानाच्या सैन्याची अक्षरश: लांडगेतोड सुरू होती. मराठ्यांच्या सैन्यापुढे आपला निभाव लागणार नाही हे पाहून मियानाच्या फौजेची पळापळ सुरू झाली. हत्तीवर बसलेला हुसेनखान माहुताला हत्ती मागे फिरविण्यास सांगत होता. माहताने हत्ती मागे फिरविला. डोकाला जाणार निाममा हत्ती पळत असल्याचे नागोजीने पाहिले. नागोजी ओरडला, “अरे! थांब पळतोस कठे?” नागोजी घोड्यावरून भरवेगाने खानाच्या हत्तीसमोर आला. त्याने हातातील भाला खचकन् हत्तीच्या गंडस्थळावर मारला.

हत्ती मुरडला. हत्तीवर बसलेल्या हसेन खानाने समोर पाहिले. त्याला घोड्यावर नागोजी…. छे! छे! साक्षात मृत्यूच दिसला. अतिशय घाबरलेल्या खानाने एक धारदार जीवघेणा बाण नागोजीला मारला. बाण नागोजीच्या मस्तकात घुसला. नागोजी घोड्यावरून जमिनीवर कोसळला. खान हत्तीवरून पळून जाण्याच्या बेतात होता, पण धनाजी जाधवाने व हंबीररावाने हत्ती अडविला.

खान कैद झाला. त्याची सगळी फौज पळत सुटली. हंबीररावाला दोन हजार घोडे, कित्येक हत्ती व अपार लूट मिळाली. सर्जेरावाचे लक्ष नागोजीकडे गेले. त्याने धावत जाऊन नागोजीच्या डोक्यातला बाण काढला, पण नागोजी वाचला नाही. त्याने प्राण सोडले. रोहीडखोऱ्यातला एक तरणाबांड वीर पराक्रमाची शर्थ करून धारातीर्थी पडला. दक्षिणेत विजय मिळवून मराठी फौज रायगडी परत आली.

शिवाजी महाराजांना नागोजीचा पराक्रम समजला. ते नागोजीच्या कारी या गावी गेले. नागोजी युद्धात मारला गेल्याची बातमी येताच त्याची तरुण बायको गोदुबाई सती गेली. गोदुबाई आणि नागोजी यांनी आपला संसार ऐन तारुण्यात संपविला. नागोजीच्या वीर मरणामुळे त्याच्या आईला फार दुःख झाले. स्वराज्यलढ्याच्या यज्ञवेदीवर तिने आपल्या पुत्राची एक आहुती दिली. शिवाजी महाराज डोळ्यातील अश्रू आवरून नागोजीच्या आईला म्हणाले, “आई, युद्धात गेला तो शिवाजी! आता मीच तुझा नागोजी!

Leave a Comment