बाजी घोरपड्यास अल्लाकडे पाठविले

शहाजीराजांच्या अपघाती मृत्युमुळे राजगड अद्यापही दुःखात होता. त्याच वेळी मोंगल सरदार जसवंत सिंहाने कोंढाणा किल्ल्यावर चाल केली. तो किल्ल्याला वेढा घालून बसला होता. सहा महिने झाले, तरी वेढा चालूच होता. जसवंत सिंहाने गड जिंकण्याचा दोन तीन वेळा प्रयत्न कला, पण गडावराल मावळ्याना प्रत्यक वळा ता प्रयत्न हाणून पाडला. जसवंत सिंहाने पुन्हा एकदा गडावर धडक हल्ला करण्याची तयारी केली.

गडावरील मावळ्यांना हे समजताच ते गुपचूप गडाखाली आले व जसवंत सिंहाच्या छावणीत शिरून तेथे असलेल्या दारुगोळ्याच्या साठ्याला आग लावली. सगळे मावळे सहीसलामत गडावर पळून गेले. दारुगोळ्याचा भयंकर स्फोट झाला. बेसावध असलेल्या शत्रूसैन्याला जबरदस्त मार बसला. या प्रकाराने भयभीत झालेला जसवंत सिंह नाइलाजाने वेढा उठवून पुण्याकडे पसार झाला.

शिवाजी महाराजांना ही बातमी समजताच त्यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी गडावर जाऊन सर्व मावळ्यांना शाबासकी दिली. प्रत्यक्ष मोंगलांची सुरत लुटून शिवाजी अगदी सहीसलामत परत गेला हे कळताच विजापूरच्या आदिलशाहची छाती काळजीने धडधडू लागली. शिवाजी महाराजापुढे तो अगदी टेकीस आला होता. मराठी दौलत एका घासात गिळण्याची भाषा बोलणारा तो, मराठी दौलतीला पायबंद कसा घालायचा याचा विचार करू लागला. त्याने महंमद इस्लासखान यास तळकोकणात पाठविले, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

मग त्याने सिद्दी अझीजखान यास तळकोकणात पाठविले, पण त्या मोहिमेत तोच अल्लाकडे गेला. आदिलशाह अतिशय वैतागला, पण करतो काय? मग त्याने आपल्या सर्व सरदारांना दरबारात बोलाविले व त्यांना विचारले, “शहाअलम औरंगजेबाची सुरत लुटण्यापर्यंत ज्याची मजल गेली त्या शिवाजीचा मुलूख जिंकून आदिलशाही सरदारांची ताकद काय आहे, हे त्या शिवाजीस दाखवून देणारा कोणी समशेर बहादूर या दरबारात आहे का?’ शिवाजीचे नाव काढताच अनेक सरदारांच्या पोटात भीतीचा गोळा उठला. प्रत्येक जण दुसऱ्याकडे पाहू लागला.

इतक्यात एक सरदार उठून उभा राहिला त्या सरदारांचे नाव खवासखान. खवासखान मोठा शूर. नामवंत योद्धा होता. खवासखान उभा राहताच इतर सरदारांना हायसे वाटले. सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्याची वाहवा केली. आदिलशाहने खवासखानाचा मोठा सन्मान केला व त्याला शिवाजी महाराजांच्या ताब्यातील कोकणी मुलूख जिंकण्याची आज्ञा केली व त्याच्या मदतीला जाण्याची सिद्दी सरवर, बाजी घोरपडे व महाराजांचा सावत्रभाऊ एकोजी यांना आज्ञा केली. खवासखान प्रचंड फौज घेऊन घाट उतरून कोकणात कुडाळ्याजवळील पहाडी भागात गेला.

बाजी घोरपडे अद्याप आलेला नव्हता. तो मुधोळास स्वत:च्या घरी होता. तो निघण्याच्या तयारीत होता. ही माहिती महाराजांना हेराकडून समजतांच त्याला चांगलाच इंगा दाखविण्याचे महाराजांनी नक्की केले. बाजी घोरपड्याचे नाव निघताच महाराजांच्या मस्तकात संतापाने शीर उठली. डोळे क्रोधाने लाल झाले. हाच तो बाजी घोरपडे! महाराजांच्याच वंशातला मराठा! हाच बाजी घोरपडे, भोसल्यांच्या आणि स्वराज्यांच्या नाशासाठी टपून बसला होता. जिंजीच्या छावणीत शहाजीराजे रात्री झोपले असतांना त्यांना पकडण्यासाठी मुस्तफाखान व अफजलखान यांच्याबरोबर गेला होता.

ह्याच बाजी घोरपड्याने शहाजीराजांच्या हातापायांत बेड्या ठोकल्या होत्या. शहाजीराजांच्या हयातीतच बाजी घोरपड्याला ठार मारण्याचा महाराजांचा बेत होता, पण तो जमला नाही. खुद्द शहाजीराजांनी शिवरायांना आज्ञा केली, ‘तुम्ही घोरपड्याचा सूड घ्या. आमची इच्छा तुम्हीच पूर्ण कराल.’ महाराजांनी ठरविले, बाजी घोरपडे मुधोळहून निघण्यापूर्वीच आपण मुधोळला जायचे व घोरपड्याचा सूड घ्यायचा व खूप दिवसापासूनची तहान शमवायची. शिवाजी महाराज अत्यंत त्वरेने मुधोळला गेले. शिवाजी असा अचानक येईल याची बाजी घोरपड्याला मुळीच कल्पना नव्हती. तो बेसावध होता.

आदिलशाहच्या हुकुमानुसार तो खवासखानाच्या मदतीला जाण्याच्या तयारीत होता. शिवाजी आल्याचे समजताच त्याने आपली तलवार काढली व आपल्या सैनिकांच्या मदतीने शिवरायांशी व त्यांच्या सैनिकांशी जोरदार झंज सुरू केली. शिवाजी महाराज आणि बाजी घोरपडे समोरासमोर आले. दोघे अटीतटीने युद्ध करू लागले. दोघांच्या तलवारीचा खणखणाट सुरू झाला. जणू अहिनकुलांचे युद्ध चालले होते. आणि इतक्यात …. शिवरायांनी आपल्या भवानी तलवारीचा एक जीवघेणा तडाखा बाजी घोरपड्याला दिला… बाजीच्या शरीरातून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या… बाजी घोरपडे जमिनीवर कोसळला… खलास झाला.

भवानी तलवार तृप्त झाली. भोसल्याचा हाडवैरी ठार झाला. मांसाहेबांची इच्छा पूर्ण झाली. शहाजीराजांचे श्राद्ध खऱ्या अर्थाने पूर्ण झाले. त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली. बाजी घोरपड्याला स्वर्गात नव्हे नरकात पाठवून शिवाजी महाराज अत्यंत वेगाने कुडाळला आले. खवासखान विजापूरहन निघाला व कुडाळ्याजवळ असलेल्या एका रानात आपल्या सैन्यासह तळ ठोकून बसला. तो बाजी घोरपड्यांची वाट पाहत होता.

शिवरायांनी घोरपड्यांची वाट लावल्याचे त्याला माहीतच नव्हते. तो आपल्या छावणीत आरामात होता. शिवाजी महाराजांनी खवासखानास एक धमकीवजा निरोप पाठविला, ‘तू आहेस तेथून ताबडतोब निघून जा. ही कोकणभूमी माझी आहे. माझे सैनिक साक्षात पिशाच आहेत. तू बऱ्या बोलाने निघून गेला नाहीस, तर तू व तुझे सैनिक जिवंत परत जाणार नाहीत.’ हा निरोप मिळताच खवासखान भयंकर संतापला. त्याला स्वत:च्या पराक्रमाचा नको इतका गर्व होता. त्याने शिवाजी महाराजांना उलट निरोप पाठविला, ‘तुझ्या नावाचा गवगवा मी खूप ऐकला आहे, पण मी तुझ्या धमकीला भीक घालीत नाही.

हिंमत असेल तर युद्धाची तयारी कर.’ घमेंडखोर खानाने युद्धाची कसलीच तयारी केली नव्हती. खानाचा निरोप मिळताच शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याला इशारा दिला. महाराजांच्या फौजेने खवासखानाच्या सैन्यावर एकदम झडप घातली. दोन्ही सैन्यांचे जोरदार युद्ध सुरू झाले. मराठ्यांनी खवासखानाच्या सैन्याचा जोरदार खात्मा सरू केला. आपल्या सैन्याचा होत असलेला नाश पाहून धास्तावलेला खवासखान आपल्या सेनेसह जीव मुठीत धरून विजापूरकडे पळत सुटला. खवासखानाचा पुरता फज्जा उडाला. तो विजापुरात जाऊन आदिलशाहला भेटला.

आपल्या पराभवाचे कारण सांगताना तो म्हणाला, या “मी बाजी घोरपड्यांची वाट पाहत होतो, पण ते आलेच नाहीत.” आदिलशाह म्हणाला, “बाजी घोरपडे तुमच्या मदतीला येणारच कसे? ते तुमच्याकडे येण्यास निघाले तोच शिवाजीने मुधोळला जाऊन बाजी घोरपड्यांना त्यांच्या वाड्यातच गाठले व त्यांना वरती अल्लाकडे पाठविले.” शिवाजी महाराजांच्या या राजकारणी डावपेचाने खवासखान अगदी थक्क झाला. बाजी घोरपड्याच्या मृत्युमुळे आदिलशाहला अतिशय दुःख झाले.

Leave a Comment