बहादूरखानास दाखविला इंगा!

६ जून १६७४ रोजी शिवरायांना रायगडावर विधिवत राज्याभिषेक झाला. शिवाजी महाराज छत्रपती झाले. शककर्ते झाले. केवळ रायगडावरच नव्हे, तर महाराष्ट्रभर आनंद ओसंडून वाहू लागला. …आणि १७ जून १६७४ रोजी जिजामातांना पाचाड येथे मृत्यू आला. राज्याभिषेकापासून पंधरवड्यात महाराज आईविना भिकारी झाले. मातृभक्त महाराजांना अपार दुःख झाले. मांसाहेब शिवरायांचे सर्वस्व होत्या. महाराजांचा त्या चालता-बोलता आशीर्वाद होत्या; परंतु कर्तव्यापुढे त्यांना दुःख उगाळीत बसणे शक्य नव्हते.

महाराज महापुरुष होते. मातृवियोगाचं दुःख त्यांनी बाजूला सारले व राज्याभिषेकासाठी जो मोठा खर्च झाला होता तो भरून काढण्याचा व वारंवार डोके वर काढणाऱ्या शत्रूच्या पारिपत्याचा ते विचार करू लागले. शिवाजी महाराजांना एका हेराकडून अशी पक्की माहिती मिळाली की, औरंगजेबाने मोंगल सरदार दिलेरखान यास दिल्लीला परत बोलाविले असून दख्खनची सुभेदारी बहादूरखान यास दिली आहे.

हा बहादूरखान मोठा ताकदवान असला, तरी डोक्याने अगदीच कमी होता. हा बहादूरखान स्वत:ला फार मोठा समजत असे. याने दक्षिणेत येताच पुण्याच्या पूर्वेस भीमेच्या काठी, पेडगाव येथे आपली छावणी ठोकली व पेडगावास बहादूरगड नावाचा एक किल्ला बांधला. पेडगावच्या या शहाण्याने आपले सगळे सैन्य व बरोबर आणलेला मोठा खजिनाही बहादूरगडावर ठेवला.

शिवाजी महाराजांची धूळधाण करण्याची जबाबदारी औरंगजेबाने या बहादूरखानावर सोपविली होती. या बहादूरखानाने दिल्लीतून निघताना औरंगजेबाला मोठ्या फुशारकीने सांगितले, “तुम्ही कसलीही चिंता करू नका. तुम्ही दिल्लीत आरामात राहा. मी जातो व त्या शिवाजीची हाडे खिळखिळी करतो.”. बहादूरखानाच्या ताब्यात असलेल्या प्रचंड खजिन्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी ठरविले. हा खजिना लुटायचा; त्यामुळे राज्याभिषेकासाठी झालेला खर्च काही अंशी भरून निघेल आणि त्या बिनडोक बहादूरखानाला चांगलीच दहशत बसेल.

महाराजांनी आपला मनसुबा दोन तीन सेनानींना सांगितला. काय करायचे, कसे करायचे, फारशी हानी होऊ न देता डाव कसा साधायचा याची योजना पक्की झाली. शिवाजी महाराजांनी नऊ हजारांची फौज खानावर सोडली. सेनानायकाने सैन्याचे दोन गट केले. एका गटात दोन हजार सैनिक व दुसऱ्या गटात सात हजार सैनिक सज्ज केले. अगोदरच ठरलेल्या योजनेप्रमाणे दोन हजार सैनिकांनी गर्जना केली, ‘हर हर महादेव!’ आणि ते बहादूरगडाकडे निघाले. दसरे सात हजार सैनिक आपण कोठे चाललो आहोत याचा थांगपत्ता लागू न देता ‘शिलंगणाचे सोने’ लुटण्यासाठी निघाले व बहादूरगडापासून काही अंतरावर एका रानात दबा धरून बसले.

या शिवाजी महाराजांचे सैनिक बहादूरगडावर चालून येत आहेत हे दिसताच बहादूरखानाने आपले झाडून सर्व सैनिक सज्ज केले. एकही सैनिक मागे ठेवला नाही. बहादूरखानाची सेना मराठ्यांच्या दोन हजार सैनिकांचा पाठलाग करू लागली. मराठी सेना पळत सुटली. मराठ्यांच्या सैनिकांनी खानाच्या फौजेला झुलवीत झुलवीत खूप लांब नेले. खानाची सेना पाठलाग करून करून पार भेंडाळून गेली.

मराठ्यांचा एकही सैनिक हाती लागला नाही. खानाचे सैनिक दमछाक हाऊन माग फिरल. खानाचे सैनिक परत येण्यास बराच वेळ लागेल हे ओळखून रानात लपून बसलेले सात हजार मराठी सैनिक घाई करून खानाच्या छावणीवर व बहादूरगडावर चालून गेले. त्यांना विरोध करायला छावणीत व किल्ल्यात कोणीही नव्हते. शिवाजी महाराजांना छावणीत उत्कृष्ट दर्जाचे दोनशे घोडे, भांडीकुंडी, कापडचोपड व एक कोटीचा खजिना मिळाला. सर्व काही घेऊन मराठी सैनिक रायगडाकडे पसार झाले. जाता जाता त्यांनी बहादूरखानाच्या छावणीला आग लावून ती नष्ट केली.

तिकडे मराठी फौजेचा पाठलाग करून दमछाक झालेला बहादूरखान आपल्या सेनेसह हातहालवीत परत आला. छावणीत येऊन पाहतो तो काय! मराठ्यांनी छावणीची पार सफाई केली होती. छावणीत काही काही शिल्लक नव्हते. एक कोटीचा खजिनाही त्या लबाडांनी लांबविला होता. हे पाहन हताश, निराश झालेला बहादूरखान कपाळाला हात लावून मटकन खाली बसला. मराठे तलवारीपेक्षा डोक्याने लढतात व शत्रूला चारीमुंड्या चीत करतात हे बहादूरखानाला कळून चुकले. वल्गनावीर बहादूरखानास महाराजांनी चांगलाच इंगा दाखविला.

Leave a Comment