बहुलेची गोष्ट

दक्षिण देशात ‘बाष्कल’ नावाचे एक घाणेरडे गाव होते. तेथे सर्व लोक दुर्वर्तनी होते. स्त्रिया व्यभिचारी होत्या. त्या गावात विदुर नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो एका वेश्येकडे जात असे. त्याच्या बायकोचे नाव ‘बहुला’ होते. तीही जारिणी होती. एकदा ती तिच्या जाराशी एकांत करीत असताना विदुराने तिला पकडले. तिचा जार मात्र पळून गेला. विदुराने खूप मारले. तेव्हा बहुला म्हणाली, “तुम्ही जे करता तेच मी केले.

तुम्हाला मला मारायचा हक्क नाही.” विदुर म्हणाला, “तू वेश्याव्यवसाय करून खूप पैसे मिळवलेस. ते मला देऊन टाक.” तिने पैसे दिले नाहीत. तेव्हा विदुराने तिचे सर्व दागिने घेतले. घरातला पैसाअडका व सोनेनाणे घेतले आणि ते त्याच्या आवडत्या वेश्येला देऊन टाकले. त्या वेश्येने ते सोनेनाणे तिच्या दुसऱ्या जाराला दिले. कालांतराने विदुर मेला. तो नरकात गेला. नरकात त्याचा भयंकर छळ झाला. त्याचा जन्म विंध्य पर्वताच्या एका दरीत पिशाच्चयोनीत झाला.

पिशाच्च झाल्यावर तो भयंकर दिसू लागला. तो वृक्षाच्या फांदीस स्वत:ला उलटे टांगे, तो आपल्या कर्माचे फळ भोगीत होता. बहला विधवा झाली. तिला एक मुलगा होता. पण तो कोणापासून झाला, ते तिलाही ही नळते. काही महिन्यांनी शिवरात्र आली. यात्रेकरू गोकर्णक्षेत्री चालले होते. यात्रेकरू शिवशंकराचा जयघोष करीत चालले होते. बहुलेला वाटले आपणही मुलाला घेऊन यात्रेला जावे. ती यात्रेकरूंत सामील होऊन गोकर्णक्षेत्री आली.

बहुलेने स्नान केले. महाबळेश्वराचे दर्शन घेतले व ती देवळात पुराण ऐकायला बसली. त्या पुराणात एका जारिणी स्त्रीला नरकात किती यातना भोगाव्या लागतात याचे वर्णन होते. ते ऐकून बहुलेला तिच्या पूर्वकर्माचा पश्चात्ताप झाला. ती रडू लागली. पुराणिकाला तिची दया आली. त्याने तिला ‘नमः शिवाय’ हा पंचाक्षरी मंत्र दिला. त्या मंत्रामुळे बहुलेला भक्तिमार्गाची गोडी लागली. ती वल्कले नेसून गोकर्ण लिंगाचे नित्यनेमाने दर्शन घेऊ लागली.

शिवशंकर तिच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी विमान पाठवून तिला शिवलोकी आणले. पार्वतीमाता प्रसन्न होऊन तिला ‘वर माग’ असे म्हणाली. बहुला म्हणाली, “माझा पती कोठे आहे? त्यांचा उद्धार व्हावा ही माझी इच्छा आहे.” ‘पार्वती म्हणाली, “बहुले, तुझा पती विंध्य पर्वतावरील एका दरीत पिशाच्च होऊन भटकत आहे. तुला जर त्याचा उद्धार करायचा असेल तर तू या तुंबाराला घेऊन विंध्य पर्वतावर जा.

हा तुला तुझ्या पतीचा ठावठिकाणा दाखवेल. त्यावेळी तू तुझ्या पतीला शिवकथा ऐकव. म्हणजे त्याचा उद्धार होईल.” बहुला व तुंबर विंध्य पर्वतावर गेले. एका दरीत तुंबराला पिशाच्च दिसले. तुंबराने त्या पिशाच्चाला एका वृक्षाला बांधून ठेवले व तुंबर वीणा वाजवून शंकराचे माहात्म्य त्याला सांगू लागला. तोच ते पिशाच्च ‘मला सोडवा’, ‘मला सोडवा’ असे ओरडू लागले. त्याला सोडताच ते तुंबराच्या पाया पडले. पिशाच्चांचे म्हणजेच विदुराचे रूप पालटले. त्याचवेळी शिवशंकराचे विमान तेथे आले आणि बहुला व विदुर यांना शिवलोकी घेऊन गेले. शिवमहिमा हा असा आहे.

Leave a Comment