भीमाचं गर्वहरण

माणसानं स्वाभिमानी असावं; पण त्याने अहंकारी, गर्वाभिमानी मात्र असू नये,नाही का? कारण गर्व, ताठा, अभिमान हा मोडायला किंवा मोडून काढायला वेळ लागत नाही. भीम हा पांडवांमधला अतिशय बलवान, सामर्थ्यवान आणि शक्तिमान! त्याने आपल्या अंगीच्या अफाट शक्तिबळावर अनेक भीमपराक्रम केलेले होते. त्याने बकासुराला मारले. हिडिंबा राक्षसिणीलाही नमवले.

कौरवांनी त्याला मारण्याचे जे जे प्रयत्न केले; त्या सर्वांतुनही तो बचावला. मात्र, ह्या सर्वांचा कळत-नकळत भीमाच्या मनावर नको तो परिणाम झाला. त्याला आपण अति बलवान आहोत, पराक्रमी आहोत, सामर्थ्य-शक्तिमान आहोत; असा गर्व झाला. जगात नेहमी ‘शेरास सव्वाशेर’ असं कुणी ना कुणी तरी भेटतंच. एकदा काय झालं, भीम आपली गदा खांद्यावर. टाकून मोठ्या ऐटीत एका जंगलामधून वाटचाल करत चालला होता. तोच त्याचं लक्ष खालच्या पायवाटेकडे गेलं. बघतो तर काय! त्या वाटेत काही तरी आडवं पडलेलं. त्यानं खाली वाकून नीटपणे पाहिलं, तर ती एक माकडाची शेपटी होती.

आता या रस्त्यात शेपटी आडवी टाकून येणाऱ्या-जाणाऱ्याची वाट अडविणाऱ्या माकडाचा शोध घेण्यासाठी भीमाने इकडे-तिकडे पाहिले; तो त्याला झाडाखाली बसलेले एक म्हातारे माकड दिसले. ती वाट अडविणारी लांबसडक शेपटी त्या माकडाचीच होती. भीम त्या माकडाला म्हणाला, “अहो मर्कटराज, हे काय, असं शेपटी आडवी टाकून बसायचं? चला, आपली ही शेपटी बाजूला घ्या. मला जाऊ द्या.” तेव्हा ते वृद्ध माकड भीमाला म्हणाले, “अरे बलभीमा, तुला काय सांगू? अरे, मी हा असा म्हातारा. त्यातूनच मी सध्या फार आजारी आहे.

ह्या आजारपणाने माझी इतकी शक्ती गेली आहे की, अरे, मला माझीच शेपटी उचलण्याची किंवा ती एका जागेवरून दुसरीकडे हलवण्याचीही ताकद राहिलेली नाही बघ. आता असं कर तुला जायचं आहे ना, मग तूच माझी शेपटी उचलून जरा बाजूला कर. आपली वाट मोकळी करून घे अन् जा म्हणजे झालं. तुझी वाट मोकळी होईल अन् मलाही तेवढीच मदत होईल.” त्या म्हाताऱ्या माकडाचे ते बोलणे ऐकले अन् भीम मनातल्या मनातच म्हणाला, ‘हे म्हातारे तर माकड, त्याच्या शेपटीचे वजन ते असे किती असणार? एखादी गवताची काडी ऐवढंच सहज उचलून टाकीन!’ असं म्हणत डाव्या हाताने आपली खांद्यावरची गदा सावरत भीमाने त्या म्हाताऱ्या माकडाची ती शेपटीची उचलण्याचा प्रयत्न केला.

पण छे! एका हाताने काही ती उचलेना. मग भीमाने खांद्यावरची गदा खाली ठेवली. तो दोन्ही हाताने सर्व ताकद लावून ती शेपटी उचलण्याचा प्रयत्न करू लागला.. आता दोन्ही हातांनी शेपटी उचलायचा प्रयत्न करूनही भीमाला काही त्या म्हाताऱ्या माकडाची शेपूट तसूभरही हलेना किंवा त्याला ती इंचभरही वर उचलता येईना. भीमाने आपल्या अंगातील सर्व शक्ती एकवटून शेपटी हलविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, पण छे ! त्याला काही ते जमेना. भीम दमला पार घामाघूम झाला. त्याच्या अंगातून घाम गळाला. पण शेपटी मात्र हलेना.

भीमाने त्या माकडाकडे पाहिले, तर ते वृद्ध माकड मात्र कशी झाली फजिती; अशा आविर्भावात गालांतल्या गालांत भीमाकडे पाहून हसत होते. भीमाला खरं तर मनोमन आपल्या शक्तिसामर्थ्याला हसणाऱ्या त्या माकडाचा राग आला. पण भीम काहीच करू शकत नव्हता, कारण त्याला त्या वृद्ध माकडाची साधी शेपटी हलत नव्हती. अंगातल्या घामाबरोबरच भीमाचा अहंकार, अभिमानही गळाला. त्याच्या विवेकी मनाच्या हे लक्षात येऊ लागले की, वरकरणी सामान्य वृद्ध दिसणारे हे माकड साधे नाही.

तेव्हा भीम हात जोडून विनम्रभावे त्या मर्कटराजास नमस्कार करीत म्हणाला, “महाराज, आपण कोण आहात? मला आपले खरे दर्शन द्या महाराज! मी आपणास अनन्यभावे शरण आलो आहे.” मग अभिमानरहित भीमास ते माकड म्हणाले, “भीमा, मी कोण आहे, हे तुला पाहायचे आहे ना मग पाहा तर….” भीमाने समोर पाहिले, तो काय! त्या वृद्ध माकडाचे जागी भीमाला रामभक्त महाबली श्री हनुमानाचे दिव्य दर्शन झाले. तेव्हा त्या रामभक्ताचे चरण वंदन करीत भीम म्हणाला, “हे बलभीमा, मला क्षमा करा. मला तुमचा बोध कळाला. ह्यापुढे मी कधीही माझ्या शक्तीचा गर्व करणार नाही.” हनुमंताने भीमाला क्षमा केली व आशीर्वाद दिला.

तात्पर्य : कधीही, कुणीही अभिमानी, अहंकार होऊ नये. गर्व करू नये.

Leave a Comment