महादेव ज्योतिरूपाने राहिले तेच हे स्थान भीमाशंकर

बारा ज्योर्तिलिंगापैकी एक क्षेत्र म्हणून भीमाशंकर ओळखले जाते. हे क्षेत्र पुणे जिल्ह्यात आंबेगाव, पेहा व खेड तालुका यांच्या सीमेवर सह्याद्रीत वसले आहे. भीमाशंकर हे ज्योर्तिलिंग मुंबईपासून २४९ कि. मी. असून तळेगावपासून १५० कि. मी. अंतरावर आहे. भीमा नदीचा उगम येथे असून तिला पवित्र नदी मानले आहे. राजगुरुनगर तहसीलमध्ये घोडेगावच्या पुढे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये भवरगिरी, रथाचल, व भीमाशंकर हे पहाड आहेत. या पहाडातील भीमाशंकर पहाडावर हे तीर्थक्षेत्र आहे.

भीमाशंकरला जाणारा घाटातील रस्ता निसर्गरम्य असून हे ठिकाण थंड हवेचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. हे जंगल अभयारण्य असल्यामुळे अनेक वनौषधी मिळतात. भीमाशंकरासंबंधी आख्यायिका आहेत. त्या अशा – रामायण काळात भीम नावाचा महापराक्रमी असा दैत्य होता. हा कुंभकर्ण व कर्कटीचा पुत्र. हा सर्व प्राणिमात्रांना त्रास देत असे.

एकदा त्याने आपल्या आईला कर्कटीला विचारले, ‘माझे वडील कोण व कुठे असतात ? ‘ कर्कटीने भीमाला तिच्यावर झालेल्या अन्यायाची कहाणी सांगितली. ती म्हणाली, ‘पुत्रा ! रावणाचा धाकटा भाऊ कुंभकर्ण त्याचे व माझे प्रेमसंबंध जुळून आले. तो लग्नाचे वचन देऊन व मला भ्रष्ट करुन लंकेला गेला. परंतु राम-रावण युद्धात तो मारला गेला. तोच तुझा बाप.’ दैत्य भीमाला फार वाईट वाटले.

याचा सूड घेतलाच पाहिजे असा निश्चय करुन तपश्चर्या केली. तसा ब्रह्मदेव प्रसन्न झाला आणि त्याने भीमाला वर मागण्यास सांगितले. भीमाने अतुलनीय बळ, शक्ती मागितली.’ ब्रह्मदेव तथास्तु’ म्हणून अंतर्धान पावले. येथे भीम महाबली झाला. त्याने पृथ्वी जिंकून घेतली आणि सर्वांना हैराण करुन सोडले. त्यामुळे देव व ऋषी श्रीभगवान शंकराला शरण गेले.

शंकर प्रसन्न होऊन माजलेल्या महाबली भीमासुराचा व त्याच्या राक्षस सैन्याचा नाश केला. महादेव शंकरांनी दैत्य भीमाचा नाश केला म्हणून त्या ठिकाणी पार्थिक शिवलिंग स्थापन केले आणि त्यात ते ज्योतिरुपाने पृथ्वीवर राहिले. तेच पुढे ‘भीमाशंकर’ स्थान म्हणून प्रसिद्धीस आले. धार्मिक ग्रंथांमध्ये भीमाशंकरचा महिमा गायला आहे. संतांनी गौरव केला.

छत्रपती शिवाजी महाराज, बाळाजी विश्वनाथ पेशवे येथे दर्शनाला येत. रघुनाथरावांनी विहिर खोदल्याचा उल्लेख आहे. हे शिवमंदिर हेमाडपंथी बांधणीचे आहे. उत्कृष्ट कलाकुसर दिसून येते. मंदिराच्या गाभाऱ्याच्या जीर्णोद्धाराचे काम नाना फडणवीसांनी सुरु केले आणि त्यांच्या पत्नीने पूर्ण केले.’ येथील मंडपाचा जीर्णोद्धार अलीकडेच झाला.

मंदिराच्या कटिबंधावर ब्रह्मा, वामन, परशुराम, गणपती इत्यादी देवतांच्या मूर्तीची रांग व दशावतार कोरले आहेत. दर्शनी भागात कोरीव काम पाहावयास मिळते. देवळाच्या प्रांगणात एक मोठी घंटा टांगली आहे. या घंटेचे वजन पाच मण असून मंदिरासमोर शनी मंदिर आहे. या देवस्थानाला सरकारकडून वर्षासन असून काही जमिनीही देवाच्या मालकीची आहे.

देवस्थानांची व्यवस्था वंशपरंपरेने चालत आली आहे. मंदिराच्या आसपास छोटी-मोठी मंदिरे आहेत. साक्षी विनायक व हनुमान मंदिर आहेत. येथील मोक्षकुंडाजवळ एक ज्ञानकुंडही आहे. यात्रेकरु दोन्ही कुंडात स्नान करुन भीमाशंकराच्या दर्शनाला जातात. सोमवारी, श्रावण महिन्यात व शिवरात्रीला येथे भाविकांची गर्दी असते. यात्रेकरु येथे श्राद्धही करतात. महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. आता बऱ्याच उंचीपर्यंत बसची सोय आहे. बस स्थानकापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या आहेत.

Leave a Comment