दधिचींचं दातृत्व

देव आणि दानव ह्यांच्यात पूर्वीपासूनच नेहमी युद्धे होत आली आहेत. त्या युद्धाचं कारण म्हणजेसुद्धा त्यांचं परस्परांतलं वितुष्ट आणि वैरभाव. ह्या देव-दानवांच्या युद्धात कधी देवांचा विजय व्हायचा, तर कधी दानवांचा! कारण दानव सुद्धा पराक्रमी किंवा कमी शक्तिमान नव्हते. उलट त्या राक्षसांना आपल्या शक्ती-सामर्थ्याचा अंदाज असायचा; म्हणूनच की काय ते राक्षस ब्रह्मा, विष्णू किंवा महेश ह्यांच्यासारख्या देवतांची कठोर तपसाधना करून, त्यांना प्रसन्न करवून घेऊन त्यांच्याकडून वेगवेगळे वर प्राप्त करून घेत. त्यामुळे त्यांच्या शक्ती-सामर्थ्यात आणखीनच भर पडत असे.

असाच एक वरप्राप्तीने मातलेला राक्षस म्हणजे ‘त्रिपुरासुर’. ह्या त्रिपुरासुराने कठोर तप करून आपल्या प्रसन्न झालेल्या देवतेकडून असा वर मिळविला होता की, “सध्या स्वर्गलोक, मृत्युलोक किंवा पाताळलोक ह्या कोणत्याही लोकी उपलब्ध असणाऱ्या कोणत्याही अस्त्र अथवा शस्त्राने माझा मृत्यू होऊ नये.” किती धूर्त अन् चाणाक्ष, कावेबाज होती ही वर मागणी! पण काय करणार? त्याने तप केले.

देवता प्रसन्न झाली. काय हवे ते माग म्हणाली. त्याने धूर्त मागणी केलीय, हे कळत असूनसुद्धा शेवटी ‘तथास्तु’ असे म्हणावेच लागले. आता आपल्याला कोणत्याच अस्त्र-शस्त्राने मृत्यू नाही, आता आपल्याला कुणीच देव-देवता मारू शकत नाही; मृत्यू आपल्या आसपासही फिरकणार नाही, याची खात्री होताच; तो असुर इतका उन्मत्त, अधर्मी, अत्याचारी झाला की, त्याने सर्वत्र एकच हाहाकार करून टाकला. सारे त्रिभुवन त्याच्या भयाने थरथर कापू लागले. साधू-सज्जन, ऋषी-मुनी, देव-देवता यांना त्रास देणे, यज्ञ-याग, होम-हवन बंद पाडणे, धार्मिक कृत्यांचा विध्वंस करणे असा धुडगूस घालून त्याने सर्वांनाच सुखासमाधानाने जगणे अशक्यच करून टाकले.

जेव्हा ह्या त्रिपुरासुराचा त्रास फारच वाढला सहनशक्तीची सीमा संपली, तेव्हा ऋषीगण, देवदेवता-मानव हे सर्व जण भगवान महाविष्णूंना शरण गेले. त्यांनी उन्मत्त त्रिपुरासुराच्या पाशवी कृत्यांचा पाढा त्यांच्यापुढे वाचला. “देवा, आता आपणच काही तरी करा. ह्या दुष्ट त्रिपुरासुराचा वध करा अन् सर्वांचं रक्षण करा,” अशी त्यांनी नारायणांना कळकळून विनंती केली. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, “हे पाहा, हा असुर मातला आहे; कारण त्याला आता स्वत:च्या मृत्यूचं भय राहिलेलं नाही.

त्याला मारू शकेल, असं एकही शस्त्र किंवा अस्त्र आजतरी ह्या त्रिभूवनात उपलब्ध नाही…. त्यामुळेच…..” “म्हणजे भगवान! हा राक्षस कधीच मरणार नाही का? त्याचा वध करेल असं एखादं अस्त्र-शस्त्र तयार करता येणार नाही का?” त्रिपूरासूराच्या त्रासाने त्रस्त झालेल्या त्या सर्वांनी एकदमच विचारणा केली… तेव्हा भगवान म्हणाले, “पृथ्वीवर सध्यातरी त्या असुराला मारू शकेल, असे एकही अस्त्र नाही. बरं, पाताळलोकीच्या बळीराजाने पण देवांचा पराभव केल्यावरआपली सर्व अस्त्र-शस्त्रे ही दधिची ऋषींच्या कमंडलूमध्ये लपवून ठेवली आहेत. कमंडलूतल्या पाण्यात आपली अस्त्रे सुरक्षित राहतील, म्हणून देवांनी ती तिथं लपवली खरी.

पण झालं काय, की दधिची ऋषींनी कमंडलूतील सर्व पाणी पिऊन टाकले आहे. आता देवाची अस्त्र-शस्त्रेसुद्धा दधिची ऋषींच्या पोटात गेली आहेत. त्यांनी आपल्या शक्तिसामर्थ्याच्या बळावर ती सर्व अस्त्रे पचवून टाकली आहेत. त्यामुळे आता तुमच्या आमच्यापुढे फक्त एकच मार्ग तेवढा उरला आहे, अन् तो म्हणजे- ” “देवा, सांगा ना!” भगवान विष्णू त्यांना म्हणाले, “तुम्ही असं करा, तुम्ही सर्व जण दधिचीऋषींकडे जा. त्यांच्याकडे तुम्ही त्यांच्या अस्थी म्हणजेच हाडे मागा. त्यांनी जर त्यांची वज्राप्रमाणे कठोर अशी हाडे दिली, तर त्या हाडांपासून आपल्याला एक नवे अस्त्र बनवता येईल. त्या नव्या अस्त्रानेच आपल्याला मग त्या त्रिपुरासुराचा वध करता येईल.”

झालं! भगवंतांनी तर मार्ग तर दाखवला आणि मग काय सर्व देव-देवता, ऋषीमुनी देवगण अन् जनता हे दधिचीऋषींच्या आश्रमात गेले. ही मंडळी तिथे पोहोचली, त्या वेळी दधिचीऋषी ध्यान लावून बसले होते. त्यांना ध्यानमग्न पाहून सर्व मंडळी तिथे शांतपणे बसून राहिली अन् मनोमन त्यांनी त्यांची स्तुती सुरू केली. आता एखाद्याची हाडे मागायची म्हणजे काय! दधिची ऋषींनी क्षणभर डोळे मिटले. त्यांच्या चेहऱ्यावर मंद हास्यरेषा उमटली. ते म्हणाले, “अरे एवढंच ना, मग चिंता का करता? अशा रूपाने माझं जीवन, माझा देह, माझी हाडे ही जर देवकार्यासाठी अन् त्रिभुवनरक्षणासाठी उपयोगी पडणार असतील; तर त्याहून दुसरं ते भाग्य काय? हे एक पुण्यकर्मच जर ठरणार असेल, तर मी लगेच तयार आहे.”

ऋषी केवळ बोलून थांबले नाहीत; तर त्यांनी लगेच पद्मासन घातले, प्राण कोंडला अन् विष्णू स्मरणाबरोबरच ते अनंतात विलीन झाले. सर्व देवांनी त्यांना विनम्रभावे वंदन केले अन् त्यांची हाडे घेऊन देव विष्णूंकडे गेले. दधिचींच्या हाडापासून ‘सुनाभ’ नावाचे एक नवं अस्त्र तयार करण्यात आलं. पुढे त्या नवनिर्मित अस्त्रानेच त्या त्रिपुरासुराचा वध करण्यात आला. दधिचींच्या दातृत्वाची ही कथा पुराणात नोंद झाली.

तात्पर्य : आपला देह हा सत्कारणी कसा लागेल, ह्याचाच प्रत्येकाने विचार करायला हवा.

Leave a Comment