एक पवित्र दत्तक्षेत्र गाणगापूर

श्री गाणगापूर क्षेत्र श्री नरसिंह सरस्वतींनी आपल्या तेवीस वर्षाच्या वास्तव्याकरिता निवडले. श्री नरसिंह सरस्वती वाडीहून या गावी आले. त्यांना दत्तावतार समजले जाते. त्यामुळे त्यांच्या प्रदीर्घ निवासाने या क्षेत्राचे महत्त्व अधिकच वाढले. गावापासून दीड-दोन कि. मी. अंतरावर, भीमा-अमरजा या दोन नद्यांचा संगम आहे.

श्री नरसिंह सरस्वती सुरुवातीला या संगमावर राहात असत. तेथे ते नित्य स्नान करीत. कालांतराने गावाच्या मध्यभागी एक मठ बांधण्यात आला आणि मग श्री नृसिंहसरस्वती या मठात राहू लागले. त्यांच्या पादुका याच मठात ठेवलेल्या आहेत. या पादुकांना निर्गुण पादुका म्हटले आहे. मठातील पादुकांच्या गाभाऱ्याला द्वार नाही.

चांदीने मढविलेल्या एका लहान झरोक्यातून भक्तांना पादुकांचे दर्शन घ्यावे लागते. या पादुका सुट्या आणि चल आहेत. त्या चांदीच्या दोन संपुष्टामध्ये ठेवलेल्या असतात. त्यातून त्या बाहेर काढल्या जात नाहीत. पूजेच्या वेळी, संपुष्टाची झाकणे काढली जातात. नंतर त्या पादुकांना अष्टगंध आणि केशराचा लेप दिला जातो. नंतर सर्व पूजोपचार ताम्हणामध्ये सोडून देतात.

पादुकांना जलाभिषेक केला जात नाही. दर गुरुवारी पालखी निघते. येथे दोन उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. त्यातील एक श्रीनृसिंह सरस्वतींची पुण्यतिथी होय. संगमाजवळ एक लहानशी टेकडी असून ती भस्माने बनली आहे. भगवान परशुरामाने या ठिकाणी मोठे यज्ञ केले. त्या यज्ञातील विभूतीने झालेली ही टेकडी असं पुराणांत म्हटले आहे. ही विभूती यात्रेकरु घरी घेऊन जातात.

या विभूतीने आपले मनोरथ पूर्ण होतात अशी यात्रेकरूंना श्रद्धा आहे. येथील संगमेश्वर मंदिर भीमा-अमरजा नद्यांच्या संगमाजवळ आहे. हे जागृतस्थान असून श्री नरसिंह सरस्वतींनी शुष्क काष्टातून जे औदुंबर पल्लवित केले तो वृक्ष या मंदिरासमोर आहे. येथील संगमावर स्नान झाल्यानंतर प्रथम संगमेश्वराचे दर्शन घेऊन मग यात्रेकरु निर्गुण पादुकांच्या दर्शनाला जातात.

संगमेश्वराच्या मंदिरासमोर असणारे झाड हे श्रीनृसिंह सरस्वतींनी केलेल्या असंख्य लीलापैकी एक मानले जाते. झाडाखाली भक्तमंडळी गुरुचरित्र पारायण करतात. श्रीनृसिंह सरस्वतींनी आपल्या पवित्र स्पर्शाने पावन झालेला हा कट्टा संगमाकडे जाताना एका शेताला लागून आहे. स्वामी या कट्यावर विश्रांती घेत म्हणून याला विश्रांतीकट्टा’ असे नांव झाले आहे.

आजही श्रीनृसिंह सरस्वती गुप्तरुपाने सरस्वती संगमावर जातात आणि या कट्ट्यावर विश्रांती घेतात, अशी श्रद्धा आहे. श्री गाणगापूर क्षेत्रात माधुकरीचे माहात्म्य मोठे आहे. माधुकरीचे माहात्म्य दत्त संप्रदायातील भक्तांनी चालवण्याचे कारण म्हणजे माधुकरी हे विदेहवृत्ती व निस्पृहता याचे द्योतक आहे. स्वत: श्रीनृसिंह स्वामी माध्यान्ह काळी गाणगापूर ग्रामी माधुकरीची भिक्षा घेण्यास जात असत.

भाविकांची अशी श्रद्धा आहे की, अजूनसुद्धा मध्यान्हकाळी श्रीनृसिंह सरस्वती माधुकरी मागण्यास गुप्तरुपाने घरी येतात. निर्गुण पादुका श्रीक्षेत्र गाणगापुराचा आत्मा आहे. भक्तांच्या आग्रहावरुन आपल्या वतार समाप्तीच्यावेळी नरसिंह सरस्वतींनी ठेवलेल्या पादुका श्री नृसिंह सरस्वतींच्या अस्तित्वाचे द्योतक आहे. भीमा नदीत केळीच्या पानावर आरुढ झालेले श्रीनृसिंह सरस्वती अंतर्धान पावले आणि सारे भक्त मंदिराकडे वळले. तेव्हा निर्गुण पादुकांच्या स्थानी प्रत्यक्ष नृसिंह सरस्वती विराजमान असलेले दृश्य भक्तांनी पाहिले.

निर्गुण पादुकांची श्रद्धापूर्वक भक्ती केल्याने दुःखे, दैन्य व संकट दूर झाली आहेत असा अनुभव भक्तांना आहे. श्री च्या निर्गुण पादुकांस स्पर्श करण्यास सक्त मनाई आहे. गाणगापूरच्या परिसरात आणि संगमापासून गावापर्यंत आठ तीर्थे आहेत. या अष्टतीर्थांतील स्नानाचे पुण्य त्रिस्थळी यात्रेच्या पुण्याइतके मानले जाते. नित्यक्रमाचे तीन भाग आहेत.

पहाटे तीन वाजता काकड आरती होते. नंतर महापूजा, विसर्जन, अभिषेक निर्गुण पादुकांना कस्तुरीलेपन, औदुंबर, अश्वत्थ, नरसिंह देवतांची पूजा, आरती, तीर्थ पंचामृत वितरण, मध्यान्हकाळी आरती, नैवेद्य व माधुकरी मागणे. संध्याकाळी पूजा, आरती, नित्यस्तोत्र, मंत्रपुष्प, विडा व शेजारती. प्रत्येक दिवशी पालखी असते. वार्षिक उत्सव होतात. गाणगापूर गुलबर्यापासून ४० कि. मी. तर मुंबई-रायचूर लोहमार्गावर सोलापूरपासून ८५ कि. मी. अंतरावर गाणगापूर स्थानक आहे.

Leave a Comment