दिवाळी माहिती, कथा, इतिहास । Diwali Information in Marathi

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला दिवाळी या सण विषयी माहिती | Diwali Information in Marathi देणार आहे. तर मित्रांनो दिवाळी हा सण पाच दिवसाचा असतो त्या मध्ये धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज हे पाच दिवस असतात. तर आपण प्रत्येक दिवस माहिती, कथा आणि इतिहास काय आहे ते या एकाच पोस्ट मध्ये बघणार आहोत तर चला बघुयात.

आणखी वाचा – कोजागरी पौर्णिमा

धनत्रयोदशी । Diwali Information in Marathi

धनत्रयोदशी । Diwali Information in Marathi

‘दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे म्हणतात ते अगदी खरे आहे. भारतीयांचा अत्यंत आनंदाचा मोठा सण म्हणजे दिवाळी. दिवाळी सगळ्यांची, लहानथोरांची, गरीब-श्रीमंतांची, चार दिवस गोड गोड खायचे. हौस-मौज करायची. घरदार स्वच्छ करायचे. रंगवायचे, सजवायचे. भल्या पहाटे अभ्यंगस्नान करायचे. नवीन कपडे घालायचे. फटाक्यांचा धडाका सुरू करायचा, आश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया असे दिवाळीचे चारपाच दिवस मोठ्या आनंदाचे, उत्साहाचे असतात.

आश्विन वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी असे म्हणतात. या दिवशी यमाला प्रसन्न करावयाचे असते. यासाठी दीपदान करतात. या दिवशी संध्याकाळी पणतीत तेलवात घालन व ती प्रज्वलित करून ती दक्षिणेकडे तोंड करून ठेवावयाची असते. दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली आहे. यालाच यमदीपदान म्हणतात. त्यामुळे यमराज प्रसन्न होतो. घरात लक्ष्मी नांदते. सर्व सुखांचा लाभ होतो. त्याचप्रमाणे घरांवर, मंदिरांवर, उंच जागी तेलाचे दिवे लावले जातात. घरातील अलंकार, नाणी स्वच्छ करतात.

या दिवशी संध्याकाळी विष्णू, कुबेर, गणेश, नाग व द्रव्यनिधी यांची पूजा करावयाची असते. अखंड दीप तेवत ठेवतात. आपल्या. संस्कृतीत लक्ष्मीला आई समजून तिला पूजनीय, वंदनीय मानले आहे. म्हणून या दिवशी लक्ष्मीला प्रार्थना करावयाची असते. हे धनदेवते, तू आमच्यावर सदैव कृपा कर. तुला स्वच्छतेची आवड आहे. आम्ही आमचे घर व मन स्वच्छ केले आहे. आता तू आमच्या घरात सदैव राहा. आम्हाला सुखी कर. यमाची भीती सर्वांनाच वाटते. त्याला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी दीपदान करतात. एकदा यमाने आपल्या दूतांना विचारले – ‘तुम्ही माझ्या आज्ञेचे पालन करण्यासाठी पृथ्वीवर जाता.

ते काम मोठे कष्टाचेच असणार. आपण खूप दिवस जगावे असे सर्वांनाच वाटते. मरण कुणालाच आवडत नाही. तेव्हा लोकांचे प्राण हरण करताना तुम्हाला दुःख होत असेल ना?’ यमदूतांनी होय म्हटले व यावर उपाय काय म्हणून विचारले. तेव्हा यम म्हणाला – ‘धनत्रयोदशीला जो दीपदान करील, घरीदारी दिवे लावील त्याला अपमृत्यू येणार नाही. या दिवशी यमदीपदान का करतात यासंबंधी एक गोष्ट आहे – पूर्वी हैम नावाचा एक राजा होता. सर्व प्रकारचे ऐश्वर्य असूनही त्याला पुत्र नसल्यामुळे तो अतिशय दुःखी होता.

पुष्कळ नवस-सायास केल्यानंतर त्याला एक पुत्र झाला. राजाने पुत्रप्राप्ती झाल्याबद्दल मोठा आनंदोत्सव केला. परंतु षष्ठीदेवीने त्या राजपुत्राचे भविष्य सांगितले – ‘हा मुलगा लग्नानंतर चारच दिवसांनी मरण पावेल.’ ही भविष्यवाणी ऐकताच राजाला मोठी चिंता वाटू लागली. राजाने आपल्या पुत्राच्या रक्षणासाठी यमुनानदीच्या डोहात एक मजबूत प्रासाद बांधला. प्रासादाभोवती रक्षक ठेवले. काही दिवसांनी राजपुत्राचा मोठ्या थाटात विवाह झाला. विवाह झाल्यावर राजपुत्र आपल्या पत्नीसह त्या प्रासादात राहावयास गेला. परंतु चारच दिवसांनी राजपुत्राला अचानक मृत्यू आला.

सगळे लोक दुःखाने आक्रोश करू लागले. त्या राजपुत्राचे प्राण घेऊन जाणारे यमदूतसुद्धा रडू लागले. यमाला हे समजले तेव्हा त्याला सुद्धा अतिशय वाईट वाटले. तेव्हा तो म्हणाला – ‘जे लोक आश्विन वद्य त्रयोदशीला मला दीपदान देतील आणि प्रदोष काळी दीपोत्सव करतील त्यांना मी असा अकाली मृत्यू येऊ देणार नाही.’ यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान करावयाचे असते. सगळीकडे दिवे लावावयाचे असतात. आपल्या संस्कृतीत दिव्याला फार महत्त्व आहे. दीप म्हणजे आनंद, उत्साह, प्रसन्नता. मांगल्य, पावित्र्य, दुर्वासनांचा नाश. हे सगळे लक्षात घेऊन हा सण साजरा केला तरच आपल्या जीवनात खरा आनंद येईल.

नरक चतुर्दशी । Diwali Information in Marathi

नरक चतुर्दशी । Diwali Information in Marathi

आश्विन वद्य चतुर्दशी या दिवसाला नरक चतुर्दशी असे म्हणतात. दिवाळी सणातील हा अत्यंत महत्त्वाचा दिवस. या दिवशी नरकासुराचा वध झाला. जगावरील एक मोठे संकट दूर झाले. या आनंदोत्सवानिमित्त दीपोत्सव करावयाचा असतो. या दिवशी घरातील सर्वांनी भल्या पहाटे उठून सुगंधी तेल, उटणे लावून गरम पाण्याने स्नान करावयाचे असते. नंतर घरातील देवांची मोठ्या थाटात षोडशोपचारे पूजा करावयाची असते.

देवाला पंचामृत स्नान घालून अभ्यंगस्नान घालायचे. दिवाळीसाठी केलेल्या फराळाचा देवाला नैवेद्य दाखवावयाचा मग सर्वांनी फराळ करायचा असतो. या दिवशी नवीन, स्वच्छ कपडे घालायचे. फटाके उडवायचे. नरकासुर ठार झाला म्हणून आनंदोत्सव करावयाचा. नरकासुराचे प्रतीक म्हणून कारीटीचे फळ पायाखाली तुडवावयाचे असते. या दिवशी संध्याकाळी नरकासुराच्या नावाने चार वातींचा दिवा लावून मग सगळीकडे दिवे लावावयाचे असतात. संध्याकाळी घरातील मुख्य पुरुषाने एक चूड पेटवून आपल्या कुळातील पितरांना मार्ग दाखवावयाचा असतो.

ज्यांना अग्निसंस्कार मिळालेला नाही ते या चुडीच्या प्रकाशाने उद्धरून जातात अशी समजूत आहे. नरकासुर कोण होता, श्रीकृष्णाने त्याला ठार का मारले? नरकासुर हा प्राग्ज्योतिषपूरचा राजा होता. तो अत्यंत बलाढ्य तितकाच महादुष्ट होता. देशात आणि देशाबाहेर त्याने मोठा धुमाकूळ घातला होता. देव-मानवांचा तो छळ करीत असे. त्यांच्या हजारो सुंदर मुली त्याने पळवून नेल्या. एकूण सोळा हजार मुलींना त्याने कारागृहात ठेवले होते. त्यांची तो विक्री करणार होता. त्याने इंद्राचा दिव्य मुकुट पळवून नेला. इंद्रमाता अदितीची कुंडले हिरावून नेली. नरकासुर उन्मत्त झाला होता.

स्वर्गलोक बळकाविण्याचा त्याचा बेत होता. त्याची सेना प्रचंड होती. सगळे देव हतबल झाले होते. संत-सज्जनांचे रक्षण व दुष्टदुर्जनांचे निर्दालन हे आपल्या अवताराचे ध्येय मानणाऱ्या श्रीकृष्णाने आपली सेना सज्ज केली. नरकासुराचा वध करण्याचा त्याने निश्चय केला. तो गरुडावर आरूढ झाला. त्या वेळी “मी सुद्धा तुमच्याबरोबर येणार” असा सत्यभामेने हट्ट धरला. स्त्रीबरोबर युद्ध केल्याशिवाय नरकासुराला मरण येणार नाही, अशी भविष्यवाणी असल्यामुळे श्रीकृष्णाने सत्यभामेला आपल्या बरोबर घेतले. श्रीकृष्ण आपल्या सेनेसह नरकासुराच्या नगराजवळ आला. त्याने त्या नगराला वेढा घातला. एकाएकी युद्धाचा धडाका सुरू झाला. दोन्हीकडून बाणांचा, शस्त्रास्त्रांचा वर्षाव सुरूं झाला. श्रीकृष्णाने हातात शारंगधनुष्य घेतले होते.

त्या वेळी सत्यभामा श्रीकृष्णाला म्हणाली, ‘ते धनुष्य मला द्या. आज या दैत्याशी मी युद्ध करते.’ श्रीकृष्णाने ते धनुष्य सत्यभामेला दिले. ती नरकासुरावर बाणांचा वर्षाव करू लागली. सत्यभामेला पाहताच नरकासुर लटपटला. गोंधळला. तो श्रीकृष्णाला म्हणाला, ‘तू स्वतःला मोठा रणवीर समजतोस आणि स्त्रीला युद्ध करावयास लावतोस. तुला याची लाज कशी वाटत नाही!’ त्याच क्षणी श्रीकृष्णाने सत्यभामेला पाठीशी घालून नरकासुराबरोबर प्रचंड युद्ध सुरू केले. खवळलेल्या नरकासुराने श्रीकृष्णावर वज्रास्त्र सोडले. मग मात्र श्रीकृष्णाने हातात सुदर्शनचक्र घेतले. त्याच्या तेजाने सगळे विश्व भरून गेले. श्रीकृष्णाने ते चक्र सोडताच एका क्षणात त्याने नरकासुराचे मस्तक उडविले. आश्विन वद्य चतुर्दशीच्या दिवशी रात्रीच्या तीन प्रहरी चंद्रोदय होताच श्रीकृष्णाने नरकासुराला ठार मारले.

सगळीकडे आनंदी आनंद झाला. सोळा हजार मुली नरकासुराच्या बंदीवासातून मुक्त झाल्या. लोकांनी दीप लावले. चौघडे वाजविले. ‘दरवर्षी या प्रसंगी जे लोक अभ्यंगस्नान करणार नाहीत ते जन्मोजन्मी अत्यंत दरिद्री होतील,’ अशी त्या वेळी आकाशवाणी झाली. मरताना नरकासुराने श्रीकृष्णाकडे वर मागितलाः “आजच्या या तिथीला जो मंगलस्नान करून दिवे लावील त्याला नरकाची पीडा होऊ नये.” श्रीकृष्णाने तो वर दिला. ही घटना घडली आश्विन वद्य चतुर्दशीला भल्या पहाटे. शत्रूच्या रक्ताचा टिळा लावून श्रीकृष्ण आपल्या घरी परत आला. त्या वेळी त्याला मंगलस्नान घातले व ओवाळले.

श्रीकृष्णाच्या या विजयाची आठवण म्हणून आपण नरक चतुर्दशी हा सण साजरा करतो. आपले सगळे सण-उत्सव नुसते गोडगोड खाण्यासाठी, मौजमजा करण्यासाठी नाहीत. ते आपल्या मनावर चांगले संस्कार करीत असतात. आजसुद्धा आपल्या समाजात दुष्ट-दुर्जन लोक दुर्बलांना, गोरगरिबांना त्रास देतात. त्यांची फसवणूक करतात. अशा वेळी मला काय त्याच्याशी कर्तव्य, असे न म्हणता आपणही अशा गोरगरिबांचे रक्षण केले पाहिजे, त्यांना आधार दिला पाहिजे. नरक चतुर्दशी हा सण आपणास हेच शिकवीत नाही का?

लक्ष्मीपूजन । Diwali Information in Marathi

लक्ष्मीपूजन । Diwali Information in Marathi

आश्विन अमावास्या हा दिवाळीच्या सणातील तिसरा दिवस. या दिवशी लक्ष्मीपूजन करावयाचे असते. या दिवशी भगवान विष्णूने कुबेरादी देवांना बलीच्या बंधनातून मुक्त केले व तो क्षीरसागरात जाऊन सुखाने झोपला. याची आठवण म्हणून या दिवशी संध्याकाळी सर्वांनी लक्ष्मीपूजन करावयाचे असते. या दिवशी लक्ष्मीपूजन केल्यामुळे आपल्या घरी लक्ष्मी सदैव नांदते. दुःख, दारिद्र्य यांची बाधा होत नाही अशी श्रद्धा आहे. या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या अगोदर लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी हिची पूजा करावयाची असते.

देव-दानवांनी अमृतप्राप्तीसाठी समुद्रमंथन केले. त्या वेळी लक्ष्मीसह चौदा रत्ने वर आली. तथापि लक्ष्मी वर येण्याअगोदर अलक्ष्मी एमटातून वर आली. अलक्ष्मी म्हणजे दारिद्र्य. ‘मी कुठे राहू?’ असे अलक्ष्मीने विचारले असता ‘ज्या घरात सतत कलह-भांडण चालू असते, अभक्ष्यभक्षण, मद्यपान, गुरू, देव, अतिथी यांचा अपमान, असत्य भाषण, जुगार व अधामिक राष्टिा चालत असतील त्या घरात तू निवास करावास’ असे तिला सांगण्यात आले. ही लक्ष्मीची अकाबाई आपल्या घरी येऊ नये म्हणून केरसुणीची पूजा करावयाची व नंतर लक्ष्मीची पूजा करावयाची असते.

या दिवशी संध्याकाळी घरात सुशोभित केलेल्या ठिकाणी लक्ष्मी, विष्णू, इंद्र व कुबेर यांची पूजा करावयाची असते. सगळीकडे दिवे लावावयाचे. धने, गूळ, साळीच्या लाह्या व बत्तासे यांचा लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखवावयाचा व तो सर्वांना वाटावयाचा असतो. या दिवशी लक्ष्मी आपल्या घरी येणार म्हणून रात्री जागरण करावयाचे असते. मध्यरात्री सुपे व दिमडी वाजवून अलक्ष्मीला म्हणजे दारिद्र्याला हाकलून लावावयाचे असते.

आपल्या घरातील, चालण्याबोलण्यातील, विचारातील अशुभ, अमंगल गोष्टींना घालवून द्यावयाचे असते. या दिवशी रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करीत असते व आपल्या निवासासाठी योग्य ठिकाण शोधते. जेथे आनंद आहे, शोभा आहे, पावित्र्य आहे त्या घरात ती प्रवेश करते. म्हणून तिच्या स्वागतासाठी आपले घर नीटनेटके, पवित्र, स्वच्छ ठेवावयाचे असते व लक्ष्मीदेवीचे मोठ्या प्रेमाने व भक्तिभावाने स्वागत करावयाचे असते. हा सण व्यापारी लोकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी संध्याकाळी व्यापारी लोक जमाखर्चाच्या वह्यांची पूजा करतात.

या दिवशी बाजारपेठेत मोठे आनंदाचे, उत्साहाचे वातावरण असते. सगळी दुकाने सजलेली असतात. तोरणे, फुलांच्या माळा लावलेल्या असतात. रोषणाई केलेली असते. व्यापारी लोक आपल्या जमाखर्चाच्या नव्या वह्या तयार करून त्यावर तांबड्या गंधाने स्वस्तिक काढतात. त्याच्या पुढे शाईने कार्तिक शुद्ध प्रतिपदेची तिथी, वार, नक्षत्र, शक, संवत लिहून शेवटी शुभमस्तु असे लिहितात. या वह्यांची म्हणजेच सरस्वतीची पूजा करावयाची असते.

या वह्यांवर लक्ष्मी-सरस्वतीची प्रतीके म्हणून सोन्याचांदीची नाणी ठेवतात. किंवा एका ताम्हणात तांदूळ पसरून त्या पूर्णपात्रावर लक्ष्मी, सरस्वतीच्या मूर्ती किंवा प्रतिमा ठेवून त्यांची पूजा करतात. याचबरोबर लेखनसाहित्याची व कुबेराची (चांदीचे नाणे) पूजा करावयाची असते. पूजा झाल्यावर निमंत्रितांना पानसुपारी-प्रसाद दिला जातो. रात्री जागरण करून मध्यरात्री उत्तरपूजा करून देवांचे विसर्जन केले जाते. व्यापारात भरभराट व्हावी अशी प्रार्थना लक्ष्मीला व सरस्वतीला यावेळी सर्वजण करतात.

बलिप्रतिपदा । Diwali Information in Marathi

बलिप्रतिपदा । Diwali Information in Marathi

कार्तिक शुद्ध प्रतिपदा या दिवसाला बलिप्रतिपदा असे म्हणतात. याला गोवर्धन प्रतिपदा, दिवाळी पाडवा असेही म्हटले जाते. प्रसिद्ध साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहूर्त दिवस दिवाळीच्या सणातील हा महत्त्वाचा दिवस, व्यापाऱ्यांच्या नवीन वर्षाचा प्रारंभदिन. विक्रम संवताचा प्रारंभ या दिवशी होतो. विक्रमादित्याला याच दिवशी राज्याभिषेक करण्यात आला. त्या दिवशी दीपोत्सव करण्यात आला. पुढे दर वर्षीच तो करण्याची चाल पडली. अत्यंत दानशूर, बलाढ्य व दानी अशा रजा बळीच्या बंधनातून सर्वांना वामनरूप विष्णूने मुक्त केले. बलीचे दातृत्व पाहून वामन म्हणाला, ‘तुझे दातृत्व पाहून मी संतुष्ट झालो आहे. मी तुला पाताळलोकाचे राज्य देतो आणि तुझ्यासारख्या अलौकिक दात्याची सेवा करण्यासाठी मी तुझा द्वारपाल होतो.

यापुढे कार्तिक शुद्ध प्रतिपदेला लोक बलिप्रतिपदा म्हणतील व दीपोत्सव करतील. शेतकरी तुझी पूजा करतील.’ बलिराजा देवांचा शत्रू होता. त्याच्या राज्यात प्रजा सुखी होती. शेतकरी सुखसंपन्न होते असा बलिराजा पाताळात गेला तरी त्याची स्मृती कायम राहावी म्हणून शेतकरी या दिवशी बलिराजाची पूजा करतात. त्याचे प्रतीक म्हणून आपल्या गोठ्यात शेणाचाच बली तयार करून त्याची पूजा करतात. पूजा करताना बलिराज नमस्तुभ्यं दैत्यदानववंदित । इंद्रशत्रोऽमराराते विष्णुसानिध्यदो भव ।। असे बलीचे ध्यान करतात. ही चाल आजही देशावर आहे. हा दिवस अत्यंत शुभ असल्यामुळे या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी करतात. व्यापारी लोक आपल्या जमाखर्चाच्या नवीन वह्या सुरू करतात.

या दिवशी सार्वजनिक कामांना प्रारंभ करतात. नवीन दुकान, कारखाना, नवीन शाळा, नवीन घर यांचे उद्घाटन या दिवशी केले जाते. या दिवशी सुवासिनी स्त्री आपल्या पतीला ओवाळते व पती आपल्या पत्नीला यथाशक्ती नवीन वस्त्र, अलंकार इत्यादींची ओवाळणी घालतो. रात्री बलिपूजन करून दीपदान करतात. रात्री गायन-वादन, बैठे खेळ करून दिवाळीचा आनंदोत्सव साजरा करतात. याच दिवशी श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून गोकुळाचे रक्षण केले. म्हणून या दिवसाला गोवर्धन प्रतिपदा असे म्हणतात. इंद्र हा मेघांचा राजा. त्याच्या कृपेने पाऊस पडतो. शेती पिकते.

गाईगुरांना चारा मिळतो. अशा समजुतीने गोकुळातील लोक दरवर्षी इंद्राचा उत्सव करीत. इंद्राच्या नावाने यज्ञ करीत असत. श्रीकृष्णाने सर्वप्रथम याविरुद्ध बंड केले. त्याने गोपाळांना सांगितले, पाऊस पडतो तो निसर्गाच्या नियमाने. पर्वतामुळे. पर्वतांवरील वृक्षांमुळे. त्यात इंद्राच्या कृपेचा काहीएक संबंध नाही. आपल्याला धान्य मिळते. पाणी मिळते. गुरांना चारा मिळतो तो पर्वतांमुळेडोंगरांमळे. म्हणून आपण इंद्राची पूजा न करता आपल्या या गोवर्धन पर्वताची पूजा करूया. श्रीकृष्णाचे हे बोलणे सगळ्यांनी मान्य केले.

गोकुळातील इंद्रपूजा बंद झाली. आपला उत्सव श्रीकृष्णाने बंद पाडला आहे. त्याने सगळ्या गवळ्यांना आपल्याविरुद्ध फितविले आहे हे इंद्राला समजले. त्याला अतिशय राग आला. त्याने आपल्या प्रलयंकारी मेघांना आज्ञा केली – गोकुळावर प्रचंड वृष्टी करा. गोकुळ बुडवून टाका.” त्या वेळी शरद ऋतू असतानाही गोकुळावर मुसळधार पाऊस पडला. नदी-नाल्यांना प्रचंड पूर आले. गोकुळ पाण्यात बुडू लागले. आपण या कृष्णाच्या नादाला लागून नको ते करून बसलो. आता तोच आपले रक्षण करील, असा विचार करून सगळे गोकुळ वासी लोक श्रीकृष्णाला शरण गेले. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, घाबरू नका.

संकटाला डगमगू नका. आपण सगळेजण हा गोवर्धन पर्वत उचलू व गोकुळाचे रक्षण करू. असे म्हणून श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून आपल्या करांगुलीवर धरला. सगळ्या गोपाळांनी आपल्या काठ्यांचा त्या पर्वताला टेकू दिला. मग सगळे गोकुळवासी लोक आपल्या गाईगुरांसह त्या पर्वताखाली आले. सगळे गोकुळ सुरक्षित राहिले. इंद्राचा गर्व गेला. पाऊस थांबला. सगळे गोकुळ आनंदाने नाचू लागले.

गोवर्धनच आपला रक्षणकर्ता. श्रीकृष्णच आपला परमेश्वर अशी गोकुळजनांची खात्री पटली. त्या वेळी गोकुळात मोठा उत्सव होता. ही घटना घडली कार्तिक शुद्ध प्रतिपदा या दिवशी. या घटनेची आठवण म्हणून या दिवशी खेडेगावात पर्वतपूजा करतात. शेणाचा गोवर्धन बनवितात. गोकुळ तयार करतात व आनंदोत्सव साजरा करतात. कितीही मोठे संकट आले तरी धीर न सोडता त्या संकटाला सामोरे गेले पाहिजे. भाकड गोष्टींवर विश्वास ठेवू नये. जीवनात यशस्वी व्हावयाचे असेल तर संघटना, संघशक्ती आवश्यक आहे. कोणत्याही कार्याला समाजातील सर्वांनी हातभार लावला पाहिजे हाच या सणाचा संदेश आहे.

भाऊबीज । Diwali Information in Marathi

भाऊबीज । Diwali Information in Marathi

कार्तिक शुद्ध द्वितीया हा दिवस यमद्वितीया म्हणून प्रसिद्ध आहे. यालाच भाऊबीज असे म्हणतात. बहीण-भाऊ यांच्या पवित्र, निःस्वार्थी प्रेमाची आठवण करून देणारा हा दिवस. लग्न होऊन परगावी गेलेली बहीण या दिवशी आपल्या भावाला घरी बोलाविते. त्याला तेल लावून मंगलस्नान घालते. आपल्या भावाचे आयुष्य वाढावे, त्याला सुखसमृद्धी प्राप्त व्हावी यासाठी त्याला औक्षण करते. म्हणजे ओवाळते. गोड गोड पदार्थ करून त्याला जेवावयास वाढते. भाऊ आपल्या बहिणीला वस्त्रअलंकार किंवा पैसे ओवाळणी म्हणून घालतो. आपल्या भावाने सामान्य जीवन जगून आयुष्य फुकट घालवू नये, त्याने सन्मार्गाने जावे, जीवनात काही पराक्रम करावा असे आशीर्वाद बहीण देत असते.

या दिवसाला यमद्वितीया असे का म्हणतात? याच्या पाठीमागे थोडा प्राचीन इतिहास आहे. यम आणि यमुना ही तर सख्खी भावंडे होती. परंतु यम आपला भाऊ आहे हे यमुनेला माहीतच नव्हते. यम आणि यमुना मोठी झाली तेव्हा आपण यमाशी लग्न करावे असे यमुनेला वाटू लागले. तिने यमाला तसा आग्रहसुद्धा केला. परंतु यम हा ज्ञानी, विचारी होता. त्याने यमुनेला समजाविले. बहीण भावाचे लग्न कधीच होत नसते. बहीण-भाऊ हे अत्यंत पवित्र नाते आहे व ते तसेच टिकले पाहिजे, असे सांगून यमाने तिची समजूत घातली. यमुनेला ते पटले. पुढे यमुना लग्न होऊन आपल्या पतीच्या घरी गेली.

नंतर एके दिवशी यमुनेने यमाला आपल्या घरी भोजनासाठी बोलाविले. तो दिवस होता कार्तिक शुद्ध द्वितीया. यम यमुनेच्या घरी गेला. यमुनेने यमाला तेल लावून पवित्र स्नान घातले. त्याच्यासाठी गोडगोड पदार्थ तयार करून त्याला भोजन दिले. त्याला ओवाळले. आपले बहीण-भावाचे हे पवित्र नाते कायम राहावे अशी इच्छा केली. त्या दिवशी यमलोकात मोठा आनंदोत्सव झाला. या दिवशी सर्वप्रथम यमाने आपल्या बहिणीच्या घरी भोजन केले त्या दिवशी नरकात यमयातना भोगणारे लोक आनंदित झाले. त्यांची सर्व पातकांतून सुटका झाली. त्या दिवसापासून यमद्वितीया हा सण सुरू झाला.

यालाच आपण भाऊबीज असे म्हणतो. आपल्या भावाचे आयुष्य वाढावे, यासाठी या दिवशी बहिणीने यमाचीही पूजा करावयाची असते. ‘या दिवशी पुरुषाने आपल्या पत्नीच्या हातचे अन्न खाऊ नये. आपल्या बहिणीकडे जावे. तिच्याकडून ओवाळून घ्यावे. तिला ओवाळणी घालावी. तिच्या घरी भोजन करावे म्हणजे आयुष्य-सुखसमृद्धी यांची वाढ होते.’ अशी यमाचीच आज्ञा आहे. या यमद्वितीयेविषयी आणखी एक कथा आहे. ती अशी – एके दिवशी यमाने आपल्या दूतांना आज्ञा केली, “ज्याला आजपर्यंत कोणीही शिवी दिली नाही अशा माणसाला घेऊन या.” यमाचे दूत अशा माणसाचा शोध करीत निघाले.

एका बहिणीला ही बातमी समजली. तिच्या भावाला आजपर्यंत कोणीही शिवी दिली नव्हती, हेही तिला माहीत होते. यमाची आज्ञा ऐकून ती अतिशय घाबरली. आपल्या भावाला यमाचे दूत पकडून नेणार, आता आपल्या भावाचे रक्षण कसे करायचे अशी काळजी .ला वाटू लागली. मग तिला सुचली एक युक्ती. ती आपल्या भावाला शिव्या देत रस्त्याने फिरू लागली. ती शिव्या देत भावाच्या घरी गेली.

हिला बहुतेक वेड लागले असावे असे माहेरच्या माणसांना वाटले. मग तिने खरा प्रकार काय तो सांगितला. सर्वांना आनंद झाला. आपले प्राण बहिणीने वाचविले म्हणून त्या भावाने बहिणीला ओवाळणी घातली. तो दिवस होता कार्तिक शुद्ध द्वितीया. म्हणून या दिवसाला यमद्वितीया किंवा भाऊबीज असे म्हणतात. – भावा-बहिणीने एकमेकांची आठवण ठेवावी. विचारपूस करावी. एकमेकांवर प्रेम करावे. यासाठी हा सण आहे.

एखाद्या स्त्रीला सख्खा भाऊ नसेल तर तिने इतर नात्यांनी असलेल्या भावाला ओवाळावे. हेही शक्य नसेल तर मानलेल्या भावाला ओवाळावे. आणि कोणत्याही नात्याचा भाऊ भेटू शकणार नसेल तर या दिवशी स्त्रीने चंद्राला ओवाळावे. चंद्र हा जसा लहान मुलांचा मामा आहे, तसा तो स्त्रियांचा भाऊ आहे. म्हणून भाऊबीजेच्या दिवशी चंद्राला ओवाळावे. पुरुषांनीही कोणत्याही नात्याची बहीण नसेल तर मानलेल्या बहिणीकडून ओवाळून घ्यावे व तिला ओवाळणी घालावी. असा आहे हा भावा-बहिणीच्या उदात्त व पवित्र प्रेमाचा सण भाऊबीज.

काय शिकलात?

आज आपण दिवाळी माहिती, कथा, इतिहास । Diwali Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Comment