गणेशाचा झाला गजानन

मुलांनो, श्री गणेश ही विद्येची देवता. तसेच तो सर्व संकटांचा, दुःखांचा, विघ्नांचा नाश करतो म्हणून आपण त्याला विघ्नहर्ता किंवा दुःखहर्ता असे म्हणतो. होय ना? तसेच तो ज्ञान, बुद्धी, कला व सुखसौख्य देणारा, म्हणूनच तो ‘सुखकर्ता’; खरं ना…..? तुम्हाला जर कुणी प्रश्न विचारला की, गणपती किंवा गणेश म्हणजे कोण? की लगेच उत्तर येणार की, गणपती म्हणजे शंकर-पार्वती यांचा मुलगा! तुमचं हे उत्तर बरोबर आहे, पण अर्धच.

का, माझ्या म्हणण्याचं आश्चर्य वाटलं ना? पण बरं का, तेच खरं आहे. कारण गणेश पुराणात ह्या संदर्भात जी गोष्ट आहे ती अशी की जेव्हा ह्या सकल विश्वात कोणतीच जीवसृष्टी नव्हती, सर्वत्र फक्त अंधार अन् केवळ पाणीच पाणी होतं; त्या वेळी त्या शून्यावस्थेत सर्वात प्रथम जर काही निर्माण झालं असेल, तर तो नाद होय. ॐकार नाद. त्या नादब्रह्मामधूनच पुढे सर्व सृष्टी, देवदेवता; इतकंच नव्हे, तर त्या मूळ चैतन्य शक्तीमधून पुढे ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्या देवता निर्माण झाल्या.

ती सकल विश्व निर्माण करणारी आद्य चैतन्यशक्ती, परमात्माशक्ती म्हणजेच श्री गणेश! आदिमाता पार्वतीदेवी हिने ह्याच नादब्रह्मस्वरूप ॐकार रूपी श्री गणेशाचीच कठोर आराधना, तपसाधना केली. अनेक वर्षे अशी कठोर उपासना, तप, ध्यान, चिंतन इ. साधना केल्यानंतर तो मूळ ॐकार स्वरूपी गणेश पार्वतीमातेवर प्रसन्न झाला आणि ‘वर माग’ असं म्हणाला.

आणि पार्वतीमातेच्या मागणीप्रमाणे ‘मी तुझ्या जवळ तुझं बालक होऊन राहीन,’ असे श्री गणेशाने तिला वचन दिले. त्या ॐकाराची साधना, जप, तप करीत असताना पार्वतीच्या शरीरातून जी शक्ती, जे तेज बाहेर पडले, त्या शक्तीने, त्या तेजाने एक बालकाचे रूप धारण केले व “माते, हा बघ मी तुझा बाळ होऊन आलो आहे!” असं म्हणून माता पार्वतीला जागे केले. अशा ह्या आपल्या बालकरूपाला म्हणजेच श्री गणेशाला द्वाररक्षणाच्या कामावर बसवून माता पार्वती स्नानास गेली.

आज्ञाधारक बाल गणेश हा द्वाररक्षण करीत बसलेला असताना, अचानकपणे तिथे भगवान शंकरांची स्वारी आली. त्यांना समोर पाहून, “आपण कोण?’ असे बालगणेशाने त्यांना विनम्रपणे विचारले. “बाळा, मी भगवान शंकर! कैलासाधिपती भगवान शिवशंकर.” “प्रणाम महाराज, प्रणाम!” बाल गणेश लगेच म्हणाला. त्या बालकाचा प्रणाम स्वीकारून भगवान शंकर आत जाण्यासाठी पढे आले.

तोच ते बालक पुढे येत, त्यांची वाट अडवत म्हणाले, “क्षमा असावी! पण आपल्याला आत्ता ह्या वेळी आत जाता येणार नाही. तेव्हा भगवान शंकर त्या बालकाला म्हणाले, “का? का मला आत जाता येणार नाही?” हे पहा, “माझ्या मातेनं मला आज्ञा केली आहे की, कुणालाही आत सोडू नकोस. क्षमा करा, पण मी तिची आज्ञा मोडू शकत नाही.” त्या बालकाने शांतपणे उत्तर दिले. “कुणालाही म्हणजे काय, तू मलाही आत जाऊ देणार नाहीस का?” त्यांनी विचारले. “हो, तुम्हालाही नाही.

कारण तुम्ही कोण, हे मी सध्यातरी ओळखत नाही…. तेव्हा….” तो एवढं म्हणाला आणि… भगवान शंकर ह्यांचा क्रोध अनावर झाला. ते शक्तीच्या बळावर पुढे जाऊ लागले. तर आपल्या हातातला छोटा परशू सारसावून ते बालक म्हणाले, “आपल्याला आधी माझ्याशी युद्ध करावे लागेल. तरंच आपण आत जाऊ शकाल.” त्या बालकाच्या तशा वागण्याचा, बोलण्याचा अन् वाट अडविण्याचा श्री शंकरांना राग आला. त्यांनी आणखी थोडे बोलून पाहिले; पण ते बालक त्यांची वाट अडवूनच बसले… आणि….आणि शंकरांचा क्रोध अनावर झाला. … “दूर हो….. दूर हो… नाहीतर…” गणेश वाट सोडेना…. आणि मग काय रागावलेल्या, संतापलेल्या शंकरांनी पुढच्याच क्षणी आपल्या हातातला त्रिशूल फेकला अन् एका क्षणात त्या बालकाचे मस्तक धडावेगळे केले…. “माते!”

म्हणून बालकाने फोडलेली आर्त किंकाळी सारा परिसर चिरत गेली. पार्वतीमाता धावत बाहेर येऊन पाहते तो काय! बालकाचे शिर धडावेगळे होऊन पडलेले….! पार्वती धावत पुढे गेली, तिने भगवान शंकरांचे पाय धरले, अन् म्हणाली, “स्वामी! आपण हे काय केलंत?…. अहो, हा आपलाच पुत्र आहे, बालगणेश. माझा पुत्र बाळ गणेश…”, असं म्हणून पार्वतीमाता पुत्रवियोगाने रडू लागली.

मग झाला प्रकार भगवान शंकर ह्यांच्या लक्षात आला. त्यांनी आपल्या शिवगणांना बाहेर पाठवले. “प्रथम जो प्राणी दिसेल,त्याचे मस्तक घेऊन या,”अशी आज्ञा केली. शिवगणांना बाहेर पडताच सर्वांत प्रथम एकत्र गजराजाचे दर्शन घडले. त्यांनी त्या गजराजाचे मुख आणले अन् ते शंकरांना दिले. भगवान शंकर ह्यांनी ते मुख त्या बालकाच्या धडाला लावले आणि आपल्या योगशक्तीने त्या बालकाला म्हणजेच गणेशाला पुन्हा जिवंत केले. गजमुख म्हणजेच गजाचे म्हणजे हत्तीचे तोंड लाभलेला तो श्री गणेश हाच पुढे गजानन ह्या नावाने प्रसिद्ध झाला.

पार्वतीस गणेश जिवंत झालेला पाहून खूप आनंद झाला. तिने त्याला भगवान शंकराच्या पायावर घातले. तेव्हा आपल्याच ह्या बालकाला मंगल आशीर्वाद देत भगवान शंकर म्हणाले, “हे गणेशा! हे गजमुखा! तू सर्वांचे मंगल करशील दु:खे हरणारा, सुख देणारा म्हणून तुला जगी सुखकर्ता दुःखहर्ता म्हणून ओळखले जाईल. तुझी उपासना, भक्ती करणाऱ्यांचे सदैव मंगल होईल. तू विश्ववंद्य होशील.” तर, असा हा गणेशाचा गजानन !

तात्पर्य – श्री गणेश ही विश्ववंद्य देवता असून ती भक्ताचे विघ्न, दुःख निवारण करून त्यांना सुख, ज्ञान, शक्ती अन् भक्ती देणारी लोकप्रिय देवता आहे.

Leave a Comment