बंगालमधील गंगासागर

बंगालमध्ये हुगळी नदीच्या मुखाजवळ असलेले हे बेट आहे. हे स्थान कोलकोताच्या दक्षिणेस सुमारे ९० मैलांवर असून डायमंड हार्बरपासून ६४ कि. मी. वर आहे. ज्या ठिकाणी हुगळी-गंगा समुद्राला मिळते त्या ठिकाणी ती २४ कि. मी. रुंद आहे. हे स्थान पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. जानेवारी महिन्यात मकर संक्रातीच्यावेळी तीन दिवस यात्रा भरते. पूर्वी येथे कपील मुनींचे मंदिर होते. ते समुद्र प्रवाहात वाहून गेले. अलीकडे एक छोटेसे मंदिर बांधले आहे.

यात्रेच्या दिवशी भारतातून असंख्य भाविक समुद्रस्नानासाठी (गंगासागरउत्सव) येथे जमतात. गंगा भूतलावर अवतरल्यापासून पूर्वसागराला मिळेपर्यंत सर्वत्र सुलभ असली, तरी गंगाद्वार (हरिद्वार) प्रयाग व गंगासागर संगम या तीन ठिकाणी ती दुर्लभ आहे. याठिकाणीजे स्नान करतात ते स्वर्गाला जातात आणि जे तेथे देह टाकतात त्यांचा पुर्नजन्म टळतो. म्हणन सर्वांना तिचे स्नान आणि दर्शन यांची विलक्षण ओढ असते.

अयोध्येचा राजा सगर याच्यावरुन या स्थानाला ‘सागर’ हे नांव मिळाले. त्याची आख्यायिका अशी आहे. सगर राजाचे ६० हजार पुत्र कपील ऋषींच्या शापामुळे दग्ध होऊन पडले. आपल्या पितरांच्या उद्धारासाठी भगिरथ राजाने उग्र तपश्चर्या करुन स्वर्गातून गंगेला भूतलावर आणले व तिच्या पवित्र जलाने सगर पुत्रांचा उद्धार झाला ते हे स्थान होय.

गंगेचे माहात्म्य असे की, प्रत्यक्ष भगवंतांनी ‘गंगा ही माझी विभूती’ असे म्हटले आहे. त्यामुळे गंगाकाठची धामे व गंगेची कथा यांना अनन्य महत्त्व प्राप्त झाले असून आद्य शंकराचार्यांनी काशीप्रांत विहारिणी विजयते गंगा मनोहारिणी’ अशा शब्दांत जयजयकार केला आहे. स्कंद पुराणात ‘विना स्नानेज गंगायाम् तृणां जन्म निरर्थकम्’ असे अगस्तीचे वचन आहे. तिच्या नुसत्या स्तवनाने, स्मरणाने, स्नानाने पापवासना नष्ट होऊन माणसाचे मन, वाणी व शरीर पवित्र होते, मनुष्य अंर्तबाह्य पवित्र बनतो. त्यामुळे तो जन्माचे सार्थक झाल्याचे मानतो. या बेटावर कपिलमुनीचे मंदिर आहे.

मुनींच्या उजव्या हाताला गंगा व डाव्या हाताला राजासगर आहे. अतृप्त आत्म्यांना मुक्ती देण्यासाठी कपिलमुनी येथे देहातीत अशा समाधीवस्थेत राहातो अशी श्रद्धा आहे. सागराला ‘गंगासागर’ असे संबोधतात. या बेटावर घनदाट जंगल असून ते ३८५ चौ. कि.मी. क्षेत्रफळांनी व्यापले आहे. ज्या ज्या गावी नदी असेल, तेथील लोक तिचे व्यावहारिक नाव काही असेल, तरी तिला गंगा म्हणूनच संबोधतात. व ज्येष्ठ शु।। प्रतिपदा ते दशमी, दशहरा उत्सव नदीकाठाच्या घाटावर साजरा करतात.

दशहरा म्हणजे दहा पातकांची नाश करणारी अशी ही पातके शारीरिक, मानसिक व वाचिक अशी त्रिविध असतात. गंगेने आमचा आध्यात्मिक पिंड भक्तीने पोसला. तिच्या तीरी आमच्या ऋषिमुनींची तपस्या संपन्न झाली. राजा परीक्षीताने तिच्या तीरीच भागवतकथा श्रवण केली व त्यांचे जीवन कृतार्थ झाले. गंगा येथे सागराला मिळाल्यामुळे गंगासागर पवित्र क्षेत्र बनते. सारे तीरथ बार बार, गंगासागर एक बार.

Leave a Comment