हर हर गंगे

नववर्षाची नवी दिनदर्शिका चाळत असता. नातवाचं लक्ष ज्येष्ठ महिन्याच्या शुद्ध दशमी ह्या दिवसांकडे गेलं त्या दिवशी ‘दशहरा’ गंगोत्सव असे दिनविशेष नोंद केलेले होते. नातवाने सहजच आजीला “आजी ! दशहरा म्हणजे काय गं? गंगोत्सव म्हणजे काय?’ असं विचारलं. आणि आजी सांगू लागली. “त्याचं काय आहे नेहमी व्यावहारिक जीवनात प्रत्येक माणसांच्या हातून कठोर बोलणे, खोटे बोलणे, चहाडी करणे, फुशारकी मारणे, चोरी करणे, हिंसा करणे, अन्याय-अनीतीने वागणे, एखाद्याला फसवणे, लुबाडणे, वाईट विचार मनात येणे आणि उगाच एखाद्याबद्दल मनात दुराग्रह धरणे ह्या प्रकारची पापे घडतच असतात.

ह्या अन् अशा अनेक पापांचे क्षालन करते गंगामाई! होय, गंगामाई म्हणजेच गंगामाता. गंगेच्या पवित्र स्नानाने ह्या दाही पापांचा नाश होतो. म्हणूनच तिला ‘दश-हरा’ असे म्हणतात. शुद्ध दशमी हा दिवस म्हणजे राजा भगीरथ ह्याने अथक प्रयत्नाने, घोर तपाने स्वर्गलोकीची गंगा ह्या भूतलावर आणली; तो हा दिवस! यालाच गंगावतरणाचा दिवस किंवा गंगोत्सव दिन असंही म्हणतात.

ही स्वर्गलोकीची पवित्र गंगा नदी ह्या भूलोकी कुणी, कशी व का आणली, याबद्दल रामायणाच्या गंगाख्यानात किंवा गंगा अवतरणासंदर्भात जी पौराणिक कथा सांगितली जाते, ती अशी की फार फार वर्षांपूर्वी इक्ष्वाकू कुळात एक राजा होऊन गेला. त्या राजाचं नाव होतं सगर राजा. ह्या राजाने एकदा अश्वमेध यज्ञ करायचे ठरवले. अश्वमेध यज्ञाचा घोडा सिद्ध करून, त्याचे विधिवत पूजन करून, काही संरक्षक सैन्यासह हा घोडा सोडून देण्यात आला. त्यावेळी असे मानले जायचे की, जिथवर हा घोडा जाईल, त्याला अडवले जाणार नाही; तिथवरच्या भागाचा तो सार्वभौम राजा.

म्हणजे त्या भागातले सर्व अन्य राजे-रजवाडे हे ह्या अश्वमेध यज्ञ करणाऱ्या सार्वभौम राजाचे मांडलिक. सगर राजानेही असाच सोडलेला अश्व हा खूप दूर-दूरवर फिरला पण तो काही लवकर परत आला नाही. जोवर अश्व परत येत नाही, तोवर यज्ञसांगता होत नव्हती. म्हणून सगराचे पुत्र ह्या घोड्याच्या शोधासाठी म्हणून गेले. त्यांना जाऊनही बरेच दिवस झाले तरी, कुणीच परत आले नाहीत; तेव्हा त्यांच्या शोध घेण्यासाठी सगर राजाचा नातू अंशुमान हा नगराबाहेर पडला. आपले चुलते कुठे गेले, तो अश्व कुठे गेला, त्याचे काय झाले असा शोध घेत घेत अंशुमान येऊन पोहोचला तो कपिला ऋषींच्या आश्रमाजवळ.

अंशुमान आश्रमाजवळ आला आणि तो आश्चर्यचकित झाला. त्याला त्या आश्रमाबाहेर अनेक ढिगारे दिसले. तसेच त्याला आश्रम परिसरात तो अश्वपण दिसला. अंशुमान आश्रमात प्रवेश करता झाला. त्याने कपिलमुनींना विनम्र प्रणाम करून त्याचे दर्शन घेतले. मग त्याने कपिलऋषींना मोठ्या आदराने विचारले, “ऋषिवर, हा आपल्या आश्रमात आलेला अश्व महाराज सगर ह्यांनी सोडलेला अश्वच आहे ना?” “होय, हा महाराज सगर ह्यांचाच अश्व आहे.” “महाराज, अश्व तर सापडला, पण ह्या अश्वाच्या संरक्षणार्थ आलेले माझे चुलते, मला कुठे भेटतील?” त्याने विचारले.

“हे बघ राजन, त्यांची भेट आता अशक्य आहे. कारण ते इथं आले, त्या वेळी मी तप करीत होतो. मीच तुमचा अश्व माझ्या आश्रमात अडवून ठेवला आहे, असे समजून त्यांनी माझ्याशी कठोरपणे वागून माझा तपोभंग केला. ते माझ्या क्रोधाग्नीचे भक्ष्य बनले. आश्रमाबाहेर जे राखेचे अनेक ढिगारे आहेत; ते सर्व त्यांचेच आहेत.” कपिलऋषींकडून हा समाचार समजला, मात्र…. स्वकीयांच्या प्रेमापोटी त्याच्या डोळ्यांत आसवे उभी राहिली.

अंशुमान पुढे होऊन क्षमा मागत ऋषींना विनवू लागला, “मुनिवर, माझ्या पर्वजांच्या, स्वकीयांच्या उद्धारासाठी मला काय करावे लागेल?” तेव्हा अंशुमानचा विनय, त्याचं त्याच्या चुलत्याबद्दलचं असणारं प्रेम पाहून प्रसन्न झालेले कपिलऋषी म्हणाले “बेटा, अंशुमान, जर स्वर्गलोकीच्या गंगेच्या प्रवाह ह्या राखेच्या ढिगाऱ्यांवरून वाहत पुढे जाईल, तर ह्या सर्वांचा उद्धार होईल. ते मुक्त होतील.” हे ऋषिवचन ऐकले आणि अंशुमानला आनंद झाला. कसला तरी एक पक्का निर्णय मनाशी करून तो अश्व घेऊन तो परत आला.

अश्व परत येताच संकल्पित यज्ञाची यथासांग सांगता झाली. अंशुमान ती स्वर्गलोकीची गंगा भूतलावर आणण्याच्या कामासाठी म्हणून तपसाधनेला निघाला. गंगा प्रसन्न व्हावी, म्हणून त्याचे तपही सुरू केले…. पण….. अंशुमानचे आयुष्य ती तपपूर्ती करण्यास कमी पडले. त्याच्या मागून अशुमानचा पुत्र दिलीप ह्यानेही गंगा खाली आणण्याचा प्रयत्न केला. त्यालाही त्या कामी यश आले नाही. दिलीपराजानंतर त्याचा मुलगा भगीरथ ह्याने हे कार्य आपल्या शिरावर घेतले. त्याने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अनेक अडी-अडचणींना तोंड दिले. अनेक कसोट्या पार केल्या आणि अखेर त्याला मोठ्या जिद्दीने ह्या कार्यात यश आले. त्याने केलेल्या कठोर तपाने प्रसन्न होऊन गंगामाता पृथ्वीवर येण्यास तयार झाली.

पण…. गंगा म्हणाली, “भगीरथा ! अरे, मी पृथ्वीतलावर आले म्हणजे सर्व लोक आपापली पापे धुऊन काढण्यासाठी माझ्याकडे येतील. त्यांचे पाप नाहीसे करताना मी मलिन होईल, त्याचे काय?” गंगेच्या ह्या प्रश्नावर भगीरथाने जो खास युक्तिवाद करून गंगामाईचे मन जिंकले, तो असा की – भगीरथ म्हणाला, “माते, पापी लोकांचे पाप धुतल्याने जशी तुला मलिनता येणे स्वाभाविक आहे.

त्याप्रमाणेच ह्या भूलोकीच्या अनेक साधूसंत, महात्मे, सत् पुरुष यांच्या पादप्रक्षालनाने तुला तुझं पूर्वीचं पावित्र्य, तीर्थत्व अन् श्रेष्ठत्व हे आपोआपच प्राप्त होणार नाही का?” ह्या युक्तिवादावर गंगामाईला काहीच बोलता येईना. मग ती म्हणाली, “अरे भगीरथा, मी जर इतक्या उंचावरून प्रचंड वेगाने त्या पृथ्वीवर पडले, तर धरा फाटून जाईल, पृथ्वी दुभंगेल. तेव्हा माझा हा प्रवाह जो आपल्यात सामावू शकेल अन् जो मला सौम्यरूप देऊन त्या धरतीवर अलगद सोडेल, अशा एखादा देवतेला तू प्रसन्न करून घे भगीरथ म्हणाले, “हे माते, माझ्यावर तू प्रसन्न झाली आहेस ना? तू धरतीवर अवतरणार आहेस ना? मग आता अशा कोणत्या देव-देवता आहे, ते तूच मला सांग.”

तेव्हा गंगेने ‘तू कैलासपती भगवान शंकर ह्यांना ह्या कामात साह्य करायला प्रसन्न करून घे.’ असे सांगितले. भगीरथाने भगवान शंकरांची कठोर तपसाधना करून, त्यांना ह्या लोकोद्धाराच्या कार्याला साह्य करायचे आवाहन केले. भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी स्वर्गलोकीची गंगा आपल्या जटेत सामावून घेतली अन् तिथून ती सौम्यरूपाने भूतलावर अवतीर्ण झाली. गंगेचा जलप्रवाह कपिलऋषींच्या आश्रमावरून पुढे जाताच भगीरथाच्या पूर्वजांचा उद्धार झाला. लोकोद्धारी, पापहरिणी गंगा भूलोकी आली.

तात्पर्य : कोणत्याही कामात भगीरथासारखे अथक प्रयत्न हवेत. प्रत्येकाचं मन, आचार-विचार हे गंगेप्रमाणे पवित्र हवेत.

Leave a Comment