मोक्षाचे द्वार हरिद्वार

संपूर्ण हिंदुस्थानातील अत्यंत पवित्र असे तीर्थक्षेत्र आहे. भक्तियुक्त अंत:करणाने येथे एक रात्र मुक्काम केला, तर सहस्त्र गायी दान केल्याचे पुण्यही लाभते. ही नगरी हरिद्वार, मायापुरी, गंगाद्वार या नावानेही ओळखले जाते. भारतातील सप्तपुऱ्यांपैकी माया म्हणजे हरिद्वार होय. गंगानदीमुळे या नगरीला श्रेष्ठत्व लाभले आहे.

भागिरथी गंगामाता हिमालयातून सुस्वर संगीताच्या तालात या सपाट भूमीवर प्रवेश करते म्हणून या स्थानाला गंगाद्वार हे नाव पडले. स्कंद पुराणात या स्थानाला मायापुरी हे नांव पडले आहे. तरी आज हरिद्वारला ‘कनखल’ या नावानेसुद्धा संबोधले जाते. नंतर लोक हरिद्वार म्हणू लागले. भगवान शंकराच्या कैलास येथे जाण्याचे प्रवेशद्वार येथूनच आहे. केदारनाथला जाण्यासाठी याच स्थानातून जावे लागते.

मोक्षप्राप्तीसाठी हिमालयात जाण्यासाठी पांडवांनी याच मार्गाचा उपयोग केला होता म्हणून या स्थानाला मोक्षद्वार असेही म्हणतात. भगवान विष्णूच्या पवित्र स्थानी जाण्याचा मार्ग येथूनच जातो. भगवान विष्णूला हरि’ या नावाने संबोधले जाते. म्हणूनही या स्थानाला हरिद्वार म्हणतात. आहे. प्रत्येक बारा वर्षांनी येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी अक्षरशः लक्षावधी भाविक गोळा होतात.

कुंभमेळ्यासाठी या कुंभात महान सिद्धयोगी, मोठमोठे साधुसंत आणि यात्री येथे येतात. अनेक आखाड्यांच्या मिरवणुकी निघतात. कुठे भजन-कीर्तन होत असतात, तर कुठे होमाद्वारे वातावरण पवित्र होत असते. या पवित्र कृतीने फार मोठा पुण्यसंचय होत असतो. या क्षेत्राशी निगडीत अशा कथा आहेत. त्यातील एक म्हणजे तेथे सूर्यवंशातील ‘सागर’ नावाचा एक अत्यंत प्रभावशाली राजा होऊन गेला. त्याने एकूण शंभर अश्वमेघ यज्ञांचे आयोजन केले होते.

जेव्हा त्याने शंभरावा यज्ञ सुरु केला, तेव्हा इंद्राला भीती वाटली की कदाचित या यज्ञपूर्तीमुळे माझे आसन नष्ट होऊन जाईल. सागर राजाने श्यामकर्ण नावाचा घोडा सोडला होता, तो इंद्राने कपील मुनींच्या आश्रमात बांधून ठेवला. कपिल मुनी सर्वश्रेष्ठ सिद्ध साधू होते. जेव्हा राजाची मुले श्यामकर्णाचा शोध घेत कपिल मुनींच्या आश्रमात आले व त्यांच्या परवानगीशिवाय त्यांनी घोडा सोडून नेला.

हा आपला अपमान असे समजून कपिल मुनींनी अत्यंत संतापाने त्याच्याकडे दृष्टिक्षेप टाकला. तेव्हा शापाच्या प्रभावाने सारे घोर निद्रेत लिप्त झाले. त्यानंतर राजा सागर याने आपला नातू अंशुमान यास राजपुत्राचा शोध घेण्यासाठी पाठवले. अंशुमानने कपिल मुनींची सेवा करुन त्यांना प्रसन्न करुन घेतले व घोडा यज्ञस्थळी आणून यज्ञाची पूर्ती केली. जेव्हा अंशुमानने कपिल मुनींना विचारले की, ‘माझ्या पूर्वजांचा उद्धार कसा होईल.’

तेव्हा कपिल मुनी म्हणाले की, ‘जेव्हा गंगेची पावन धारा पृथ्वीवर पडेल तेव्हा या सर्वांना मोक्ष प्राप्ती होईल.’ कपिल मुनींच्या शब्दाप्रमाणे अंशुमानने खूप तप केले. परंतु गंगा पृथ्वीवर आणण्यास अपयशी ठरला. दिलीपसिंहचा मुलगा भगिरथ याने घोर तपश्चर्या करुन गंगामातेला प्रसन्न करुन घेतलेवगंगेने पृथ्वीवर अवतरण्यास स्वीकृती दिली.

गंगेच्या पृथ्वीवरील आगमनाप्रसंगी तिच्या प्रचंड वेगाला आवर घालण्यासाठी भगवान शंकराने तिला आपल्या जटेत धारण केले व थेंब थेंब पाणी पृथ्वीवर आणले. राजा सागरच्या हजारो मुलांना मुक्ती मिळाली. गंगेला पृथ्वीवर आणण्याचे श्रेय भगिरथालाच देतात. म्हणून गंगामातेला ‘भागिरथी’ या नावानेसुद्धा संबोधले जाते. – जेथे स्नान केले जाते त्या घाटाचे नांव ‘हरिची पायरी’ असे आहे.

सायंकाळी आरतीचा सोहळा अप्रतिम असतो. भरतीच्या वेळी गंगेला ओवाळण्याकरिता इतरही मंदिरातून आरत्या येतात, निरनिराळ्या वाद्यांचे घोष, घंटानाद, टाळ्या यांच्या आवाजाने पवित्र वातावरण तयार होते. या गंगा प्रवाहात दीप सोडण्याची प्रथा आहे. गंगामय्या सर्वांना आपल्या कुशीत घेऊन संदेश देते की, ‘मी तुमचे पाप धुवून टाकले आहे. यापुढे पापाचरण करु नका.’

Leave a Comment