जेजुरीचा श्री खंडेराया

श्री खंडोबाराया मल्हारी मार्तंड हे महाराष्ट्रातील जागृत दैवत. हे ठिकाण पुण्याच्या आग्नेयेस ५०. कि. मी. अंतरावर आहे. जेजुरी स्थानक २ कि. मी. असून सासवड १६ कि. मी. आणि मुंबई २०६ कि. मी. अंतरावर आहे. मंदिर किल्लेवजा तसेच पायथ्यापासून महाद्वारापर्यंत सुबक पायऱ्या, त्याच्या वाटेवर नवसाच्या २५० दीपमाळा आहेत. येथील टेकडीवर क-हे पठार आणि गडकोट अशा दोन ठिकाणी खंडोबाची मंदिरे आहेत.

क-हे पठार जुने आहे. हे ठिकाण जेजुरी गावाच्या नैऋत्येस टेकडीच्या माथ्यावर आहे. तर कन्हे पठाराच्या ईशान्येस टेकडीवर खंडोबाचे दुसरे स्थान असून त्याच्याभोवती तटबंदी असल्याने लोक या स्थानाला गडकोट म्हणतात. सन १५१० मध्ये चैतन्य महाप्रभूया ठिकाणी आले आणि त्यांनी वाघ्या मुरळ्यांना नैतिक आचरणाचा उपदेश केला. त्यामुळे इंदिरा नावाची मुरळी प्रभावित होऊन सन्मार्गाला लागली.

मराठेशाहीत अनेक सरदार आणि पेशव्यांनी पण खंडोबाला नवस केला होता. अहिल्याबाई होळकर हिने सन १७४२ ते १७७७ या काळात मंदिराचा जीर्णोद्धार केला. या मंदिराचे तीन विभाग आहेत. मंदिरासमोर पितळी पत्र्याने मढवलेले एक कासव आहे. जवळ मणी दैत्याचा नऊ फूट उंचीचा एक दगडी पुतळा तसेच सोप्यात एक खड्डा आहे. याला काळ खड्ग म्हणतात. या खड्गाने मल्हारी मार्तंडाने मणी दैत्याचा पराभव केला.

हे खड्ग हातात उंच पेलण्याची स्पर्धा संस्थानाच्या वतीने प्रतिवर्षी होते. या मंदिरात खंडोबा व म्हाळसा यांची स्वयंभू लिंगे आहेत. त्यावर रुपेरी आच्छादनाचे मुखवटे आहेत. या लिंगाच्या मागे खंडोबा व म्हाळसा यांच्या उभ्या मूर्तीच्या तीन जोड्या आहेत. प्रदक्षिणेच्या ठिकाणी गणपती व तुळजाभवानी यांची मंदिरे असून त्यांच्यापुढे एक भव्य शिला असून ही धूतमारी किंवा महामारी म्हणून ओळखली जाते.

एक कथा अशी आहे. आपल्या बंधूंच्या मणीच्या वधामुळे मल्लासूर भयंकर रागावला. त्याचे व मार्तंडाचे मोठे युद्ध सुरु झाले. मल्लासुराने आपली शक्ती पणाला लावली. पण मार्तंडापुढे त्याचे काहीच चालेना. मार्तंडाने आपला त्रिशूल मल्लासूराच्या छातीवर मारला आणि मल्लासूर जमिनीवर कोसळला. मार्तंडाने त्याच्या डोक्यावर पाय ठेवला.

मल्लासूराच्या डोळ्यातून अश्रूवाहू लागले. मल्लासूराने मार्तंडाकडे वर मागितला तो असा, ‘देवा, माझे नांव तुझ्या नावाच्या आधी असावे.’मार्तंडाने ‘तथास्तु’ म्हटले. देवऋषींना छळणाऱ्या मणिमल्लासुराचा नाश झाला. सर्वत्र आनंदी वातावरण पसरले. देवांनी मार्तंडभैरवावर फुलांचा वर्षाव केला. तेव्हापासून मार्तंडभैरव ‘मल्हारी मार्तंड’ या नावाने प्रसिद्ध झाला. ज्या पर्वतावर मार्तंडभैरवाला विजय मिळाला त्याचे नांव जयाद्री झाले. त्यालाच पुढे जेजुरी असे नांव मिळाले.

मार्तंडाने हातात खड्ग घेतले होते म्हणून त्यास खंडोबा’ असे नांव मिळाले. दुसरी गोष्ट अशी, कडेपठार हे खंडोबाचे राहाण्याचे मूळ ठिकाण. हे जेजुरीपासून चार मैलांवर आठशे फूट उंचावर आहे. याच्या वाटेवर एक ठिकाण आहे. त्याला ‘घोडेउड्डाण’ म्हणतात. देव-भक्ताच्या भेटीची ही जागा. येथूनच खंडोबाच्या घोड्याने उड्डाण केले व तो जेजुरीच्या टेकडीवर आला. म्हणून या ठिकाणाला ‘घोडेउड्डाण’ असे म्हणतात.

यासंबंधी एक गोष्ट अशी आहे. सुपे गावात खैरे पाटील यांच्या वंशातील एक पुरुष खंडोबाचा मोठा भक्त होता. तो दर रविवारी खंडोबाच्या दर्शनासाठी पठारावर जात असे. हा त्याचा नियम कित्येक वर्षे चालू होता. पाटील म्हातारा झाला. त्याला पठारावर चढता येईना. म्हणून तो म्हणाला, ‘देवा, थकलो रे आता. आता तुझं दर्शन मला कसं होणार ? ‘ अशी त्याने खंडोबाला प्रार्थना केली. भक्ताची ही अवस्था पाहून खंडोबाला दया आली.

खंडोबा आपल्या पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसून तेथे आला व म्हणाला, ‘माझ्या भक्ता, दुःख करु नकोस. इतके लांब येण्याचा तुला त्रास नको, म्हणून मीच तुझ्यासाठी गावाजवळील टेकडीवर येऊन राहातो. असं म्हणून खंडोबा गुप्त झाला.’ येथे खैरे पाटील जेजुरीच्या टेकडीवर आला. तेथे त्याला म्हाळसा व खंडोबा यांची दोन लिंगे दिसली. लोकांना अतिशय आनंद झाला.

खैरे पाटीलामुळे खंडेराया आपल्या गावाजवळ आला असे त्यांना वाटले. काही दिवसांनी तेथे मंदिर उभे राहिले. आपल्या भक्तासाठी खंडोबा कडेपठार सोडून जेजुरीला आला. येथे चार पौर्णिमा व माघी या तिथींना विशेष उत्सव होतो. उत्सवाच्यावेळी पिवळ्या भंडाऱ्याने आसमंत पिवळे होते. ‘सदानंदाचा येळकोट’ ‘येळकोट, येळकोट जयमल्हारी’ असा जयघोष होतो.

Leave a Comment