जिजाऊ मांसाहेबांची सुवर्णतुला

शिवाजी महाराज अनंत गुणमंडित होते. ते महापराक्रमी, धाडसी होते. ते मोठे मुत्सद्दी होते. आपल्या संस्कृतीचे रक्षक होते. ते राजकारण धुरंधर होते. ते सर्वांशी प्रेमाने वागत, बोलत. ते संत सज्जनांचे पूजक होते. दुष्टदुर्जनांचे ते कर्दनकाळ होते. याला कारण अगदी लहानपणापासून त्यांच्यावर झालेले संस्कार. महाराजांच्या मांसाहेब जिजामाता ह्याच शिवरायांच्या गुरू होत्या. महाराजांनी लहानपणी मांसाहेबांच्या मांडीवर बसून त्यांच्या तोंडून रामायण, महाभारतातील स्फूर्तिकथा ऐकल्या. मांसाहेब महाराजांना पूजनीय, सदा वंदनीय होत्या. ‘न मातुः परं दैवतम्’ ‘आई समान दुसरे दैवत नाही’ अशी महाराजांची धारणा होती.

आपल्या या मातेची सुवर्णतुला करावी असे महाराजांना खूप दिवसांपासून वाटत होते. खरं तर आपली आई सोन्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तिची सुवर्णतुला केली, तर सुवर्णच भाग्यवान ठरेल असे महाराजांना मनापासून वाटत होते. पौष महिना संपत आला होता. पौषी अमावस्येला सूर्यग्रहण लागणार होते. अशा पर्वकाळी जपतपादी धार्मिक अनुष्ठानाप्रमाणे दानधर्मही करण्याची पद्धत आहे ; म्हणून जिजामाता महाराजांना म्हणाल्या, “शिवबा, येत्या सूर्यग्रहणाच्या निमित्ताने ग्रहणकाळात काही दानधर्म करावा असे मला वाटते.’

मांसाहेबांना दानधर्म करावयाचा आहे हे ऐकून महाराजांना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, “मासाहेब, जगदबेच्या कृपेने व आपल्या आशीर्वादाने मी खूप संपत्ती मिळविली आहे. तिचा उपयोग चागल्या कार्यासाठी व्हावा असे मलाही वाटते. या सूर्यग्रहणाच्या दिवशी तुम्ही अगदी मनसोक्त दान, धर्म करा, पण त्याअगोदर माझ्या एका इच्छेला तुम्ही मान्यता द्यावी.” “तुझी कोणती इच्छा आहे?’ असे जिजामातांनी विचारले.. महाराज म्हणाले, “मांसाहेब, या सूर्यग्रहणाच्या दिवशी मला आपली सुवर्णतुला करावयाची आहे. ही गोष्ट तुम्ही मान्य करावी.

तुमची सुवर्णतुला केल्यानंतर ते सुवर्ण तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे दान करा. असे झाले, तर एकाच वेळी तुमची व माझी इच्छा पूर्ण होईल.” शिवबाचे आपल्यावरील अलोट प्रेम पाहून जिजाऊच्या डोळ्यांत धन्यतेचे आनंदाश्रू आले. त्यांनी महाराजांची इच्छा मान्य केली. शिवाजी महाराजांना खूप खूप आनंद झाला. ‘मांसाहेबांची सुवर्णतुला!’ ह्या गोड कल्पनेने महाराज अगदी हरखून गेले. सुवर्णतुलेसाठी स्थळ निश्चित झाले. श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिराजवळ कार्यक्रमासाठी भव्य मंडप उभारण्यात आला.

महाबळेश्वर येथील थोर सत्पुरुष वेदमूर्ती श्रीधरभट महाबळेश्वरकर हे मांसाहेबांचे व महाराजांचे गुरू होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुवर्णतुला करण्याचे ठरले. या सुवर्णतुलेसाठी विपुल सोने महाबळेश्वरास आणले होते. महाबळेश्वराचे मंदिर व आवार लोकांनी गजबजून गेले होते. ग्रहणकाल लागला. स्नानादी विधी पूर्ण झाले. मंडपात मोठी तागडी उभी करण्यात आली. तिची विधिवत पूजा करण्यात आली. मग एका पारड्यात मांसाहेबांना बसविण्यात आले. दुसऱ्या पारड्यात सोन्याच्या मोहरापुतळ्या टाकण्यास सुरुवात झाली. शास्त्री-पंडित तुलादानाचे मंत्र म्हणू लागले.

मांसाहेबांची सुवर्णतुला झाली. महाराजांची खूप दिवसापासूनची इच्छा पूर्ण झाली. त्या वेळी मांसाहेबांसह सर्व उपस्थितांच्या डोळ्यांतून आनंदाश्रूच्या गंगा-यमुना वाहू लागल्या. मांसाहेबांनी तुला केलेल्या सुवर्णाचे दान केले. याच वेळी शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या व आता वृद्ध झालेल्या सोनोपंत डबिरांचीही सुवर्णतुला केली. महाराजांचे आपल्यावरील प्रेम पाहून सोनोपंतांना आपले जीवन धन्य झाले असे वाटले.

Leave a Comment