आसाममधील गुवाहाटीतील प्रसिद्ध कामाख्या मंदिर

गुवाहाटी हे शहर आसाम राज्याचे मुख्य शहर असून ब्रह्मपुत्रा नदीचे विशाल पात्र हे या शहराचे वैभव आहे. उंच टेकडीवर वसलेली कामाख्या व नवग्रह ही मंदिरे तसेच ब्रह्मपुत्रेच्या बेटावरील उमानंद हे मंदिर भक्तांसाठी तीर्थक्षेत्रे म्हणावी लागतील. गुवाहाटीपासून ५ कि. मी. अंतरावर असलेल्या नीलाचल पर्वतावर कामाख्या मंदिर असून ते एक प्रसिद्ध शक्तीपीठ आहे. हा पर्वत शिवाचे प्रतिक मानलेला आहे.

१८ व्या भागात पुराणाने सात शक्ती पीठांचा उल्लेख केला असून या सात पीठांपैकी तीन पीठे कामरुप जिल्ह्यांत आहेत. कामरुप त्या काळात तांत्रिक उपासनेचे सर्वोच्च केंद्र होते. कामाख्या मंदिर हे शक्तीपूजेचे एक प्रमुख स्थान म्हटले आहे. या देवीच्या मंदिराचा कळस मधमाशांपैकी बनवलेल्या घरासारखा असून आसाममध्ये अनेक मंदिरांचा कळस असा दिसतो. येथे शिल्पकलेचे अनेक नमुने पाहावयास मिळतात.

नाचणारा गणेश आणि चामुंडा देवीचे शिल्प तसेच पूजा करणारे, नृत्य करणारे, गाल फुगवून तोंडाने शंख वाजवणारे अशी पण शिल्पे आहेत. कामाख्या मंदिरात देवीची मूर्ती नसून मंदिराच्या आतल्या गुंफेत एका दगडावर योनीची आकृती खोदलेली आहे. या योनीप्रतिकावरच फूलपत्री वाहून तिची पूजा केली जाते. ही भूदेवीच आहे. इकडील पूजाविधी कालीच्या पूजेप्रमाणे असतो. प्राचीन काळी गारो लोक कामाख्याचे पुजारी होते.

नरक व कोच राजांनी ब्राह्मणांना या भागात आणले. नरक राजाने कामाख्येला कालीशी एकरुप करुन तिची पूजा-अर्चा सुरु केली. कामाख्या मंदिर आर्यपूर्व पद्धतीचे होते. १६ व्या शतकात मुसलमानांनी या मंदिराचा विध्वंस केला. पुढे सन १६६५ मध्ये कोच राजा नरनारायण ह्यांनी सध्याचे मंदिर उभारले. या मंदिराचे प्रमुख उत्सव साजरे केले जातात. दुर्गापूजा सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये तीन दिवस साजरी करतात.

प्रमुख उत्सवांतील देबाद्धानी उत्सव हा मनसादेवीच्या पूजनासाठी असतो. अनेक जिल्ह्यात हा उत्सव भक्तीभावाने साजरा करतात. गावात, शहरात साथीचे रोग आले तर मानसाची पूजा करतात. तिला ‘मराई’ असे म्हणतात. उत्सव तीन दिवस असून चंद सादागरची गाणी म्हटली जातात. या देवीला नर्तकाची आवड असल्यामुळे या उत्सवामध्ये ‘देवधा’ नर्तकीचे नृत्य असते.

ही मंडळी शाकाहारी असून कामाख्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे, येथे उजव्या हाताने आणि डाव्या हाताने पूजा अशा दोन पद्धती रुढ आहेत. प्राण्यांमध्ये फक्त नरबळी दिला जातो. मादीला बळी देत नाहीत. आपल्या येथे अनेक सिद्धपीठे आहेत. या सर्वांत कामाख्यापीठ सर्वात प्रधान मानले जाते. कामाक्षीदेवीचे माहात्म्य वर्णन करताना देवी भागवतात म्हटले आहे की, सर्व पृथ्वीतलावर देवीचे हे महाक्षेत्र आहे.

Leave a Comment