मोक्षदायक सप्तपुरींपैकी एक काशी (कालिका, बनारस, वाराणसी)

काशी हे हिंदूंचे पवित्र तीर्थस्थान असून उत्तर प्रदेशाची ‘सांस्कृतिक ‘ राजधानी आहे. एकदा ब्रह्मदेवाने काशी व स्वर्ग यांची तुला केली. तेव्हा स्वर्गापेक्षा काशीचे पारडे जड ठरल्यामुळे ती धरतीवर अवतरली असून काशीच्या पुराणोक्त अनेक नांवांपैकी ‘आनंदवन’ हे एक नांव आहे. त्यावर समर्थ रामदासांनी ‘आनंदवनभुवनी’ नावाचे उत्कृष्ट काव्य लिहिले.

याच पुण्यनगरीत विश्वामित्राला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी सत्यवचनी राजा हरिश्चंद्र सर्वस्वाचे दान करुन अकिंचन बनला. येथेच नाथांनी आपले रसाळ भागवत पूर्ण केले. या ग्रंथाला पालखीतून मिरवण्याचा सन्मान प्राप्त झाला तो येथेच. आचार्यांनी ब्रह्मसूत्रावरील भाष्य पण येथेच केले. कालिदासाने ‘काशीरहस्यात’ म्हटले आहे की, “सोनेरी अलंकाराच्या मधोमध ज्याप्रमाणे रत्ने, तसे पृथ्वीच्या मधोमध काशी आहे. ‘

सुप्रसिद्ध लेखक मार्कट्वेन ह्यांनी म्हटले की, ‘काशी परंपराहून प्राचीन आहे.’ वाराणसी-आग्रा ५६५ कि. मी. लखनौहून २४८ कि. मी. तर सारनाथ येथून १० कि. मी. अंतरावर आहे. येथे अनेक धर्मशाळा असून अन्नसत्रांमध्ये जेवणाची सोय असते. मत्स्य पुराणात एक कथा आहे, भगवान शंकर पार्वतीला काशीमहत्त्व सांगतांना म्हणतात, हे पार्वती, वाराणसी हे माझे गुह्यतम क्षेत्र आहे. येथे सर्व जंतूंना मोक्ष प्राप्त होतो.

तसेच देवांनाही दुर्लभ अशा परम कैवल्याला तो प्राप्त होतो.’ काशी हे क्षेत्र शंकराच्या मनात भरले आणि ते कायम वास्तव्यासाठी येथे आले. काशी शिवक्षेत्र बनले. पुराणांनी काशीचा उदंड गौरव गायिला आहे. परंतु मध्ययुगात उत्तरप्रदेश इस्लामी आक्रमणामुळे जर्जर होऊन गेला. अनेक सांस्कृतिक क्षेत्रांची धूळधाण झाली. त्यात काशीचेही दुर्दैव ओढवले.

औरंगजेबाने काशी-विश्वेश्वर मंदिर पाडून तेथे मशिद बांधली. त्याआधी पुजाऱ्यांनी तेथील मूर्ती विहिरीत लपवून ठेवल्या होत्या. त्या विहिरीला ज्ञानव्यापी’ म्हणतात. पुढे ज्ञानव्यापीजवळच अहिल्याबाई होळकर यांनी मंदिर बांधले आणि पंजाबच्या महाराजांनी रणजीतसिंह यांनी कळसावर सोन्याचा पत्रा चढविला. येथे मंदिरातील गाभाऱ्यात जाऊन देवाच्या पिंडीवर डोके ठेवून दर्शन घेता येते.

काशीस आल्यावर सर्वांभूती परमेश्वर पाहाण्याची व जीवनाची सफलता गोविंदाची भक्ती करुन त्याला शरण जाण्यात आहे, हे जाणवते. काशी हे शक्तीपीठ असून इथे सतीचे उजवे कर्णकुंडल गळून पडले. अशा काशीची बारा नांवे आहेत. तसेच अयोध्या, मथुरा, कनखल, हरिद्वार, अवंतिका, द्वारका, कांची व काशी या सात मोक्षदायक पुऱ्यांमधील काशी ही पवित्र, सर्वश्रेष्ठ पुरी मानतात. अशा या काशीत १५०० हून जास्त मंदिरे व असंख्य घाट आहेत.

काशीचा मुख्य देव म्हणजे विश्वेश्वर किंवा विश्वनाथ हाच होय. काशीला विश्वनाथाची नगरी असेही म्हणतात. या परिसरात अनेक शिवलिंगे आहेत. मंदिराच्या प्रमुख सभामंडपाच्या पश्चिमेला दंडपाणिश्वर मंदिर व एका बाजूला सौभाग्यगौरी, गणेश असून दुसऱ्या बाजूला श्रृंगार गौरी, अविमुक्तेश्वर सत्यनारायण यांची मंदिरे पाहावयास मिळतात. शनैश्वरेश्वर मंदिर आहे.

महाशिवरात्रीला विश्वेश्वराची पूजा फलदायक असते. काशीचे दुसरे नांव वाराणसी. काशी व वाराणसी एकच समजतात. दर्शनीय स्थानही भरपूर आहेत. तीर्थश्राद्ध, गंगाभेट, अन्नपूर्णा मंदिर, अक्षयवट मंदिर, कर्णमेरु शिवालय मंदिर, कबीर समाधी मंदिर, कालभैरव मंदिर, काशीदेवी मंदिर, गोपाल मंदिर, गोरखनाथ मंदिर, तुलसी-मानस, तिलभांडेश्वर, बिंदू माधव, भूतभैरव व भारतमाता मंदिरे आहेत हिंदूधर्म-संस्कृतीचा गौरव वाढविणारी काशी अलौकिक म्हणावी लागेल.

Leave a Comment