कल्माषपाद राजाची कथा

मित्रसह नावाचा एक राजा होता. त्याला वेदशास्त्राचे उत्तम ज्ञान होते. एकदा तो शिकारीसाठी आपले सैन्य घेऊन अरण्यात गेला. सैन्यासह राजा आलेला पाहून वाघ, सिंह, हरणे, माकडे, ससे पळू लागले. चातक, मोर, बदके, हंस, चक्रवाक हे पक्षी घाबरून इतस्ततः उडू लागले. राजाने अमाप पशुपक्ष्यांची शिकार केली. त्यात त्याने एक महाभयंकर राक्षसही मारला. त्याच्या भावाने ते दृश्य लांबून पाहिले आणि त्याने ठरविले की कपटाने या राजाचा घात करून सूड उगवायचा.

शिकारीनंतर राजा आपल्या सैन्यासह राज्यात परतला. पण त्या राक्षसाच्या भावाने स्वतः मनुष्यरूप धारण केले. स्वयंपाकासाठी लागणारा झारा व इतर सामुग्री घेतली. आचाऱ्याचा वेष केला व तो राजापुढे जाऊन म्हणाला, “राजा, मी एक पाककला येणारा उत्तम आचारी आहे. मला तू तुझ्या मुदपाकखान्यात ठेवून घे. मी तुला उत्तमोत्तम पदार्थ खायला घालीन.” राजाने त्याला आपल्या पदरी ठेवून घेतले.

एक-दोन महिन्यातच राजाच्या पितरांचे श्राद्ध होते. राजाने वशिष्ठ ऋषींना श्राद्धाच्या भोजनासाठी बोलावले होते. तिकडे राक्षसाने कोणालाही नकळत नरमांस आणले व ते अन्नात मिसळून वशिष्ठांच्या पानात वाढले. वशिष्ठ ऋषींनी अंतर्ज्ञानाने हा आचारी राक्षस असून अन्नात नरमांस घातले आहे, हे ओळखले. राजाने राक्षसाकरवी आपल्याला नरमांस भक्षण करण्यास दिले. याचा त्यांना राग आला. त्यांनी मित्रासह राजाला शाप दिला. ते म्हणाले, “तू मला आपल्या राक्षस आचाऱ्याकरवी नरमांस खायला घालत होतास. जा माझ्यासमोरून चालता हो. तू राक्षस होशील.

रानात वणवण भटकशील. तुला काहीही खायला मिळणार नाही.” राजा नमस्कार करून म्हणाला, “मी ठेवलेल्या आचाऱ्याचे हे काम आहे. मी त्याला बोलावतो व शिक्षा देतो.” राजाने स्वयंपाक्याला बोलावणे धाडले. पण तो केव्हाच पळून गेला होता. आपली काहीही चूक नसताना वशिष्ठांनी शाप दिला. याचा राजाला राग आला. वशिष्ठांना शाप देण्यासाठी राजाने हाती पाणी घेतले.

तोच मित्रसह राजाची पत्नी मदयंती धावत तेथे आली व राजाला थांबवत म्हणाली, “तुम्ही वशिष्ठांना शाप देऊ नका. गुरूंना शाप देण्याचा शिष्याला अधिकार नसतो. असा शाप दिला असता शिष्य नरकात पडतो.” राजा हातात पाणी घेऊन तसाच थांबला. तो मदयंतीला म्हणाला, “मी शाप देण्यासाठी ओंजळीत पाणी तर घेतले आहे, हे पाणी मी कोठे टाकू? जमिनीवर टाकले तर ती जळून खाक होईल आणि धान्यही येणार नाही. म्हणून हे पाणी मी माझ्याच पावलांवर टाकतो.” मदयंती अडवत असताना राजाने ते पाणी आपल्या पायांवर टाकले.

त्यामुळे त्याचे दोन्ही पाय गुडघ्यांपर्यंत जळाले. त्याच्या पायावर कोड उठले. त्यामुळे याच राजाला ‘कल्माषपाद’ या नावाने प्रजा ओळखू लागली. मदयंतीने वंदन करून वशिष्ठांना राजाला उ:शाप देण्यासाठी विनविले. वशिष्ठांच्याही सर्व प्रकार लक्षात आला होता. म्हणून त्यांनी राजाला उ:शाप दिला. ते म्हणाले, “हे राजा, माझा शाप खोटा ठरणार नाही. पण बारा वर्षांनी तू राक्षसयोनीतून मुक्त होशील व पुन्हा राजा होशील.” बघता बघता राजाचे रूप बदलले. राजा अक्राळविक्राळ राक्षस झाला. त्याचे पाय जळून काळे झाले होते. रात्रंदिवस तो रानात फिरू लागला.

तो सदैव भुकेला असे. अशीच काही वर्षे गेली. एक तरुण जोडपे त्याला त्या अरण्यातून जाताना दिसले. तो तरुण ब्राह्मण होता. तो आपल्या सुंदर पत्नीसह जात होता. ते जोडपे एका झाडाखाली थांबले. त्या तरुणाला त्याच्या बायकोशी संग हवा होता. तीसुद्धा त्यासाठी उत्सुक होती. तोच तो राक्षसरूपी राजा त्यांच्यापुढे उभा ठाकला. एका झेपेत त्याने त्या ब्राह्मण तरुणास खाण्यासाठी उचलले. तो त्याला तोंडात टाकणार तोच त्याची बायको म्हणाली, “अरे राक्षसा, तू पूर्वी राजा होतास. वशिष्ठ ऋषींच्या शापाने तू कल्माषपाद राक्षस झालास.

आता तरी ब्राह्मणाला मारून आणखी पाप शिरावर घेऊ नकोस.” राजाला खूप भूक लागली होती. तो तरुण रडत ओरडत असताना त्याने त्याला पर व फाडले. ठार मारून त्याचे मांस खाऊन टाकले. त्या ब्राह्मणाची बायको धाय मोकलन र लागली. क्रोधाने तिने कल्माषपादाला शाप दिला. ती म्हणाली, “वशिष्ठ ऋषींच्या शापातून मुक्त झालास तरीही तू तुझ्या बायकोशी संग करू शकणार नाहीस. तसे करशील त्या क्षणी मरशील. तू माझे व माझ्या पतीचे मिलन होण्यापूर्वी त्याला भक्षण केलेस. आता तुला कधीही स्त्रीसुख घेता येणार नाही.”

तिने आपल्या पतीच्या अस्थी गोळा केल्या व तिथेच अग्नी पेटवून त्यात स्वत:ला जाळून घेतले. राजा आश्चर्यचकित होऊन तो प्रकार पाहत होता. आणखी एक शाप त्याच्या डोक्यावर लागला. बारा वर्षे पूर्ण झाली. राजाचा राक्षस देह जाऊन तो पुन्हा तेजस्वी दिसू लागला. तो आपल्या राजवाड्यात आला. मदयंतीला त्याने ब्राह्मण पत्नीने दिलेल्या शापाची हकिकत सांगितली. ती राजाला म्हणाली, ‘यापुढे तुम्हाला कोणत्याही स्त्रीशी बोलताही येणार नाही. कोणत्याही स्त्रीला तुम्ही पाहू नका. कारण मन अचपळ असते. त्याचा संयम कधी सुटेल हे सांगता येत नाही.’

राजा खूप दुःखी झाला. यापुढे त्याचा वंश वाढणार नव्हता. विचारान्ती त्याने ठरविले, गुरूकडून नियोग पद्धतीने मदयंतीला पुत्रप्राप्ती होऊ शकेल. त्याने वशिष्ठांनाच पाचारण केले. गुरूंच्या कृपेमुळे मदयंतीला मुलगा झाला. राजा मात्र अरण्यात गेला. त्याने आपले मन काबूत ठेवले होते. तो आपल्या कर्मगतीला दोष देत रानात हिंडत होता. तो रानात हिंडत असता त्याच्यामागे पिशाच्च लागले आहे असे त्याला वाटू लागले. ते पिशाच्च कराकरा दात खात त्याला घाबरवत होते. राजाने केलेली ब्राह्मणाची हत्या त्याला पिशाच्चरूपाने घाबरवत होती. राजाने अनेक व्रते केली.

अनेक तीर्थे फिरला. पण ते पिशाच्च त्याला छळतच होते. एक दिवस त्या रानात गौतम ऋषी आले. त्यांच्याबरोबर त्यांचे शिष्यही होते. गौतम ऋषींना पाहताच राजाने त्यांच्यापुढे साष्टांग दंडवत घातले. राजा म्हणाला, “हे मुनिवर्य, माझ्यावर कृपा करा. मला छळणाऱ्या या पिशाच्चापासून सोडवा”, असे म्हणून राजाने गौतम ऋषींना सर्व हकिकत सांगितली. गौतम ऋषी म्हणाले, “भारतातील गोकर्ण नामक क्षेत्र फार पवित्र आहे. ते कैलासनाथ व पार्वतीचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. तेथे ओमकाररूपाने शिवाचे वास्तव्य आहे.

देवादिकांचीसुद्धा तेथे शंकराच्या दर्शनासाठी गर्दी होते.” “गोकर्ण क्षेत्री अनेक वृक्ष आहेत. हे क्षेत्र तेजस्वी आहे. मंदिराची चारही दारे रत्नजडित असून पूर्व दारावर इंद्राचा ऐरावत. पश्चिम दारावर वरुण, उत्तर दारावर कुबेर व दक्षिण दारावर यम उभा आहे. गोकर्ण क्षेत्री स्नान केल्यास सर्व तीर्थी स्नान केल्याचे पुण्य लाभते. पूर्वी रावण, कुंभकर्ण व बिभिषण यांनी शंकराची उपासना केली. रावणाने कैलास पर्वतावरून जे लिंग आणले, तेच इथे आहे. तेथे तू जा. तुझे ब्रह्महत्येचे पाप तेथेच दूर होईल. गोकर्ण क्षेत्राचे माहात्म्य विलक्षण आहे.”

Leave a Comment