शंकराची प्रतिक्षा करीत उभी आहे कन्याकुमारी

तामिळनाडू हे भारतीय द्वीपकल्पाच्या दक्षिण टोकावर असलेले राज्य आहे. या राज्याला २००० वर्षाची सांस्कृतिक परंपरा आहे. या राज्याला १००० कि.मी. अप्रतिम समुद्र किनारा लाभला आहे. हे राज्य मंदिरांचे असून अनेक संप्रदाय तीर्थक्षेत्र आहेत. कन्याकुमारी हा तामिळनाडू राज्याच्या दक्षिण टोकाचा जिल्हा आणि देशाचे शेवटचे टोक आहे. सूर्यास्त व चंद्रोदय पाहाण्यासारखा असतो.

कन्याकुमारी हे जसे धार्मिक स्थळ आहे तसेच पौराणिक क्षेत्रही मानले जाते. प्राचीन ग्रंथ, शिलालेख यातून कन्याकुमारीचा उल्लेख आढळतो. पांड्य, चालुक्य, चेर, नायक आणि चोल राजघराण्यांनी येथे राज्य केले. कन्याकुमारी ही पांड्य घराण्याची कुलदेवता. तामिळ ग्रंथाप्रमाणे कन्याकुमारी ही पार्वती देवीचा अवतार आहे. कुमारी कन्याकुमारीच्या हातून एका राक्षसाचा वध होणार होता.

पण तिचे श्रीशंकराबरोबर लग्न झाल्यास ते शक्य होणार नाही. यासाठी नारदाने लग्नाला निघालेल्या श्रीशंकराचे मन वळवले. त्यामुळे श्रीशंकर वेळेवर विवाहाच्या जागी पोहोचलेच नाहीत. आज वर्षानुवर्ष तीन सागरांच्या खळखळणाऱ्या लाटांच्या सान्निध्यात अविवाहित कन्याकुमारी सागरतीरावर प्रतिक्षा करीत उभी आहे. ही कमारी देवी इथे कशी आली. येथे का राहिली याविषयी कथा सांगितली जाते.

शोणितपूरचा दक्ष प्रजापती नांवाचा राजा होता. त्याला बाण, महिपसारखे चार मुलगे होते. यापैकी बाणासुराने घोर तपश्चर्या करुन अमरत्व प्राप्त करुन घेतले होते. मात्र असे सांगितले की, ‘कुमारी कन्येवाचून अन्य कोणाच्याही हातून तू मरणार नाहीस.’ शंकराचा वर मिळताच बाणासुराने त्रैलोक्यात उच्छाद मांडला. त्यामुळे देव भयभीत होऊन विष्णूला शरण गेले. विष्णने त्यांना कन्येच्या उत्त्पत्तीसाठी यज्ञ करण्यास सांगितले. या यज्ञकुंडातील अग्नीतून दुर्गादेवी कन्या रुपाने प्रकट झाली. शंकर पती मिळावा म्हणून तिने दक्षिण सागरतीरी तपश्चर्या सुरु केली.

शिव प्रसन्न होऊन त्यांनी लग्नाचे मान्य केले. या घटनेने देव घाबरले. कारण तिचे लग्न झाले तर तिच्या हातून बाणासूर मरणार नव्हता. म्हणून देवांनी नारदाला पुढे घातले. नारदाने कपट करुन शंकराला थांबवून धरले. त्यामुळे लग्नाचा मुहूर्त टळला आणि कुमारी ही अविवाहितच राहिली. कुमारीच्या सौंदर्याची कीर्ती बाणासुराला कळली. त्याने आपल्याशी लग्न करण्याचा आग्रह धरला.

कुमारीने त्याला झिडकारले. बाणासुराने अतिप्रसंग करताच त्यातून युद्ध झाले. कुमारीकेने बाणासुराचा वध केला. तेव्हापासून कन्याकुमारी शंकराची प्रतिक्षा करत आहे. कन्याकुमारी मंदिर फार पुरातन असून, महाभारतातील उल्लेखानुसार अर्जुन व बलराम येथे दर्शनासाठी आले होते. कन्याकमारी मंदिराचे प्रवेशद्वार उत्तरेकडे असन, देवीचे तोंड पूर्व दिशेकडे आहे. चेहरा मोहक असून नेत्र विशाल आहेत.

उजव्या हातात पुष्पमाला व डावा हात सरळ आहे. देवीच्या नाकातील हिऱ्याची नथ तेजस्वी व चमकदार दिसते. ही मूर्ती अलंकार विभूषित आहे. कन्याकुमारीच्या मंदिराला चारी बाजूला उंच उंच दगडी भिंती आहेत. पूर्वेकडील दरवाजा नेहमी बंद असतो. त्यामुळे उत्तरेकडील दरवाजातून आत प्रवेश करावा लागतो. कन्याकुमारीच्या पूर्वेला गंगासागरात सावित्री, गायत्री, सरस्वती व कन्याविनायक इत्यादी तीर्थस्थाने आहेत.

याशिवाय देवीच्या मंदिराच्या दक्षिणेस मातृतीर्थ, पितृतीर्थ आणि भीमातीर्थ आहे. व पश्चिमेस काही अंतरावर ‘स्थानतीर्थ’ आहे. भक्तगणांना या तीर्थाबद्दल मोठे आकर्षण आहे. घाटावर एक मंडप आहे. त्या मंडपात यात्री श्राद्धादी विधी क्रिया करतात. तामिळ महिन्याप्रमाणे ‘वैकासी’ महिन्यात म्हणजेच मे ते जन महिन्यात देवीचा मोठा उत्सव असतो.

तर नवरात्रीत नऊ दिवस रथोत्सव व दहाव्या दिवशी जलोत्सव साजरा केला जातो. मुख्य मंदिराच्या उत्तरेला भद्र कालीचे मंदिर आहे. तसेच तेथे समुद्राच्या तटावर एक विहिर आहे. या विहिरीचे पाणी गोड व पिण्यालायक आहे. मंदिराचे पूर्वेकडीलद्वार विषेशप्रसंगी उघडले जाते.

मंदिराच्या मंडपात प्रवेश करताना दोन भव्य वाघ आपले स्वागत करतात. मंदिराला सात गच्चींची बांधलेली उंच मिनार आहे. येथून कन्याकुमारी मंदिराचे व त्रिवेणी संगमाचे दर्शन होते. येथे जवळच महर्षी अत्री व अनसूयेचे मंदिर आहे. हे मंदिर कुमारी अम्मन मंदिर नावानेही ओळखले जाते.

Leave a Comment