कथा शारदेची

सौराष्ट्र देशात ‘देवस्थ’ नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याला शारदा नावाची एक सुंदर मुलगी राहत होती. तिचे लग्न ‘पद्मनाभ’ नावाच्या तरुण ब्राह्मणाशी झाले. विवाह उत्तमप्रकारे पार पडला. पद्मनाभ थोडे दिवस सासऱ्याकडे राहून नंतर घरी जाणार होता. एक दिवस सायंकाळी तो नदीवर आंघोळीला गेला असता परत येताना त्याला वाटेत साप चावला व सापाचे विष अंगात भिनून तो मरण पावला. ती वार्ता सगळीकडे पसरली.

देवरथ, शारदा व तिची आई धावत तेथे आले व शोक करू लागले. त्यांचे दुःख पाहून लोकही दुःखी झाले. पद्मनाभावर अंत्यसंस्कार करून लोक घरी गेले. एक दिवस देवरथाकडे ‘नैध्रुव’ नावाचे ऋषी आले. ते आंधळे होते. शारदा घरीच होती. तिने नैध्रुव ऋषींना आसनावर बसविले. त्यांची पूजा करून त्यांना वाकून नमस्कार केला. नैध्रुव ऋषींनी तिला आशीर्वाद दिला, “अखंड सौभाग्यवती भव.

तुला सुलक्षणी मुलगा होवो.” ऋषींना ती विधवा असल्याचे माहीत नव्हते. शारदा दुःखी चेहऱ्याने त्यांना म्हणाली, “आपण आशीर्वाद दिलात. पण माझे पती काही दिवसांपूर्वी साप चावून मृत्यू पावले. तेव्हा आपला आशीर्वाद खरा कसा होणार?” नैध्रुव ऋषी म्हणाले, “माझा आशीर्वाद कधीही खोटा होणार नाही.” त्याचवेळी शारदेचे आईवडील घरी परत आले. ते म्हणाले, “तपस्व्यांचा आशीर्वाद कधी खोटा होत नाही.”

नैध्रुव ऋषी म्हणाले, “शारदे, उमा-महेशाचा पंचाक्षरी मंत्राचा जप कर. हा मंत्र सफल होईपर्यंत मी तुझ्या घराजवळच राहीन.” शारदेने व्रताला आरंभ केला. सोन्याच्या उमा-महेशाच्या मूर्तीची स्थापना केली. पंचाक्षरी मंत्राचा जप सुरू केला. शारदेने हे व्रत वर्षभर केले. नंतर त्या व्रताचे उद्यापन केले. रात्र झाली. शारदा जप करत बसली होती. तिचे आईवडीलही तेथे होते. मध्यरात्री पार्वतीमाता प्रकट झाली. तिला पाहताच शारदेने साष्टांग नमस्कार केला.

तेथे असलेल्या नैध्रुव ऋषींना देवीने दिव्य दृष्टी दिली. ती फक्त शारदेला व नैध्रुव ऋषींनाच दिसत होती. पार्वतीमाता म्हणाली, “वर माग.” नैध्रुव ऋषी म्हणाले, “मी तिला सौभाग्यवती होशील असा आशीर्वाद दिला आहे. तो खरा होणे तुझ्या कृपेवर अवलंबून आहे.” देवी म्हणाली, “शारदा ही पूर्वजन्मी एका ब्राह्मणाची मुलगी होती. तिचे नाव भामिनी होते. तिचे लग्न झाले.

तिला मोठी सवत होती. त्या सवतीचा परपुरुषाशी संबंध होता. त्या पुरुषाची पापी नजर भामिनीवर गेली. एक दिवस घरात कोणीही नसताना त्याने हिच्याशी संग करण्याचा प्रयत्न केला. पण हिने त्याला हाकलून दिले. हिच्या सौंदर्याने तो घायाळ झाला होता. तो हिचा ध्यास घेऊन शेवटी मरण पावला. त्यामुळे सवतीला हिचा राग आला. तिने भामिनीला शाप दिला, ‘तू विधवा होशील.’

“पूर्वजन्मीची भामिनी आता शारदा म्हणून जन्माला आली आहे. गतजन्मीच्या त्या माणसाशी या जन्मी हिचे लग्न झाले तो पद्मनाभ. सवतीने तिला विधवा होण्याची शाप दिला. म्हणून या जन्मी ही विधवा झाली.” “मागल्या जन्मी भामिनीचा जो पती होता तोच खरा हिचा पती आहे. तो द्रविड देशात एका ब्राह्मणाच्या जन्माला आला आहे. तो हिच्या स्वप्नात येईल. स्वप्नात दोघांचे मिलन होईल.

काही काळाने हिला मुलगा होईल. तो ब्राह्मण नेहमी स्वप्नात येऊनच हिच्याशी शरीरसंबंध ठेवेल. त्यामुळे दोघांनाही सुख लाभेल.” एवढे बोलून पार्वती गुप्त झाली. काही काळाने शारदा गरोदर राहिली. पण विधवा गरोदर राहिलेली पाहून सर्व लोक निंदा करू लागले. त्याचवेळी आकाशवाणी झाली. तरीही लोकांना ही आकाशवाणी खोटी वाटत होती. पण त्या गावात एक पुण्यशील माणूस राहत होता. तो म्हणाला, “शारदेचा गर्भ स्वप्नातील दिव्य संबंधाने झाला असणे शक्य आहे.

ईश्वरी माया अगम्य आहे.” तरी दुर्जन निंदा करीत होते. पुन्हा आकाशवाणी झाली. “लोकहो ऐका. जो कोणी शारदेला पापी म्हणेल. त्याच्या तोंडात किडे पडतील.” शारदा प्रसूत झाली. तिला मुलगा झाला. तो वेदशास्त्रात पारंगत झाला. शारदा त्यानंतर गोकर्ण क्षेत्राच्या यात्रेसाठी गेली आणि काय आश्चर्य! तेथे तिला तिच्या स्वप्रात नेहमी भेटणारा तिच्या पूर्वजन्मीचा पती भेटला.

तिने देवीने सांगितल्याप्रमाणे उमामहेश व्रताचे अर्धे पुण्य त्या स्वप्रात येणाऱ्या ब्राह्मणाला दिले. देवी तिला म्हणाली होती, “तू तुझा पुत्र त्या ब्राह्मणाच्या स्वाधीन कर. चार महिने त्याच्या सहवासात राहा. पण त्याच्याशी समागम करू नकोस. व्रतस्थ राहा. तू शिवलोकी जाशील.” तिने माता पार्वतीच्या म्हणण्याप्रमाणे केले. ती पतीबरोबर द्रविड़ देशात गेली. व्रतस्थ राहिली. काही वर्षांनी शारदेचा पती निधन पावला. शारदा त्याच्यामागोमाग सती गेली आणि दोघे पतिपत्नी शिवलोकाला गेले.

Leave a Comment