भगवान शंकराचे महातीर्थ केदारनाथ

हिमालयाच्या चारी धामांपैकी एक (गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ ही तीन धामे) आणि बारा ज्योर्तिलिंगांपैकी समाविष्ट असलेले थोर तीर्थक्षेत्र केदारनगरी हे पांडवांनी बनविलेले स्थापत्य होते. ३५८४ मी. उंचीवर वसलेले हे पुण्यक्षेत्र. अकरा या अंकात काही वैशिष्ट्य आहे. म्हणून म्हणा अथवा रुद्र अकराच आहेत. त्यामुळे म्हणा, हिमालयातील केदारनाथ हे अकरावे ज्योर्तिलिंगाचे ठिकाण काही खास वेगळ्याच स्वरुपात तिथे उभे आहे.

केदारनाथच्या दर्शनाला पांडव आले होते. तसेच तपश्चर्येसाठी येथे आले होते. येथे दर्शनाला येणारे भाविक प्रथम गंगोत्री, यमुनोत्री करुन तेथील पवित्रजल केदारनाथच्या अभिषेकासाठी आणतात. पापनाशक केदारनाथच्या दर्शनाविना बद्रीची यात्रा निष्फळ होते. हे मंदिर गावाच्या टोकास आहे. ते रस्त्यापासून दोन अडीच पुरुष उंचीवर आहे. गुडघाभर उंचीवरील चौथऱ्यावर केदारनाथाचे चिरेबंदी मंदिर बांधलेले आहे.

शिखर ब्राह्मी पद्धतीचे आहे. महाद्वार प्रशस्त असून त्यांच्या दोन बाजूंना दोन मोठे द्वारपाल आहेत. मंदिराच्या डाव्या-उजव्या अंगांनाही मोठाले दरवाजे आहेत. मंदिराच्या वरील बाजूस २० कोनाडे असून सभागृहाच्या चारही भिंतीवर द्रौपदीसहीत पाच पांडवांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. याच्या माथ्यावर पितळेचा नंदी आहे. शिवाय मंदिराच्या प्रांगणात दारासमोर नंदीचे भव्य शिल्प दृष्टीस पडते.

पायऱ्यांजवळील कमानीत असंख्य लहान-मोठ्या आकाराच्या घंटा लोंबकळताना दिसतात. – केदारनाथाचे लिंग शाळुका-पिंडी या आकारात नसून ते कैलास शिखराप्रमाणे किंवा धान्याच्या शिंगेप्रमाणे घुमटाकार आहे. हे लिंग स्वयंभू मानतात. गाभाऱ्यात तुपाचे नंदादीप अहोरात्र तेवत असतात. मंदिराच्या मागे सुमारे ३ फूट लांब व रुंद कुंड आहे. त्यात एक शिवलिंग स्थापित आहे.

पूर्व व उत्तर दिशेस हंसकुंड आणि रेतसकुंडात वीरासनात तीन आचमन डाव्या हाताने व तीन आचमन उजव्या हाताने घेतले जाते. येथेच ईशान्येश्वर महादेव स्थित आहे. मंदिराच्या मागे गोड पाण्याचे एक कुंड असून याचेही पाणी तीर्थ म्हणून घेतले जाते. इथली मूर्ती म्हणजे लिंग नाही. तर कैलास शिखराप्रमाणे असून येथे देवाला अभिषेक करीत नाहीत, किंवा लिंगावर पाणीही घालत नाहीत. त्याऐवजी लिंगावर तुपाचे गोळे थापतात.

येथे कडाक्याची थंडी असल्यामुळे सोवळ्या-ओवळ्याचा विधीनिषेध नाही. पंडे व यात्रेकरु कपडे घालूनच देवाची पूजा करतात. केदारनाथाच्या मुख्य पुजाऱ्याला रावळ म्हणतात. हा नंपूतिरी ब्राह्मण असतो. तो देवाची पूजा स्वत: न करता शिष्यांकरवी करुन घेतो. उखीमठ या ठिकाणी तो राहातो. उखीमठ हे गांव केदारनाथपासून ३८ कि.मी. अंतरावर आहे.

थंडीच्या दिवसात बर्फ पडत असतो, तेव्हा सहा महिने केदारनाथाची गादी उखीमठ येथेच असते. विविध प्रकारच्या पूजा असतात. उदा. अष्टोपचार पूजा, गणेशपूजा, पांडवपूजा, प्रात:कालाची पूजा, भैरव पूजा, महाभिषेक, रुद्राभिषेक, लघुरुद्राभिषेक, षोडशोपचार पूजा, साधारण शिवपूजा, संपूर्ण दिवसाची पूजा, संपूर्ण आरती असून संध्याकाळच्या पूजेत अपराध क्षमापन स्तोत्र, एकांतसेवा, शिव तांडव स्तोत्र, शिवनामावली, शिवमहिम्न स्तोत्र, शिव अष्टोहत्तर पाठ व शिव सहस्त्रनाम ह्यांचा समावेश असतो. भोगमध्ये साधारण भोग, विशेष भोग, उत्तमभोग, कीर्तन, श्रावणी, अन्नकूट, सोमवार व संक्रांत असते. या शिवमंदिराच्या बाहेरील प्रदक्षिणेच्या वाटेवर अष्टदिशांना आठ कुंडे लागतात. व ती पवित्र मानली जातात.

केदारनाथ माहात्म्य
१) गरुड पुराणांत केदार तीर्थ हे सर्व पापांचा नाश करणारे पवित्र तीर्थ आहे.
२) सौर पुराणांत म्हटले आहे की, केदारक्षेत्र हे भगवान शंकराचे महातीर्थ आहे. जो मनुष्य येथे स्नान करुन शंकराचे दर्शन घेतो, तो गणांचा राजा होतो.
३) पद्म पुराणांत कुंभ राशीतील सूर्याचे ब्रह्मदेवांत परिवर्तन होते. अशा शुभमुहूर्तावर केदारनाथाचे दर्शन मोक्षदायी ठरते.
४) लिंग पुराण म्हणते, जो मनुष्य संन्यास ग्रहण करुन केदारनाथ येथे निवास करतो. तो शिवरुप होऊन जातो. असे हे केदारनाथ माहात्म्य आहे.

Leave a Comment