श्री क्षेत्र नाशिकमधील कुंभमेळा

श्री क्षेत्र नाशिक हे इ. स. पूर्व काळापासून धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व असणारे प्राचीन क्षेत्र आहे. अशा श्री क्षेत्र नाशिकला प्रत्येक युगात निरनिराळी नांवे पडली. कृत युगात भगवान ब्रह्मदेवाने सृष्टी रचण्यासाठी पद्मासनस्थ होऊन तप केल्याने ‘पद्मनगर’ हे नांव पडले. त्रेता युगात खर, दूषण, त्रिशिर हे काट्याप्रमाणे विध्वंसक असणाऱ्या राक्षसांचा संचार असल्याने त्रिकंटक’ नांव पडले.

द्वापार युगात जनक राजाने अनेक यज्ञ-यागादी कर्मे करुन वास्तव्य केले होते म्हणून ‘जनस्थान’ हे नाव पडले. आणि प्रभू श्री रामचंद्र बंधू लक्ष्मणाने रावण भगिनी शूर्पनखा हिचे नाक छेदन केले म्हणून कलियुगात ‘नासिक’ नावाने प्रसिद्ध झाले. नाशिक जिल्हा भाग्यवंत आहे. वणी सप्तशृंगीचे पावन शक्तीपीठ येथे आहे.

प्रभू रामचंद्र, सीता व लक्ष्मण यांच्या वास्तव्याने पुनित झालेली ही श्रेष्ठ भूमी असून बारा ज्योर्तिलिंगांपैकी त्र्यंबकेश्वर नाशिकहून जवळच आहे. नाशिकची पांडव लेणी प्रसिद्ध आहे. परम पवित्र गोदेच्या प्रवाहाने पावन झालेल्या नाशिक क्षेत्राची परंपरा अति प्राचीन असून आदिकवी वाल्मिकी, महाकवी कालिदास, भवभूती या महान व्यक्तींनी नाशिकचा गौरव केला आहे.

नाशिकचे सृष्टी सौंदर्याचे वर्णन रामायण व उत्तर रामचरित्र या ग्रंथात वर्णन केलेले आढळते. श्रीगोदावरी मातेच्या उगम स्थळी, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरनाथाचे, श्री कुशावर्त तीर्थराजात, सिंहस्थ कुंभ मेळाव्याच्यावेळी संत संन्यासी इथे स्नान करतात. सिंहस्थ कुंभमेळाच्याविषयी पुराणात कथा आहेत. समुद्र मंथनाच्या कथानकावरुन सिंहस्थ कुंभमेळा सुरु झाला. देव दानवांमध्ये अनेक वर्षे वैमनस्य होते. या दोघांनी पृथ्वीचा संपूर्ण शोध घेतला. परंतु त्यांचे समाधान झाले नाही. तेव्हा त्यांनी सागराचा शोध घेण्याचे ठरविले.

सागराचा शोध घेणे म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. म्हणून देव-दानवांनी समन्वय केला व समुद्र मंथनासाठी मंदारचल पर्वताची रवि केली आणि सर्पराज वासुकीची दोरी करुन दोघांनी मिळून समुद्रमंथन करण्यास सुरुवात केली तेव्हासागराने-रत्नाकराने आपल्या पोटातील अमृता सह चौदा रत्ने बाहेर काढून दिली. अमृतकलश प्राप्त होताच देव-दानवांमध्ये उत्साह निर्माण झाला. परंतु अमृत कोणी घ्यावयाचे यावरुन कपटकारस्थाने सुरु झाली. त्यावेळी इंद्राचा पुत्र जयंत याने तो अमृतकलश पळवून नेला. तो पळवित असतांना दैत्यांनी जयंतला चार ठिकाणी अडवून युद्ध केले.

हे युद्ध बारा वर्षे चालले. या युद्धप्रसंगी चार ठिकाणी अमृत कुंभातील अमृताचे काही थेंब पडल्यामुळे चार स्थाने अमृतमय झाली. या कुंभाचे रक्षण गुरुने केले म्हणून त्या वेळेपासून या तीन ग्रहांचे विशिष्ट राशीत भ्रमण होत असतांना म्हणजे सूर्य, चंद्र आणि बृहस्पति कुंभ राशीत प्रवेश करतो तेव्हा कुंभमेळा लागतो. अमृतकुंभासाठी १२ वर्षे युद्ध झाले. त्याप्रमाणे प्रत्येक १२ वर्षानंतर चार कुंभमेळे लागतात.

देव-दानवांच्या युद्धासमयी आठ थेंब देवलोकांत आणि चार थेंब भूलोकात पडले, या कारणाने चार कुंभमेळे भूलोकांत आणि आठ कुंभमेळे स्वर्गलोकात लागतात. पृथ्वीवर हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरला कुंभमेळा भरतो.

१) जेव्हा मेष राशीत सूर्य आणि कुंभ राशीत गुरुचे आगमन होते. तेव्हा हरिद्वारला कुंभमेळा भरतो. २) ज्यावेळी वृषभ राशीत बृहस्पती आणि मकर राशीत सूर्याचे आगमन होते, तेव्हा प्रयागराज येथे कुंभमेळा लागतो. ३) जेव्हा वृश्चिक राशीत बृहस्पती आणि सूर्याचे आगमन होते, तेव्हा उज्जैन येते कुंभमेळा लागतो. ४) त्याचप्रमाणे सिंह राशीत गुरु आणि सूर्याचे आगमन होते तेव्हा गोदावरीच्या उगम स्थानात श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरात कुंभमेळा लागतो.

सिंहस्थ काळात गोदावरी स्नानाचे फळ अत्यंत फलदायक आहे. या पर्वकाळी विशेष ग्रह, नक्षत्र आणि राशी योग बनतो त्यालाच कुंभ महापर्व म्हणतात. कुंभ पर्वात साधू, संन्यासी, संतगण कुशावर्तती स्नानाला येतात. संपूर्ण भारत वर्षातील साधूसंत, सत्पुरुष, महंत, बैरागी, उदासी, निर्वाणी, निर्मोही, दिगंबर, खालसा, गुरुद्वारा, खाकी, रामानुजी व दसनामी इत्यादी प्रारंभीच्यावेळी ध्वजारोहन करतात आणि आपापल्या परंपरेनुसार शाही मिरवणूकीने आखाड्यांसह ढोल, शंख, डमरु, मृदुंग, चौघडा, बॅन्ड इत्यादींचा निनाद करीत हत्तीवर, उंटावर अंबारीत बसून जयघोष करीत स्नानादिक कर्म करतात. भाविक जनताही याठिकाणी कुंभमेळ्याचे स्नान, दान, श्राद्ध कर्मे करुन धन्य होतात.

Leave a Comment