300+ सुंदर मराठी सुविचार । Marathi Suvichar

हॅलो मित्रांनो कशे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठीगुरु वेब वर आज मी तुम्हाला 300+ सुंदर मराठी सुविचार । Marathi Suvichar दोनशे पेक्षा जास्त मराठी सुविचार संग्रह अर्थासहित एकाच पोस्ट मध्ये. मी शब्द देतो जर तुम्ही हे सर्व सुविचार मन लावून समजून घेत वाचले तर नक्की तुमच्या वागणुकीमध्ये त्याचा फरक जाणवेल तर चला बघुयात.

आणखी वाचा – 25 Marathi Suvichar

Marathi Suvichar

०१] ‘विनम्र वृत्ती ही सर्व दैवी गुणांचे मूळ आहे.’ (गौतम बुद्ध)
विनम्र वृत्तीमुळे माणूस सदैव स्वागतशील राहू शकतो. त्यामुळे सतत नवीन काही तरी शिकण्याची क्षमता त्यांच्या अंगी शिल्लक राहते. असा माणूस आपलं व्यक्तिमत्त्व विविधांगाने फुलवू शकतो आणि असा माणूसच सुसंवादी जीवन जगू शकतो.

०२] ‘न व्यसनपरस्थ कार्यावाप्तिः।’ (चाणक्यसूत्र)
व्यसनात गढून गेलेल्या माणसाकडून कोणतेही चांगले काम पूर्ण होऊ शकत नाही. व्यसनांच्या आहारी जाण्याने व्यक्तीची कार्यक्षमता संपू लागते. त्याच्या विचारशक्तीला पांगळेपणा येतो. सतत नशेत राहणाऱ्याला वास्तवाची शुद्धच न उरल्याने संकटावर मात करून समृद्धी प्राप्त करून घ्यावी, अशी इच्छादेखील होत नाही.

०३] ‘पेरिले ते उगवते । बोलण्यासारिखे उत्तर येते । तरी मग कर्कश बोलावें ते । काय निमित्य?’ (समर्थ रामदास)
आपल्या प्रत्येक क्रियाला त्याच प्रमाणात प्रतिक्रिया जगाकडून मिळते. आपण जगाशी प्रेमाने वागलो तर आपल्यावरही लोक प्रेमच करतील. आपण जर चांगल्या कार्याची सुरुवात केली तर चांगल्याच परिणामांची निर्मिती होते असे असताना या जगात क्रोधाने व्यवहार करण्यात काय फायदा?

०४] ‘माणसे कोणत्या गोष्टीला हसतात ते पाहावे त्यावरून त्यांच्या चारित्र्याची कल्पना येते.’ (गटे)
चांगल्या कार्याचं महत्त्व पटवून ते अंगीकारण्याऐवजी काही माणसे अशा सहकार्याची टिंगल टवाळी करताना दिसतात. अशा माणसांची समजून घेण्याची कुवतच कमी असते. त्यांच्यावर चारित्र्याचा संस्कारही झालेला नसतो. म्हणूनच लोकांचं चारित्र्य ओळखण्याची ही सोपी खूणच आहे.

०५] ज्याचे स्वतःवर नियंत्रण नाही तो स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ शकत नाही. (रस्किन)
स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. स्वातंत्र्याचे हक्क हे जबाबदारीच्या मर्यादांमध्ये बांधलेले असतात. स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यासाठी मुळात जबाबदारीची, संयमपूर्ण वागणुकीची जाणीव असावी लागते. स्वतःवर नियंत्रणे घालू न शकणारा माणूस स्वातंत्र्याऐवजी स्वैराचारानेच वागेल.

०६] ‘वाट पुसल्याविण जाऊ नये । फळ ओळखल्याविण खाऊ नये। पडली वस्तू घेऊ नये । एकाकी ।।’ (समर्थ रामदास)
आयुष्यात चुकांना क्षमा नसते. म्हणूनच जगताना अखंड सावधानता हाच मंत्र लक्षात ठेवला पाहिजे. सावधचित्त माणसाला संकटाशी मुकाबला करण्याचे प्रसंगच फार कमी येतात आणि आले तरी तो त्यातून सहीसलामत सुटतो. प्रवासाला जाण्यापूर्वी आपल्या मार्गाची नीट चौकशी करावी. मिळालेल्या खाद्य वस्तू तपासल्याशिवाय खाऊ नये. सापडलेल्या गोष्टींची चौकशी, चिकित्सा करावी आणि सावधतेने जगावे.

०७] ‘प्राप्त झालेले वैभवदेखील आळशी माणसाला टिकविता येत नाही.’ (चाणक्यसूत्र)
कधी कधी नशीब, दैव उजळलेल्या आळशी माणसालाही सहजगत्या संपत्ती मिळते. पण अगदी विनासायास मिळालेल्या या संपत्तीला वाढवणे हे खरं तर कोणालाही जमणारं काम आळशी माणसाला जमत नाही. कारण त्यासाठी बुद्धी, कौशल्य व शारीरिक कष्ट सोसावे लागतात. दैवदुर्विलास असा की, आळशीपणामुळे त्यांच्याने संपत्ती वाढवणे तर सोडाच पण टिकवणेसुद्धा शक्य होत नाही.

०८] ‘जर आपल्या मनात शांतता नसेल तर कोणत्याही बाह्य उपचारांनी शांतता मिळणे शक्य नाही.’ (म. गांधी)
आपला जगाबद्दलचा दृष्टिकोन आपणच घडवीत असतो. आपली मनःस्थिती जशी असेल तशी परिस्थिती आपल्याला जाणवत असते. बाह्य घटकांपेक्षा आपलं मनच शांती – अशांतीसाठी जबाबदार असते. शांतता बाह्य गोष्ट नसून आंतरिक अवस्था आहे.

०९] ‘बुद्धिमत्ता ही माणसाला लाभलेली सर्वोत्तम देणगी होय.’ (सोफोक्लेस)
माणूसही प्राणीच आहे. मात्र तरीही तो इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. कारण इतर प्राणी सहजभावाने जगतात तर माणूस जगताना बुद्धिमत्तेचा वापर करतो. जगताना कार्यकारण भावाची जाणीव असल्याने माणसाने अपूर्व विविधांगी प्रगती साधलेली दिसते. बुद्धिमत्तेशिवाय हे शक्य नसतं.

१०] ‘ऋणशत्रुव्याधिषु अशेषः कर्तव्यः ।’ (चाणक्यसूत्र)
कर्ज, शत्रू आणि रोग यांची थोडीसुद्धा बाकी ठेवू नये. कर्ज वेळेवर फेडले नाही तर व्याजाचा बोजा वाढत जातो. शत्रूला पूर्णतः नष्ट केले नाही तर तो कालांतराने पुन्हा आक्रमण करण्याचा धोका असतो. आणि रोगाचा पुरता बीमोड केला नाही तर आजारपण पुन्हा उद्भवत.

✿ मराठी सुविचार । Marathi Suvichar

Marathi Suvichar

११] ‘अक्षरे गाळून वाची । काही घाली पदरींचे ।निगा न राखी पुस्तकाची । तो एक मूर्ख ।।’ (समर्थ रामदास)
खऱ्या अर्थानं शहाणं व्हायचं असेल तर वस्तुनिष्ठ अभ्यास केला पाहिजे. अभ्यासातील पुस्तके, ग्रंथसंपदा म्हणजे आपले गुरूच होत. हे गुरू आपल्या मौन वाणीनं काय सांगतात, याकडे यथार्थतेनं लक्ष देणं हे शहाण्याचं लक्षण आहे. नीट न वाचणारा, न सांगितलेली वाक्ये खोटेपणानेच पुस्तकात आहेत असं सांगणारा आणि पुस्तकांची काळजी न घेणारा माणूस हा मूर्खच असतो, असं समजावं.

१२] ‘निर्भयता हे नैतिकतेचे अधिष्ठान आहे . भित्रा माणूस कधीही नीतिमान होऊ शकत नाही.’ (महात्मा गांधी)
असीम धैर्यातूनच नीतीचा जन्म होतो. जो धाडसी माणूस आहे तो सर्व अनुकूल – प्रतिकूल प्रसंगांना विलक्षण आत्मविश्वासाने सामोरा जातो. अशा माणसाला जीव वाचविण्यासाठी खोटं बोलावं, अन्यायाचा आश्रय घ्यावा याचा कधीही मोह होत नाही. याउलट भित्रा माणूस कधीही इतक्या नीतीने जगू शकत नाही.

१३] ‘माणसाला स्वतःच्या दोषांची जाणीव होणे हे त्यांच्या शहाणपणाचे पहिले लक्षण होय.’ (रुदरफोर्ड)
शहाणा माणूस कोणत्याही वेळी सजग असतो. आपले सामर्थ्य कशात आहे यांच्या आधी आपले नेमके दोष कोणते याची त्याला स्पष्ट जाणीव असते. या जाणीवेतून तो आपले दोष सुधारतो आणि मगच यशस्वी होतो. म्हणूनच स्वतःच्या दोषांची जाणीव होण्याच्या क्षणापासून शहाणपणाकडे वाटचाल सुरू होते.

१४] ‘जगात दुसऱ्याला हसण्याइतके सोपे आणि दुसऱ्यासाठी रडण्याइतके कठीण काम दुसरे कोणतेही नाही.’ (साने गुरुजी)
दुसऱ्याला हसणं म्हणजे दुसऱ्याच्या दोषांना, दुःखांना, अपुरेपणाला हसणं. हे फार सोपं असतं कारण दुसऱ्याचं कुसळसुद्धा आपल्या डोळ्यांना दिसतं या हसण्यासाठी आपल्याला काहीही गमवावं लागत नाही. पण दुसऱ्यासाठी रडणं फार अवघड असतं. कारण त्यासाठी दुसऱ्याच्या दुःखानं हेलावून जाणारं संवेदनशील मन, अपार करुणा असावी लागते दुसऱ्यासाठी झिजण्याची तयारीच या रडण्यातून दिसून येत असते.

१५] ‘आधी कामाला प्रारंभ करा, म्हणजे तुमच्यामधील प्रचंड शक्तीचा तुम्हाला प्रत्यय येईल.’ (स्वामी विवेकानंद)
कार्याच्या सुरुवातीला आपल्यातील सुप्त क्षमतांचा आपल्याला परिचय नसतो. पुढे जसजसे कार्य आकारू लागते तसतसे मिळालेल्या अनुभवांनी आपल्याला खूप. काही शिकायला मिळतं. याचाच परिणाम म्हणजे आपल्यातलं निद्रिस्त सामर्थ्य जागं होऊन प्रचंड ऊर्जेने आपल्या हातून कार्य घडतात, असं आश्चर्यकारक सत्य अनुभवास येतं.

१६] ‘सद्गुणांशिवाय सौंदर्य म्हणजे बिनवासाचे कागदी फूल होय.’ (साने गुरुजी)
सौंदर्य हे वरच्या त्वचेचं असतं. माणसाच्या बाह्यरूपाला भुलून आपण त्याची किंमत करणं फारसं उपयुक्त नसतं कारण, माणसाचं खरंखुरं रूप म्हणजे त्यांचं अंतरंग, त्याचा ‘स्व-भाव’ – सद्गुणी माणसाचं सौंदर्य हे जणू मधुर सुवासानं दरवळलेलं सुंदर फूलच असतं. सद्गुणांचा अभाव असलेला सौंदर्याचा पुतळा म्हणजे बिनवासाचं कृत्रिम कागदी फूल होय.

१७] ‘हल्ला करणाऱ्या शत्रूपेक्षा स्तुती करणाऱ्या मित्रापासून सावध राहावे.'(नेपोलियन)
छुप्या ढोंगापेक्षा उघड उघड धोके केव्हाही कमी धोकादायक असतात. आपला उघड शत्रू आपल्या विरोधात कोणत्या हालचाली करत आहे याची कल्पना आपल्याला सहजपणे येते पण आपल्याला स्तुतीच्या नशेत बेहोष करून टाकणाऱ्या आपल्या ढोंगी मित्राचा अंतस्थ कावा ओळखणं फार अवघडच असतं.

१८] ‘अप्रामाणिकपणामुळे तात्पुरता फायदा होतो पण कायमचा तोटा होतो.’ (बोल्ही)
तात्पुरता फायदा कोणालाही एकदा-दोनदा फसवून करून घेता येतो. त्या क्षणी आपल्याला काही फायदा झालेला दिसला तरी आपण अशा अप्रामाणिक वागणुकीमुळे एक कायमस्वरूपी तोटा करून घेत असतो. तो म्हणजे आपणच आपल्याबद्दलचा लोकांचा विश्वास गमवतो. पुढे आपल्यापासून सगळेच लोक दूर होतात.

१९] ‘मोती होऊन सोन्याच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागविणे अधिक चांगले.’ (साने गुरुजी)
आयुष्याचा उपयोग दुसऱ्यांना उपयोगी पडण्यासाठी व्हावा, आपण पैसा, सत्ता, प्रतिष्ठा, दरारा, सौंदर्य, सामर्थ्य हे सगळं मिळवलं आणि कोणालाही मदत केली नाही, उपयोगी पडलो नाही तर या संपत्ती, सामर्थ्याचा उपयोग काय? हा दिखाऊपणा झाला. यापेक्षा एखाद्या भुकेल्या माणसाच्या पोटात, आपल्या भाकरीचा अर्धा भाग सहजपणे देणं, हे किती तरी सार्थ आहे.

२०] ‘ध्येयाचा ध्यास लागला म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही.’ (बाबा आमटे)
कार्य कितीही खडतर , कष्टप्रद असले तरीही त्यावर निष्ठेने वाटचाल करणाऱ्यांना जराही थकवा येत नाही. कारण त्यांना ध्येयाची आस लागलेली असते. ध्येय जितके महान तितका कामाचा उत्साह, धैर्य, क्षमता मोठी होत जाते. ध्येय ही कार्यरूपी इंजिनाची उर्जा असते.

✿ मराठी सुविचार । Marathi Suvichar

Marathi Suvichar

२१] ‘तुमच्या आवडीचे काम मिळालेले नसले तरी मिळालेले कामआवडीने करा.’ (महात्मा गांधी)
सगळ्यांनाच आपल्या मनाप्रमाणे आवडतं काम मिळू शकणारच नाही. मात्र प्रत्येकाला कोणतं ना कोणतं काम करावंच लागतं. अशा वेळी आपल्याला मिळालेलं काम आवडीनं, उत्साहानं करणंच श्रेयस्कर, नाही का?

२२] ‘माणसाजवळ राक्षसी शक्ती असावी, पण ती राक्षसासारखी वापरु नये. म्हणजे झालं.’ (शेक्सपिअर)
माणसापुढची आव्हानं पर्वतप्राय आहेत . त्यांच्यावर मात करण्यासाठी त्याला प्रचंड सामर्थ्यांची, कौशल्याची गरज आहे पण त्याच वेळी त्या सामर्थ्याचा मानवी हितासाठीच वापर कसा करावा, याचा विवेक फार गरजेचा आहे. नाही तर माणसाच्या डोक्यावरच राक्षस येऊन राज्य करेल.

२३] ‘आपण केलेल्या त्यागाबद्दल लोकांनी आपल्याला सहानुभूती दाखवावी अशी ज्याची अपेक्षा असते तो ढोंगी समजावा.’ (महात्मा गांधी)
त्यागाची भावना प्रबळ असावी पण केलेल्या त्यागाची जाणीव नसावी. आपण त्याग केला आहे हा विचार सहजगत्या गळून पडला पाहिजे. आपल्या त्यागाची जाहिरात करून त्या बदल्यात सहानुभूती, कौतुक, सत्कार या कशाचीही अपेक्षा ठेवणं म्हणजे एक प्रकारे ढोंग रचणे होय.

२४] ‘सूक्ष्म छिद्रातून जसा सूर्यप्रकाश जाणवतो तसाच किरकोळ गोष्टीतूनच माणसाचा स्वभाव कळतो.’ (एस. जॉन्सन)
पूर्ण अंधाऱ्या खोलीत छताला असलेल्या अतिसूक्ष्म छिद्रामधूनदेखील सूर्यप्रकाशाचं अस्तित्व पटतं . किंबहुना जास्त चटकन लक्षात येतं. त्याचप्रमाणे मोठ्या मोठ्या माणसांच्या छोट्या छोट्या गोष्टीतूनसुद्धा त्यांचे खरं अंतरंग स्पष्टपणे जाणवतं. ते लपून राहू शकत नाही.

२५] ‘भेटलेल्या प्रत्येक माणसापासून काही तरी शिकावं.’ (इमर्सन) डोळे उघडे ठेवले तर जीवन विद्यालय बनेल, ज्याला शिकायची भूक आहे तो प्रत्येक व्यक्तीपासून आणि घटनेपासून संदेश घेत असतो. तो कसा मिळवायचा हे ज्याला समजतं त्याला ज्ञान प्राप्त होतं. ह्या पद्धतीने जो शिकला तो जीवनात सर्व काही शिकू शकतो.

२६] ‘सामान्य लोक आपला वेळ कसा घालवावा, याचा विचार करतात; पण बुद्धिमान लोक त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न करतात.’ (स्कॉपन हॉवर)
वेळ ही अत्यंत चंचल गोष्ट आहे. पण तिचं मूल्य व्यक्तीनुसार बदलतं. काही व्यक्ती इतक्या रिकामटेकड्या असतात की, त्यांचा वेळ जाता जात नसतो. वेळ घालविण्यासाठी काय काय करावं हेच बिचाऱ्यांना समजत नसतं . त्याच वेळी कर्तृत्वनान , बुद्धिवान , विचारी माणसं आपल्यापुढे उभे असलेले कामाचे डोंगर उपसण्यासाठी वेळेचं जास्तीत जास्त नियोजन करू पाहतात.

२७] ‘ज्याने वेळ वाया घालविला त्याच्याजवळ गमवायला काहीही उरत नाही.’ (थॉमस फुलर)
विचारी माणसासाठी जगातली सर्वात मौल्यवान संपत्ती म्हणजे वेळ होय. कारण वेळेचा योग्य उपयोग करून असा माणूस सर्व प्रकारची सुखसमृद्धी प्राप्त करून घेऊ शकतो. मात्र जो मनुष्य वेळ वाया घालवतो तो जणू आपल्या सुखसमृद्धीची गुरुकिल्लीच हरवून बसतो.

२८] ‘वर्तमान काळ वाया घालवून आपण सर्वच काळ वाया दवडतो.’ (डब्ल्यू. जी. बेनहॅम)
भूतकाळ हा इतिहासजमा झालेला असतो. तो जणू मृतप्राय असतो अन् भविष्यकाळ कसा असेल याची आपल्याला पूर्णपणे खात्री देता येत नसते. माणसाच्या हातात केवळ सध्या जगत असलेला क्षण इतकेच काय ते वास्तव असते. असा वर्तमान क्षण वाया घालविण म्हणजे सगळाच काळ व्यर्थ दवडणं होय.

२९] ‘जो विजयानंतरही स्वतःवर संयम ठेवू शकतो, त्याला दुप्पट विजय विजय लाभतो. (बी .एफ. बेकॉन)
विजय मिळवणं खूप सोपं आहे. अवघड असतं ते विजयाच्या उन्मादात स्वतःला न हरवणं विजय मिळाल्यानंतर विजेत्याचे पाय जमिनीलाच टेकलेले असणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यासाठी मोठी तपश्चर्या लागते. जो हे साधतो त्यानं जणू दुप्पट विजय मिळविला असं म्हणावं लागतं.

३०] ‘ज्या देशाला दूरदृष्टीची देणगी लाभलेली नसते तो देश नाश पावल्याशिवाय राहणार नाही.’ (अब्राहम लिंकन)
जनसमूहाच्या कोट्यावधी गरजा असतात . अब्जावधी आशा-आकांक्षाच्या पूर्ततेसाठी देशात प्रयत्न करावे लागतात . हे सगळं पार पाडण्याचं आव्हान दूरदृष्टी असल्याशिवाय पार पाडणं अशक्यच असतं , ज्या देशाकडे भविष्यात आपलं स्थान शोधण्याची क्षमता नसते, तो देश कधीही टिकू शकत नाही.

✿ मराठी सुविचार । Marathi Suvichar

Marathi Suvichar

३१] ‘जेव्हा काय बोलावं असा प्रश्न पडतो तेव्हा सत्यच बोलावं.’ (मार्क ट्वेन)
काय बोलावं याचा प्रश्न पडतो म्हणजेच काही तरी लपवून ठेवण्याची इच्छा तिथं दडलेली असते. द्विधा मनःस्थिती असणं म्हणजेच असत्याला वाव मिळणं. एका असत्यातून पुढील असत्याची मालिका सुरू होते व ती टिकवून धरणं हे आवाक्यापलीकडचं असतं, अशा वेळी सगळाच खोटेपणा उघडा पडतो. हे टाळण्यासाठी सत्याचाच आश्रय घेतलेला बरा.

३२] ‘ज्या झाडाला फळे येतात त्याच्यावरच लोक दगड मारतात.’ (डब्ल्यू. बेनहॅम)
ज्याच्या जवळ देण्यासारखे काही आहे, त्याच्याकडे गरजू लोक मागायला जातात. पैसे, धनसंपदा मागण्यासाठी ऐश्वर्यसंपन्न सम्राटाकडेच जावे लागते .विद्याप्राप्तीसाठी ज्ञानवंतांकडेच याचना करावी लागते. तहान लागली तर नदीकडे वळावं लागतं . हे सगळं घडतं कारण असा देणारा आधी मुळात संपन्न असतो. फळेच नसलेल्या झाडावर दगड मारण्याचा उद्योग कोणी करीत नाही. जो काही काम करीत असतो त्याच्यावर टीका होते.

३३] ‘छोट्या ठिणग्यातूनच पुढे प्रचंड अग्निज्वाला भडकतात.’ (डॅन्टे)
कोणत्याही भव्य गोष्टी घडण्याच्या आधी अगदी छोट्या असतात. गंगेचा उगम लहान लहान थेंबांनीच होतो, वटवृक्षाचा जन्म होताना बीजांकुर इतका लहान असतो की दिसतसुद्धा नाही. छोट्या छोट्या ठिणग्यांपासून पुढे वणवा जन्माला येतो.

३४] ‘दुर्बल गोष्टी एकत्रित झाल्या की त्या प्रबळ होतात.’ (टी फुलर)
एकटेपणात दौर्बल्य असतं. मुळातच दुबळ्या गोष्टी असतील तर एकेक करून त्या नष्ट होऊन जातात. परंतु याच दुबळ्या, क्षीण काड्या – काड्यांचा एकच जुङगा तयार केला तर मात्र त्या पहिलवानाच्या हातूनसुद्धा मोडत नाहीत त्याचप्रमाणे सामान्य माणसे संघटनेने एकत्र आली की प्रबळ साम्राज्यदेखील उद्ध्वस्त होतात.

३५] ‘विहीर कोरडी पडेपर्यंत आपल्याला पाण्याची किंमत कळत नाही.’ (टी फुलर) आपल्याजवळ असलेल्या गोष्टींचं महत्त्व आपल्याला विपुलतेमुळे समजत नाही. पण काही कारणाने एखादी गोष्ट दुर्मिळ झाली की मग मात्र त्या वस्तूला किती तरी मोल चढतं. पाण्याचं मोल गंगाकिनारी राहणाऱ्याला फारसं नसतंच मुळी, ते असतं वाळवंटात वस्ती करणाऱ्याला. त्याचप्रमाणे आपले आप्तस्वकीय, मित्र आपल्यापासून दूर गेल्यास त्यांचं मोल आपल्याला समजू लागतं.

३६] ‘ज्यांना जास्त गोष्टींची हाव असते त्यांना प्रत्येक गोष्टीची कमतरता असते.’ (होरेस) लोभी माणूस सर्वात जास्त गरीब असतो, कारण त्याला कितीही आणि काहीही दिले तरी पुरेसं वाटतच नाही. आपल्याला आयुष्यात काहीही समाधान मिळालं नाही असंच रडगाणं तो गात असतो. याउलट समाधानी स्वभावाच्या संयमी माणसाला , जे काही मिळालं तेच खूप झालं असं वाटत असतं. अशी माणसं या जगातली सर्वात श्रीमंत माणसं होत.

३७] ‘जी शपथ जास्त बद्ध करू पाहते ती तुटल्याशिवाय राहात नाही.’ (टेनिसन) माणसाला संकोच आवडत नाही. आपल्या व्यक्तिमत्त्वावर, कार्यक्षेत्रावर आचरणक्रमावर अतिक्रमण झालेलं कोणालाही सहन होत नाही. जो नियम, जाचक ठरतो , तो मोडला जातो ; जो कायदा जुलमी ठरतो तो पायदळी तुडविला जातो . तसचं जी शपथ अवास्तव बांधून ठेवायला धजावते , ती शपथच तुटली तरी त्यात आश्चर्य काय?

३८] ‘काळजी घ्या म्हणजे काळजी करावी लागत नाही. (स्व . यशंवतराव केळकर)
एखादी क्रिया केल्यानंतर आता त्याचे परिणाम भोगण्याशिवाय पर्याय नसतो. अशा वेळी काळजी करत बसणं , चिंता करणे म्हणजे व्यर्थशक्तीपात असतो . त्याऐवजी काळजी घेणं आणि विचारपूर्वक काळजीपूर्वक कृती केल्यास योग्य ते अनुकूल परिणाम साधता येतात , प्रतिकूलता कमी करता येते. अशा वेळी व्यर्थ चिंता करण्याची वेळच येत नाही.

३९] ‘शब्द हे जणू विचारांचे वस्त्रच होय.’ (लॉर्ड चेस्टरफील्ड)
शब्द हे आपल्या विचारांचे कपडेच असल्याप्रमाणे होत. आपलं व्यक्तिमत्त्व सभ्य , सुंदर, आकर्षक दिसावं यासाठी आपण कपड्यांची किती काळजीपूर्वक निवड करतो. ते स्वच्छ , मोहक , रंगसंगतीतले , उत्तम प्रतीचे , व्यवस्थित इस्त्री केलेले असे वापरतो. त्याचप्रमाणेच आपले विचार लोकांनी स्वीकारण्यासाठी योग्य चांगले, आकर्षक, परिपक्व शब्द वापरावेत म्हणजे विचारांचे व्यक्तिमत्त्व खुलून दिसतं.

४०] ‘जो झाडावर चढून जातो, त्याला फळे तोडण्याचा हक्क आहे.’ (स्कॉट)
जो प्रयत्न करतो त्याला यश मिळण्याची शक्यता जास्त असते आणि यशावर त्याला हक्कही सागंता येतो. कष्ट केल्यानंतर एखादी गोष्ट त्या व्यक्तीला मिळाली पाहिजे, असं जग म्हणते. याचाच अर्थ, फळ मिळो न मिळो, झाडावर चढण्याचे कष्ट ज्याने घेतले त्याला फळ मिळाले पाहिजे, अशी सदिच्छा जगाकडून मिळणे म्हणजेच फळ तोडण्याचा हक्क मिळणे होय.

✿ मराठी सुविचार । Marathi Suvichar

Marathi Suvichar

४१] ‘दुःखे सहन करूनच माणसाला शहाणपण येतं.’ (ऑस्किलस)
दुःखांनी माणूस घडतो . दुःखातून माणसे जास्त मौल्यवान गोष्टी शिकू शकतात . सुखामध्ये बेहोषी असते . दुःखे माणसाचा गर्व, अहंकार उतरून टाकतात . जमिनीवर चालायला भाग पाडतात. डोळे उघडायला लावण्याचं सामर्थ्य दुःखामध्येच जास्त असतं. दुःखे भोगल्याने माणसाला पिकलेपण येतं.

४२] ‘पापी माणसांनासुद्धा सूर्यप्रकाश देतो.’ (सिनेका)
आपला चांगुलपणा, आपली कर्तव्यबुद्धी, आपली करुणा, दया , स्नेहभावना ही व्यक्तिनिरपेक्ष असावी. कोणी आपल्याशी चांगला वागला तर केवळ त्याच्याशी चांगलं वागणं म्हणजे निसर्गाकडून काहीही न शिकणं होय, झऱ्याचं थंडगार पाणी हरिणाची तहान भागवत तसंच वाघसुद्धा तेच पाणी पिऊन तृप्त होतो. जसा सज्जनांना सूर्यप्रकाश दाखवितो, तसाच पापी , अज्ञानी लोकांना जीवनउर्जा देतच असतो.

४३] ‘जे भयापोटी देवाची पूजा करतात, ते लोक सैतान आला तर त्याचीही पूजा करतील.’ (टी.फुलर)
देवाची पूजा विनयतेने, करुणाभावाने, श्रद्धेने केली जात असेल तर त्यात एक प्रकारचे धैर्य असतं सौंदर्य असतं, पण जर देवाच्या भीतीपोटी पूजा होत असेल तर देवाच्या जागी सैतान आला तर त्याला नाकारण्याऐवजी त्याचीही पूजा करायला ही भित्री माणसं धावत पुढे येतील.

४४] ‘कोणत्याही गोष्टीची किंमत, दिली जाते म्हणून तिला किंमत असते.’ (मोलियर)
सहजगत्या सापडणाऱ्या गोष्टीला काहीही मूल्य नसते. पण खूप परिश्रम घेऊन, खूप कौशल्य लावून, खूप त्याग करून एखादी गोष्ट तयार केली तर मात्र तिला अधिकाधिक किंमत प्राप्त होते. जसं माणसानं अतिशय कष्टानं जोपासलेल्या फळबागेतील फळाला खूप किंमत येते. कारण त्यासाठी त्यांना कष्टाची , काळजीची किंमत दिलेली असते.

४५] ‘छोट्या रकमेने मोठ्या वस्तूंची खरेदी करता येत नाही.’ (सिनेका)
देशाचं स्वातंत्र्य मिळविण्यासाठी हजारोंनी आत्मबलिदान करावं लागतं , शेकडो वर्षांच्या अभ्यासातून ज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखांची निर्मिती होते तसंच रक्ताचं पाणी करून शेतकऱ्याला अन्न पिकवावं लागतं. आयुष्यात भव्य दिव्य गोष्टी साध्य करण्यासाठी फार मोल चुकवावं लागतं.

४६] ‘जगाला खऱ्याखुऱ्या थोर पुरुषांच्या अस्तित्वाची जाणीव बऱ्याचदा नसते.’
प्रसिद्धी, कीर्ती काही जणांनाच मिळते पण त्या यशस्वी माणसांइतके प्रयत्न, कष्ट, त्याग केलेले थोर लोक जगाला माहिती असतात असे नाही. महात्मा गांधीप्रमाणेच निष्ठेने कार्य करणारे लक्षावधी स्वयंसेवक,कार्यकर्ते जगाच्या रंगमंचावरील प्रकाशझोतात आले नाहीत, पण तेही तितकेच मोठे असतात.

४७] ‘काम करीत असताना खर्च झालेला वेळ कधीच व्यर्थ जात नाही.’ (इमर्सन)
काम करताना माणूस नेहमी काही तरी शिकत असतो. मिळवत असतो. काही तरी घडवत असतो. बऱ्याचदा नवे निर्माण करतो, जुने मोडून टाकतो. या सगळ्यातून व्यक्ती म्हणून तो फुलून येत असतो. हे सगळं प्रत्येक वेळी स्पष्टपणे दिसतंच असे नाही. पण सुप्त रूपानं हे विकसन घडत असतं म्हणूनच काहीही वाया जात नाही.

४८] ‘जसा मित्र निवडाल तसाच लेखक निवडा.’ (डब्ल्यू. डिलॉन)
मित्र निवडण्यासाठी संधी आपल्याला असते ही भाग्याची गोष्ट आहे. कारण आपण आपल्याला हव्या त्या व्यक्तीला मित्र म्हणू शकतो. नातेवाईक मात्र जन्माने वा संबंधाने लादले जातात, ते निवडता येत नाहीत. त्याचप्रमाणे लेखक आणि त्याची पुस्तके निवडावी. हे लेखक व त्यांची पुस्तके म्हणजे आपले दूरस्थ मित्रच असतात. चोखंदळपणे आपण त्यांना निवडावे.

४९] ‘जो कीर्तीची अभिलाषा धरीत नाही तो सर्वांत सुखी असतो.'(आयर्विंग)
कीर्ती माणसाला आपल्या मायाजालात खेचून घेते. ती आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर वर्चस्व गाजवू पाहते. कीर्ती मिळविण्यासाठी माणसे काहीही करायला तयार होतात. यातून माणसाची सुखशांतीच नाहीशी होते . याउलट जो पूर्ण समृद्धीने जगतो, त्याला कीर्तीचं फसवं रूप लक्षात येतं व तो नावासाठी वाटेल ती उठाठेव करीत नाही . सुखसमाधान प्राप्त करून घेतो.

५०] ‘ज्यांना जखमांची भीती वाटते त्यांनी रणांगणावर कधी जाऊच नये.’ (जॉन क्लार्क)
रणांगणावर जायचं म्हणजे जखमा होणारच. जखमांची भीती वाटणं व रणांगणावर लढणं या दोन गोष्टी एका व्यक्तिमत्त्वात असूच शकत नाही . त्यामुळे आपल्याला ज्या क्षेत्रात जायचं आहे, त्याच्या सर्वांगाला सामोर जाण्यात खरं धैर्य आहे.

✿ मराठी सुविचार । Marathi Suvichar

Marathi Suvichar

५१] ‘अन्याय सहन करणं म्हणजे अन्याय करण्यासारखंच आहे.’ (पी. सायरस)
अन्याय करणान्या माणसाप्रमाणेच अन्याय सहन करणारासुद्धा दोषी असतो. कारण अन्यायाला प्रतिकार करणं हे मानवतेचं कर्तव्य आहे. प्रतिकार होत नाही हे पाहूनच अन्याय करणाऱ्यांना अधिक चेव येतो. एक अन्याय सहन करणं म्हणजे पुढच्या दहा भावी अन्यायांना जन्माला घालणं होय.

52] ‘बंदुकीच्या जोरावर मिळवलेले राज्य बंदुकीत गोळ्या असेपर्यंतच टिकेल.’ (शेक्सपिअर)
लोकांच्या हृदयावर राज्य केल तरच ते चिरस्थायी राज्य ठरू शकेल. केवळ पाशवी बळाच्या धाकाने कोणालाही गुलाम बनवणे फारच थोडा काळ शक्य होईल. काही काळाने सामर्थ्य उतरणीला लागले की लगेच क्रांती घडेल.

53] ‘गर्वामुळे ज्ञानाचा, स्तुतीमुळे बुद्धीचा आणि स्वार्थामुळे प्रतिष्ठेचा नाश होतो.’ (भगवान महावीर)
गर्व केल्याने आपली जिज्ञासा, कुतुहल संपून जाते. नवीन ज्ञानाची प्राप्ती होण्याची शक्यताच संपते. स्तुती ही एक प्रकारची नशाच असते. स्तुतीमुळे बुद्धीला गुंगी चढते आणि वास्तवापासून माणूस दूर पळू लागतो. स्वार्थामुळे समाजात माणसाची बदनामी होते. नावलौकिकाला काळिमा लागतो. स्वार्थी माणसांपासून लोक दूरदूरच राहतात.

54] ‘मानवजातीच्या सर्व योग्य गरजा भागवण्यास पृथ्वी समर्थ आहे. मात्र एका माणसाच्याही लोभी वृत्तीला ती अपुरी पडेल.’ (महात्मा गांधी)
माणसाला माणसासारखं जगण्यासाठी किती संपत्तीची गरज असते? अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा व कार्यक्षमता जपण्यासाठी, काही आवश्यक गरजा भागविण्याइतपत साधने, निसर्गानं मुबलक प्रमाणात दिली आहेत. पण माणसाच्या लोभाला, हव्यासाला अंत नसतो. लोभ सुटलेल्या अवश्य एका माणसालादेखील पृथ्वीचं मुबलक धन अपुरंच वाटेल.

55] ‘अज्ञान असणं हा गुन्हा नाही पण ते दूर करण्यासाठी धडपड न करणे म्हणजेच गुन्हा आहे.’ (साने गुरुजी)
अज्ञान अगोदर अस्तित्वात असतं. त्याला प्रयत्नपूर्वक हटवल्यावरच ज्ञान प्राप्त होतं. साहजिकच जगातले सगळे विद्वान, ज्ञानी हे मुळात अज्ञानीच होते. त्यांनी कष्टानं ज्ञान साधलं, जन्मजात ज्ञानी असणं हे आश्चर्यच मानावं लागेल. म्हणूनच अज्ञान असणं हा गुन्हा नाही, ती प्राकृतिक अवस्था आहे पण ती तशीच राहू देणं ही मात्र गंभीर चूक आहे.

56] ‘आशावादी विसरण्यासाठी असतो तर निराशावादी हसण्याचे विसरून जातो.’
कठीण प्रसंगाकडे पाहण्याची दृष्टी दोन प्रकारची असते. आशावादी दृष्टी ही प्रसंगातील दुःखद भाग सहन करण्यासाठी हसते. हसल्याने क्षणिक काल तरी दुःख विसरलं जातं. अशा विसरण्यातून मोठं बल प्राप्त होतं. संकटांशी झुंजता येतं. याउलट निराशावादी दृष्टीला सगळं जगच मोठं संकट वाटू लागतं. सदान्कदा गंभीर चेहऱ्यानं तो माणूस जणू हसणंच विसरून जातो.

57] ‘ज्या नदीतील पाणी वाहात असते ती नदी पवित्र होय, जो साधू नेहमी भ्रमण करीत असतो तो पवित्र होय.’
वाहत्या नदीत चैतन्य असतं. साचलेल्या डबक्यातलं पाणी मृतच समजलं जातं. वाहत्या नदीतली घाण, कचरा वाहून निघून जातो तर ताजं स्वच्छ पाणी सतत प्रवाहात राहिल्यानं ती नदी पवित्र मानली जाते. तसंच जो साधू पुरुष आयुष्यभर भ्रमण करतो, निरनिराळ्या जनसमूहांना भेटतो, जीवनाला सामोरं जातो, त्याला पवित्रता प्राप्त होते. कारण अशा भ्रमंतीनं त्याच्यातील असार गोष्टी निघून जातात व निखळ चैतन्य त्याच्या अंगी उरतं.

58] ‘मरावे परि कीर्तिरूपी उरावे.’ (समर्थ रामदास)
माणसाच्या आयुष्याचं मोल , त्याच्या शेवटच्या श्वासाप्रसंगी निश्चित होतं. अमरत्व हे शारीरिक तर ते लोकांच्या स्मृतिपटलावरच असतं. एखाद्याचा मृत्यू हा जर जगाला शोकाकुल करीत असेल तर त्याचं जगणं मौल्यवाणं समजावं. जेव्हा बालक जन्माला येतं तेव्हा सगळं जग आनंदानं हसत असतं व बालक मात्र रडतं पण असं जगावं की, मरताना सगळ जग धाय मोकलून रडेल व आपण समाधानानं हसत हसत अखेरचा श्वास घ्यावा.

59] ‘दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्ये पाहो ।। जो जे वांच्छील तो ते लाहो । प्राणिजात ।’ (संत ज्ञानेश्वर)
दुष्ट दुर्जनांच्या अंतःकरणातला अंधार नष्ट होवो आणि ते सज्जन बनोत. संपूर्ण विश्वाला स्वकर्तव्याचा मार्ग मिळो. जगामध्ये नीतिधर्माचं सुराज्य येवो. समस्त जीवसृष्टी ज्या गोष्टींची इच्छा करील ते ते सर्व प्राप्त होवो कारण अशी इच्छादेखील सदिच्छाच असेल.

60] ‘माझे ते खरे म्हणू नका; खरे ते माझे म्हणा.’
माणसातला ‘मी’ हा मोठा गंमतीदार प्रकार आहे. त्याला स्वतःची हार पाहायला आवडत नाही. आपलं मत चुकीचं असलं तरी तेच खरं असं दामटून नेण्याचा त्यांचा अट्टाहास असतो पण खरा विवेकी तो की जो आपल्याला आवडो न आवडो पण सत्याची बाजूच आपली बाजू असं मानतो.

✿ मराठी सुविचार । Marathi Suvichar

Marathi Suvichar

61] ‘फारच थोड्यांना बुद्धिमत्ता लाभलेली असते, बहुतेकांना नुसते डोळेच असतात.’ (विन्स्टन चर्चिल)
उघड्या डोळ्यांनी जगाकडे पाहणे, हे महत्त्वाचं असतं. बहुतेक माणसं आपल्या आजूबाजूला पाहतात पण त्यांच्यामध्ये मर्म समजून घेण्याची पात्रता बऱ्याचदा दिसत नाही पण बुद्धिमान माणसं जागेपणानं निरीक्षण करतात , सुज्ञपणानं निष्कर्ष काढतात, म्हणून ती डोळस मानली पाहिजेत. बाकीची जनता म्हणजे डोळे असूनही अंधच म्हणावी.

62] ‘व्यायामाची जशी शरीराला गरज असते तशी वाचनाची मनाला असते. (जी. अॅडिसन)
व्यायामामुळं शरीर बलवान होतं. अंगी चपळता येते . व्यायामामुळं व्याधींचा नाश होतो व आरोग्यमय जीवनाची प्राप्ती होते. त्याचप्रमाणं वाचनामुळं माणसाला विवेक प्राप्त होतो. त्याच्या मनाचं पोषण होतं. सन्मार्गाची ओळख पटून त्या दिशेने दृढपणे वाटचाल करण्याची प्रेरणा मिळते.

63] ‘जर अपूर्व बुद्धिमत्तेच्या माणसाशी आपली गाठ पडली तर तुम्ही कोणते ग्रंथ वाचता असे त्याला विचारावे.’ (इमर्सन) ग्रंथवाचनानं जन्मजात बुद्धिमत्तेला सुंदर पैलू पडतात . अशा बुद्धिमत्तेचा प्रकाश मौल्यवान हिन्याप्रमाणं तेजस्वी असतो. अशा स्वयंप्रकाशी बुद्धिमंताला, तो कोणते ग्रंथ अभ्यासतो. हे आवर्जून विचारावे त्यातून आपल्यालाही या ज्ञानसाधनेचा मार्ग समजेल.

64] ‘वाचक चोखंदळ असला म्हणजे चांगली पुस्तकेही लिहिली जातात.’ (इमर्सन)
रसिकांच्या मैफलीत गायकाचं गाणं अधिक खुलून येतं. जाणकार प्रेक्षकांच्या उपस्थितीत चित्रकाराला आपल्या रंगसामर्थ्याचा प्रत्यय येतो, त्याप्रमाणे साक्षेपी वाचक असलेल्या समाजात मौलिक लिखाणासाठी विद्वानांना प्रेरणा मिळते.

65] ‘समृध्दीच्या काळात माणसाने खबरदारीने वागावे आणि विपत्तीच्या काळात सबुरीने.’ (जे.रे.)
चांगल्या काळात माणसाला अहंकाराची, बेफिकीरीची बाधा होण्याचा संभव जास्त असतो. अशा बेपर्वा वागण्यानं संकटांना तोंड देण्याचा प्रसंग येतो. म्हणूनच समृद्धीत सावधचित्त असावे तसेच आपत्कालात माणसाचा चटकन धीर सुटतो. धीर सुटलेली व्यक्ती आणखी चुका करू शकते. जर अशा वेळी सबुरीने वागलो तर आपत्ती निवारणाचा मार्ग सुचू शकतो.

66] ‘जो मनुष्य पक्षी आणि जनावरे यावर माणसाइतकेच प्रेम करतो त्याने प्रार्थना केल्यासारखी आहे.’ (कोलरिज)
माणूस हा निसर्गाचाच एक भाग आहे. निसर्ग हा ईश्वराचाच चैतन्यमय प्रत्यय आहे. हा शाश्वत नियम जाणून जो माणूस संपूर्ण सृष्टीशी एकतेने सहजीवन जगू शकतो तो जणू ईश्वरप्राप्तीची साधना करत असतो.

67] ‘येताना संधी छोटी वाटते, पण जाताना मोठी वाटते’
संधीचा प्रत्यक्ष उपयोग होईपर्यंत तिच्यातील सुप्त शक्यतांचा आपल्याला पुरेपूर अंदाज येत नाही, त्यामुळे ती कमी महत्त्वाची वाटू शकते. परंतु ती उपयुक्त ठरली अथवा हातून निसटली, तर होणारा फायदा अथवा तोटा खूपच मोठा ठरतो.

68] ‘अंतरीची तळमळ आणि गाढ द्रष्टेपणा यामुळे माणूस कवी होतो.’ (कार्लाईल)
माणसाच्या अंगी असलेली काव्यमय वृत्ती म्हणजे त्याच्या निरागसतेचं प्रतीक, ही निरागसता प्राप्त होण्यासाठी त्याच्या अंतःकरणात संवेदनाचा ओलावा असावा लागतो. तसेच सहअनुभूती बरोबरच भविष्याचा वेध घेण्याची ठाम शक्ती त्याच्या अभिव्यक्तीत असावी लागते. त्यामुळे माणूस खरा कवी होऊ शकतो.

69] ‘स्वतःच्या अज्ञानाची नम्र कबुली हाच तत्त्वज्ञानाचा परिपाक होय.’ (आर. डी. हिचकॉक)
आपल्याला थोडं ज्ञान झालं की, गर्वामुळे सर्वज्ञ झाल्याचा भ्रम निर्माण होतो. मानात थोडी अधिक भर पडली की, आपल्या बौद्धिक मर्यादा जाणवू लागतात आणि आपण सगळं ज्ञात असलेले तत्त्वज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करू लागतो तेव्हाच आपण जाणलेल्या जगापेक्षा हजारो पींनी अज्ञात-अज्ञान शिल्लक आहे आणि आपण काहीच शिकलेलो नाही, असा विनम्रभाव प्रतीत होतो.

70] ‘दुःख भोगल्यानंतरच आपणाला सुखाची किंमत कळते.’ (ड्रायडेन)
दुःखानं होरपळून निघालेला माणूस हा अधिक संवेदनशील होतो. त्याच्या मनोवृत्तीला सुखाची तीव्रतेनं आस लागते. तहानेनं व्याकुळ झालेल्या माणसाला पाण्याच्या पहिल्या घोटाची चव अमृततुल्य भासते. तद्वत दुःखाने भाजलेल्या व्यक्तीला सुखाच्या शीतलतेचं मोल समजतं.

✿ मराठी सुविचार । Marathi Suvichar

Marathi Suvichar

71] ‘जो मृदूपणे हुकूम करतो, त्याला सारे जण चटकन नमतात.’ (सिनेका)
प्रेमाची सत्ता अधिक टिकाऊ असते. प्रेमाच्या संबंधामध्ये मार्दवता असते आर्जवाची, कळकळीची भावना असते. अशा मृदू बंधनांना तोडणं फार अवघड जातं म्हणून जो मृदूभाषेत आदेश देतो, त्याचे आज्ञान पालन करायला सर्वांना मनापासून आवडत.

72] ‘हुकूम करण्यापुर्वी हुकूम पाळायला शिका.’ (सोलोन)
उत्तम सेनापती होण्यासाठी आधी उत्तम सैनिक असणं आवश्यक असतं. उत्तम नेता होण्याआधी उत्तम अनुयायाप्रमाणं आचरण जमणं महत्त्वाचं असतं. कारण हुकूम पाळण्यासाठी कोणत्या मनोवृत्तीची, कशा परिस्थितीची, कोणत्या साधनांची गरज आहे हे हुकूम करणाऱ्याला चांगलं समजलेलं असावं लागतं .

73] सकळ अवगुणांमध्ये अवगुण । आपले अवगुण वाटती गुण ॥ (समर्थ रामदास)
सगळ्यात वाईट काय असेल तर आपल्या वाईट गुणांनाच चांगले समजणं किंवा आपल्यामध्ये अवगुण आहेत हे नाकारणं दोष सुधारता येतात पण त्याआधी ते पाहणं आणि लक्षात येणं आवश्यक आहे. मी असा वागतो, मी कसं वागावं हा अध्यात्माचा खरा विषय आहे.

74] माणूस विवेकभ्रष्ट झाला की त्याचा अधःपात झालाच म्हणून समजा. (ऋग्वेद)
विवेकभ्रष्ट माणूस अविचारी बनतो. त्याची स्थिती दारूड्यासारखी होते. मन भरकटत राहतं. मग त्याची प्रगती कशी होणार? उलट असलेली संपत्ती निघून जाते. अविचार, दारिद्र आणि निलाजरेपणा यामुळे त्याचा अधःपात होत राहतो. ज्याला पोहता येत नाही तो जसा खाली खाली जातो तशी त्याची गत होते.

75] शीलं परं भूषणम् । (भर्तृहरि)
शूर माणसानं नम्र, धनिक माणसानं निगर्वी , ज्ञानी माणसानं शांत , तपस्व्यानं क्षमाशील, धार्मिक माणसानं सज्जन आणि उदार माणसानं विवेकी असणं हे त्यांचं भूषण आहे. तेव्हा सर्व माणसांच्या बाबतीत चारित्र्य किंवा सदाचार हे सर्वश्रेष्ठ भूषण आहे.

76] प्रत्येक क्षण जगणं हेच जीवन. (आचार्य रजनीश)
जीवनातील प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. कुठल्याही क्षणाचं मूल्य दुसऱ्यापेक्षा कमी किंवा जास्त नसतं ज्ञानी लोक प्रत्येक क्षणातून आनंद मिळवितात . थेंबाथेंबानं सागर बनतो. क्षणाक्षणानं जीवन बनतं जो प्रत्येक क्षणाचा लाभ करून घेतो त्याला जीवनही लाभदायक होतं.

77] कुठे काय बोलावे । नव्हे बोलूची नये । बोल अनमोल तयांचा । तोल घालवू नये ।। (गुलाबराव महाराज)
योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य शब्दांत योग्य तहेनं बोलावं अन्यथा न बोलणं हेच चांगलं शब्द अनमोल असतात. त्याचं मूल्य आणि वजन त्यांना वाटेल तसं वापरून कमी करू नये.

78] यः क्रियावान् स पण्डितः । (महाभारत)
खरा ज्ञानी कोण? शास्त्राचं अध्ययन आणि अध्यापन करणारा नव्हे. शास्त्राला अनुसरुन जो आचरण करतो तो खरा पंडित किंवा ज्ञानी. प्रत्यक्ष आचरणाचं महत्त्व जास्त असतं. क्रियेविणा वाचकता व्यर्थ असते. वाचन आणि मनन यापेक्षा सदाचरण करण्यानं खरा शास्त्राभ्यास होतो.

79] जोपर्यंत स्त्रियांची स्थिती सुधारत नाही तोपर्यंत जगाचं कल्याण होणं शक्य नाही. (विवेकानंद)
स्त्री आणि पुरुष हे समाजाचे दोन पंख आहेत. पक्षी कधी एकाच पंखानं उडू शकत नाही. जगाची प्रगती न होण्याचं मुख्य कारण स्त्रियांची उपेक्षा व अवहेलना. स्त्रीचा सन्मान हे संस्कृतीचं प्रमुख लक्षण आहे. एक स्त्री प्रगत झाली की एका कुटुंबाचं कल्याण होतं.

80] युक्ताहार करणारी व्यक्ती आरोग्यसंपन्न असते. (भगवद्गीता)
माफक, योग्य आणि सात्त्विक आहार घेणं केव्हाही हितकर असतं. योग्य आहार घेणारी व्यक्ती तरतरीत, शांत आणि समाधानी असते. अतिआहार आणि तोही चुकीच्या वेळी घेण्याने माणूस सुस्त असमाधानी आणि तामसी वृत्तीचा होतो. योग्याने आपला आहार, विहार आणि आचार नेहमी योग्य ठेवावा लागतो.

✿ मराठी सुविचार । Marathi Suvichar

Marathi Suvichar

81] आपण किती गुणी आहोत यापेक्षा आपण किती दोषी आहोत हे पाहण्यातच मोठेपण असतं. (अप्पासाहेब पटवर्धन)
आपल्या ठिकाणी असणाऱ्या गुणदोषांचं नेहमी निरीक्षण करावं. दोषांची जाणीव झाली की ते कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. दोष कमी झाले की गुण वाढीस लागण्यास मदत होते. गुण वाढले म्हणजे व्यक्तिमत्त्व आपोआप मोठं होतं.

82] गुणाः सर्वत्र पूज्यन्ते । (कालिदास)
गुणांची सर्वांकडून पूजा होते. जगात सर्व ठिकाणी गुणांचा आदर केला जातो. भुंगे केतकीचा सुवास घेण्यासाठी स्वतः धावत येतात. लोक तुमच्या गुणांची, कर्तृत्वाची पारख करून तुमचा मोठेपणा ठरवितात. केवळ कुळाचा किंवा पूर्वजांचा मोठेपणा सांगून कोणी मोठा होत नाही.

83] खरे असेल तेच बोलावे, उदात्त असेल तेच लिहावे, उपयोगी तेच शिकावे, देशाचे हित ज्यात असेल तेच करावे (शि म. परांजपे)
पारतंत्र्याचं स्वराज्यात आणि स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर होण्यासाठी लोकांनी असं वागलं पाहिजे , सत्यवाणी पवित्र लेखणी , उपयुक्त अभ्यास आणि राष्ट्रीय हिताची कृती यामुळे व्यक्ती आणि राष्ट्र समर्थ होतात.

84] अनिर्वेदः श्रियो मूलम । (रामायण)
उत्साह हे ऐश्वर्याचे कारण आहे. हे सुखाचे मूळ आहे. अडचणीवर मात करण्यासाठी जवळ उत्साहाचं शास्त्र हवं. मोठ्या लोकांच्या यशाचं रहस्य त्यांच्या उत्साहातच दिसून येते. बाह्य साधनांपेक्षा उत्साह, चिकाटी, निष्ठा यांसारखे गुण माणसाच्या उत्कर्षाला कारणीभूत होतात.

85] संकटांना पाठ दाखविली की संकटं पाठीशी लागतात. (स्वामी विवेकानंद)
जीवनात संकटे येणारच. त्यांना समोर जायला हवं त्यांच्याशी सामना केला की सहनशक्ती वाढते. मन खंबीर बनतं. त्यांच्यापासून पळायला लागलो की ती जास्तच पाठीशी लागतात. संकटं नकोत या मागणीपेक्षा ती सोसण्याचं सामर्थ्य मिळविणारी प्रार्थना असावी कुंतीनं श्रीकृष्णाजवळ अशीच प्रार्थना केली होती.

86] संहतिः कार्यसाधिका । (हितोपदेश)
कमी सामर्थ्याच्या वस्तूंची एकजूट केल्याने कार्यसिद्ध होतं. गवताच्या काड्यांची दोरी वळली म्हणजे तिनं उन्मत्त हत्तीही बांधले जातात. सर्व समाजावर आलेल्या संकटाचा प्रतिकार एकेकट्यानं स्वतंत्र प्रयत्न करून साध्य होत नाही त्यासाठी ऐक्य आवश्यक असतं.

87] निःस्पृहस्य तृणं जगत्। निरीच्छ माणसाला सारं जग गवतासमान तुच्छ वाटतं त्याला कोणताच स्वार्थ, लोभ, मोह नसतो. त्यामुळे कशाचीही आसक्ती वाटत नाही. दानी माणसाला द्रव्य, शूराला मृत्यू, वैराग्यसंपन्नाला पत्नी आणि जो सर्वच बाबतीत निर्लोभी आहे त्याला सारं जगच तृणासमान म्हणजे कवडीमोल वाटतं.

88] चिंतेला चिंतनामध्ये बदलवा. (डेल कार्नेजी)
चिंतेने मनुष्य निराश आणि हतबल होतो. चिंता जर त्रास द्यायला लागली तर चिंतेवरच चिंतन करावं. आपल्यापुढे समस्या नेमकी कोणती आहे? ती दूर करण्याचे कोणते मार्ग उपलब्ध आहेत? त्यातील सर्वोत्तम मार्ग कोणता? अशा प्रश्नांचं चितन केलं तर चिंतेचा रोग नाहीसा होतो आणि मनाचं स्वास्थ्य सुधारतं चिंता बऱ्याच वेळा अकारण असते.

89] प्रार्थना म्हणजे प्रेम आणि समर्पण. (आचार्य रजनीश)
प्रेमपूर्ण हृदयातून प्रार्थनेचा उगम झाला पाहिजे. प्रार्थना ही काही यांत्रिक कृती नाही. ती अंतःकरणातून सहज प्रगट व्हावी लागते. पर्वतातून झरे स्वाभाविकपणे वाहतात. प्रेमपूर्ण हृदयातून प्रार्थनेचा आविष्कार तसाच होतो. प्रार्थनेत आपण आपल्या सर्व वृत्ती ईश्वराकडे वळविल्या पाहिजेत , त्याला अनन्यभावानं शरण जाऊन स्वतःला विसरणं म्हणजे प्रार्थना.

90] दुसऱ्या लोकांनी आपल्याशी जसं वागू नये असं वाटतं तसं आपण त्यांच्याशी वागता कामा नये. (येशू ख्रिस्त)
माझा कोणी अपमान करू नये, असं वाटत असेल तर मी पण कोणाचा अपमान करता कामा नये. माझ्याबरोबर कोणी वाईट वागू नये असं वाटत असेल तर मी पण कोणाबरोबर वाईट वागता कामा नये. सर्व लोकांच्या ठिकाणी एकच ईश्वर राहतो असं जेव्हा अनुभवाला येईल तेव्हाच असं आचरण घडेल.

✿ मराठी सुविचार । Marathi Suvichar

Marathi Suvichar

91] मनुष्यासाठी धर्म आहे; धर्मासाठी मनुष्य नाही. (खलील जिब्रान)
प्रत्येक धर्मात, प्रत्येक पंथात, प्रत्येक वादात तत्त्वे नेहमी बाजूला पडतात. शब्द प्रमाणाला भलतंच महत्त्व प्राप्त होतं. आपल कार्य सामान्य माणसाचं जीवन सुखी करणं आहे याचा सर्व धर्मांना आणि पंथांना नेहमी विसर पडतो. जीवनासाठी पावित्र्य आहे. सामान्य मनुष्यावर केवळ बळजबरी करून जग सुधारणार नाही.

92] उद्योग हेच माणसाचे लक्षण आहे. (संस्कृत सुभाषित)
घोड्याचं लक्षण वेग. हत्तीच लक्षण मस्तवालपणा. स्त्रीचे लक्षण चतुरपणा. पुरुषाचे लक्षण मात्र उद्योग, उद्योग करण्याबाबत उगाच कुरकुर करू नये. ज्याचे राबतात हात त्याला देव देतो साथ. श्रमामुळे, उद्योगामुळे परिस्थिती बदलते. उद्योग हीच ठेव हितकर असते.

93] वचन देताना विलंब करा पण पाळताना मात्र घाई करा.
वचन देण्यापूर्वी ते आपल्याकडून पाळलं जाईल की नाही याचा विचार करावा. मगच ते द्यावं शब्द देताना थोडा उशीर झाला तरी चालेल पण शब्द दिला की मात्र तो लगेच पाळावा. एकदा मदत करीन म्हटलं की लगेच मदत करावी, त्यात दिरंगाई नको.

94] पुष्कळ ग्रंथांचे वाचन करण्यापेक्षा थोड्या ग्रंथांचे मनन केलेले अधिक चांगले. (ग. त्र्यं. माडखोलकर)
‘एक ना धड भाराभर’ अशी काही वाचकांची स्थिती असते. ते नुसतं वाचत सुटतात पण वाचलेलं त्यांच्याकडून पचवलं जात नाही. वाचनाच्या अशा अजीर्णाचा काय उपयोग? यांत्रिक रीतीनं भारंभार वाचण्यापेक्षा थोड्याच पुस्तकांचं वारंवार वाचन करून ती बुद्धीत मुरवावीत, जीवनात उतरवावीत.

95] तेजसां हि न वयः समीक्ष्यते । (कालिदास)
तेज वयावर अवलंबून नसते. तेजस्वी व्यक्तीचा पराक्रम बाल्यावस्थेतही प्रगट होतं असतो. सामान्यापेक्षा त्यांच्या अंगी असामान्य कर्तृत्व असतं. यज्ञ नीटपणे पार पाडण्यासाठी विश्वामित्रांनी दशरथाजवळ रामाची मागणी तो लहान असतानासुद्धा केली. कर्तृत्वाला, पराक्रमाला वयाचं बंधन नसतं.

96] फुलासमान कोमल । देवापरी सुनिर्मळ विनम्र या तृणासम । सदैव ही मति मम ।। (साने गुरुजी)
बुद्धी कशी असावी? फुलासारखी कोमल. ती तर्ककर्कश असू नये. दुसऱ्याचं वाईट चिंतणारी नसावी. ती विकार-रहित म्हणजे पवित्र असावी. बुद्धीचा माणसास अहंकार नसावा. नम्रतेनं विद्या शोभून दिसते. म्हणून ती तृणासम विनयशील असावी. अशी बुद्धी सात्त्विक व कल्याणकारक असते.

97] अतिपरिचयात् अवज्ञा । (संस्कृत सुभाषित संग्रह) अति परिचय केल्यानं, वारंवार एखाद्याकडे गेल्यानं अनादर उत्पन्न होतो. मलय पर्वतावर भिल्ल स्त्री चंदनाची लाकडं इंधन म्हणून वापरते. प्रयाग क्षेत्राचे रहिवासी आडावर स्नान करतात. एखादी वस्तू सतत उपलब्ध असली म्हणजे तिची किंमत वाटेनाशी होते मग ती कितीही मोलाची असो.

98] धनिकांची संपत्ती हा लोककल्याणाचा निधी ठरला तरच समाजाची उन्नती होईल. (अॅण्ड्रयू कार्नेजी)
जगात भलं करता यावं यासाठी धन मिळवावं. संपत्ती मिळवून नुसती तिजोरीत भरून ठेवणं हे माणसाच्या जातीला शोभत नाही पैसा समाजाचा असून मी त्याचा विश्वस्त आहे. या भावनेनं तो समाजासाठी खर्च करावा. धनिकांची, उद्योगपतींची अशी दृष्टी असेल तरच समाजाच्या प्रगतीची खात्री बाळगावी.

99] प्रेम गली अति सांकरी ताते दूजो न समाय । (संत कबीर)
प्रेमाचा, भक्तीची वाट एवढी अरुंद असते की त्यात एकच सामावू शकतो. ईश्वरभक्तीनं मन ओतप्रोत भरलं की दुसऱ्या कशालाच जागा उरत नाही. उद्धव जेव्हा गोपीचं सांत्वन करण्यासाठी गेला तेव्हा त्या म्हणाल्या, “एकुलतं एक होतं ते मन कृष्णार्पण केलं.” भक्तीची परिणती अखेर अद्वैतात होते.

100] आदर्शाचे सामर्थ्य मोजता येत नाही. (एडरसन)
आदर्श म्हणजे आकांक्षा, आदर्श म्हणजे एक संकल्प, आदर्श म्हणजे संकल्प सिद्ध करण्यासाठी केलेले परिश्रम, आदर्शाचे व्यवहारात आचरण केलं नाही तर तो व्यर्थ ठरतो. आदर्श नसेल तर जीवनरूपी नौकेला बुडविण्याशिवाय पयार्य नसतो. म्हणून आदर्शाचे सामर्थ्य अपरिमित आहे.

✿ मराठी सुविचार । Marathi Suvichar

Marathi Suvichar

101] जीवनात यश मिळण्याची इच्छा असेल तर चिकाटीला तुमचा मित्र, अनुभवाला तुमचा शहाणा सल्लागार, सावधानतेला तुमचा बंधू आणि अशेला तुमची संरक्षण करणारी बुद्धी माना. (एडरसन)
चिकाटी, अनुभव, दक्षता आणि आशा ही यशाची चतुःसूत्री आहे. चिकाटीने अनुभव प्राप्त होतो. अनुभवातून सावधानता कशी बाळगायची ते कळते. या सर्वांना आशावादाचे खतपाणी घातलं की सफलतेचं पीक चांगलं फोफावते.

102] भित्री माणसे मरण्यापूर्वी अनेकदा मरतात पण शूर मात्र एकदाच मरतो. (शेक्सपिअर)
जी माणसे भित्री असतात ती नेहमी घाबरून, दबून वावरत आणि वागत असतात. अनेकदा त्यांचा इतरांकडून अपमान होतो. मग ती मनानं खचतात. दुबळी होत जातात. धीट व्यक्ती निर्भय असतात. त्यामुळे अपमानित जिणं जगण्याची त्यांच्यावर वेळच येत नाही.

103] निष्काम कर्म म्हणजे कर्मत्याग नव्हे. (भगवद्गीता)
कर्माचा त्याग कोणीच करू शकणार नाही. कर्म करावं लागणं हा प्रकृतीचा धर्म आहे. तुमची इच्छा असो वा नसो. कर्म कोणालाच टाळता येणार नाही. कर्म न करणं हे सुद्धा कर्म केल्यासारखं आहे. म्हणून कर्म अवश्य करावं पण त्यात मात्र आसक्ती नसावी. अनासक्त कर्म ईश्वरप्राप्तीसाठी केलेला कर्मयोग होय.

104] खोट्याचे मर्म फसवणुकीत आहे, शब्दात नाही. ( महात्मा गांधी)
खोटं अनेक प्रकारे सांगता येतं मौनानं, द्वयार्थी बोलण्यानं, अस्पष्ट बोलण्यानं, दृष्टिक्षेपानं एखाद्या वाक्याला विशिष्ट महत्त्व दिल्यानं किंवा ‘नरो वा कुंजरो वा’ याप्रमाणे एखाद्या शब्दावर जोर देऊन त्याचा वापर करता येतो. हे सर्व प्रकार शब्दांनी खोटं सांगण्यापेक्षा अधिक वाईट आहेत.

105] आत्मसंयम, आत्मजाणीव आणि आत्म-सुधारणा ज्याच्यापाशी आहेत त्यानं जग जिंकलं असं समजावं. (टेनिसन)
या जगात कोणाची तरी सत्ता कोणावर तरी चालणारचं. मग आपणच आपल्यावर ताबा का ठेवू नये? दुसऱ्याला आपण फसवू शकतो. स्वतः स्वतःस फसवणं अवघड असतं. म्हणूनच आत्मजयी तो विश्वजयी संयम सुधारणा व ज्ञान यांच्या सहकार्याने स्वतःवर विजय म्हणजे एक प्रकारे सर्वांवर विजय असतो.

106] विज्ञानात आत्मज्ञान आले तर सर्वोदय होईल. (विनोबा भावे)
विज्ञानानं जीवनाला गती मिळते तर आत्मज्ञानानं दिशा मिळते. म्हणून विज्ञानाला नेहमी आत्मज्ञानाची, अध्यात्माची जोड हवी. तसं झालं तर मूल्यांचं संरक्षण आणि संवर्धन होईल. विज्ञानात हिंसा आली तर नाश ओढवेल. विज्ञानाला अध्यात्म किंवा आत्मज्ञान याचं पाठबळ लाभलं तर सर्वोदय होईल.

107] जीवनात जे जे तुम्ही करता ते प्रेमाने करा. (डॉ. स्माईल ब्लँटन)
सर्व मानवी संबंधांचा पाया मैत्री आणि सदिच्छा आहे. प्रेम जीवनाचं संरक्षक असतं. द्वेष नाश करणारं ठरतं. द्वेष आपली दृष्टी आंधळी बनवितो आणि आपली बुद्धी कलुषित करतो, प्रेम मानव समाजाला टिकवून धरते. जीवनाला योग्य मार्गावर नेण्यासाठी त्याला शक्ती आणि उत्साह देते .

108] ज्याला आपल्या पापांचा पश्चात्ताप झालेला असतो तो जवळजवळ निष्पापच समजावा. (सिनेका)
पाप हातून न घडणं चांगलं. समजा घडलंच तर त्याबद्दल वाईट वाटलं पाहिजे. पश्चात्ताप झाला पाहिजे. पश्चात्ताप झाला की माणूस परत ते दुष्कृत्य करीत नाही. म्हणजेच माणसात सुधारणा होते. पाप न करणारा मनुष्य आणि असा सुधारलेला मनुष्य सारखाच समजण्यास हरकत नाही.

109] सत्संगतिः कथय किं न करोति पुसांम् । (भर्तृहरि)
सत्संगती माणसाला सर्व काही प्राप्त करून देते. मनुष्याच्या जीवनाचा खरा विकास सज्जनांच्या संगतीनं होत असतो. चांगल्या संगतीमुळे ज्ञानात वाढ होते. खरं बोलण्याची सवय जडते. मन प्रसन्न राहतं. त्यात कुविचार येत नाहीत. समाजाला आदर प्राप्त होतो. मानसिक आणि आत्मिक शांति लाभते.

110] जगाचा कधी काळी उद्धार झाला तर शिक्षकांकडूनच होईल. (वि.स. खांडेकर)
शिक्षण हा एक संस्कार आहे. शिक्षक हा त्या संस्काराचा शिल्पकार आहे. संस्कार आपल्याला घडवीत असतो. तेव्हा शिक्षक हाच जगाचा उद्धारकर्ता आहे. जगाचं भवितव्य वर्गाच्या चार भिंतीत घडत असतं शिक्षक विद्यार्थ्यांमधली सुप्त गुण ओळखून त्यांना आकार देतो. हा आकार म्हणजे समाजाचा उद्धार.

✿ मराठी सुविचार । Marathi Suvichar

Marathi Suvichar

111] नमस्कारास काहीच नलगे । उपकर्ण सामग्री ।। (समर्थ रामदास)
नमस्काराचं साधन अगदी साधं असतं. पूजेसाठी थोडी बहुत सामग्री लागते. नमस्कारासाठी काही खर्च नसतो. फक्त अंतःकरणात भाव लागतो. मात्र नमस्कारात यांत्रिकता नसावी. नमस्कार ही वंदनभक्ती आहे. ज्ञानप्राप्तीसाठी ही महत्त्वाची आहे. तिची शास्त्रशुद्ध बैठक समजावून घ्यावी.

112] अंधश्रद्धेने मूर्ख बनण्यापेक्षा नास्तिक परवडला. (स्वामी विवेकानंद)
अंधश्रद्धेमुळे बुद्धी निष्प्रभ होते. बुद्धी दुबळी झाली म्हणजे सारेच गेले. जीवनाचा अंधःपात झाला. मनुष्य नास्तिक असला तरी त्याच्या ठायी जिवंतपणा असतो. तो आपल्याला उपयोगी पडतो. त्यात बदल घडवून आणता येतो. अंधश्रद्धेने मूर्ख झालेला दुराग्रही आणि अपरिवर्तनीय बनतो.

113] ध्येयं साधयामि वा देहं पातयामि । (स्वामी विवेकानंद)
मी श्रेष्ठ ध्येय प्राप्त करून घेईन किंवा त्यासाठी देह अर्पण करीन मनुष्याचा निर्धार अशा प्रकारचा हवा. मनुष्याचं ध्येय जसं असतं तसंच श्रेय त्याला मिळत असतं. म्हणून सर्वोच्च ध्येय निश्चित करुन त्याचा ध्यास कधीही सोडू नये मी तरी संपेन नाही तर माझे कार्य तरी संपेल अशी मानसिकता हवी.

114] संदेहाने सत्याचे दर्शन होते.
संदेह म्हणजे विश्वास आणि अविश्वास यांच्या पलीकडील तिसरी अवस्था, संदेहातून जिज्ञासेचा जन्म होतो. शोध घेण्यास माणूस प्रवृत्त होतो. संदेह म्हणजे स्वतःमध्ये चाललेलं चिंतन संदेहाच्या मार्गाने गेल्यास सत्य सापडण्यास मदत होते.

115] बालादपि सुभाषितं ग्राह्यम् । (मनुस्मृती)
लहान मुलांचेही हितकारक वचन ऐकावे. चांगला विचार कोणाकडून आणि कुठूनही स्वीकारावा. मोठ्या माणसांची बुद्धी अनेक वेळा कुंठित होते. अशा प्रसंगी लहान मुलेही काही वेळा महत्त्वाच्या कल्पना सुचवितात. दिवा किंवा पणतीचा प्रकास देखील मार्ग दाखविणारा ठरतो.

116] माणसाचे मोठेपण त्याने किती माणसे मोठी केली यावरुन सिद्ध होते. (गोपाळकृष्ण गोखले)
मोठेपणाचं गमक केवळ स्वतः मोठं होण्यात नसून इतरांना आपल्याप्रमाणं मोठं करण्यात आहे. शिक्षक मोठा केव्हा? जेव्हा तो आपल्यापेक्षा वरचढ विद्यार्थी निर्माण करतो तेव्हा. क्रीडा मार्गदर्शक ज्या वेळेस अनेक दर्जेदार खेळाडू निर्माण करतो तेव्हाच तो मोठा समजला जातो. खरा परीस तो, जो लोखंडाला आपल्याप्रमाणे परीसच बनवेल.

117] परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम् । (महर्षि व्यास)
अनेक शास्त्रांमध्ये, पुराणांमध्ये जे सांगितले आहे ते येथे अर्ध्या श्लोकात सांगितलं आहे. उपकार करणं म्हणजे पुण्य आणि दुसऱ्याला पीडा देणं म्हणजे पाप मानवी जीवन हे परोपकारासाठी असतं. परोपकारासारखा सदाचार नाही. परोपकारांसारखा दुसरा धर्म नाही.

118] ज्याची कसलीही मागणी नसते तो सम्राट असतो. (महर्षि कणाद)
ज्यांना गरजाच उरत नाहीत तेच खरे धनवान असतात. माणसाला दरिद्री बनवितात त्या इच्छा संपत्ती जशी बाहेरची असते तशी आंतरिकही असते. ही अंतर्यामीची संपत्ती प्राप्त झाली की आणखी काही मिळण्याजोगं शिल्लकच राहात नाही. मनुष्य खऱ्या अर्थानं सम्राट बनतो.

119] प्रारब्धमुन्तमजना न परित्यजन्ति । (भर्तृहरि)
कामात विघ्ने निर्माण होतील अशा भयानं कामाला जे सुरुवातच करीत नाहीत ते कनिष्ठ लोक होत काम सुरु केल्यावर विघ्नं आली तर ते सोडून देणारे लोक मध्यम प्रतीचे होत. मात्र विघ्न वारंवार आली तरीही सुरु केलेलं कार्य न सोडणारे लोक श्रेष्ठ प्रतीचे लोक असतात.

120] दीर्घकाळ धुमसत राहण्यापेक्षा क्षणभरच का होईना प्रज्वलित होणं चांगलं. (महाभारत)
मनुष्याचं जगणं क्षणभरच का होईना पण ज्ञान, शौर्य आणि यश यांनी युक्त असावं. त्यालाच खरं जगणं म्हणतात शेळी होऊन शंभर वर्षे जगण्यापेक्षा शेर होऊन एक दिवस जगणं मानाचं असतं. देशासाठी प्राणत्याग करण्यात जे सुख आहे ते केवळ जगण्यात थोडंच लाभणार आहे?

✿ मराठी सुविचार । Marathi Suvichar

Marathi Suvichar

121] एखाद्या गोष्टीची गप्प अवस्था म्हणजे तिच्या नाशाची सुरुवात. (हेनरी फ्रेडरिक अॅमिड)
जो गप्प बसतो तो विसरला जातो. जो पुढे जात नाही. तो मागे पडतो. जो हजर नसतो त्याचे म्हणणे अग्राह्य धरले जाते . जो थांबतो त्यावर मात केली जाते. जो विकास घडवून आणण्यास तयार होत नाही तो लहान बनतो. जो एखादं काम सोडून देतो तो ते पूर्ण करू शकत नाही.

122] अविचाराने कोणतेही काम करू नये कारण ते अनेक आपत्तींना जन्म देते. (भारवि)
कोणतंही काम करण्यापूर्वी त्याच्या परिणामांचा विचार करावा. घाईगर्दीने काम करू नये. कोणाचा तरी सल्ला घ्यावा. अविवेकानं केलेली गोष्ट काही वेळेस जन्मभर पश्चात्तापास कारणीभूत होते. विवेकानं वागणाऱ्यांच्या गुणावर लुब्ध होऊन यशश्री त्याला आपण होऊन भेटते.

123] दीर्घसूत्री विनश्यति । (महाभारत)
दिरंगाईमुळे आजचं काम उद्यावर ढकलल्यामुळे आपला सदैव तोटा होतो. काम नेहमी वेळेवर उरकावं. पुढं ढकलल्यास उत्साह नाहीसा होतो. मदत करणारे घटक नाहीसे होतात. कार्य अयशस्वी होतं. कार्यतत्पर माणसालाच सुख प्राप्त होतं.

124] अंधाराची चिंता सोडा आणि प्रकाश उजळा. (आचार्य रजनीश)
जे अंधाराचा विचार करीत बसतात ते प्रकाशापर्यंत पोहोचू शकत नाहीत. प्रकाश येताच अंधार नाहीसा होतो. अंधाराशी झगडणं म्हणजे जे नाही त्याच्याशी झगडण्यासारखं आहे. अंधार मानणाराही चूक करीत असतो आणि अंधाराशी लढणाराही चूक करीत असतो. प्रकाशाच्या प्राप्तीसाठी झटा.

125] क्रिया करून करवावी । बहुतांकरवी । (समर्थ रामदास)
दुसऱ्याला उपदेश करणं फार सोपं असतं. ‘ लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण स्वतः कोरडे पाषाण’ असे नसावं. चांगलं काम आपण स्वतः आधी करावं. मग इतरांना सांगावं. त्यांच्याकडून करवून घ्यावं. नुसते शब्दांचे बुडबुडे काय कामाचे ? ढीगभर आश्वासनांपेक्षा टीचभर कृती चांगली.

126] विनोद हे दोषदर्शनाचे प्रखर व प्रभावी साधन आहे. (आचार्य अत्रे)
विनोद हा दुसऱ्यातील दोष दाखवितो. परंतु दोष दाखविताना माणसांचाचांगुलपणाही मान्य करतो. विनोद ही वैगुण्य दाखविण्याची अहिंसात्मक पद्धती आहे. विनोद हा मानवतेवर प्रेम करणारा, हसत हसत दुसऱ्याला सुधारणारा महान शिक्षकच आहे.

127] सभ्य माणसाचं लक्षण हे की तो दुसऱ्याला दुखवीत नसतो. (कार्डिनल न्यूमन)
सभ्य मनुष्य दुसऱ्याच्या मनास लागेल असं बोलत नाही. सर्वांकडे तो सहानुभूतीने पाहतो. भांडत नाही, शिव्या देत नाही, रागावत नाही. आपल्या सहवासात दुसऱ्याला आनंद होईल असा प्रयत्न करतो. सोशिकता, सहनशीलता, शांत स्वभाव या गुणांमळे तो जणू ‘व्यावहारिक योगी’ असतो.

128] शहाणपण येण्यास मनाची एकाग्रता हवी. (ऋग्वेद)
समस्या सोडविण्यास शहाणपण लागतं, शहाणपण मनाच्या दक्षतेनं आणि एकाग्रतेनं येतं . मन उंडारलेल्या जनावरासारखं असतं. त्याला प्रथम स्थिर केलं पाहिजे, मनाला स्थिर करण्याची क्षमता म्हणजे एकाग्रता. मन एकाग्र झालं की जगात असाध्य असं काहीच उरत नाही. मन आणि बुद्धी स्थिर हवी.

129] दयेसारखा दुसरा धर्म नाही. (कवि कालिदास)
शांतीसारखं तप नाही. संतोषासारखं सुख नाही. तृष्णेसारखा रोग नाही. दयेसारखा दुसरा धर्म नाही. दया हे सद्गुणांच माहेर आहे. सर्व धर्मांचं पोषण दयारूपी नदीच्या पात्रावरच होत असतं. म्हणून जीवात जीव असेपर्यंत दयेची कास सोडू नका.

130] न्यायात्पथः प्रविचलन्ति पदं न धीराः । (कवी कालिदास)
लोक निंदा करोत किंवा स्तुती करोत, लक्ष्मी घरात प्रवेश करो अथवा आपल्या मर्जीप्रमाणं निघून जावो, मरण आज येवो. किंवा कालांतरानं येवो, धीरोदात्त पुरुष न्याय्य मार्गापासून कधीही ढळत नाहीत. विकार उत्पन्न होण्यासारखी परिस्थिती असूनही ते सदाचार सोडत नाहीत.

✿ मराठी सुविचार । Marathi Suvichar

Marathi Suvichar

131] मृत्योर्मा अमृतं गमय । (बृहदारण्यक उपनिषद्)
मृत्यूकडून मला अमृतत्त्वाकडे ने. अमृतत्त्व म्हणजे केवळ अमृतत्त्व नव्हे. अमृतत्व म्हणजे निर्भयता. निर्भयतेशिवाय जगण्याला पर्याय नाही. भ्याला तो मेला. भयानं न पछाडणं म्हणजे अमृतत्त्व. असं अमृतत्त्व माणसाला सुख देतं. निर्भयतेसाठी हवे शुद्ध मन, प्रबुद्ध विचार आणि निर्मळ आचार. हृदयातला अंधार नाहीसा करणारी ही प्रार्थना आहे.

132] सर्वात जास्त आनंद कोणत्या गोष्टीत असेल तर दुसऱ्यांना आनंद देण्यात. (कवि वर्डस्वर्थ)
जीवनाचा सर्वोच्च आनंद दुसऱ्यांना सुखी करण्यात असतो. मोती होऊन सोन्याच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागवणं अधिक चांगलं. जेथे जाऊ तेथे वातावरण आनंदानं भारावून टाकावं.

133] लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ।। (संत तुकाराम)
मुंगीला वाटेत कोणी आडवं आलं तर नम्रतेनं ती बाजूनं वाट काढते. आपलं कर्तव्य विश्रांती न घेता करीत राहते. म्हणूनच तिच्या तोंडात नेहमी साखर पडते. मुंगीसारखं नम्र व कार्यमग्न असावं. नम्रतेमुळे जीवन सुखी होतं. जगण्याची गोडी वाढते. या उलट ऐरावत आला तरी त्याला अंकुशाचा मार सहन करावा लागतो.

134] उद्योगावाचून शक्तीचा उपयोग नाही. (पंचतंत्र)
कार्य उद्योगानेच सिद्धीस जातात, केवळ मनोराज्यांनी नव्हे. झोपलेल्या सिंहाच्या मुखात हरीण किंवा इतर प्राणी आपणहोऊन प्रवेश करीत नाहीत. सिंह शक्तिवान असतो म्हणून आपण होऊन त्याला भक्ष्य कधीही मिळत नाही. उद्योगाशिवाय सर्व व्यर्थ आहे. उद्योग करणारा नेहमीच उत्कर्षाप्रत पोहोचतो.

135] मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो. (कवि माधव ज्युलियन)
मैत्री हे एक न तुटणारं बंधन असावं, अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. गैरसमजुतीनं मैत्री तुटणं, तिच्यात बाधा येणं या गोष्टी जास्त दुःख देणाऱ्या असतात. प्रत्यक्ष मित्र गेला तर जेवढं दुःख होणार नाही त्यापेक्षा अधिक दुःख मैत्री तुटल्यावर त्रास देत राहतं.

136] निर्वाहः प्रतिपन्नवस्तुषु । (भर्तृहरी)
हाती घेतलेलं कार्य तडीस न्यावं. स्वीकारलेलं कार्य चिकाटीनं पूर्ण करावं श्रेष्ठ लोकांचा तो स्वभावधर्म असतो. अडचणींची पर्वा न करता जिद्दीनं कार्य पूर्ण करणं हे स्वाभिमानाचं आणि मोठेपणाचं लक्षण आहे. कसा तरी उदरनिर्वाह करणे किंवा आहे त्या साधनसामग्रीत भागवणे असा या उक्तीचा केला जाणारा अर्थ बरोबर नाही.

137] शक्तीपेक्षा सहनशक्तीनं अधिक कामं होतात.
शक्तीच्या बळावर फार तर मैदानी किंवा शारीरिक यश मिळेल. सहनशीलतेनं मात्र संपूर्ण जीवनच यशस्वी होतं. अवघड काम पूर्ण करण्यास वेळ लागतो. त्या वेळेस उपयोगी पडतो. धीर आणि सहनशक्ती जो धैर्यानं सहन करतो तोच शेवटी जिंकतो. ऐरण सुरक्षित राहते. हातोडे तुटतात .

138] प्रेम म्हणजे जीवनाचा प्राण होय. (तिरुवल्लूवर)
ज्या माणसाजवळ प्रेम नाही तो केवळ एक मांसाचा आणि हाडांचा सांगाडा असतो. प्रेम मिळालं म्हणजे अन्य मिळविण्याजोगं काहीच राहात नाही. प्रेम म्हणजे ईश्वराच्या द्वाराकडे नेणारी शिडी होय. प्रेम जगावयाचे असेल तर स्वतःला हरवावे लागेल. प्रेमाहून मोठी शक्ती नाही. प्रेम नसतं तिथं भय असतं.

139] यत्ने कृते यदि न सिद्धायति कोऽत्र दोषः। (पंचतंत्र)
प्रयत्न करणं हे मनुष्याचं कर्तव्य आहे . रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणं हा सैनिकाचा धर्म आहे. प्रयत्न करूनही यश मिळालं नाही तर त्यात मनुष्याचा दोष नसतो. प्रयत्न आपल्या हातात असतात. त्यांच्यातून आपण अनुभवसंपन्न होतो. पुष्कळ वेळा प्रयत्नांचा आनंद प्राप्तीपेक्षा मोठा असतो.

140] धर्माहून व्यवहार श्रेष्ठ आहे. (आचार्य चाणक्य)
धर्म आत्मा असेल तर व्यवहार शरीर आहे. धर्म विद्युत प्रवाह असेल तर व्यवहार त्याचा प्रकाश आहे. व्यवहार हा जीवनाचा आरसा असून त्यात मनुष्याच्या आचारविचारांचे प्रतिबिंब पडलेले असते. चांगला व्यवहार हा चांगल्या मनाचा आविष्कार समजावा. शास्त्रांचा अभ्यास करूनही व्यवहार जमत नसेल तर अशा अभ्यासाचा काय उपयोग?

✿ मराठी सुविचार । Marathi Suvichar

Marathi Suvichar

141] मानसिक स्वातंत्र्य हेच खरं स्वातंत्र्य आहे. (डॉ. बाबासाहेब आंबेडकर )
ज्याचं मन स्वतंत्र नाही तो मोकळा असून गुलाम आहे, तो कैदी नसला तरी तुरुंगात आहे. ज्याचं मन स्वतंत्र नाही तो जिवंत असूनही मृत असतो. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. स्वातंत्र्य म्हणजे स्वतःच स्वतःवर नियंत्रण ठेवण इंद्रिये मनाच्या ताब्यात हवीत.

142] क्रियासिद्धिः सत्वे वसति महतां नोपकरणे । (भोजप्रबंध)
थोर लोकांच कार्य सिद्धीला जाणं हे त्यांच्या पराक्रमावर अवलंबून असतं. साधन-सामग्रीवर नव्हे. अंगात तेज नसलेला मनुष्य अपयशी झाला म्हणजे साधन सामग्रीवर खापर फोडतो. ‘नाचता येईना अंगण वाकडं’ अशी त्याची वृत्ती असते. पराक्रमी व आत्मविश्वास असणारा संकटाचंही रूपांतर संधीत करतो.

143] वसुधैव कुटुम्बकम् । (योगवसिष्ठ) हा आपला, हा परका असा भेदभाव क्षुद्र वृत्तीची माणसंच करतात. ज्यांची मनं थोर आणि विशाल आहेत. त्यांना सर्व पृथ्वी हेच आपलं कुटुंब अथवा घर वाटतं. जगातल्या सर्व दुःखाचं मूळ भेदभावात, विषमतेत असतं. ‘हे विश्वचि माझे घर’ अशी वृत्ती म्हणजे समतेचं, ममतेचं आणि सुखाचं राज्य.

144] विद्या विनयेन शोभते । (हितोपदेश)
विद्येची उपासना करताना तिचा पहिला कोणता गुण दिसावयास हवा असेल तर तो म्हणजे विनय किंवा नम्रता, विद्या आणि विनय या दोन गुणांनी प्रतिष्ठा मिळते. प्रतिष्ठा धन मिळवून देते. धनाला धर्माचरणाची जोड मिळाली तर मग सुखाला काय तोटा? सुखासाठी तर आपली सारी धडपड चालू असते.

145] पापाचा विचार हे सुद्धा पापच होय. (आचार्य रजनीश)
पाप प्रत्यक्ष घडलं नाही परंतु त्याचा मानसिक विचार झाला तरी ते पापच समजावं. अनेकदा माणसं प्रत्यक्ष पाप करू शकत नाहीत. परिस्थिती अनुकूल नसते म्हणून पाप घडत नाही. पण अशा वेळी पापी विचार मनात आला तर ते पाप घडल्यासारखंच आहे. बाह्य कृती बरोबरच आंतरिक हेतूला नैतिकतेत तेवढंच महत्त्व आहे.

146] संपत्ति मित्र मिळवी । आपत्ती पारखी तया ।। (फ्रेंच लोकोक्ती)
पैसा असला की, अनेक मित्र जमा होतात. म्हणतात ना, ‘असतील शीतं तर जमतील भुतं .’ परंतु मित्रांची खरी परीक्षा संकटकाळी होत असते. आपत्तीच्या मुशीत हिणकस कोणतं व सोनं कोणतं ते तेव्हाच वेगळं दिसतं. केवळ पैशाच्या भोवती जमा झालेले ढोंगी मित्र आपत्तीत पळून जातात. जे खरे मित्र असतात ते मात्र टिकून राहतात.

147] प्रत्येक व्यक्तीत काही ना काही सामर्थ्य असतेच. (आर्य चाणक्य)
ज्ञान हे ज्ञानी माणसाचं बल असतं सौंदर्य हे स्त्रीचं सामर्थ्य असतं प्रत्येकाची शक्ती वेगवेगळ्या प्रकारची असते. त्यामुळे कोणालाही एकदम दुर्बल किंवा नगण्य मानू नये. छोट्या आणि किरकोळ शत्रूलाही कमी लेखू नये.

148] ज्याला सार्वजनिक कार्य करावयाचं आहे त्याच्या डोक्यावर बर्फाची लादी, ओठांवर खडीसाखर आणि पायाला चक्र हवं. (पंडित दीनदयाळ उपाध्याय) सार्वजनिक कार्य करताना बोलण्यात आर्जव असावं. कुणाचं अंतःकरण दुखावेल असं बोलणं नसावं. अंगी स्थितप्रज्ञता असावी. स्तुती किंवा निंदा यांनी चित्त विचलित होता कामा नये. लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सार्वजनिक कार्यकर्त्याला परिभ्रमण करावं लागतं. तेव्हा अशा गुणांनी तो संपन्न हवा.

149] व्यसनेषु च बान्धवान् जानीयत् । (संस्कृत सुभाषित संग्रह)
संकटकाळी नातलगांची परीक्षा होते , संकटाच्या वेळी मदत न करता पाठ फिरवणारे खरे नातलग नव्हेत. शूरांची परीक्षा लढाईतील पराक्रमावरून होते. कर्जात असताना प्रामाणिक माणसाची कसोटी लागते. दारिद्र्यात संसार कसा चालवते यावरून पत्नीची पारख होते. संकटाच्या वेळी खरे नातलग कोण ते समजावे.

150] माणसाला सुख हवं असतं पण सुख देणारे पदार्थ नको असतात. दुःख देणारे पदार्थ हवे असतात पण दुःख नको असतं. (आचार्य रजनीश)
माणसाला आरोग्य हवं असतं. पण त्यासाठी पहाटे उठणं, व्यायाम करणं, योग्य आहार घेणं नको असतं. व्यसनाधीनता हवी असते पण आजार नको असतो. यश हवं असतं पण त्यासाठी कष्ट नको असतात. वाचन नको असतं. मात्र ज्ञान हवं असतं. हक्क हवे असतात जबाबदाऱ्या नको असतात.

✿ मराठी सुविचार । Marathi Suvichar

Marathi Suvichar

151] वृक्षनाश म्हणजे संस्कृतीचा नाश. (इंदिरा गांधी)
वृक्षराजी वाढविल्याशिवाय मानवी संस्कृती फुलणार नाही. प्रदूषण हा शाप आहे. वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन यांनी प्रदूषणावर मात करता येते. हरित भारताची निर्मिती ही राष्ट्राची गरज आहे. जीवनाचा दर्जा उंचावण्यासाठी, माणुसकीची जाणीव निर्माण होण्यासाठी, जीवन निकोप आणि चैतन्यमय होण्यासाठी वृक्षाची गरज आहे.

152] सुविचार हाच सुखाचा आधार.
एखादं निर्विवाद सत्य जेव्हा मोजक्या शब्दांत मार्मिकपणे मांडलं जातं तेव्हा त्याला सुविचार म्हणतात. सुविचारांमुळे माणूस खरा माणूस बनतो. सुख विचारांवर अवलंबून असतं, थोर लोकांचे सुविचार उच्च आनंद देतात उच्चपदाला पोहोचवितात. मोहांचा नाश करतात. अन्नानं शरीर तर सुविचारानं मन सुदृढ बनतं.

153] जे जेणे भावावे । ते फळ तेणे पावावे । (संत ज्ञानेश्वर) जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टीवर आनंद अवलंबून असतो. ज्यांची दृष्टी प्रसन्न आणि प्रकाशमय आहे त्यांना सुख आणि सौंदर्याचं अनुभवास येते. निराश आणि कुरकुर यांच्या संगतीत वाढलेल्या माणसाला जीवनाची काळी बाजूच दिसते. ज्यांची जशी श्रद्धा असते तसे फळ त्याला मिळते.

154] संवो मनांसि जानताम् । (ऋग्वेद)
तुम्ही सर्व एक मनानं जीवनाचा आस्वाद घ्या. तुमचा मित्र, विचार ध्येय एकच असू द्या. हृदयाची स्पंदनं समान असू द्या. अशा एकट्याच्या उभ्या आडव्या धाग्यांनी जेव्हा राष्ट्रीय जीवनाचं महावस्त्र विणलं जातं त्या वेळी सर्वच धागे सुखाचे असतात.

155] साधु-संत मानवांइतकेच वृक्षाशीही हितगुज करणे श्रेयस्कर समजतात. (खलील जिब्रान)
वृक्षांच्या ठिकाणी चैतन्य असतं, साधु-संतांना, वैमानिकांना त्यांचा प्रत्यय येतो वृक्षांशी त्यांची मैत्री जमते. एकांतात आत्मशोध घेणाऱ्या साधु-संताना वृक्षाबरोबर हितगुज करणं निसर्गाबरोबर संवाद साधणं आवडतं वृक्ष हे माणसाचे जिव्हाळ्याचे स्नेही, सोबती, सल्लागार आहेत. संत त्यांना ‘ईश्वराचे मनोगत’ समजतात.

156] तीन गोष्टी देत राहा – मान, ज्ञान आणि दान. (रवींद्रनाथ टागोर)
ज्यांना हवं आहे त्यांना तुमच्याजवळ जे काही आहे त्यातलं सतत देत राहा. दानातच मोठेपणा आहे. ज्ञानदान हे पुण्यकारी आहे. दिल्यानं ज्ञान कमी न होता उलट वाढत राहतं. दुसन्याला मान देण्यात नम्रता, सभ्यता आणि आदर दिसून येतो. मान, ज्ञान, देणं सुसंकृतपणाचं लक्षण आहे.

157] विचार केल्याशिवाय लिहिता येत नाही. (डॉ. ग. श्री . खैर)
लिहावयाची इच्छा होणं हे जिवंत बुद्धीचं प्रतीक आहे. विचार सुचले की लिहिणं अपरिहार्य होतं, लेखन आणि विचार याचं जवळचं नातं आहे. लेखन म्हणजे विचारांची अभिव्यक्ती लेखन म्हणजे सृजनशील आनंदाची निर्मिती. विचार करणाऱ्याची बुद्धी जिवंत असते आणि आनंद देत राहते.

158] सत्संग म्हणजे स्वतःचा संग (एखार्ट)
आपण दिसतो तसे नसतो. आपण एक मुखवटा घालून जगात वावरत आणि वागत असतो. हा मुखवटा टाकून खऱ्या मूर्तीचं दर्शन घ्यायला हवं. त्यासाठी सत्संग म्हणजे स्वतःचा संग, स्वतःला चांगलं जाणल्याशिवाय चांगलं जीवन जगता येत नाही.

159] तथापि काको न तु राजहंस : । (संस्कृत सुभाषित संग्रह)
कावळा राजहंस कधीही होणार नाही. कावळा तो कावळाच ! त्याचं शरीर सोन्यानं सजवलं, चोंचीत हिरे-माणके जडविले तरी तो राजहंसाप्रमाणे होणार नाही. आंतरिक गुण नसलेल्या एखाद्या शुद्र व्यक्तीला बाहेरून कितीही नटवलं तरी ती प्रतिष्ठित होऊ शकणार नाही.

160] आधी माणूस वाचा, मग पुस्तक वाचा.
माणूस ज्या परिस्थितीत जगतो ती समजावून घेतली पाहिजे. माणसाचं आकलन ‘झालं तर जीवनाचं आकलन होईल. निवळ पुस्तकं वाचून माणूस आणि जीवन समजणार नाही. एकमेकांना समजावून घेतलं पाहिजे. या प्रक्रियेचंच नाव म्हणजे माणूस वाचणं होय.

✿ मराठी सुविचार । Marathi Suvichar

Marathi Suvichar

161] निम्न भरलिया उणें । पाणी ढळोचि नेणे । तेवी श्रांता तोषोनि जाणे । सामोर या ।। (संत ज्ञानेश्वर)
वाहतं पाणी वाटेतील खाचखळगे भरल्याशिवाय पुढं जात नाही, तो त्याचा स्वभावधर्म आहे. माणसांनीही हा आदर्श पुढे ठेवावा, आपल्या बांधवांची दुःखे, उणीवा दोष यांचे खड्डे भरून न काढता जगणं हे खरं जगणंच नव्हे.

162] वीरभोग्या वसुन्धरा ।। (स्वामी विवेकानंद)
पृथ्वी शूरांची आहे. वीरांची आहे. दुर्बलांची किंवा भ्याडांची नाही. शौर्य केवळ रणागंणातच लागतं असं नाही. संकटानं न खचणं, यशानं न हुरळणं किंवा दुःखानं न विरघळणं हे सुद्धा शौर्यच आहे. शारीरिक सुदृढ़ता आणि मानसिक निर्भयता हा पुरुषार्थाचा गाभा आहे.

163] बुद्धी आणि भावना यांचा समन्वय साधता येणं ही जीवनकला आहे. (शांताराम आठवले)
बुद्धी माणसाला ज्ञानसंपन्न करते. ती पुरुषार्थाची जननी आहे पण केवळ बुद्धीचा विकास म्हणजे जीवनाचा विकास नव्हे, भावना हा मानवी जीवनाचा अमृतरस आहे.. जीवनातील प्रेम, प्रकाश आणि प्रसन्नता यांचा साक्षात्कार भावहीन अंत:करणात होऊ शकणार नाही. बुद्धी आणि भावना ही जीवनरथाची दोन चाके आहेत.

164] दुसऱ्या दुःखे दुःखवे । दुसऱ्याच्या सुखे सुखावे । अवघेचि सुखी असावे । ऐसी वासना ।।
दुसऱ्याच्या सुखानं आनंदित होणं आणि दुसऱ्याच्या दुःखानं व्यथित होणं हे भावनासंपन्न लक्षण आहे. त्यासाठी वस्तुमात्राविषयी प्रेम वाटलं पाहिजे, स्वार्थ आणि अहंकार यांच्या बंधनातून बाहेर पडलं पाहिजे. जीवनाची सफलता साधण्यासाठी यासारखं श्रेष्ठ व्रत नाही.

165] शत्रू निर्माण व्हायला आपल्या कृतीपेक्षा शब्दच जास्त कारणीभूत ठरतात. (महाभारत)
बोलणं इतरांना सुख देणारं असावं इतरांचा मर्मभेद करणारं नसावं. माणसाला लोकप्रिय करणारं गोड वाणीहून अधिक कार्यक्षम दुसरं साधन नाही. जगामध्ये मित्र किंवा शत्रू निर्माण करण्याचं सामर्थ्य शब्दांमध्ये असतं. शब्दांनी झालेली जखम लवकर भरून येत नाही.

166] ईश्वराचा आवाज ऐकण्यासाठी प्रत्येकानं मौन पाळलं पाहिजे. (इमर्सन)
मौन म्हणजे केवळ नि:शब्दता नव्हे. मौनात अंतरंगात शिरायचं असतं. आत्मतत्त्वाशी संवाद साधायचा असतो. मन चंचल, चपळ असतं जे स्वस्थ होण्यासाठी मौन पाळायचं, मौनात ध्यान किंवा नामस्मरण करायचं, ज्याला ही साधना जमली तो अंतरंगातील आत्मारामाचा आवाज ऐकू शकतो.

167] कोहेण अप्पं डहति परंच । (वर्धमान महावीर)
क्रोध हा असा अग्नी आहे जो पहिल्यांदा स्वतःला आणि नंतर दुसन्याला जाळतो. क्रोधामुळे शेकडो वर्षाचं तपोबल नाहीसं होतं रागाची किंवा द्वेषाची गाठ स्वतःलाही पीडा देते आणि दुसऱ्यालाही पीडा देते. क्रोधामुळे मनुष्य क्षीण होतो. त्याची शक्ती आणि साहस नष्ट होतं.

168] उदरभरण नोहे जाणि जे यज्ञकर्म । (समर्थ रामदास)
जीवन हे केवळ पोट भरण्यासाठी नाही. जीवनातील जे काही आपण करू ते यज्ञकर्माच्या भूमिकेतून केलं पाहिजे. यज्ञकर्माची भूमिका म्हणजे केवळ कर्मकांड नव्हे. आपलं कार्य विचारपूर्वक, त्याग बुद्धीने आणि कर्तव्यप्रेमानं करणं म्हणजे यज्ञकर्म, ऐहिक आणि पारमार्थिक कल्याणाचा त्याने लाभ होतो.

169] माणूस किती मोठा झाला यापेक्षा कसा मोठा झाला याला फार महत्त्व आहे. (म. गांधी)
तुम्ही किती चालतात यापेक्षा कोणत्या मार्गानं चालत आहात याला जास्त महत्त्व असतं खरा मोठा माणूस साध्याबरोबरच साधनांचीही शूचिता पाळतो. त्याला नीतीचा मार्ग माहीत असतो. त्या मार्गाने तो चालत असतो. इतरांनाही तो मार्ग दाखवीत असतो. वाटेल ते करून मोठं होणं सोपं आहे. चांगल्या मार्गाने मोठं होणं अवघड आहे.

170] छटाकभर प्रेम शेरभर ज्ञानापेक्षा वरचढ असतं. (जॉन वेस्ली)
प्रेम ज्ञानापेक्षा श्रेष्ठ असतं. सारं आयुष्यही ज्याला अपुरं पडेल असं कष्टसाध्य काम प्रेमानं क्षणभरात होतं. म्हणून मित्रत्वाच्या दृष्टीने जगाकडं पाहायला शिकलं पाहिजे. शत्रूवर प्रेम करा, विरोधकांशी अहिंसेने वागा असं जे म्हटलं जातं त्या पाठीमागं प्रेमाच्या शक्तीवरील विश्वासच असतो.

✿ मराठी सुविचार । Marathi Suvichar

Marathi Suvichar

171] जो जिभेच्या अंकित आहे आणि झोपेच्या अधीन आहे तो अध्यात्माचा केव्हाही अधिकारी होऊ शकणार नाही. (संत ज्ञानेश्वर)
खाणं बोलणं, झोपणं या क्रियांवर नियत्रंण ठेवणं हे योग, भक्ती आणि कर्म यांचं रहस्य होय. ज्याला कोणाला विकास साधावयाचा असेल त्यानं नेमस्तपणाचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवावा, अतिरेकी सेवन किंवा आत्यंतिक निरोधन ही दोन्ही टोके टाळणं याचा अर्थ योग, आचरणाचा सुवर्णमध्य साधण्यात असतो.

172] जीवन हे युद्ध आहे. (वि, स, खांडेकर)
जीवन हे सत्कार्यासाठी युद्ध आहे. कर्तव्यासाठी युद्ध आहे. अधर्माविरुद्ध युद्ध आहे. भीतीनं व्याप्त असलेलं जीवन हे जीवन नव्हे. जीवनाच्या लालचीखातर शस्त्रे खाली टाकण्याची भाषा योग्य नव्हे. अन्याय, असत्य, अनाचार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी जीवन हे युद्धच आहे.

173] सत्याते जोडावे सुज्ञ , धर्मासि पळ न सोडावे । (कवि मोरोपंत)
सत्याची कास कधाही सोडू नये, सत्य सोडलं की जीवनातली माणूसकी संपलीच सत्याचं पालन म्हणजे धर्म धर्म हा आचारात्मक आणि विचारात्मक असतो. धर्माने समाजाची धारणा होते. ढगांनी पाऊस पडला नाही तर शेताचं काय होईल? सत्य आणि धर्म नसेल तर जीवनांच तसंच होईल.

174] स्वतःची बेसूर जीवन बासरी सुधारा मग दुसऱ्याच्या जीवन बासऱ्या तुम्ही सुधारू शकाल.(साने गुरुजी)
स्वतः आपण स्फूर्तिहीन असलो तर दुसऱ्यास प्रेरणा देऊ शकणार नाही. स्वतः निरुत्साही असलेला दुसऱ्यास उत्साह सागर कसा बनवू शकेल? जो स्वतः गुलाम आहे तो दुसऱ्यास कसे मुक्त करणार? जो स्वतः अशांत आहे तो दुसऱ्यास शांती कशी देऊ शकेल? म्हणूनच स्वतःच सुधारलं की आपण इतरांना आपोआप सुधारू शकाल.

175] अन्नं न निन्द्यात् । तद्वतम् । (भृगुवल्ली)
अन्नाची कधीही निंदा करू नये. ते एक व्रत आहे. अन्नाची निंदा म्हणजे ज्या अन्नापासून आपले सारे जीवन व्यापार चालतात त्याची निंदा होय, अन्नाचं सेवन पवित्र भावनेनं आणि प्रसन्न चित्तानं करावं, निंदेमुळे अन्नपचन नीट होत नाही. ज्या अन्नामुळे आपले श्वास आणि उच्छ्वास चालतात ते प्राण हेच अन्न होय.

176] अति लीनता सर्वभावे स्वभावे । (समर्थ रामदास)
माणसाचा स्वभाव नम्र असला की त्याला सर्व काही मिळतं. नम्रता धरली तर प्रत्यक्ष परमेश्वरदेखील वश होतो. नम्रतेचा अभाव म्हणजे क्रोधाचा प्रभाव, क्रोधामुळे बुद्धी दूषित होते. नम्रता हे सर्व गोष्टी साध्य होण्याचं कारण आहे. जिथे नम्रता भारी, तिथे लक्ष्मी वास करी.

177] आत्मचिंतन करीत राहणं हा महान शिक्षक होण्याचा मार्ग आहे. (डॉ राधाकृष्णन्)
शिक्षकांनी स्वतःचं निरीक्षण करावं स्वतःचं मूल्य स्वतः ठरवावं मी चालतो कसा? बोलतो कसा? माझं ज्ञान किती? माझं मन कसं? माझ्या व्यवसायाशी मी प्रामाणिक आहे का? या सर्व प्रश्नांचा साकल्यानं विचार म्हणजे आत्मचिंतन, आत्मचिंतनाच्या आरशात जो डोकावतो तो महानशिक्षक होतो.

178] प्रत्येक मनुष्य ही राष्ट्राची दौलत आहे. (डॉ. ग. श्री.खैर.)
प्रत्येक माणसाची बुद्धी, शरीर आणि मन हे समाजाचं धन आहे. या धनाचा संपूर्ण उपयोग देशासाठी करणं हे प्रत्येक व्यक्तीच्या हातात आहे, समाजाचा उत्कर्ष तेव्हाच होईल जेव्हा समाजातील सर्व मनुष्यबळाचा उपयोग होईल. कापात प्रत्येकानं रस घेतला तरच काम सरस होतं.

179] स्वानुभूति हेच माझे मत. (भगवान गौतम बुद्ध)
स्वतःच्या अनुभवांच्या आधारावर आपले मत बनवाजे, असे भगवान बुद्ध म्हणतात ते योग्यच आहे. ऐकिव वा अप्रत्यक्ष माहिती हे दुय्यम स्वरूपाचेच ज्ञान होय. त्यावर विसंबण्यापेक्षा स्वत अनुभव जे सांगतो त्यावर विश्वास ठेवणेच श्रेयस्कर होय.

180] चुकांची भीती बाळगू नका. कारण कोणीच संपूर्ण नाही. परंतु त्याच चुका पुनः पुन्हा करू नका.’ (आचार्य अत्रे)
सर्वसामान्य माणसे चुका करणे पाप समजतात, परंतु मानव हा परिपूर्ण नसल्याने चुकणे आणि त्यातून शिकणे हाच मानवधर्म ठरतो. अशा वेळी चुकणे हा अपराध कसा? फक्त लक्षात घ्या की पुन्हा त्याच चुका करणे म्हणजे काहीही न शिकणे होय.

✿ मराठी सुविचार । Marathi Suvichar

Marathi Suvichar

181] ‘अपयश हेच दर्शविते की आणखी साधनेची आवश्यकता आहे.’ (राहूल सांकृत्यायन)
प्रयत्न करण्यातून कधी अपयश येऊ शकते पण हे अपयश नक्कीच काही तरी शिकविणारे असते. अपयश शिकविते की आणखी वेगळे प्रयल अधिक काटेकोर आणि कठोर साधना करायला हवी. अपयशदेखील फलदायी आहे.

182] ‘पशूना द्रव्याची इच्छा नसते पण तीच इच्छा मनुष्याला पशू बनवते.’ (ना. ह. आपटे.)
पैसा मिळविण्याचा अतिरेकी हव्यास मानवाला काहीही करण्यास भाग पाडतो. नीतिनियम सदसद्विवेकबुद्धी पायदळी तुडवून स्वार्थी बनण्यास हा हव्यास कारणीभूत ठरतो. पाण पशूना मात्र ही लालसा बांधू शकत नाही. खरेच पशूप्रमाणे माणसाने केवळ आपली नैसर्गिक गरज ओळखावी म्हणजे तो माणूस म्हणून जगू शकेल.

183] जोडोनिया धन उत्तम वेव्हारे । उदाक विचारें बेंच करी । (संत तुकाराम)
मानवाने आपल्या उत्तम कौशल्याने ज्ञानाने कार्यक्षमतेने धनसंपदा अवश्य मिळवावी त्यात गैर काहीच नाही. फक्त या पैशाचा विनियोग माणसाने तटस्थ भावनेने. संस्कृत्यांसाठी परोपकार भावनेने करावा हे योग्य.

184] ‘रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उषःकाल’ (कविवर्य कुसुमाग्रज)
कितीही संकटांनी भरलेली काळरात्र असली तरीही तिला मार्ग दाखविणारी पहाट जन्माला येतेच, हा निसर्गधर्मच आहे. म्हणूनच हे मानवा उषःकालाच्या प्रतिक्षेत प्रयलरत रहा.

185] ‘आत्मा जिंकला की सर्व काही जिंकले’ (भगवान महावीर)
या जगात शक्ती, बुद्धी, लबाडी वा अन्य मार्गानी सगळे काही जिंकणे शक्य आहे. परंतु या साधनांनी स्वतःला, स्वतःच्या वासनांना जिकणं शक्य नाही. सगळे जिंकूनही आल्याशिवाय ते निरर्थकच ! म्हणूनच महावीर म्हणतात की आत्मा जिंकला की सगळे जिंकलं.

186] ‘मुंगीपाशी जा तिचा उद्योग शिका व शहाणे व्हा.’ (ओल्ड टेस्टामेंट)
मुंगी हा या विश्वातला सर्वात उयोगी जीव. गतकाळातील अनुभवांवर आधारित वर्तमानात काळजीपूर्वक काम करीत राहणे व भविष्याची काळजी घेणे हे मुंग्यांचे यशस्वी सूत्र आपण शिकण्यासारखेच आहे.

187] ‘विश्वासामुळे माणसाला बळ येते.’ (आचार्य विनोबा भावे)
आयुष्यात बऱ्याचदा श्रद्धेच्या जोरावर कामाला सुरुवात करावी लागते अन्यथा माणसे ‘सन्मार्गाने जगूच शकणार नाहीत, अशा श्रद्धेने मिळत गेलेल्या कामातूनच माणसाला अधिकाधिक शक्ती मिळत असते.

188] ‘तुम्ही निर्भय व्हा. भीती बाळगाल तर तरणोपाय नाही.’ (लोकमान्य टिळक) भित्यापाठी ब्रह्मराक्षस ! माणसाने आयुष्यात निर्भयतेने जगावे. कारण भीती म्हणजे पराजय, दुर्बलता मृत्यूच ! भीतीमुळे माणसाचे बुद्धिसामर्थ्य, शक्तिबळ हतबल होऊ लागते. म्हणून निर्भय व्हा.

189] ‘प्रकाशाच्या झोतात राहणाऱ्यांना अंधाराचा गैरफायदा घेता येत नाही.’
प्रसिद्धी प्रकाशात वावरणाऱ्यांच्या वागणुकीवर सगळ्या समाजाचे लक्ष असते. अशा व्यक्तीच्या छोट्या छोट्या चुका देखील ठळकपणे दिसून येतात. यामुळेच प्रसिद्ध माणसांनी नेहमीच सावधचित्त व निष्कलंक राहावे.

190] ‘राग जाळा नाही तर तो तुम्हाला जाळेल.’
क्रोध हा अग्नीप्रमाणेच असतो. क्रोध हा विवेकाला जाळणारा विकार आहे. अशा क्रोधाला जाळणे म्हणजेच त्या क्रोधाला गमाविणे आपले कर्तव्य ठरते. या क्रोधाला जर आपण विझविले नाही तर तोच क्रोध आपल्याला जाळून टाकेल म्हणजेच आपला सारासार विवेक संपूर्ण जाईल.

✿ मराठी सुविचार । Marathi Suvichar

Marathi Suvichar

191] ‘पुस्तक हे संस्कृतीचे मस्तक होय.’
कोणत्याही संस्कृतीचे सार हे त्यातील पुस्तकांमध्ये अक्षरबद्ध केलेले असते. पुस्तके माणसांना ज्ञान देतात. विचारशक्ती देतात, मार्ग दाखवितात. पुस्तके सगळ्या संस्कृतीचे जणू मापदंडच असतात.

192] ‘सद्गुणांसाठी दुसऱ्याकडे बघा व दुर्गुणांसाठी स्वतःवर नजर ठेवा.’ माणसाने जगाकडे बघताना शोधक व स्वीकारवृत्तीने बघावे. दुसऱ्यांच्या दुर्गुणांची निंदा करीत बसण्यापेक्षा स्वतःच्या दुर्गुणांवर करडी नजर ठेवावी आणि स्वतःच्या सदगुणांची स्वतःचे स्तुती करण्यापेक्षा दुसऱ्यांच्या सद्गुणांचा स्वतःमध्ये स्वीकार करावा.

193] विचारांचा दिवा विझला की आचारांचा अंधार होतो.
माणसाच्या प्रत्येक चांगल्या आचरणाचा पाया हा मुळातच एखादा सद्विचार असतो. विचार एखाद्या दिव्याप्रमाणे आचरणमार्ग दाखवीत असतात. जर विचारच करणे बंद केले तर आचाराचा स्वैराचार होण्यास वेळ लागत नाही.

194] ‘सहनशीलता ही कडू गोष्ट असली तरीही तिची फळे मधुर असतात.’
सहनशील असणे म्हणजेच दुःख पचविण्याची शक्ती असणे होय.दुःख पचविणे ही मनाला कडवट अनुभव देणारी गोष्ट होय. परंतु जो माणूस ही सहनशील वृत्ती अंगी बाणवतो, त्याला आयुष्यातील सर्व प्रसंगांना तोंड देता येते व तो जीवनाचा आनंद घेऊ शकतो.

195] ‘ज्याच्याजवळ पुस्तक आहे तो एकटा नाही.’
पुस्तके ही आपल्या मित्रांप्रमाणेच असतात. पुस्तके माणसाला ज्ञान देतात. सुखात व दुःखात ती आपल्या बरोबर असतात. आपला आनंद वाढवितात. दुःखे हलकी करतात, आपल्याला समृद्ध करतात म्हणून पुस्तके उत्तम साथ देतात .

196] ‘ज्याने वेळ वाया घालविला त्याच्याजवळ गमवायला काहीच शिल्लक राहात नाही.’
वेळ ही अत्यंत गतिमान आणि नाशवंत गोष्ट आहे पण तसेच ती फलदायी आहे. वेळेचा सदुपयोग केल्यास माणसे स्वर्ग निर्माण करू शकतात पण वेळ गमावला तर पुढे गमविण्यासाठी सुद्धा माणसाला काहीही मिळालेले नसते. वेळ गमावणे म्हणजे सर्व काही गमावणे.

197] ‘मनात ध्येयाची ऊर्मी असेल तर पायात धावण्याची गती येते.’
माणसाच्या प्रयत्नांसाठी काहीतरी ध्येयवादी प्रेरणा आवश्यक असते. जणू ध्येय ऊर्मी हे रेल्वे इंजिन असून मानवी प्रयत्न हे त्या रेल्वेचे डबे आहेत. अशा वेळी ध्येयाचा उत्साह धावत्याच्या पायात बळ निर्माण करतो.

198] ‘तुम्ही जितके चांगलेपणाने वागाल तितका अधिक चांगुलपणा तुम्हाला प्राप्त होईल.
आपला जगात वावरताना असलेला चांगुलपणा हा जणू पेरलेले बीज आहे. आपण पेरलेल्या बियांना पुन्हा त्याच जातीची रोपे अंकुरतील तसेच या चांगल्या आचरणातून अधिकाधिक चांगली वागणूक इतरांकडून आपल्याला अनुभवाला येईल.

199] ‘शिक्षणाचे तीन पैलू असतात – योग, उपयोग व सहयोग.
योग म्हणजे जोडणे चांगली कौशल्ये , उच्च ज्ञान व सुप्रेरणा यांची एकत्रित जोडणी करणे, या साधनांचा कल्याणासाठी वापर म्हणजे उपयोग करणे, हे कार्य करताना सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाणे म्हणजे सहयोग करणे, तीन पैलू म्हणजे शिक्षण होय.

200] यशस्वी वाटचालीसाठी प्रथम ‘वाट’ शोधा आणि मग ‘चाल’ करा.
यशस्वी वाटचालीसाठी उत्तम सेनापतीची दृष्टी हवी उत्तम सेनापती, प्रथम आपले उद्दिष्ट, लक्ष्य ठरवून घेतो आणि नंतर सर्व शक्तीनिशी त्यावर चाल कस्तो. अशाच प्रकारे प्रथम आपल्याला काय करायचे ही वाट शोधली पाहिजे व नंतर शोधलेल्या वाटेवर न थकता प्रयत्न केले पाहिजेत.

✿ मराठी सुविचार । Marathi Suvichar

Marathi Suvichar

201] ‘सवय ही एक तर एकनिष्ठ सेवक बनू शकते किंवा निष्ठूर मालक बनते.’
सवयीला स्वतःला विचार-विवेक नसतो. तिच्या वापरावर तिची उपयोगिता किंवा उपद्रव ठरत असतो. पुस्तक वाचनाची सवय माणसाला उपकारक होते. सहायक ठरते, तर दारू पिण्याची सवय ही व्यसनरूपाने निष्ठुरपणे मानगुटीवर बसते. म्हणून योग्य गोष्टींची सवय असावी. सवय आपल्या ताब्यात असावी. आपण तिच्या ताब्यात नसावे.

202] ‘कार्यात रस असेल तर कार्य निश्चितच सरस ठरतं.’
कार्याच्या स्वरूपाविषयी, उद्दिष्टांविषयी व परिणामाविषयी, प्रेम जिव्हाळा, आपलेपणा असेल तर आपण ते कार्य निःसंशयरीत्या चांगले, उत्तम प्रकारे पार पाडतो. मग असे कार्य हलक्या प्रकारचे कसे होईल बरे?

203] ‘कर्तव्याची प्रीती ही ईश्वराची सर्वश्रेष्ठ भक्ती होय.’
कर्तव्य म्हणजे ईश्वर होय, अशा कर्तव्याबद्दल आपलेपणा, प्रीती वाटणे म्हणजे कार्य, आपण ईश्वराचे कार्य या भावनेने करू इच्छितो. ईश्वराचे कार्य करणे म्हणजेच ईश्वराची भक्ती, त्याचे आज्ञापालन होय.

204] समोर अंधार दिसत असला तरीही त्यापलीकडे उजेड आहे हे लक्षात ठेवा.
कोणतीही स्थिती कायमची नसते. साहजिकच संकटे ही तात्पुरतीच असतात. संकटरूपी अंधारात काहीही दिसत नसले तरी, डगमगून जाऊ नये कारण अंधार संपून लवकरच यशाचा उजेड पडणार असतो.

205] छोट्या लोकांच्या सावल्या मोठ्या पडायला लागल्या की सूर्य अस्तास चालला असे समजावे.
अनेकदा अत्यंत उथळ, शूद्र, गोष्टींना समाजामध्ये प्रतिष्ठा मिळू लागते . कारण मोठेपणाचे मानदंडच छोटे झालेले दिसतात. एकूण संस्कृतीलाच काय श्रेष्ठ, काय कनिष्ठ हे समजेनासे होते. थोडक्यात संस्कृति सूर्याचा अस्त जवळ आलेला असतो. म्हणूनच हे विपरीत चित्र दिसू लागते.

206] ‘व्यवहारात आपण दुसऱ्याची लबाडी ओळखून वागावे, एवढीच लबाडी आपल्यामध्ये असावी.’
जगात अगदी भोळसटपणे वागणे म्हणजे आत्मनाश ओढवून घेणे होय. आपल्याला जगात प्रामाणिकपणे वागायचे आहे, परंतु प्रामाणिकपणे जगण्यासाठी दुसऱ्यांचा कावेबाजपणा ओळखण्याइतका धूर्तपणा आवश्यक आहे.

207] “Morning after morning, He opens my eyes.”
उजडणारी प्रत्येक सकाळ, आपल्याला काही तरी नवे शिकवीत असते. तो सर्वश्रेष्ठ ईश्वर आपल्यासाठी नवीन संदेश, नवा जोम, नवी शक्ती प्रत्येक सकाळी आणत असतो. फक्त आपण जागे असले पाहिजे.

208] ‘जहाज पाण्यात चालते पण जहाजात पाणी चालत नाही.’
जन्माला आलेल्या प्राण्याला भवसागर चुकत नाही इंद्रियांची नाकेबंदी करून ऐहिक वासनारूपी जल आत न येऊ दिले तर जीवननौका सुखरूप पैलतीरावर पोहोचेल कर्म करावे पण त्याच्या बंधनात अडकू नये.

209] “खूप लांबच्या यात्रादेखील एका पावलानेच सुरू होतात.”
कितीही भव्य कार्य करायचे असले तरी ते एकदम उभे करता येत नाही. त्यासाठी आपल्याला थोडी थोडी पण सातत्याने सुरुवात करावी लागते. नंतरच आपल्या प्रयत्नांना भव्य आकारमान प्राप्त होते.

210] ‘भविष्यकाळ ही वर्तमान काळानेच केलेली गुंतवणूक असते.”
वर्तमानातील प्रयत्नातूनच भविष्य आकारला येते. वर्तमान स्वस्थ बसून भविष्यातील पीक काढता येत नाही. आजचे कष्ट, आजची बचत म्हणजे उद्याची संपत्ती, उद्याची विश्रांती होय.

✿ मराठी सुविचार । Marathi Suvichar

Marathi Suvichar

211] ‘कौतुक मोठ्या आवाजात करावे, दोष कानांत सांगावेत.’
समाजामध्ये एखाद्याचे जाहीरपणे कौतुक केल्यास त्याला प्रोत्साहन मिळते, अधिक चांगले कार्य त्याच्या हातून घडते. पण काही चुकल्यास त्याचा उल्लेख केवळ संबंधित व्यक्तीकडे मृदू शब्दात करावा अन्यथा चूक सुधारण्याऐवजी ती व्यक्तीच दुखावली जाईल.

212] ‘प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नाचा आनंद अधिक आहे.’ (विनोबा भावे)
यश मिळणे किंवा अपयश येणे, हे अनेक गोष्टींवर अवलंबून असल्याने त्याविषयी हर्ष-खेद मानण्याची काहीच गरज नाही ; खरे पाहता एखादे यश मिळविण्यासाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न हेच आधिक आनंददायी असतात. कारण सामान्य माणसाच्या हातांत प्रयत्न करणे एवढेच असते.

213] ‘झाडांची मुळे मिळेल तेथून ओलावा घेण्यासाठी धडपडत असतात. त्याचप्रमाणे ज्ञानोपासकाची दृष्टी हवी.’ (साने गुरुजी)
ज्ञान कोठेही असो, ते पवित्रच असते. ते प्रत्येक क्षणाला घेण्याचा म्हणजे अंर्तदृष्टी जागी ठेवून जगण्याचा प्रयत्न करावा झाडांची मुळे ज्याप्रमाणे सदैव पाण्याच्या शोधात खोलवर पसरत जातात त्याचप्रमाणे ज्ञानाच्या खऱ्या उपासकाने ज्ञानाचा सर्वत्र व अविरत शोध घ्यावा त्यासाठी पड़तील ते कष्ट उपसावेत.

214] ‘वाचकाने फुलपाखरांप्रमाणे असावे.’
फुलपाखरे फुलांतील मधुरस पिताना फुलाला अजीबात इजा पोहोचवत नाहीत, त्याचप्रमाणे वाचकाने पुस्तकांचे वाचन, अध्ययन करताना आतील ज्ञानरस काळजीपूर्वक ग्रहण करावा, पुस्तकाला मात्र अजीबात इजा करू नये’

215] ‘जर कोणावर उपकार केलात, तर तो स्मरणात ठेवू नका, आणि जर कोणाचा उपकार तुमच्यावर झाला, तर तो विसरू नका.’ (महाभारत)
जगात वावरताना आपल्या हातून होणाऱ्या सत्कृत्यांची, उपकारांची सतत आठवण ठेवल्याने आपला अहंकारच बळकट होईल. याउलट आपण केलेल्या उपकारांची विस्मृती माणसाला अधिक विनयशील बनवते, साधे बनवते. पण जर कोणी आपल्यावरच उपकार केला असेल तर मात्र तो विसरू नये अशा उपकाराची विस्मृती आपल्याला कृतघ्न बनवते.

216] “ऊठ ऊठ माझ्या जिवा, काम पडलं अमापं । काम करता करता, देख देवाजीचं रूप ।। (बहिणाबाई चौधरी)
कामात राम पाहणाऱ्या बहिणाबाई म्हणतात, अरे माणसा ऊठ, तुझ्या इवल्याशा आयुष्यात खूप कामाचा, कष्टाचा पसारा पडला आहे, तो पसारा आवरणे, हीच तुझी जीवन साधना ठरणार आहे. कोणतेही कार्य ही ईश्वराची सगुण मूर्तीच आहे असे जाणून कामाला लाग.

217] ‘कृती हे ज्ञानाचे सुंदर फळ आहे.’ (थॉमस फुलर)
एखाद्या प्रश्नाचे ज्ञान झाले की त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी माणसाने कृतिशील उपाययोजना केली पाहिजे. कृतीशिवाय ज्ञान निरुपयोगी व भारभूत असते. याउलट ज्ञानाच्या सुंदर फुलांचे अत्यंत मधुर अशा फळात रूपांतर झाले तर ते ज्ञान सार्थकी लागते.

218] ‘हात उगारण्यासाठी नसतात उभारण्यासाठी असतात.’ (बाबा आमटे)
माणसाची सृजनशीलता ही माणूसपणाची खूण आहे. माणसाने आपले सगळे सामर्थ्य काही तरी चांगले कार्य उभे करण्यासाठी वापरावे, सामर्थ्याचा, कल्पकतेचा, माणूसपणाचा हात खरा उपयोग आहे. दुसऱ्यांवर आक्रमण, हल्ला, अपमान वा विध्वंस करणे, यासाठी आपले जीवन नाही हे माणसाने ओळखले पाहिजे.

219] ‘कर्तृत्वाला कल्पकतेची जोड मिळाली म्हणजे अद्भुत कार्ये घडतात.’ (कुराण)
नुसतीच अंगमेहनत उपयोगाची नाही. कष्ट उपसण्यासाठी सदृढ देहाच्या कर्तृत्वाबरोबरच सुपीक कल्पनांची, कल्पकशक्तीचीही जोड हवी. त्यातून मानवी प्रयलांना दिशा मिळते व अद्भुत अशी कार्ये घडून येतात. कर्तृत्व हे हात असतील तर कल्पकता हा मेंदू आहे. होय.”

220] ‘अकारण काळजी करणे म्हणजे न घेतलेल्या कर्जावर व्याज भरण्यासारखे आहे.
काळजी केल्याने उद्याचे दुःख कमी होण्यापेक्षा आजची ताकद कमी होते. काळजी करीत बसण्यापेक्षा काळजी घेणे अधिक फायदेशीर असते. काळजीमुक्त जीवन जगणे महत्त्वाचे असते. अकारण काळजी करणे म्हणजे नदी समोर नसतानादेखील ती पार कशी करू या विचाराने हैराण होण्यासारखे आहे.

✿ मराठी सुविचार । Marathi Suvichar

Marathi Suvichar

221] शिक्षण म्हणजे मानवाच्या अंगी जे सुप्त पूर्णत्वे आहे, त्याचेच प्रकटीकरण (स्वामी विवेकानंद)
मनुष्याच्या अंगी अनेक सुप्त गुण, शक्ती बसलेल्या आहेत म्हणूनच मानवी देह, मन, बुद्धी यांच्या सामर्थ्यांने मानवाचा जन्म मौल्यवान आहे परंतु हे सामर्थ्य जणू झोपलेले आहे, त्याला जागे करण्यासाठी, त्याचा उपयोग करण्यासाठी मानवाला काही कौशल्ये शिकावी लागतात, त्यासाठी मानवाला शिक्षणाची आवश्यकता आहे.

222] ‘सामर्थ्य हेच जीवन ; दुर्बलता म्हणजे मृत्यू होय.” (स्वामी विवेकानंद)
जीवन जगण्यासाठी सर्व प्रकारचे सामर्थ्य हवे शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक या सर्व जीवनागांनी समर्थ माणूस जगात यशस्वी होतो. याउलट सामर्थ्याचा अभाव म्हणजेच कर्तृत्वशक्तीचा अभाव होय, अशी दुर्बल व्यक्ती म्हणजे जगावरचे नकोसे वाटणारे ओझेच होय.

223] “It is better to wear out than to rust out” (स्वामी विवेकानंद)
मृत्यू अटळच आहे, तर मग शुद्र जंतूप्रमाणे मरण्यापेक्षा वीरोचित मरण कवटाळणे अधिक चांगले, जरा जीर्ण अवस्थेत खितपत पडून थोडे थोडे मरण्यापेक्षा, अल्पकालच का होईना पण परकल्याणार्थ झटून चटकन मरून जाणे बरे नाही का? शेळी म्हणून हजार वर्षे जगण्यापेक्षा वाघ म्हणून शंभर वर्षे जगणे अधिक चांगले.

224] ‘मी तुम्हाला एक शस्त्र दिले आहे, ते म्हणजे विवेकशक्ती’ (गौतम बुद्ध)
विवेक म्हणजे एक कुशल धारदार शस्त्रच आहे. माणसाच्या जगण्यात अनेक जटिल समस्यांचा गुंता सोडविण्यासाठी विवेकरूपी शस्त्राचाच उपयोग होतो. विवेकशून्य माणसांचे जगणे म्हणजे शस्त्रहीन सैनिकाचे लढणे होय. विवेक हे सर्व शस्त्रांचे शस्त्र व शास्त्रांचे शास्त्र आहे.

225] ‘विचारस्वातंत्र्य हा राष्ट्राचा आत्मा आहे.’ (लोकमान्य टिळक)
विचार हे अंतिमतः कृतीचे रूप धारण करतात. जर देशामध्ये विचारस्वातंत्र्य नसेल तर त्या देशाला कार्य करण्याचेही स्वातंत्र्य उरणार नाही. जो देश कृती करू शकत नाही, त्या देशाला मृत देशच म्हणावे लागेल. म्हणूनच विचार करण्याचे स्वातंत्र्य हे जणू राष्ट्राचा आत्माच आहे. विचारस्वातंत्र्यावाचून राजकीय स्वातंत्र्याला अर्थच नाही.

226] ‘आपले जीवन हे आपणास मिळालेले एक दान आहे. त्याचे दान करीत राहिल्यानेच त्याचे मोल वाढते.’ (रवींद्रनाथ टागोर)
आपला जन्म हा आपण मागितलेला नाही. त्यामुळे जणू आपल्याला ईश्वराने जगण्याचे दान दिले आहे. म्हणजेच आपल्या जीवनाचा केवळ स्वार्थी विचाराने उपभोग घेणे हे ईश्वराचा अपराध करण्यासारखे आहे. असे स्वार्थी जगण्यापेक्षा मानवाने आपल्या जीवनात जनकल्याणाचे कार्य करावे, म्हणजेच जीवनाचे ईश्वरप्रमाणेच दान करीत राहावे म्हणजे ते अमूल्य जीवन होईल.

227] ‘सामर्थ्यवंताचे क्षमा हे भूषण आहे.’
शक्तिशाली माणसाला आपल्या सामर्थ्याचा स्वेच्छेने उपयोग करता येतो पण आपल्या सामर्थ्याने दुसऱ्याला शासन करण्यात फारसे वेगळे काही नाही. त्याउलट शक्ती असूनही क्षमा करण्यासाठी खूप संयमाची उदार हृदयाची गरज असते , क्षमा करू शकणारे समर्थ अधिक श्रेष्ठ असतात .

228] ‘देशसेवा ही केवळ बुद्धीवर अवलंबून नसून दीर्घोद्योगावर व स्वार्थत्यागावर अवलंबून आहे.’ (लोकमान्य टिळक)
देशाची सेवा करताना बुद्धी आवश्यक आहेच पण पुरेशी नाही अन्यथा सर्वच बुद्धिवंत देशसेवक झाले असते. देशसेवा हे खडतर व्रत आहे, बुद्धीच्या जोडीला चिकाटी आणि स्वार्थत्याग या दोन गुणांचीही देशसेवेसाठी आवश्यकता असते.

229] ‘प्रबोधन, संघटन आणि संघर्ष ही परिवर्तनाची वाट आहे.’ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर)
अन्यायकारक परिस्थिती बदलणे व न्याय प्रस्थापित करणे म्हणजे परिवर्तन होय. परिवर्तन करण्यासाठी मुळात अन्याय समजून घ्यावा लागतो. त्यासाठी प्रबोधन आवश्यक आहे. अन्यायाचे स्वरूप समजल्यावर न्याय मागणाऱ्या लोकांना संघटित करणे गरजेचे आहे आणि असा. संघटित समूहाने न्यायासाठी संघर्ष करण्याची आवश्यकता असते. परिवर्तन शक्य होते.

230] ‘एका पुरुषाचे शिक्षण हे बहुधा त्याचे एकट्याचेच ठरते पण एका स्त्रीचे शिक्षण म्हणजे भावी पिढीचे शिक्षण असते.’ (महात्मा फुले)
सुशिक्षित पुरुषाची जबाबदारी सामान्यतः घरासाठी अर्थार्जन करणे हीच असते तर सामान्यपणे स्त्रीला अपत्य संगोपनाचा मोठा वाटा उचलावा लागतो. जर पुरुष शिकलेला असेल तर तो घरासाठी अधिक पैसा मिळवू शकेल पण तो अधिकांना शिकवू शकणार नाही. जर स्त्री सुशिक्षित झाली तर ती आपल्या मुलांचे उत्तम संगोपन करेल, त्यांनाही सुशिक्षित बनवेल म्हणजेच आपल्याबरोबर भावी पिढीचेही शिक्षण स्त्रीकडून साध्य होईल.

✿ मराठी सुविचार । Marathi Suvichar

Marathi Suvichar

231] तोडायला वेळ लागत नाही पण जोडायला मात्र लागतो.
तोडणे सोपे असते, जोडणे अवघड असते. जोडायला ज्ञान, कौशल्य आणि सृजनशील दृष्टी लागते. मने दुभंगायला वेळ लागत नाही. मने सांधायला मात्र वेळ लागतो. जीवनात नेहमी विधायक दृष्टिकोन असावा, विध्वंसक नसावा.

232] पेराल तसे उगवेल !
सकस आणि उत्तम बी पेरले तरच उत्तम रोपटे उगवते. निसर्गाचा हा नियम आहे. त्याचप्रमाणे जसे तुमचे कर्म तसे फळ तुम्हाला प्राप्त होते. इतरांशी तुम्ही जसे वागता तसेच लोक तुमच्याशी वागतील. म्हणून आनंद पेरा व आनंद उगवा.

233] जगामध्ये जगमित्र । जिव्हेपाशी आहे सूत्र ।
समाजामध्ये लोकप्रिय असणे, खूप मित्र असणे हे कौतुकाचे लक्षण आहे पण जगमित्र होण्यासाठी सर्वांशी आदराने, नम्रतेने व गोडपणे बोलावे. जिभेचा तुम्ही कसा उपयोग करता त्यावर लोक तुमचे मित्र किंवा शत्रू बनतात.

234] ज्याच्याजवळ धैर्यरूपी धन नाही तो खरा निर्धन असतो.
धाडसी माणूस नेहमी जे मिळवायचे त्याकडे घोडदौड करीत असतो प्रयत्नांच्या घोड्यावर बसून तो यशरूपी धनाकडे जात असतो. संकटांना तो घाबरत नाही. उलट मनाने कमकुवत, स्व-सामर्थ्यावर विश्वास नसलेला मात्र निर्धन असतो.

235] राई एवढा दोष लपविल्याने पर्वताएवढा मोठा होतो.
स्वतःकडून झालेली एखादी लहानशी चूक लपवली तर पुढे चार चुकीच्या गोष्टी आपल्याकडून होतात, कराव्या लागतात. लहानशी चूक कबूल केली तर सुधारता येते. म्हणूनच आपल्यातले दोष , चुका वेळीच कबूल करायला शिका.

236] चांगले विचार मनात फार वेळ ‘टकत नाहीत म्हणून ते मनात येताच कृती करा.
मन चिंती ते वैरी न चिंती असे म्हणतात. माणसाच्या मनात चांगल्यापेक्षा वाईट विचारच अधिक येतात. म्हणून चांगले विचार मनात आल्या रोबर ते आचारात आणावेत, थोडा जरी विलंब झाला तरी वाफेप्रमाणे ते निघून जातात.

237] जे जे आपणास ठावे । ते दुसऱ्यांशी शिकवावे ।
ज्ञान कितीही मिळवले तरी अपुरेच पडते. शिक्षण ही जन्मभर चालणारी प्रक्रिया आहे. आपल्याला जे माहीत आहे ते इतरांना सांगावे. ज्ञान दिल्याने कमी न होता उलट वाढत राहते. आपण ज्ञानी व्हावे व इतरांनाही तसे करावे.

238] आनंदाचा गुणाकार करावा. दुःखाचा भागाकार करावा.
वाटून वाढतो तो आनंद. आठवून कमी होते ते दुःख. समोरच्या, शेजारच्या व्यक्तीस तुम्ही आनंद दिल्याने ती आनंदी होईल. दुःखात कोणी तरी आपल्या पाठीशी आहे ही भावना दुःखी माणसाचे दुःख कमी करते. म्हणून दुसऱ्याच्या सुख-दुःखात सहभागी व्हा.

239] फुलांचे सौंदर्य बघायला फुलांचे डोळे हवेत.
सौंदर्य हे वस्तूबरोबरच पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते. चांगल्या दृष्टीने पाहिले तर सौंदर्य व सद्गुण दिसतात. याउलट अरसिक व दोषदृष्टीने पाहिले तर व्यक्तीला वाईटपणा व दोषच दिसतात, जशी दृष्टी तशी सृष्टी भासते.

240] आई म्हणजे मुलांची पहिला शाळा असते.
आई म्हणजे जननी, लहान मूल मातीचा गोळा असते. त्याला संस्काराने मूर्तीचा आकार आई देते. मुलगा शाळेत जाण्यापूर्वी पहिली संस्कारांची, सद्गुणांची शाळा व शिक्षिका म्हणजे आई. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी ।

✿ मराठी सुविचार । Marathi Suvichar

Marathi Suvichar

241] वृद्धपूजा म्हणजे ज्ञानपूजा.
वृद्धांच्या शभ्र केसांत अनुभवाचे शुद्ध ज्ञान असते. त्यांच्या वाकलेल्या पाठीवर कित्येक वर्षाचा इतिहास असतो. परंपरा वृद्धांना माहीत असते. अनासक्त, आत्मतृप्त आणि उपकार करणारी म्हातारी माणसं म्हणजे नव्या पिढीचा आधार म्हणून वयाचा आदर हे सुसंस्कृत समाजाचं लक्षण आहे.

242] मोठी माणसे मोठेपणाच्या मागे नसतात.
मोठी माणसे मोठेपणा मिळविण्याकरता काम करत नाहीत ती ध्येयवादाकरिता झगडत असतात. कामाच्या प्रेमामुळे व तळमळीमुळे कष्ट करतात. ध्येयाची प्रगती ही त्यांची स्फूर्ती वा आनंद असतो. त्यांना नकळत मोठेपणा त्यांच्यामागे जात असतो.

243] क्षणक्षणा जीवन बनते, क्षण जाता जीवन जाते ।
वेळ गमावणे म्हणजे आयुष्य गमावणे. सर्व संधी गमावणे, गमावलेले धन काटकसरीने व परिश्रमाने मिळविता येईल. विसरलेले ज्ञान अभ्यासाने प्राप्त होईल. गेलेले आरोग्य औषधाने व संयमाने मिळेल परंतु आयुष्याचा एक क्षणसुद्धा कशानेही परत आणता येणार नाही.

244] वेळ कसली बघता? चांगलेपणा हाच तिचा मुहूर्त आहे.
चांगले काम करावयाचे मनात आले की ते लगेच करून टाकावे ते खात्रीने होते. काही करण्याची प्रेरणा जेव्हा होते तोच योग्य मुहूर्त. ती वेळ टळली तर सफलताही टळली.

245] ‘सुख व कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.’ (सेनापती बापट)
सुख आणि कर्तव्य एकमेकांशी संबंधित आहेत. प्रत्येक सुखापाठीमागे कर्तव्य असतं तर प्रत्येक कर्तव्याच्या पाठीमागे सुख असतं. कर्तव्याशिवाय सुख म्हणजे पशुता तर सुखाशिवाय कर्तव्य म्हणजे रुक्ष जीवन.

246] ‘शिक्षणं म्हणजे सतत विकसित होणं.’ (डॉ. राधाकृष्णन)
प्रत्येकजण आजन्म विद्यार्थी असला पाहिजे. जे झाड जमिनीतून रोज नवी द्रव्ये शोधून घेत नाही त्याची वाढ खुंटते, नव्हे ते सुकून जातं. जी व्यक्ती रोज नवं ज्ञान, नवा अनुभव ग्रहण करीत नाही ती देखील सुकून जाते. तिच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत नाही.

247] ‘जी सुधारणा घडवून आणते, ती खरी टीका.’ (श्रीनिवास सरदेसाई)
माळी आणि लाकूडतोड्या यांत फरक हा की, एकानं तोडलेले झाड दुप्पट जोमानं वाढतं. दुसऱ्यानं तोडलेल्या झाडाची खच्ची होते. चांगल्या व वाईट टीकाकारांत हाच फरक असतो. सहानुभूतीशिवाय टीका म्हणजे बधिर न करता केलेलं ऑपरेशन !

248] ‘नराचा वानर किंवा नराचा नारायण करण्याचे सामर्थ्य मनात आहे.’
मन आपलं मित्र आहे. तसं ते आपलं शत्रूदेखील आहे. एका बाजूनं ते राम आहे तर दुसऱ्या बाजूनं ते रावण आहे. मन हे चंचल माकड आहे. तसं ते शक्तिवान हनुमान आहे म्हणून आपण त्याच्या ताब्यात न जाता त्याला आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयल करावा.

249] ‘व्यवहार म्हणजे आपल्या व दुसऱ्यांच्या विचारांची बेरीज-वजाबाकी होय.’
व्यवहार हा आपल्या एकट्यावर अवलंबून नसतो. तेथे दुसऱ्याचा संबंध असतो. दुसऱ्याचे पटणारे किंवा न पटणारे विचार लक्षात घ्यावे लागतात. आपल्या तत्त्वाला धक्का न लावता दुसऱ्यांच्या विचारांनाही आवश्यक तेवढा मान द्यावा. तसं वागणं म्हणजे खरा व्यवहार.

250] “नित्यनेम मोजकेच असावेत पण ते प्राणापलीकडे जपावेत.’ (गोंदवलेकर महाराज)
पुष्कळ नियम करायचे आणि एकही पाळायचा नाही हे बरोबर नाही. ‘एक ना धड, भाराभर चिंध्या’ अशी स्थिती नसावी. त्यापेक्षा नियम थोडेच असावेत पण पक्के असावेत म्हणून श्री तुकोबारायांनी सांगितलं आहे – ‘काही नित्यनेमावीण । अन्न खाय तोचि श्वान ।।

✿ मराठी सुविचार । Marathi Suvichar

Marathi Suvichar

251] ‘ठेच दोन कारणांनी लागते-मुळीच न पाहिल्यामुळे किंवा फार दूरवर पाहिल्यामुळं.’
चालताना पायाखाली लक्ष न दिल्यास किंवा फार दूरवर पाहिल्यास ठेच लागते. कुठलीही गोष्ट एकदम दुर्लक्षित करणं किंवा तीत खूप लक्ष घालणं, दोन्हीही वाईट. योग्य प्रमाणात योग्य त-हेनं परिस्थितीवर लक्ष ठेवावं.

252] “ग्रंथाइतका प्रांजळ व निष्कपटी गुरू नाही.’ (न. चिं. केळकर)
छडी न वाजता, रागानं न बोलता शिकविणारे ग्रंथ आपले प्रेमळ गुरू होत. ते कधीही झोपत नाहीत. काहीही लपवून ठेवत नाहीत चूक झाली तर रागावत नाहीत. अज्ञानाला हसत नाहीत. हवी तेव्हा हवी तितक्या वेळा त्यांची भेट घेता येते

253] ‘सत्संग मानवाला काय देत नाही?’ ( नीतिशतक)
सत्संग दुर्मिळ असतो. परंतु एकदा घडला की त्यानं जीवन सफल होतं. स्वभाव सुधारतो, बुद्धी जागृत राहते. स्वतःचे दोष कळतात. हृदयात चांगले भाव उत्पन्न होतात. तेव्हा सत्संगतीमुळे काय शक्य होत नाही?

254] निवृत्तीविना प्रवृत्ति आंधळी आहे तर प्रवृत्तिविना निवृत्ति पांगळी आहे.
प्रवृत्ती व निवृत्ती या दोहोंची सारखीच गरज आहे. दोहोंचं सहकार्य असेल तरच सुखप्राप्ती होते. एका पारड्यात प्रपंचाचं भाग्य तर दुसऱ्यात वैराग्य ठेवां. तराजू समतोल झाल्यास शाश्वत सुखाचा अनुभव मिळतो. मनात निवृत्ती तर जनात प्रवृत्ती असावी.

255] ‘संस्कृती म्हणजे प्रकृती आणि विकृती यांना दिलेली योग्य आकृती,’ (विनोबा भावे)
आपण सुखी व्हायचं मग इतरांचं काय वाटेल ते होवो, अशी वृत्ती म्हणजे प्रकृती होय. आपलं काय वाटेल ते होवो पण दुसऱ्यांचं वाटोळं झालेच पाहिजे ही वृत्ती म्हणजे विकृती तर इतरांच्या सुखातच आपलं सुख असतं ही वृत्ती म्हणजे संस्कृती होय. सुयोग्य संस्कारांतून संस्कृती निर्माण होते.

256] ‘बोलताना विचार करून बोला, बोलून विचारात पडू नका.’ (कॉन्फ्युशियस)
शब्द फार जपून, विचार करून वापरावेत, बोलायच्या आधीच आपल्या बोलण्याचा परिणाम काय होईल याचा विचार करायला हवा. बोलून झाल्यावर मग आपण हे बोललो नसतो तर बरं झालं असतं असं वाटू नये. शब्द तोंडातून बाहेर पडला म्हणजे त्याची सत्ता आपल्यावर चालू होते.

257] ‘जग भित्र्याला भिवविते आणि भिवविणाऱ्याला भिते.’ (साने )
भित्रेपणामुळं दुर्बलता येते. दुर्बल माणसाला जग जास्त भीती दाखविते. याउलट जो समर्थ निर्भय असतो त्याला सगळे भितात. तेव्हा अंगातील सामर्थ्य वाढवावं. स्वामी विवेकानंद म्हणत, “दुर्बलता पाप आहे, सामर्थ्य हे धर्माचं मूळ आहे.

258] परमेश्वराची अत्युच्च देणगी म्हणजे वेळ, ती वाया घालवू नका. (प्रफुल्लचंद्र)
सुटलेला बाण, बोललेला शब्द आणि गेलेली वेळ कधीच परत येत नाही. म्हणूनच सर्वांसाठी वेळ द्या पण वेळेत सर्व करावयास शिका. वेळेच्या सदुपयोगासाठी नियमितपणा आवश्यक असतो. वेळेचं मोल अनमोल आहे. ज्यांनी वेळ वाया घालवला, त्यांनी सर्व काही गमावलं.

259] ‘कोणाचा उपकार घेऊ नये । घेतला तरी राखो नये ।।’ (समर्थ रामदास)
शक्यतो स्वतःचं काम स्वतः करावं. उगाचच दुसऱ्याची हरघडी मदत घेऊ नये. अडचणीच्या वेळी एकमेकांची मदत लागतेच, अशी मदत लक्षात ठेवून तिची परतफेड करावी. स्वावलंबन आणि उपकाराची जाणीव याचं महत्त्व समर्थांनी येथे सांगितले आहे.

260] ‘सामान्य माणसाचे प्रबोधन म्हणजेच लोकशाहीचे उन्नयन. (डॉ. बाबासाहेब आंबेडकर)
सामान्य माणूस म्हणजे समाजाचा केंद्रबिंदू. त्याला जागं केल्याशिवाय देशाला भवितव्य नसतं. देशाची प्रगती मोठ्या व्यक्तीपेक्षाही छोट्या व सामान्य माणसाकडून जास्त होत असते. लोकशाहीत एका व्यक्तीची उंची फूटभर वाढण्यापेक्षा सर्वाची इंचभर उंची वाढणे अधिक आवश्यक आणि उपयुक्त असतं.

✿ मराठी सुविचार । Marathi Suvichar

261] ‘ज्ञान म्हणजे आत्मज्ञान । पाहावे आपणासी आपण ।।
आपण डोळा, कान, नाक अशा पाच इंद्रियांनी ज्ञान मिळवितो. परंतु हे ज्ञान लौकिक व दुय्यम ज्ञान होय. खरं ज्ञान म्हणजे जो जाणणारा आहे त्याला जाणणं आपण आपल्याला ओळखणं होय, हे आत्मज्ञान साधनेत व सद्गुरूच्या कृपेने प्राप्त होतं.

262] ‘उच्चारावरून विद्वत्ता, आवाजावरून नम्रता आणि वर्तनावरून शील समजते.’ (पं. नेहरू)
आपले उच्चार स्पष्ट असावे तर शब्दसंग्रह भरपूर हवा , त्यावरून आपली हुशारी कळते. बोलणं थोडं असावं, त्यात मृदुपणा असावा. त्यावरून आपली विनयवृत्ती समजते. आपलं वागणं साधं, सरळ असावं अस वागण म्हणजे आपल्या चारित्र्याचा आरसाच होय.

263] ‘अविचारानं आत्मघात होतो.’ (आचार्य जावडेकर)
कोणतीही गोष्ट विचारपूर्वक करावी विचार न करता घाईघाईनं काम केल्यास ते फसतं. आपल्याला काम झेपेल का? आपल्याकडून ते पूर्ण होईल का? त्याचे परिणाम काय होतील? याचा विचार करून मग ते काम हाती घ्यावं.

264] ‘सुंदर सकाळ पाहण्यासाठी आधी काळोखाची रात्र जावी लागते.’ (कुसुमाग्रज)
सकाळचा उगवता सूर्य खूप सुंदर दिसतो. परंतु रात्र संपल्याशिवाय तो सुंदर देखावा पाहता येत नाही. त्याचप्रमाणे यशाचा सूर्य पाहावयाचा असेल तरी धीर धरावा लागतो. प्रयत्न, कष्ट व चिकाटी यांची कास धरावी लागते.

265] ‘क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.’
श्री समर्थ रामदास स्वामींचे हे विचार आहेत. बोलण्यापेक्षा करण्याला जास्त महत्त्व आहे. मी हे करीन, ते करीन असं नुसतं म्हणून काहीही न करणाऱ्यांवर कोणीही विश्वास ठेवत नाही. कमी बोलून जास्त काम करणं याला जास्त महत्त्व आहे.

266] ‘तुलना करावी पण अवहेलना करू नये.’
अनेक बाबतीत दुसऱ्याशी तुलना करावी लागते. तुलनेमुळे आपल्यातले दोष कळतात ते सुधारता येतात. प्रगतीसाठी तुलना आवश्यक असते, तेव्हा तुलना करावी परंतु दुसऱ्याला किंवा स्वतःला कमी लेखू नये. कोणाही व्यक्तीची अवहेलना करू नये,

267] आळसात प्रारंभी सुख, नंतर दुःख । कष्टात प्रसंगी दुःख । नंतर मात्र सुख।
आळशीपणामुळं सुरुवातीला नेहमीच सुख वाटतं. आराम मिळतो. परंतु कष्ट करण्याची सवय कमी होते. अभ्यासाची सवय मोडते. याउलट कष्ट करणारा सुरुवाती दमतो पण त्याची कामे वेळच्या वेळी पूर्ण होतात. त्याला आनंद व उत्साह लाभतो.

268] ‘सन्मित्र हीच जगातील श्रेष्ठ संपत्ती आहे.’ (भगवान महावीर)
एखादी व्यक्ती कशी आहे, हे त्या व्यक्तीच्या मित्रमंडळीवरून समजते. ज्याला उत्तम मित्रांचे धन असते, तो खऱ्या अर्थाने श्रीमंत असतो. अडी अडचणीच्या वेळी त्याचे मित्र धावून येतात आणि मदत करतात. या जगात पैशानं सगळीच काम होत नसतात.

269] ‘मौन हा रागाला जिंकण्याचा सोपा उपाय आहे.’ (मेहेरबाबा)
माणसाला राग आला की रागाच्या भरात माणूस काहीही बोलतो. इतरांना लागेल असं बोलतो. त्यामुळे मने दुखावली जातात. म्हणून राग आला की मौन पाळावं. गप्प राहिल्यास अनेक वाईट गोष्टी टाळल्या जातात.

270] नम्र झाला भूता । तेणे कोंडिले अनंता । (संत तुकाराम)
सारे प्राणिमात्र म्हणजे ईश्वराची लेकरं आहेत. त्यांच्या सेवेतच परमेश्वराची पूजा साधली जाते. हे महान तत्त्व ज्यांनी जाणलं, ते महात्मे झाले. मानवता हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. तो ज्यांनी अंगिकारला, त्यांचा परमेश्वरसुद्धा दास होतो. संत एकनाथांनी हा धर्म आचरला त्यामुळे प्रत्यक्ष परमेश्वर त्यांच्याकडे ‘श्रीखंड्या’ च्या रूपाने चाकरीला राहिला.

✿ मराठी सुविचार । Marathi Suvichar

271] ‘कर्तव्यपूर्ती म्हणजेच मोक्ष’ (भगवद्गीता)
आजकाल प्रत्येकाला हक्कांची जाणीव आहे, परंतु कर्तव्यांचा विसर पडत चालला आहे. खरं तर कर्तव्यपूर्तीचा आनंद मोठा आहे. त्याची करता येईल. प्रभू रामचंद्रांनी कर्तव्यपूर्तीसाठी वनवास पत्करला, अर्जुनाला युद्ध करवं लागलं कर्तव्याचं पूर्ण पालन करणं हाच प्रत्येकाचा श्रेष्ठ धर्म असला पाहिजे.

272] ‘चराति चरतो भगः ।’ (ऐतरेय ब्राह्मणक)
जो चालतो म्हणजे प्रयत्न करतो, त्याचं नशीबही चालतं म्हणजे त्याला साथ तुलना मोक्षाशीच देतं दैव हे माणसानं आपल्या पराक्रमानं घडवायचं असतं. पराक्रमी माणसेच भाग्याला आवडतात. आळशी माणसं उद्योग न करता, नशिबावर हवाला ठेवून बसतात. ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ ही त्यांची विचारसरणी आहे. ती अत्यंत घातक आहे.

273] “मना करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे साधन” (संत तुकाराम)
प्रसन्न माणूस सर्वांना आवडतो, चुंबकाप्रमाणे तो लोकांना आपल्याकडे खेचतो. नेहमी निराशावादी उदास असणाऱ्या माणसापासून लोक दूर राहतात. मन प्रसन्न राहण्यासाठी गांधीजींच्या शिकवणुकीप्रमाणे – चांगलंच पाहावं. चांगलंच बोलावं आणि चांगलंच ऐकावं.

274] ‘टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही.’
कोणत्याही मोठ्या माणसाचं जीवन पाहा, त्यात सुरुवातीला कष्ट आणि हालच आढळतात. महात्मा गांधी, अब्राहम लिंकन यांना मोठेपणा काही आपोआपच प्राप्त झालं नाही. सोनं कसोटीला उतरण्यापूर्वी त्याला अग्निपरीक्षा द्यावी लागते. श्रम, साधना, सहनशीलता यांतूनच मोठेपण प्राप्त होतं.

275] प्रेम लाभे प्रेमळाला । त्याग ही त्याची कसोटी । (माधव ज्युलियन)
प्रेम द्यावं तेव्हा प्रेम मिळतं. प्रेमासाठी त्याग करावा लागतो. आई आपल्याला सर्वांत प्रिय असते कारण तिच्याइतका त्याग दुसरा कोणीच करीत नाही . समाजातदेखील आपण हेच पाहतो की, जो दुसऱ्यासाठी निरपेक्षपणे खपतो तो सर्वांना हवाहवासा वाटतो.

276] ‘जो माणूस चांगली पुस्तके वाचत नाही व ज्याला वाचताच येत नाही, ह्या दोघांत काही फरक नाही.’
लिहिता-वाचता येणे, हे तर एक साधन आहे. साधनाचा उपयोग साध्य प्राप्त करून घेण्यासाठी झाला पाहिजे. चांगली पुस्तके वाचली तर वाचता येण्याचे सार्थक आहे, अन्यथा वाचू शकणारा व न शकणारा दोघेही सारखेच.

277] ‘धर्माचे अंतरंग प्रेम तर बहिरंग परोपकार होय.’
प्रेमाने माणसे संपूर्ण सृष्टीशी जोडली जातात. प्रेमाच्या अस्तित्वाने सगळे संघर्ष गळून पडतात. प्रेम परिपक्व अवस्थेत आले की सहजीवन, सुसंवाद निर्माण होतो व प्रेमाचा हृदय अवतार परोपकारामध्ये होतो. म्हणजे धर्म या नाण्याचा धातू प्रेम असेल तर त्याच्या शिक्क्याच्या बाजू परोपकाराच्या आहेत .

278] ‘स्वतःला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा. इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा.’
स्वतःचे प्रामाणिकपणे मूल्यमापन करणे व दोष कमी करून गुणसंवर्धन करणे, याचा अर्थ स्वतःला जिंकणे होय. यासाठी कठोर चिकित्सा केली पाहिजे तर दुसऱ्यांना जिंकणे म्हणजे इतरांच्या दोषांकडे आईच्या दृष्टीने बघणे आणि गुणांकडे गुरूच्या दृष्टीने बघणे होय. यासाठी मोठ्या मनाची गरज असते.

279] ‘स्वतः तुम्ही उशिरा उठला म्हणून सूर्य उशिरा उगवणार नाही.’
काळ हा कोणासाठी थांबत नाही. जगातील सगळी चक्रे अव्याहतपणे स्वतःच्या गतीप्रमाणे चालूच असतात . आपण त्या गतीशी जुळवून घ्यायचे की नाही, हे आपल्यावर अवलंबून आहे. आपण या जगात अपरिहार्य असत नाही . आपण उशिरा जागे झालो तर आपली जागा कोणी अन्य व्यक्ती घेईल.

280] ‘शब्दात भाव असेल तर शब्दांना भाव मिळेल.’ उपदेशामागे अनुरूप आचरणाची तपश्चर्या असेल, त्यातील शब्दांमागे आत्मनिष्ठेने पाठबळ असेल तर त्या शब्दांना मंत्राक्षरांचे सामर्थ्य येते. शब्द केवळ ओठांतून न येता हृदयातून आले पाहिजेत.

✿ मराठी सुविचार । Marathi Suvichar

Marathi Suvichar

281] ‘अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा.’
अभ्यास म्हणजे सजगपणे एखादी शिकवण वारंवार उजळणे, अशा डोळस उजळणीतून चांगल्या गोष्टींचा जन्म होतो. अभ्यासाशिवाय भाग्योदय होणे अशक्यच आहे. अभ्यास ही उत्कर्षाची गुरुकिल्ली आहे.

282] ‘एकदा शिकवणे म्हणजे दोनदा शिकणे.’
एखादी गोष्ट दुसऱ्याला समजावून देण्यासाठी आधी आपल्याला समजणे आवश्यक व त्यानंतर दुसऱ्याला सांगताना तिची उजळणी झाल्याने दोनदा शिकण्याप्रमाणे होते. चांगला शिक्षक याच अर्थाने कायमचा विद्यार्थी असतो.

283] ‘संस्कारसंपन्न मुले ही देवाच्या चांगुलपणाची स्मिते आहेत.’
मुले ही मुग्ध कळ्यांप्रमाणेच असतात. ईश्वराच्या किमयेने कळ्या उमलतात व हसरे सौंदर्य जन्म घेते. मुलांचे उमलणे म्हणजेच सुसंस्कारित होणे होय. ईश्वरी चांगुलपणा मानवी जगात त्यांच्याद्वारेच अवतरतो.

284] ‘भीती ही नकारात्मक बाबींची अंधारकोठडी असते.’
भीतीच्या अवाजवी दडपणामुळे मनाला निराशावाद ग्रासून टाकतो. निराशेपोटी सुटकेचा कोणताच मार्ग दिसत नाही. नकाराची अंधारी कोठडी यामुळे भयग्रस्ताला कैदेत टाकते. यामुळे निर्भय बना.

285] ‘दुसऱ्यांना हसण्यापेक्षा दुसऱ्यांना हसविता आले पाहिजे.’
दुसऱ्यांना हसणे म्हणजे त्यांच्या कोणत्या तरी उणीवेला, व्यंगाला हसणे, हिणवणे होय. यातून दुसऱ्या माणसाचा आत्मविश्वास खचविण्याचा क्षुद्र प्रयत्न आपणाकडून होतो. याऐवजी दुसऱ्यांचे दुःख, ओझे त्याला हसवून प्रसन्न करून हलके करण्याचे देवदूताचे कार्य करावे.

286] ‘शिस्तीशिवाय जीवन म्हणजे सुकाणूशिवाय जहाज.’
जहाजाच्या उपयोगितेसाठी सुकाणू अपरिहार्य आहे. सुकाणूशिवाय जहाज दिशाहीनपणे भरकटते. अशा जहाजाचा प्रवाशाला उपयोगच काय? तद्वत शिस्त नसेल तर जगण्याचा उद्देश संपतो मग जीवन जगलो काय अन् न जगलो काय, एकच निरर्थक भटकंती.

287] ‘तुमच्या कार्यावर प्रेम करा, कार्यातील तुमच्यावर नको.’
कार्यावर प्रेम असल्याने तन्मयतेने कार्य करता येते. हे खूप चांगले परंतु कार्य करणाऱ्या निमित्ताप्रमाणे असलेल्या तुमच्यावर, तुमच्या अहंकारावर प्रेम करणे म्हणजे कार्यापेक्षा कार्यकर्ता मोठा व साध्यापेक्षा साधन मोठे महत्त्वाचे ठरेल हे कर्मयोगाच्या विपरीत आहे.

288] ‘आपल्यामधील एकही दोष लक्षात न येणे, हाच सर्वात मोठा दोष आहे.’
माणूस अपुरा असतो. तो परिपूर्ण नाही हेच सत्य आहे. प्रत्येकाचे कोणते तरी दोषस्थान असतेच हे ज्याला जाणवत नाही, तोच त्याचा मोठा दोष, अपुरेपणा ठरतो.

289] ‘घडावे असे वाटते पण घडत नाही, ते घडविण्याचे सामर्थ्य शिक्षणात असते.’
आपल्याला आदर्श माहीत असतात. ते आदर्श आपण अंगी बाणवावेत, असेही आपल्याला वाटते ; परंतु त्यासाठी कोणत्या दिशेने प्रयत्न करावेत, काय कष्ट घ्यावेत हे सांगण्याचे कार्य शिक्षणाचे असते .

290] ‘सज्जन म्हणून जन्माला येणे हा योगायोग, पण सज्जन म्हणून मरणे ही आयुष्यभराची कमाई होय.’
आपला जन्म कोणत्या घरात व्हावा, हे योगायोगानेच ठरेल, त्यामुळे आपल्याला सज्जनपणाचा वारसा मिळाला तर ते आपले सद्भाग्य असेल. परंतु संपूर्ण आयुष्यभर सतत विवेकपूर्ण जगणे, सज्जनपणे आयुष्य व्यतीत करणे व अंतिम घटकेलाही आपण सज्जन आहोत याची खात्री देता येणे म्हणजे सार्थ जगणे होय.

✿ मराठी सुविचार । Marathi Suvichar

Marathi Suvichar

291] ‘वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार व पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच.’
पिके पाण्याअभावी जळाल्यावर उशिरा पाऊस पडल्याचा काहीच फायदा नसतो. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष गरज असतांना योग्य विचार सुचला नाही तर ती वेळ व्यर्थ ठरते, अर्थशून्य ठरते. योग्य वेळी योग्य विचार सुचले पाहिजेत .

292] ‘चुका करीत नाही, जो काहीच करत नाही’
चुकाल तर शिकाल’ या उक्तीप्रमाणे वागल्यास चुकांचे भय वाटणार नाही पण काही माणसे चुका करण्यास घाबरतात व चुका होऊ नये यासाठी निष्क्रिय राहणे हेच त्यांना बरे वाटते. हे आळशाचे तत्त्वज्ञान ठरते.

293] ‘युद्धात निर्धार, औदार्य व शांततेत सदिच्छा हवी’
पराक्रमी, उमद्या व सत्प्रवृत्त माणसाची लक्षणे वेगवेगळ्या परिस्थितीत वरीलप्रमाणे दिसून येतात. संकटप्रसंगी ही माणसे निश्चियी तर यशस्वी झाल्यावर उदार होतात आणि एरवीच्या शांत दिनक्रमात त्यांच्या वागणुकीत सगळ्याविषयी चांगल्या भावना दिसतात.

294] ‘जो स्वतःला विसरतो, त्याला जग स्मरते, जो स्वतःला स्मरतो, त्याला जग विसरते.’
अहंभाव विसरुन जो सगळ्यांच्या सुख-दुःखांशी तन्मय होतो, त्याच्या हातूनअपार करुणेने जगदोद्धाराचे कार्य घडते. जग ही अशा मानवांना महात्मा म्हणून लक्षात ठेवते. परंतु केवळ स्वतःपुरतेच पाहणाऱ्या स्वार्थी माणसाला त्याचे आप्त विसरु पाहतात. तिथे जगाची काय कथा?

295] ‘अहंकार ही अज्ञानी माणसाची कुबडी असते.’
ज्याला काहीही ज्ञान नाही, कौशल्य नाही, मोठेपणा नाही, तो माणूस आपल्याला जगाने मोठे म्हणावे यासाठी खोट्या अहंकाराला फुलवतो. अहंकार अज्ञानातून निर्माण होतो व तो माणसाला पंगू बनवितो.

296] ‘जर तुम्हास मोठा पर्वत हलवायचा असेल तर आपल्या पायाशी धोंडे प्रथम हलवा.’
जग बदलायला आपल्यापासून सुरुवात करा. आपली ताकद मर्यादित असते आणि आपणही जगाचा भाग असतो. या दोहोंचा विचार केल्यास मोठ्या प्रयत्नांची सुरुवात आपल्यापासून करणे हाच सुज्ञपणा होय. छोट्या – छोळ्या गोष्टींनी मोठी गोष्ट साध्य होते.

297] ‘हृदयाने हृदयाला ओळखणे, हाच सर्वश्रेष्ठ धर्म होय.’
हे तर खऱ्या धर्माचे सार आहे. कारण भावनेला आपल्या जगण्यात पायाभूत असलेले दगड – स्थान आहे. सहभावाशिवाय आपले सहजीवन उभेच राहू शकत नाही. दोन माणसांना जोडणाऱ्या भावबंधनाचे नाव धर्म होय.

298] ‘कोणत्याही गोष्टीपूर्वी तयार होणे हे यशाचे रहस्य आहे’
तयार होणे म्हणजे मानसिक, बौद्धिक, भावनिक, शारिरीक या सर्व अंगांनी सिद्ध सज्ज होणे होय. एखाद्या समस्येला तोंड देण्यापूर्वी इतक्या व्यापक प्रमाणात तयारी केल्यास यश निश्चितपणे मिळेल.

299] ‘शांततेच्या काळात जितका जास्त घाम गाळाल, तितके कमी रक्त युद्धकाळात तुम्हाला सांडावे लागेल’.
घाम गाळणे म्हणजे सर्वांगांनी कष्टपूर्वक तयारी करणे, यामध्ये केवळ शिकणेच असते, हानी नाही. यानंतर प्रत्यक्ष संकटात आधीच्या अभ्यासाने इतके कौशल्य येईल की हानी कमीत कमी होईल.

300] ‘अपयशाची भीती ही सर्वांत मोठी भीती होय.’
अपयश एकवेळ परवडते. कारण ते काही कृतीनंतर येते व माणूस त्यातून धडे घेतो, पण अपयश येण्याआधीच त्याची भीती वाटणे म्हणजे कृतिशीलतेवर, सर्जकतेवरच घाला घालणे होय. हे अतिशय वाईट आहे. ज्याचा आत्मविश्वास संपला त्याचे सारे काही संपले.

✿ मराठी सुविचार । Marathi Suvichar

Marathi Suvichar

301] ‘मनुष्याचे मन हे पॅरॅशूटसारखे आहे, ते उघडे केले तरच कार्य प्रवण होते.’
पॅरॅशूट बंद असताना नव्हे तर उघडे झाल्यावरच आपले नियोजित कार्य करते. मानवी मनही आपल्या पूर्ण शक्यतांसह वापरले तरच आपल्या नियोजित कार्यामध्ये समग्रतेने ठोस होऊ शकते.

302] ‘दया ही अशी भाषा आहे की जी बहिऱ्याला ऐकू येते आणि मुक्यालाही समजू शकते.’
दयेच्या भावनेमध्ये अनुभूतिच प्रमुख असते, शब्द हे अतिशय गौण असतात. त्यामुळे लौकिक भाषेतील समजण्याच्या मार्गातले अडथळे, दयेच्या भाषेत येत नाहीत. दया ही वैश्विक भाषा आहे.

303] ‘माणसाची निम्मी अधिक शक्ती त्याच्या आनंदी वृत्तीतच सामावली आहे.’
साखरेचे खाणार त्याला देव देणार, या म्हणीप्रमाणे माणसाला आपल्या शक्तीचा, मिळणाऱ्या यशाचा खरा उगम आपल्या आनंदीपणात, प्रसन्नतेत आहे, याचा अनुभव येतो. आनंदी वृत्तीसारखी ऊर्जा नाही.

काय शिकलात?

आज आपण 300+ सुंदर मराठी सुविचार । Marathi Suvichar एकाच पोस्ट मध्ये पाहिलं. शेवटपर्यंत हे सुविचार वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Comment