Marathi Vakprachar Arth, Vakyat Upyog । वाक्यप्रचारांचे अर्थ व वाक्यात उपयोग

हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठींगूरू वेबसाईट मध्ये. आज मी तुम्हाला २०० Marathi Vakprachar Arth, Vakyat Upyog । वाक्यप्रचारांचे अर्थ व वाक्यात उपयोग सांगणार आहे ते खालील प्रमाणे.

Marathi Vakprachar Arth, Vakyat Upyog । वाक्यप्रचारांचे अर्थ व वाक्यात उपयोग

(१) अजरामर होणे -अर्थ : कायमस्वरूपी टिकणे.
वाक्य : क्रांतिकारकांचे नाव भारताच्या इतिहासात अजरामर झाले आहे.

(२) अप्रूप वाटणे-अर्थ : आश्चर्य किंवा कौतुक वाटणे.
वाक्य : लहानगी मुग्धा जेव्हा शास्त्रीय संगीत गाते, तेव्हा श्रोत्यांना तिचे अप्रूप वाटते.

(३) अपूर्व योग येणे-अर्थ : दुर्मीळ योग येणे.
वाक्य : सूर्यग्रहण व चंद्रग्रहण एकाच दिवशी होण्याचा अपूर्व योग आला.

(४) अभंग असणे-अर्थ : एकसंध, अखंड असणे.
वाक्य : कितीही संकटे आली, तरी भारतीयांची एकात्मता अभंग राहील.

(५) अभिलाषा धरणे-अर्थ : एखादया गोष्टीची इच्छा बाळगणे.
वाक्य : आपल्या आवाक्यात नसलेल्या गोष्टीची अभिलाषा धरणे चांगले नाही.

(६) अमलात आणणे-अर्थ : कारवाई करणे.
वाक्य : माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय अमलात आणला.

(७) अवाक् होणे-अर्थ : आश्चर्यचकित होणे.
वाक्य : अचानक उमटलेले इंद्रधनुष्य पाहून सर्व अवाक् झाले.

(८) अंगावर काटा येणे-अर्थ : खूप भीती वाटणे.
वाक्य : समोर वाघ पाहताच दामूच्या अंगावर काटा आला.

(९) अंगी बाणणे-अर्थ : मनात खोलवर रुजणे.
वाक्य : चांगल्या सवयी अंगी बाणल्या पाहिजेत.

(१०) आड येणे-अर्थ : अडथळा निर्माण करणे.
वाक्य : चांगल्या कार्याच्या जो आड येतो तो माणूस वाईट वृत्तीचा असतो.

(११) आडवे होणे-अर्थ : झोपणे.
वाक्य : खूप काम केल्यावर आई दुपारी जरा आडवी होते.

(१२) आडाखे बांधणे-अर्थ : मनात आराखडा किंवा अंदाज करणे.
वाक्य : जमीन घेतल्यावर घर कसे बांधायचे, याचे महेशने मनाशी आडाखे बांधले.

(१३) आत्मसात करणे-अर्थ : मिळवणे, अंगात मुरवणे.
वाक्य : मुग्धाने बालवयातच संगीतातील सर्व राग आत्मसात केले.

(१४) आयोजित करणे-अर्थ : व्यवस्था करणे.
वाक्य : नववीच्या विद्यार्थ्यांनी शालान्त परीक्षेस बसणाऱ्या विदयार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित केला.

(१५) आवर्जून पाहणे-अर्थ : मुद्दामहून पाहणे.
वाक्य : मुंबईमधले प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम आवर्जून पाहावे असे आहे.

(१६) ओक्साबोक्शी रडणे-अर्थ : मोठ्याने आवाज करत रडणे.
वाक्य : सतीश नापास झाला, तेव्हा तो ओक्साबोक्शी रडला.

(१७) ओढ असणे-अर्थ : आस असणे, आवड असणे.
वाक्य : शेवंताला फुलांची खूप ओढ आहे.

(१८) ओढा असणे-अर्थ : कल असणे, आवड असणे.
वाक्य : रमेशचा लहानपणापासून चित्रे काढण्याकडे ओढा होता.

(१९) उत्पात करणे-अर्थ : विध्वंस करणे.
वाक्य : दहशतवादयांनी मुंबईवर हल्ला करून उत्पात केला.

(२०) उद्ध्वस्त करणे-अर्थ : नष्ट करणे.
वाक्य : भारतीय सेनेने शQची सर्व ठाणी उद्ध्वस्त केली.

(२१) उदास होणे-अर्थ : खिन्न होणे.
वाक्य : सहलीला जायला मिळाले नाही; म्हणून मिताली उदास झाली.

(२२) उपरती होणे-अर्थ : पश्चात्ताप वाटणे.
वाक्य : अभ्यास न करता दिवाळीची सुट्टी खेळण्यात फुकट घालवली याची मनोजला उपरती झाली.

(२३) उपोषण करणे-अर्थ : लंघन करणे, उपाशी राहणे.
वाक्य : आपल्या रास्त मागण्यांसाठी गिरणीतील कामगारांनी उपोषण केले.

(२४) उंडारणे-अर्थ : बागडणे, हुंदडणे.
वाक्य : माळरानावरील हिरवे गवत पाहून वासरे उंडारली.

(२५) कटाक्ष असणे-अर्थ : कल असणे, भर असणे, जोर असणे.
वाक्य : छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळ्यांमध्ये जिद्द निर्माण करण्यावर कटाक्ष होता.

(२६) कणव असणे-अर्थ : आस्था किंवा करुणा असणे.
वाक्य : मदर तेरेसा यांना गरिबांची कणव होती.

(२७) कणीक तिंबणे-अर्थ : बदडून काढणे, चोप देणे.
वाक्य : काल पकडलेल्या चोराची पोलिसांनी रात्रभर चांगलीच कणीक तिंबली.

(२८) कस लावणे-अर्थ : सत्त्व किंवा सामर्थ्य पणाला लावणे.
वाक्य : हिंदकेसरी होण्यासाठी बापू पहेलवानाने प्रत्येक कुस्तीत आपला कस लावला.

(२९) कसून मेहनत करणे-अर्थ : खूप नेटाने कष्ट करणे.
वाक्य : शालान्त परीक्षेत पहिले येण्यासाठी मधुराने कसून मेहनत केली.

(३०) कहर करणे-अर्थ : अतिरेक करणे.
वाक्य : एके दिवशी मुलांनी वर्गात गोंधळाचा कहर केला.

(३१) कापरे सुटणे-अर्थ : घाबरल्यामुळे थरथरणे.
वाक्य : अचानक समोर आलेला वाघ पाहून नथुरामच्या अंगाला कापरे सुटले.

(३२) कारवाया करणे-अर्थ : कारस्थाने करणे, कट करणे.
वाक्य : सोयराबाईंनी अष्टप्रधान मंडळाला हाताशी धरून संभाजीराजांच्या विरुद्ध कारवाया केल्या.

(३३) काळजी घेणे-अर्थ : चिंता वाहणे, आस्था असणे.
वाक्य : राजू आजारी पडल्यामुळे आईने त्याची खूप काळजी घेतली.

(३४) काळ्या पाण्याची शिक्षा-अर्थ : मरेपर्यंत कैद होणे.
वाक्य : इंग्रज सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली होती.

(३५) किरकिर करणे-अर्थ : एखादया गोष्टीबाबत सतत तक्रार करणे.
वाक्य : मालकापाशी मजूर ‘पगार कमी आहे’ म्हणून किरकिर करतात.

(३६) कोडकौतुक होणे-अर्थ : लाड होणे, शाबासकी मिळणे.
वाक्य : सौंदर्यस्पर्धेत प्रथम आलेल्या मधुराचे गावात कोडकौतुक झाले.

(३७) कंपित होणे-अर्थ : थरथरणे, कापणे.
वाक्य : अपरात्री जंगलातून जाताना रामभाऊंचे शरीर भीतीने कंपित झाले.

(३८) खपणे-अर्थ : कष्ट करणे.
वाक्य : चांगले पीक काढण्यासाठी शेतकरी दिवसभर शेतात खपतात.

(३९) खळखळ करणे-अर्थ : नाखुशीने सतत नकार देणे, टाळाटाळ करणे.
वाक्य : ताटात कारल्याची भाजी वाढली की, मोहन आईपाशी खळखळ करतो.

(४०) खंड न पडणे-अर्थ : एखादे कार्य करताना मध्ये न थांबणे.
वाक्य : नित्यनेमाने देवपूजा करण्यात आजीचा कधीही खंड पडला नाही.

(४१) गट्टी जमणे-अर्थ : दोस्ती होणे.
वाक्य : गावी आलेल्या मालूची गावातल्या शालूशी चांगली गट्टी जमली.

(४२) गढून जाणे-अर्थ : मग्न होणे, गुंग होणे.
वाक्य : सुदेश चित्र काढण्यात नेहमी गढून जातो.

(४३) ग्राह्य धरणे-अर्थ : योग्य आहे असे समजणे.
वाक्य : भूदान चळवळीबाबतचे पूज्य विनोबाजींचे मत जनतेने ग्राह्य धरले.

(४४) गाडी अडणे-अर्थ : खोळंबा होणे, अडथळा येणे.
वाक्य : भाषण देताना दोन-तीन वाक्यांनंतर राजेशची गाडी अडली.

(४५) गाण्याला धार येणे-अर्थ : गाणे उत्कृष्ट होणे.
वाक्य : जीव ओतून गायल्यामुळे लतादीदींच्या गाण्याला धार आली.

(४६) गुण्यागोविंदाने राहणे-अर्थ : प्रेमाने एकत्र राहणे.
वाक्य : शीला व मीना एकमेकांच्या विरुद्ध स्वभावाच्या असूनही घरात गुण्यागोविंदाने राहतात.

(४७) गुमान काम करणे-अर्थ : निमूटपणे काम करणे.
वाक्य : मालकाने सांगावे व नोकराने गुमान काम करावे अशी पूर्वीची पद्धत होती.

(४८) घोकंपट्टी करणे-अर्थ : अर्थ लक्षात न घेता केवळ पाठांतर करणे.
वाक्य : धडा नेहमी समजून घ्यावा; उगाच घोकंपट्टी करण्यात काय अर्थ आहे?

(४९) चक्कर मारणे-अर्थ : फेरफटका मारणे.
वाक्य : नानाकाका दररोज सकाळी बागेमध्ये चक्कर मारतात.

(५०) चाहूल लागणे-अर्थ : कानोसा लागणे, लक्षात येणे.
वाक्य : आपल्यामागे कोणीतरी चालत आहे, याची सुरेंद्रला चाहूल लागली.

(५१) चिल्लेपिल्ले वाऱ्यावर सोडणे-अर्थ : अनाथ करणे, पोरके करणे.
वाक्य : गेल्या वर्षी चिल्लेपिल्ले वाऱ्यावर सोडून पांडूतात्या स्वर्गवासी झाले.

(५२) चेहरा खुलणे-अर्थ : आनंद होणे.
वाक्य : बाबांच्या हातातील खाऊ पाहताच लहानग्या अमिताचा चेहरा खुलला.

(५३) छातीत धस्स होणे-अर्थ : अचानक खूप घाबरणे.
वाक्य : जंगलातून प्रवास करताना समोर आलेला वाघ पाहून शंतनूच्या छातीत धस्स झाले.

(५४) छाननी करणे-अर्थ : तपास करणे.
वाक्य : अतिरेकी कोणत्या जागी लपले आहेत, याची पोलिसांनी प्रथम छाननी केली.

(५५) जखडून ठेवणे-अर्थ : बांधून ठेवणे.
वाक्य : परीक्षा जवळ आल्यामुळे नीताने स्वत:ला पुस्तकांशी जखडून ठेवले.

(५६) जम बसणे-अर्थ : स्थिर होणे, बस्तान बसणे.
वाक्य : दोन वर्षे मंदीत गेल्यावर महिपतरावांचा आता व्यापारात जम बसला.

(५७) जलमय होणे-अर्थ : पाण्यात पूर्णपणे बुडून जाणे.
वाक्य : नदीच्या पुराने सबंध गाव जलमय झाले होते.

(५८) जागरूक राहणे-अर्थ : सतर्क राहणे, सावध राहणे.
वाक्य : सीमेवर भारतीय सैन्य नेहमी जागरूक राहते.

(५९) जागृत होणे-अर्थ : जागे होणे.
वाक्य : अंधश्रद्धेविरुद्ध सारा समाज जागृत व्हायला हवा.

(६०) झुंज देणे-अर्थ : लढा देणे, संघर्ष करणे.
वाक्य : भारतीय सेनेने शत्रूच्या सैन्याशी कडवी झुंज दिली.

(६१) टिकाव लागणे-अर्थ : निभाव लागणे, तगून राहणे.
वाक्य : बंडोपंतांच्या बुद्धिबळ खेळण्याच्या चातुर्यापुढे कोणाचा टिकाव लागेल बरे!

(६२) ठसा उमटवणे-अर्थ : छाप पाडणे.
वाक्य : प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी आपल्या भाषणाचा श्रोत्यांवर ठसा उमटवला.

(६३) ठाण मांडणे-अर्थ : एका जागेवर बसून राहणे.
वाक्य : कंपनीच्या दरवाजावर संपकऱ्यांनी ठाण मांडले.

(६४) ठासून भरणे-अर्थ : गच्च कोंबून भरणे.
वाक्य : गावाला जाताना पांडूने सगळे सामान ट्रंकेमध्ये ठासून भरले.

(६५) डाव येणे-अर्थ : खेळात राज्य येणे.
वाक्य : लपाछपी खेळताना चंदूवर पहिल्यांदा डाव आला.

(६६) डोक्यात वीज चमकणे-अर्थ : पटकन समजणे.
वाक्य : रतनला कठीण गणित सुटत नव्हते; पण एका क्षणाला त्याच्याडोक्यात वीज चमकली.

(६७) डोळ्याला डोळा न भिडवणे-अर्थ : घाबरून नजर न देणे.
वाक्य : उशिरा घरी आलेल्या समीरने बाबांच्या डोळ्याला डोळा भिडवला नाही.

(६८) डोळ्यांत तेल घालून राहणे-अर्थ : सावध राहणे.
वाक्य : भारतीय सैन्य सीमेवर डोळ्यांत तेल घालून पहारा करते.

(६९) डोळ्यांत धारा लागणे-अर्थ : अश्रू वाहणे, रडणे.
वाक्य : विठ्ठलाच्या मूर्तीचे दर्शन घेताना भक्तिभावाने रामरावांच्या डोळ्यांत धारा लागल्या.

(७०) डोळे फिरणे-अर्थ : खूप घाबरणे.
वाक्य : आकाशपाळणा वरून खाली येताना त्यात बसलेल्या लहानग्या भूमिकाचे डोळे फिरले.

(७१) ताटकळत उभे राहणे-अर्थ : वाट पाहणे.
वाक्य : मेघा येणार म्हणून मिता झाडाखाली ताटकळत उभी राहिली.

(७२) तारांबळ होणे-अर्थ : घाईगडबड उडणे.
वाक्य : भलेमोठे सामान घेऊन गाडी पकडताना महादूची तारांबळ झाली.

(७३) तोंड देणे-अर्थ : मुकाबला करणे, सामना करणे.
वाक्य : यंदा गावकऱ्यांनी दुष्काळाला समर्थपणे तोंड दिले.

(७४) तोंड वेगाडून पाहणे-अर्थ : तोंड वाकडे करून अजिजीने पाहणे, वाकुल्या दाखवणे.
वाक्य : मोटारीतून उतरणाऱ्या प्रत्येकाकडे भिकारी तोंड वेगाडून पाहत भिक्षा मागत होता.

(७५) तोंडून अक्षर न फुटणे-अर्थ : घाबरून न बोलणे.
वाक्य : बाबांनी हातात छडी घेताच लहानग्या मयूरच्या तोंडून अक्षर फुटले नाही.

(७६) दडी मारणे-अर्थ : लपून राहणे.
वाक्य : जून महिना उलटून गेला, तरी अजून पावसाने दडी मारली होती.

(७७) दप्तरी दाखल होणे-अर्थ : संग्रही जमा होणे.
वाक्य : युरोप दौऱ्यातील सर्व छायाचित्रे सुधाकरच्या दप्तरी दाखल झाली.

(७८) दरारा वाटणे-अर्थ : वचक असणे.
वाक्य : मोगलांच्या सैन्याला मावळ्यांचा दरारा वाटायचा.

(७९) दिशा फुटेल तिकडे पळणे-अर्थ : सैरावैरा पळणे.
वाक्य : वाघाची चाहूल लागताच रानातली हरिणे दिशा फुटेल तिकडे पळतात.

(८०) दिस बुडून जाणे-अर्थ : सूर्य मावळणे.
वाक्य : दिस बुडून गेल्यावर आजीने देवापुढे दिवा लावला.

(८१) दुमदुमून जाणे-अर्थ : निनादून जाणे.
वाक्य : आषाढी एकादशीला पंढरपूरचा परिसर विठ्ठलभक्तांच्या गजराने दुमदुमून जातो.

(८२) देखभाल करणे-अर्थ : जतन करणे, सांभाळणे.
वाक्य : पोरक्या सुभान्याची त्याच्या मावशीने स्वत:च्या मुलासारखी देखभाल केली.

(८३) देखरेख करणे-अर्थ : राखण करणे.
वाक्य : बंगल्याची देखरेख करण्यासाठी कुणालबापूंनी एक दारवान नेमला.

(८४) देहातून प्राण जाणे-अर्थ : मरण येणे.
वाक्य : ‘हे राम’ असे उद्गार निघाले आणि महात्माजींच्या देहातून प्राण निघून गेले.

(८५) धडपड करणे-अर्थ : खूप कष्ट करणे.
वाक्य : पोट भरण्यासाठी महादू दिवसभर काही ना काही धडपड करतो.

(८६) धडा घेणे-अर्थ : एखादया उदाहरणावरून आपल्या वागण्यात योग्य तो बदल करणे.
वाक्य : थोर पुरुषांच्या चरित्रांपासून चांगले धडे घ्यावेत.

(८७) धन्य होणे-अर्थ : कृतार्थ होणे, कृतकृत्य होणे.
वाक्य : मुलाचे उज्ज्वल यश पाहून यशोदाबाई धन्य झाल्या.

(८८) धास्ती घेणे-अर्थ : धसका घेणे, घाबरणे.
वाक्य : एकदा पाय घसरून पडल्यामुळे मथुराबाईंनी अंधारात जाण्याची धास्ती घेतली.

(८९) धुडगूस घालणे-अर्थ : गोंधळ करणे.
वाक्य : वर्गात शिक्षक आले नाहीत, तेव्हा मुलांनी धुडगूस घातला.

(९०) धूम ठोकणे-अर्थ : जोराने पळून जाणे.
वाक्य : पानांची सळसळ होताच झाडीतल्या भित्र्या सशाने धूम ठोकली.

(९१) नजर वाकडी करणे-अर्थ : वाईट हेतू बाळगणे.
वाक्य : आपल्या देशावर कोणी वाकडी नजर केली, तर त्यांना आपण खडे चारू,

(९२) नवल वाटणे-अर्थ : आश्चर्य वाटणे.
वाक्य : सर्कशीत हत्ती स्टुलावर उभा राहिलेला पाहून लहानग्या शशीला नवल वाटले.

(९३) नाव कमावणे-अर्थ : कीर्ती मिळवणे.
वाक्य : सुचित्राने पायलट होऊन मोठे नाव कमावले.

(९४) नाव मिळवणे-अर्थ : कीर्ती मिळवणे.
वाक्य : थोडक्या काळातच सानिया मिर्झने टेनिस खेळात नाव मिळवले.

(९५) नाळ तोडणे-अर्थ : संबंध तोडणे.
वाक्य : सुदेश परदेशी गेला आणि त्याने भारतीय संस्कृतीशी असलेली नाळ तोडली.

(९६) निद्राधीन होणे-अर्थ : झोपणे.
वाक्य : बिछान्यावर पडल्या पडल्या गंपू पटकन निद्राधीन झाला.

(९७) निर्भय होणे-अर्थ : निडर होणे.
वाक्य : संकटावर मात करायची असेल, तर प्रत्येकाने निर्भय व्हायला हवे.

(९८) निवास करणे-अर्थ : एखादया ठिकाणी राहणे.
वाक्य : साईभक्त शिर्डीमध्ये नेहमी निवास करतात.

(९९) पदरी घेणे-अर्थ : स्वीकार करणे.
वाक्य : पतीचे निधन झाल्यावर पार्वतीबाईंनी एकाकीपणाचे सर्व दुःख पदरी घेतले.

(१००) परिपाठ असणे-अर्थ : विशिष्ट पद्धत असणे, नित्यक्रम असणे.
वाक्य : पहाटे दोन किलोमीटर चालण्याचा रामभाऊंचा परिपाठ आहे.

(१०१) परिसीमा गाठणे-अर्थ : शेवटची हद्द गाठणे, पराकोटीला जाणे.
वाक्य : टी-20 मध्ये विश्वचषक जिंकून भारतीय संघाने विजयाची परिसीमा गाठली.

(१०२) पसंती मिळणे-अर्थ : अनुकूलता लाभणे.
वाक्य : सुरेशने व सुदीपने मिळून केलेल्या प्रकल्पाला विज्ञान प्रदर्शनात पहिल्या क्रमांकाची पसंती मिळाली.

(१०३) पहारा देणे-अर्थ : राखण करणे.
वाक्य : भारतीय सैनिक सीमेवर रात्रंदिवस कडक पहारा देतात.

(१०४) प्रघात पडणे-अर्थ : पद्धत पडणे, रीत असणे.
वाक्य : खंडोबाच्या देवळात भंडारा उधळण्याचा प्रघात पडला आहे.

(१०५) प्रचंड कृतज्ञता असणे-अर्थ : उपकाराची खूप जाणीव असणे.
वाक्य : भारतीय स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांविषयी भारतीयांना प्रचंड कृतज्ञता आहे.

(१०६) प्रचारात आणणे-अर्थ : जाहीरपणे माहिती देणे.
वाक्य : पाच वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनाने संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान मोहीम प्रचारात आणली.

(१०७) प्रत्यय येणे-अर्थ : प्रचीती येणे, लक्षात येणे.
वाक्य : आषाढी एकादशीला भक्तांच्या विठ्ठलभक्तीचा प्रत्यय येतो.

(१०८) प्रतिकार करणे-अर्थ : विरोध करणे.
वाक्य : समुद्राकाठी सहलीला जायच्या कल्पनेला बाबांनी प्रतिकार केला.

(१०९) प्रतिष्ठा लाभणे-अर्थ : मान मिळणे, मोठेपणा मिळणे.
वाक्य : समाजकार्य करणाऱ्या बापूरावांना गावात मोठी प्रतिष्ठा लाभली होती.

(११०) प्रतिष्ठापित करणे-अर्थ : स्थापना करणे.
वाक्य : विनायकी चतुर्थीला श्रीगणेशाची मूर्ती आम्ही घरात प्रतिष्ठापित केली.

(१११) प्रभावित होणे-अर्थ : छाप पडणे.
वाक्य : महात्मा गांधीजींचे महान देशकार्य पाहून विनोबा भावे प्रभावित झाले.

(११२) प्रस्ताव ठेवणे-अर्थ : ठराव मांडणे.
वाक्य : घरातल्या मंडळीपुढे आजीने कायमचे गावी राहण्याचा प्रस्ताव ठेवला.

(११३) प्रक्षेपित करणे-अर्थ : प्रसारित करणे.
वाक्य : बॉम्बस्फोटाच्या सर्व बातम्या दूरदर्शनने प्रक्षेपित केल्या.

(११४) प्राणाला मुकणे-अर्थ : जीव जाणे, मरण येणे,
वाक्य : नदीला आलेल्या पुरामध्ये बरीचशी जनावरे प्राणाला मुकली.

(११५) प्राप्त करणे-अर्थ : मिळवणे.
वाक्य : वार्षिक परीक्षेत मेघनाने नव्वद टक्के गुण प्राप्त केले.

(११६) प्रेरणा मिळणे-अर्थ : स्फूर्ती मिळणे.
वाक्य : महात्मा गांधीजींकडून साने गुरुजींना समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळाली.

(११७) पाठिंबा देणे-अर्थ : दुजोरा देणे.
वाक्य : माथेरानला सहलीला जाण्याच्या गुरुजींच्या कल्पनेला मुलांनी पाठिंबा दिला.

(११८) पार पाडणे-अर्थ : सांगता करणे, संपवणे, संपन्न होणे.
वाक्य : गेले दोन दिवस चाललेला क्रीडा महोत्सव आज आनंदात पार पडला.

(११९) पाळी येणे-अर्थ : वेळ येणे.
वाक्य : रांगेत उभे असलेल्या पांडोबाची दोन तासांनी डॉक्टरकडे जाण्याची पाळी आली.

(१२०) पुढाकार घेणे-अर्थ : नेतृत्व करणे.
वाक्य : कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ‘रयत शिक्षण संस्थे’चे जाळे पसरण्यात पुढाकार घेतला.

(१२१) फंदात न पडणे-अर्थ : भानगडीत न अडकणे.
वाक्य : भांडण होऊनही सदू आणि महादू कोर्ट कचेरीच्या फंदात पडले नाहीत.

(१२२) फिदा होणे-अर्थ : खूश होणे.
वाक्य : नयनाने काढलेले चित्र पाहून तिची मावशी तिच्यावर फिदा झाली.

(१२३) बडेजाव वाढवणे-अर्थ : प्रौढी मिरवणे.
वाक्य : काही लोक उगाचच स्वत:चा बडेजाव वाढवतात.

(१२४) बत्तरबाळ्या होणे-अर्थ : चिंध्या होणे, नासधूस होणे.
वाक्य : चिमीसाठी आणलेल्या नवीन फ्रॉकचा उंदराने कुरतडून अगदी बत्तरबाळ्या केला.

(१२५) बहिष्कार टाकणे-अर्थ : वाळीत टाकणे, नकार देणे.
वाक्य : स्वातंत्र्य चळवळीत भारतीय जनतेने परदेशी कापडावर बहिष्कार टाकला.

(१२६) बावरणे-अर्थ : गांगरणे, गोंधळणे.
वाक्य : नाटकात प्रथमच भूमिका करताना सई थोडीशी बावरली.

(१२७) बाहू स्फुरण पावणे-अर्थ : स्फूर्ती येणे.
वाक्य : आखाड्यात दुसरा पहेलवान येताच दामू पहेलवानाचे बाहू स्फुरण पावू लागले.

(१२८) बांधणी करणे-अर्थ : रचना करणे.
वाक्य : नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या सैन्याची योग्य बांधणी केली होती.

(१२९) बेत आखणे-अर्थ : योजना आखणे.
वाक्य : उन्हाळ्याच्या सुट्टीत बाबांनी महाबळेश्वरला जाण्याचा बेत आखला.

(१३०) बेत करणे-अर्थ : योजना आखणे.
वाक्य : नरवीर तानाजीने आपल्या मावळ्यांसह कोंढाणा सर करण्याचा बेत केला.

(१३१) भडभडून येणे-अर्थ : हुंदके देणे, गलबलणे.
वाक्य : मुलाचा अपघात झाला, हे कळताच शीलाताईंना भडभडून आले.

(१३२) भरडून जाणे-अर्थ : एखादया कामाने त्रासणे, पिचून जाणे.
वाक्य : लग्नसोहळ्याच्या कामामध्ये काका पार भरडून गेले.

(१३३) भरभराट होणे-अर्थ : प्रगती होणे, समृद्धी येणे.
वाक्य : गेल्या वर्षी पाऊस व्यवस्थित पडल्यामुळे धनधान्याची भरभराट झाली होती.

(१३४) भरारी मारणे-अर्थ : झेप घेणे.
वाक्य : पिलू मोठे झाले की घरट्यामधून आकाशात भरारी मारते.

(१३५) भ्रमण करणे-अर्थ : भटकंती करणे.
वाक्य : मुंबईत नव्याने आलेला गोविंदा दिवसभर भ्रमण करत होता.

(१३६) भान ठेवणे-अर्थ : जाणीव ठेवणे.
वाक्य : दुःखात साथ करणाऱ्या उपकारकर्त्याचे माणसाने नेहमी भान ठेवावे.

(१३७) भानगडीत न पडणे-अर्थ : घोटाळ्यात न पडणे.
वाक्य : सज्जन माणसे कोणाच्याही भानगडीत पडत नाहीत.

(१३८) भावनेचे भरते येणे-अर्थ : मन भावनेने उचंबळणे.
वाक्य : माथेरानचा निसर्ग पाहून मिताला भावनेचे भरते आले.

(१३९) भावपूर्ण श्रद्धांजली वाहणे-अर्थ : पूज्यभावाने स्मरण करणे.
वाक्य : अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांना जनतेने भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

(१४०) मती गुंग होणे-अर्थ : आश्चर्य वाटणे.
वाक्य : सर्कशीत धावत्या घोड्यावर उडी मारून उभा राहिलेला विदूषक पाहून प्रेक्षकांची मती गुंग झाली.

(१४१) मनावर बिंबवणे-अर्थ : मनावर ठसवणे.
वाक्य : दररोज सकाळी व्यायाम करायला पाहिजे, ही गोष्ट काकांनी अमरच्या मनावर बिंबवली.

(१४२) मागमूस नसणे-अर्थ : थांगपत्ता नसणे, नामोनिशाणी न राहणे.
वाक्य : यंदा जून महिना उलटला, तरी पावसाचा मागमूस नव्हता.

(१४३) मात करणे-अर्थ : विजय मिळवणे.
वाक्य : भारतीय क्रिकेट संघाने कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघावर मात केली.

(१४४) मान्यता पावणे-अर्थ : प्रसिद्ध होणे.
वाक्य : गेली दहा वर्षे आमची शाळा पूर्ण जिल्ह्यात मान्यता पावत आहे.

(१४५) मुखोद्गत असणे-अर्थ : तोंडपाठ असणे.
वाक्य : लहानग्या राजूला मारुती स्तोत्र मुखोद्गत होते.

(१४६) मुभा असणे-अर्थ : परवानगी असणे.
वाक्य : चार तास अभ्यास केल्यानंतर मयूरला एक तास खेळण्याची मुभा होती.

(१४७) मोहाला बळी पडणे-अर्थ : एखादया गोष्टीच्या आसक्तीमध्ये वाहून जाणे.
वाक्य : मधुमेह असूनही गौतमराव लाडू खाण्याच्या मोहाला बळी पडले.

(१४८) यक्षप्रश्न असणे-अर्थ : महत्त्वाची गोष्ट असणे.
वाक्य : सध्या जगापुढे दहशतवाद निपटून काढण्याचा यक्षप्रश्न आहे.

(१४९) रवाना होणे-अर्थ : निघून जाणे.
वाक्य : पुण्याला आलेली आत्या दुसऱ्या दिवशी पंढरपूरला रवाना झाली.

(१५०) रस असणे-अर्थ : अत्यंत आवड असणे.
वाक्य : तुषारला चित्रकलेत खूप रस आहे.

(१५१) रक्षण करणे-अर्थ : राखण करणे.
वाक्य : आमचा टॉमी रात्रीच्या वेळी आमच्या बंगल्याचे रक्षण करतो.

(१५२) राबता असणे-अर्थ : (लोकांची) सतत ये-जा असणे.
वाक्य : संत तुकाराम-बीजेच्या दिवशी महिपतरावांच्या वाड्यावर लोकांचा राबता असतो.

(१५३) रियाज करणे-अर्थ : सराव करणे.
वाक्य : प्रथमेश दररोज पहाटे उठून गाण्याचा रियाज करतो.

(१५४) रुची निर्माण होणे-अर्थ : गोडी उत्पन्न होणे, आवड निर्माण होणे.
वाक्य : सरिताला हळूहळू शास्त्रीय संगीतात रुची निर्माण झाली.

(१५५) रोष ठेवणे-अर्थ : चीड येणे, नाराजी असणे.
वाक्य : माणसाने दुसऱ्यांबद्दल मनात रोष ठेवणे चांगले नाही.

(१५६) ललकारी देणे-अर्थ : जयघोष करणे.
वाक्य : पूर्वी राजा दरबारात येताना भालदार-चोपदार ललकारी देत असत.

(१५७) लवलेश नसणे-अर्थ : जराही पत्ता नसणे, जराही न उरणे.
वाक्य : चोरी करताना पकडल्यावरही महादूच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा लवलेश नव्हता.

(१५८) लवून मुजरा करणे-अर्थ : कमरेत वाकून अभिवादन करणे.
वाक्य : दरबारात येताच तानाजी मालुसऱ्यांनी महाराजांना लवून मुजरा केला.

(१५९) लांच्छनास्पद असणे-अर्थ : लाजिरवाणे असणे.
वाक्य : आईवडिलांना मान न देणे, हे लांच्छनास्पद आहे.

(१६०) वजन पडणे-अर्थ : प्रभाव पडणे.
वाक्य : आपण इतके ज्ञान कमवावे की, आपल्या ज्ञानाचे समाजात वजन पडले पाहिजे.

(१६१) वणवण करणे-अर्थ : खूप भटकणे.
वाक्य : महादू पोटासाठी दिवसभर वणवण करतो.

(१६२) वर्दी देणे-अर्थ : खबर देणे.
वाक्य : शिक्षणाधिकारी शाळेत आल्याची वदी शिपायाने मुख्याध्यापकांना दिली.

(१६३) वरदान देणे-अर्थ: कृपाशीर्वाद देणे,
वाक्य : देवाने आशाताई भोसले यांना सुंदर गळ्याचे वरदान दिले आहे.

(१६४) वंचित राहणे-अर्थ : एखादी गोष्ट न मिळणे,
वाक्य : आदिवासी लोक अजूनही प्राथमिक गरजांपासून वंचित राहिले आहेत.

(१६५) व्रत घेणे-अर्थ : वसा घेणे,
वाक्य : स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मायभूमीला स्वतंत्र करण्याचे व्रत घेतले होते.

(१६६) वाट तुडवणे-अर्थ : रस्ता कापणे, खूप चालत राहणे,
वाक्य : प्रवाशांनी रात्रभर जंगलातली वाट तुडवली.

(१६७) वारसा देणे-अर्थ : ( वडिलोपार्जित) हक्क सोपवणे,
वाक्य : प्राचीन भारतीय संस्कृतीने आपल्याला शांतीचा वारसा दिला आहे.

(१६८) विरस होणे-अर्थ : निराशा होणे, उत्साहभंग होणे,
वाक्य : सहलीला जायला मिळाले नाही; म्हणून सरिताचा विरस झाला.

(१६९) विरोध दर्शवणे-अर्थ : प्रतिकार करणे,
वाक्य : मोटारने कोकणात जाण्याच्या कल्पनेला दादाने विरोध दर्शवला.

(१७०) विलक्षण कष्टी होणे-अर्थ : अतिशय दु:खी होणे.
वाक्य : लग्नानंतर मुलीला सासरी जाताना पाहून राधाबाई विलक्षण कष्टी झाल्या.

(१७१) विसावा घेणे-अर्थ : विश्रांती घेणे.
वाक्य : दुपारची सर्व कामे झाली की, आई थोडासा विसावा घेते.

(१७२) विहरणे-अर्थ : संचार करणे,
वाक्य : पाखरे आकाशात मुक्तपणे विहरतात.

(१७३) वेळ कारणी लावणे-अर्थ : वेळ योग्य कारणासाठी खर्च करणे.
वाक्य : दिवाळीच्या सुट्टीत पोहण्याचा सराव करून मोहनने आपला वेळ कारणी लावला.

(१७४) वेळेचे गणित मांडणे-अर्थ : वेळेचे सुनियोजन करणे,
वाक्य : परीक्षेच्या काळामध्ये प्रत्येक विदयार्थ्याने अभ्यासाच्या वेळेचे गणित मांडायला हवे.

(१७५) शेवटचा श्वास जाणे-अर्थ : मरण येणे.
वाक्य : शेवटचा श्वास जाताना महात्मा गांधीजींच्या तोंडून ‘हे राम’ असे उद्गार बाहेर पडले.

(१७६) सख्य नसणे-अर्थ : मैत्री नसणे.
वाक्य : एका संघात खेळत असूनही नीलेश व रितेश यांचे सख्य नव्हते.

(१७७) सपाटा लावणे-अर्थ : एकापाठोपाठ एक तेच काम वेगात करणे.
वाक्य : ताईच्या लग्नात पंगतीमध्ये रामभाऊंनी जिलेबी खाण्याचा सपाटा लावला.

(१७८) समजूत काढणे-अर्थ : समजावणे.
वाक्य : रडत असलेल्या बाबीची आईने गोड बोलून समजूत काढली.

(१७९) समरस होणे-अर्थ : गुंग होणे, एकरूप होणे.
वाक्य : लहान मुले कोणत्याही खेळाशी सहज समरस होतात.

(१८०) सरत येणे-अर्थ : संपत येणे.
वाक्य : रात्र सरत आली नि पहाट झाली.

(१८१) सहन करणे-अर्थ : सोसणे.
वाक्य : दामूने बालपणी खूप हालअपेष्टा सहन केल्या.

(१८२) सहभागी होणे-अर्थ : सामील होणे.
वाक्य : श्रमदानामध्ये सर्व गावकरी सहभागी झाले.

(१८३) स्तंभित होणे-अर्थ : आश्चर्याने स्तब्ध होणे, चकित होणे.
वाक्य : सर्कशीतला कसरतींचा खेळ पाहताना प्रेक्षक स्तंभित झाले.

(१८४) स्तुती करणे-अर्थ : प्रशंसा करणे.
वाक्य : मोहित शालान्त परीक्षेत जिल्ह्यात पहिला आला; म्हणून गावकऱ्यांनी त्याची स्तुती केली.

(१८५) साजसरंजाम असणे-अर्थ : सर्व प्रकारचे सामानसुमान असणे.
वाक्य : इनामदारांच्या वाड्यावर वडिलोपार्जित खूप साजसरंजाम होता.

(१८६) सांगड घालणे-अर्थ : मेळ साधणे.
वाक्य : महात्मा गांधीजींनी आपल्या विचारांची व आचारांची उत्तम सांगड घातली होती.

(१८७) सांत्वन करणे-अर्थ : दिलासा देणे.
वाक्य : युद्धामध्ये शहीद झालेल्या वीरांच्या मातांचे पंतप्रधानांनी जाहीर सांत्वन केले.

(१८८) सुळकांडी मारणे-अर्थ : सूर मारणे.
वाक्य : काठावर उभ्या असलेल्या गोप्याने नदीत अचानक सुळकांडी मारली.

(१८९) सूड घेणे-अर्थ : बदला घेणे.
वाक्य : द्रौपदीने केलेल्या अपमानाचा दुर्योधनाने सूड घेतला.

(१९०) सोटेशाही चालवणे-अर्थ : दांडगाई करणे.
वाक्य : कधी कधी पोलीस चोर सोडून संन्याशावर सोटेशाही चालवतात.

(१९१) हवालदिल होणे-अर्थ : हताश होणे, घाबरून गोंधळून जाणे.
वाक्य : रात्रभर वाघाचा शोध घेऊनही वाघ सापडला नाही; म्हणून गावकरी हवालदिल झाले.

(१९२) हशा पिकणे-अर्थ : हास्यस्फोट होणे.
वाक्य : माकड नेमके वसंतापाशी जाऊन बसले आणि वर्गामध्ये हशा पिकला.

(१९३) हसता हसता पोट दुखणे-अर्थ : खूप हसणे.
वाक्य : गुरुजींनी सांगितलेला विनोद ऐकून मुलांची हसता हसता पोटे दुखू लागली.

(१९४) हळहळ व्यक्त करणे-अर्थ : चुकचुकणे, चुटपूट लागणे, मन अस्वस्थ होणे, खेद वाटणे.
वाक्य : सहलीला जाता न आल्यामुळे सरिताने आईजवळ हळहळ व्यक्त केली.

(१९५) हंबरडा फोडणे-अर्थ : आक्रोश करणे.
वाक्य : पुरामध्ये बैल वाहून जाताच दामूकाकांनी हंबरडा फोडला.

(१९६) हाडीमासी भिनणे-अर्थ : अंगात मुरणे.
वाक्य : पहाटे उठून व्यायाम करण्याची सवय कुमारच्या हाडीमासी भिनली होती.

(१९७) हात न पसरणे-अर्थ : न मागणे.
वाक्य : माणसाने स्वतः कष्ट करून खावे, कुणासमोर हात पसरू नये.

(१९८) हातभार लावणे-अर्थ : सहकार्य करणे.
वाक्य : श्रमदान करून रस्ता बांधण्यात सर्व गावकऱ्यांनी हातभार लावला.

(१९९) हाताशी राहणे-अर्थ : सहज उपलब्ध असणे.
वाक्य : प्रश्नपत्रिका सोडवताना प्रथमेशने वेळेचे नियोजन केल्यामुळे शेवटची दहा मिनिटे त्याच्या हाताशी राहिली.

(२००) हेवा वाटणे-अर्थ : मत्सर वाटणे.
वाक्य : सखूच्या श्रीमंतीचा मालतीबाईंना हेवा वाटला.

(२०१) हौस भागवणे-अर्थ : आवड पुरवून घेणे.
वाक्य : ताईच्या लग्नात मालतीने साडी नेसण्याची हौस पुरवून घेतली.

काय शिकलात?

आज आपण २०० Marathi Vakprachar Arth, Vakyat Upyog । वाक्यप्रचारांचे अर्थ व वाक्यात उपयोग पाहिले आहे. पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Comment