मोहिते मामांची उचलबांगडी

शिवरायांनी चंद्रराव मोऱ्यांचे पारिपत्य करून जावळी स्वराज्यात सामील केली. विजापूर दरबाराला हे समजले, तरी शिवरायांवर कारवाई करण्याचा विचार कोणीही केला नाही; कारण त्या वेळी विजापुरात मोठे चिंतेचे वातावरण पसरले होते. बादशहा मुहम्मद आदिलशाह अतिशय आजारी होता. बडे बडे सरदार विजापुरात जमले होते. दिवसेंदिवस चिंता वाढत होती. आदिलशाही कारभारात ढिलेपणा आला होता. शिवरायांना ही बातमी समजताच त्यांचे लक्ष कन्हेपठारांतील सुपे परगण्याकडे गेले. सुप्याचे ठाणे आपल्या खास हुकमतीत असावयास हवे. असे झाले नाही, तर स्वराज्याला धोका संभवतो असे शिवरायांना वाटत होते.

पुणे परगण्याची जहागिरी शहाजीराजांनी शिवरायांच्या नावे करून दिली होती, पण सुपे परगण्याची जहागिरी अद्याप त्यांच्या स्वत:च्याच नावावर होती. त्यांनी ती संभाजी मोहिते यांच्यावर सोपविली होती. संभाजी मोहिते म्हणजे शहाजीराजांच्या धाकट्या राणीसाहेबांचे भाऊ. शहाजीराजांचे मेहुणे. शिवरायांचे सावत्र मामा. संभाजी मोहिते सुप्याच्या गढीत राहून परगण्याचा अंमल करीत होते. शिवराय संभाजी मोहित्यांना ‘मामा’ म्हणत, पण ह्या मामांचे आपल्या भाच्यावर मुळीच प्रेम नव्हते. ते शिवरायांना मुळीच जुमानीत नसत.

ह्या मोहिते मामांविरुद्ध अनेक तक्रारी शिवरायांच्या कानावर आल्या होत्या. हे मामा लाच खाण्यात मोठे पटाईत होते. हे मामा लाच खाऊन रयतेवर जुलूम करीत असत, खऱ्या हक्कदाराचे वतन बुडवीत असत, सावकारीत दुबार वसूली करीत असत, एका पक्षाकडून लाच घेऊन दुसऱ्या पक्षावर अन्याय करीत असत, निरापराध्यांना शिक्षा करीत असत, शेजारच्या म्हणजे शिवरायांच्या मुलखांतील अधिकाऱ्यांवर आकस धरून त्यांना त्रास देत असत. अशा अनेक तक्रारी शहाजीराजांकडे व शिवरायांकडे येत होत्या, पण हे मामा कुणालाही जुमानीत नसत.

शेवटी ह्या मामांचा बंदोबस्त करण्याचे शिवरायांनी ठरविले. शिवराय आपल्या मावळ्यांसह कन्हे पठारात आले. सुप्याच्या गढीत फारशी फौज शिबंदी नव्हती. दरवाजावर पहारे होते. शिवराय सरळ गढीत शिरले. शिवराय शहाजीराजांचे पुत्र; आपले मालकच. त्यांना कोण अडविणार? असा विचार करून पहारेकऱ्यांनी त्यांना सरळ आत जाऊ दिले. शिवराय मावळ्यांसह सरळ मोहितेमामांच्या समोर जाऊन उभे राहिले. त्यांनी मामांना बेधडक सांगितले, “मामा, सुपे, ठाणे परगणा ताबडतोब आमच्या स्वाधीन करा.” मामांनी साफ नकार दिला. आपले मालक शहाजीराजे.

हा पोरगा कोण हकूम करणार? हा संभाजी मोहिते, मी थोरल्या महाराजांचा मेहणा आहे. अशा गुर्मीत मोहिते मामा होते. हे मामा सरळपणे सुप्याचा ताबा देणार नाहीत हे लक्षात येताच शिवरायांनी मावळ्यांना आज्ञा केली, “गिरफतार करा मामासाहेबांना!” एका क्षणात संभाजी मोहिते कैद झाले. मामा हादरले, पण मामांपेक्षा शिवरायांचे मावळे जास्त हादरले, कारण मोहिते मामा म्हणजे खुद्द मोठ्या महाराजांचे मेहणे. शिवरायांच्या सावत्र आईचे भाऊ. त्यांना असे तडकाफडकी शिवराय कैद करतील असे कोणालाच वाटले नव्हते. मोहितेमामा पैशासाठी हपापलेला इसम होता.

तो सुपे परगण्याचा कारभारी राहिला असता, तर प्रसंगी पैशासाठी त्याने जहागिरीही शत्रूच्या हवाली केली असती. हा माणूस पैशाच्या लोभाने स्वराज्यावर चालून येणाऱ्या शत्रूला जहागिरीतून वाट देईल; म्हणूनच शिवरायांनी मोहितेमामास अटक करून गढीचा ताबा घेतला. गढीत तीनशे घोडे, बराचसा खजिना, कापडचोपड व चीजवस्तू होत्या. त्या जप्त केल्या. मग शिवराय मोहितेमामांना भेटून म्हणाले, “मामा, तुम्ही येथेच स्वराज्यात राहा.” का…पण मामांनी त्याला नकार दिला. शिवरायांनी मामांना कर्नाटकात शहाजीराजांकडे पाठविले.

सुप्याच्या ठाण्यावर येसाजी गणेश अत्रे यांची नेमणूक केली. मोहितेमामांनी कर्नाटकात शहाजीराजांकडे गेल्यावर शिवरायांविरुद्ध शहाजीराजांचे मन कलुषित करण्याचा प्रयत्न केला, पण मोहितेमामा काय लायकीचा आहे हे माहीत असल्याने शहाजीराजांनी मोहितेमामांच्या तक्रारींची मुळीच दखल घेतली नाही. उलट त्यांचीच खरडपट्टी काढली. श मोहितेमामांच्या कारकिर्दीत ज्यांच्या ज्यांच्यावर अन्याय झाले होते ते अन्याय शिवरायांनी दर केले व रयतेला न्याय दिला. शिवरायांनी लाचखाऊ, अन्यायी, स्वार्थी अशा आपल्या मामाचाही मुलाहिजा ठेवला नाही. त्याची सत्तेवरून उचलबांगडी केली; त्यामुळे स्वार्थी लोकांना जरब बसली आणि शिवरायांच्या कीर्तीत भर पडली.

Leave a Comment