मुलगा-मुलगी एकसमान

एकदा तथागत बुद्ध चारिका करत श्रावस्ती येथे गेलेले होते. ही बातमी तेथील पसेनदी राजाला कळली. त्याला वाटलं, आपण बुद्धांजवळ जावं, त्यांना भेटावं आणि त्यांच्याशी बोलावं. तो त्यांच्याकडे गेला. त्याच्यासोबत त्याचे काही निवडक सैनिक सुद्धा होते. आपल्या सैनिकांना थोड्या अंतरावर थांबायला सांगून पसेनदी राजा बुद्धांना भेटायला त्यांच्या जवळ गेला. बुद्धांना वंदन करून तो त्यांच्या शेजारी जाऊन बसला. चेहऱ्यावरून तो खूप आनंदी असल्याचे दिसत होते. त्याची प्रसन्न मुद्रा बघून बुद्ध त्याला म्हणाले, ”महाराज आज तुम्ही खूप प्रसन्न दिसत आहात.

तुमच्या चेहऱ्यावरून आनंद जणू ओसंडून वाहतोय. या आनंदाचे कारण काय बरे?’ बुद्धांचं बोलणं ऐकून पसेनदी राजा म्हणाला, ”भगवंत, आपण बरोबर ओळखलत. माझी पत्नी राणी मल्लिकादेवी गर्भवती आहे. मी वडील होणार आहे. त्यामुळे मी खूप प्रसन्न आहे, आनंदात आहे.” ही गोड बातमी ऐकून बुद्धांना सुद्धा आनंद झाला. हळुवार स्मित करत ते म्हणाले, ”महाराज, खरंच खूप गोड बातमी दिलीत तुम्ही.” त्या दोघांतील चर्चा सुरू असताना अचानक एक सैनिक लगबगीने तेथे आला.

बुद्धांना आणि राजाला वंदन करून तो राजाच्या जवळ जाऊन उभा राहिला. राजाच्या कानात तो हळूच काहीतरी पुटपुटला आणि काय आश्चर्य ! थोड्या वेळापूर्वी आनंदी असणारा राजा पसेनदी अचानक एखादं मोठं संकट कोसळल्याप्रमाणे दुःखी झाला,निराश झाला. राजा उदास झाल्याचे बुद्धांनी लगेच ओळखले. ते राजाला म्हणाले, “महाराज, काय झालं ? अचानक तुम्ही असे उदास का झालात?” यावर राजा म्हणाला, “तथागत, माझ्या पत्नीने मुलीला जन्म दिल्याची बातमी हा सैनिक घेऊन आलेला आहे.

मुलीचा जन्म अशुभ असतो. म्हणून मी उदास आहे, दुःखी आहे.” बुद्ध म्हणाले, ”महाराज, त्यात दुःख मानायचे काय कारण आहे ?” त्यावर राजा म्हणाला, “भन्ते, माझ्या राज्यावर राज्य करणारा एक पराक्रमी, बुद्धिमान असा मुलगा व्हावा, अशी माझी इच्छा होती. माझा मुलगा, राजपुत्र माझ्यासारखा पराक्रमी, बुद्धिमान आणि कर्तबगार म्हणून नावारूपाला येईल, असे स्वप्न मी मनोमन रंगवले होते. पण सारं काही उलटंच घडलं. म्हणून मी खूप दुःखी आहे.”

बुद्धांनी त्याला पुन्हा विचारले, “महाराज स्त्रिया बुद्धिमान असत नाही, असं आपल्याला वाटतं का? स्त्रिया पराक्रमी असू शकत नाहीत, असा विचार तुम्ही करता का?” त्यावर राजा उत्तरला, “तस नव्हे. स्त्रियांकडे सुद्धा बुद्धिमत्ता आणि पराक्रम गाजविण्याची क्षमता असू शकते.” राजाचे हे उत्तर ऐकून त्याला समजावत बुद्ध म्हणाले, “हे राजा, निसर्गतः स्त्री आणि पुरुष यांच्यात कुणीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही.

निसर्गाने स्त्री आणि पुरुष या दोघांनाही सारखीच बुद्धिमत्ता आणि क्षमता दिलेल्या आहेत. जर निसर्ग या दोघांमध्ये भेदभाव करत नसेल, तर मग आपण का करावा ? महाराज, पुत्र ज्याप्रमाणे कर्तबगार असू शकतो, त्याचप्रमाणे मुलगीदेखील कर्तृत्व गाजवू शकते. म्हणून आपण मुलगा आणि मुलगी या दोघांनाही समान मानले पाहिजे. त्यांच्यात कसलेही भेद करू नयेत. तेव्हा मुलगी जन्मली म्हणून तुम्ही उदास होऊ नका.”

तथागतांचे हे बोलणे ऐकून पसेनदी राजाला आपली चूक लक्षात आली. बुद्धांना वंदन करत तो म्हणाला, “भन्ते, मला माझी चूक कळली. मला क्षमा करा. आपले म्हणणे खरे आहे. बुद्धिवंत, शीलवंत अशा स्त्रीच्या पोटी जन्मलेला मुलगा असो वा मुलगी, तो आपल्या कर्तृत्वाने जगाचा स्वामी होऊ शकतो. त्यामुळे मुला-मुलींमध्ये भेद करणे पूर्णतः चुकीचे आहे. यापुढे मी अशी चूक करणार नाही.” तथागतांनी स्मित करत त्याला सदिच्छा दिल्या आणि प्रसन्न मुद्रेसह पसेनदी राजा आपल्या घरी परतला.

तात्पर्य/बोध – मुलगा आणि मुलगी दोघेही समान आहेत. निसर्गाने त्यांच्यात कुठलाही भेद केलेला नाही. आपणही त्यांच्यात भेदभाव करू नये. संधी मिळाली तर मुलांप्रमाणे मुलीसुद्धा कर्तृत्व गाजवू शकतात.

Leave a Comment