मुंबईची महालक्ष्मी

महालक्ष्मीची महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मंदिरे आहेत. नवरात्रामध्ये मुंबई शहरात जर कुठल्या देवीच्या दर्शनास सर्वात अधिक लोक जात असतील तर ते महालक्ष्मीला होय. अशा मुंबईत मुंबादेवी, गांवदेवी, प्रभादेवी, काळबादेवी वगैरे प्राचीन प्रसिद्ध देवींची मंदिरे आहेत. पण या महालक्ष्मीची गोष्टच न्यारी आहे. ह्या महालक्ष्मीचा वरदहस्त जणू मुंबईला लाभलेला आहे आणि मुंबईची समृद्धी व भरभराट सारखी वृद्धिंगत होत आहे. मुंबई शहरातील पश्चिमेकडील वाळकेश्वरच्या अलिकडच्या काही भागाला महालक्ष्मी म्हणतात.

याचठिकाणी समुद्र किनाऱ्यावर एका लहानशा टेकडीवर महालक्ष्मीचे ठिकाण आहे. ज्या ठिकाणी देवालय बांधण्यात आले आहे, तो भाग रम्य व प्रशांत आहे. महालक्ष्मी मंदिराविषयी अनेक आख्यायिका आहेत. मुंबई पूर्वी सात बेटांचा समूह होता तेव्हा महालक्ष्मीचे मंदिर वरळी बेटावर होते. १७२० सालापर्यंत या वरळी बेटावरील एका टेकडीवर महालक्ष्मीचे मंदिर होते, असा उल्लेख आढळतो.

ह्या मंदिराच्या इतिहासाकडे पाहिले तर असे दिसून येते की, शिलाहार राजाच्या काळातील ह्या मंदिरावर मुसलमान व पोर्तुगिजांचे आक्रमण झाले तेव्हा त्यातील तिन्ही मूर्ती मध्यरात्री हलविण्यात येऊन सागरात टाकण्यात आल्या. पुढे इ. स. १७५० च्या सुमारास इंग्रज सरकारकडून वरळीला बांध बांधण्यास सुरुवात झाली. परंतु तो यशस्वी होत नव्हता. तेव्हा श्री. महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती यांचे मनात आले की, क्षीरसागरातून बाहेर निघावे आणि मुंबई शहरात प्रसिद्ध व्हावे भक्तजनांसाठी.

कारण या रस्त्यावरचे जागेत त्यांचा वास होता जेणे करुन बांधाची बांधणी सिद्धीस जात नव्हती. त्यासाठी महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती ह्यांनी सरकारचे इंजिनियर शिवजी प्रभू ह्यास दृष्टांत दिला की, ‘आम्ही क्षीरसागरामध्ये असून आम्हास बाहेर काढून ज्या ठिकाणी सद्य: आहेत ते टेकडीवर देवालय बांधून स्थापन करावी, तर आम्ही संतुष्ट होऊन बांध बांधावयास अनुकूल होऊ.’ देवीच्या आज्ञेप्रमाणे समुद्रात जाळे घातले, तेव्हा तीन मूर्ती महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती त्या जाळ्यात आल्या.

नंतर त्या मूर्ती ज्या त्या टेकडीवर आहेत त्याच टेकडीवर ठेवील्या. नंतर ती टेकडी व जागा सरकारकडून बक्षीस मागून टेकडीवर देऊळ बांधून स्थापना केली आणि समुद्राच्या भरतीने येणाऱ्या लाटांनी भराव वाहून जाण्याचा प्रकार थांबला. चौपाटी व वरळी ही बेटे जोडली जाण्याचा मार्ग दिसू लागला. महालक्ष्मी मंदिराची रचना सुंदर आहे. गर्भागाराच्या मध्यभागी एक लहानशी पेढी असून तिच्यावर सुंदर मखरात तीन काळ्या पाषाणाच्या मूर्ती आहेत. महालक्ष्मी व्याघ्रावर आरुढ झाली असून महाकाली महिषासुरावर बसली आहे.

सरस्वती ही मयुराधिष्ठित आहे. मात्र ही देवींची आसने स्पष्ट दिसत नाहीत. पण साधारण दगडाचा आकार दिसावा तसा दिसतो. ह्या पाषाणाच्या मूर्तीना नेहमी मुखवटे व शृंगार घातलेला असतो त्यामुळे मूळ मूर्तीचे दर्शन क्वचितच होते. महालक्ष्मी चतुर्भुजा असून सव्वा दोन हात उंच आहे. तर महाकाली व महासरस्वती यांच्या मूर्ती अनुक्रमे अडीच आणि दोन फुटांच्या आहेत. त्यांच्यावर शेंदूराचा लेप लावला आहे. त्या मूर्ती स्वयंभू आहेत असे सांगतात.

या मूर्तीवर सोन्याचे मुखवटे असतात. डोक्यावर मुकुट असतो, नाकात नथ, कंकणे, मोत्यांचा हार असा शृंगारही असतो. सभामंडपात गर्भगृहाकडे तोंड वर करुन व्याघ्राची पाषाण मूर्ती व कासव आहे. तिथेच गणेशाच्या मूर्ती आहेत. पूर्वीच्या काळी ‘महालक्ष्मी ‘ कोळी व आगरीचे पूजास्थान होते. मंगळवार व शुक्रवार देवीचे वार असल्याने त्यादिवशी पुष्कळ भाविक येतात. चैत्र पौर्णिमेला देवीची जत्रा असते. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये घटस्थापना होते व दहाव्या दिवशी होम, हवन, पूजा होते. तसेच मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी मंदिरामध्ये हजारो भाविक देवीची खणानारळांनी ओटी भरत असतात. दिपावलीतसुद्धा परिसरात जत्रा भरते.

Leave a Comment