प्राचीन काळी आपल्या देशात अनेक लहान-मोठी राज्ये होती. या राज्यांवर विविध गणांचे लोक राज्य करायचे. त्यापैकी कपिलवस्तू येथील राजा शुद्धोदन हे शाक्य गणाचे प्रमुख होते. गोतम हे त्यांच्या घराण्याचे नाव, अगदी आजच्या आपल्या आडनावासारखं. राजा शुद्धोदन यांना महामायादेवी आणि महाप्रजापती अशा दोन पत्नी होत्या. त्यापैकी महामायादेवी यांच्या पोटी इ.स.पू. ५६३ साली एका गोंडस मुलाचा जन्म झाला.
मुलाचं नाव ठेवलं गेलं ‘सिद्धार्थ’. सिद्धार्थच्या जन्मानंतर फक्त सात दिवसांनी त्याची आई महामायादेवी यांचं निधन झालं. आईचं छत्र हरवलेल्या सिद्धार्थचे पालनपोषण महाप्रजापती यांनी अतिशय मायेनं केले. हळूहळू सिद्धार्थ मोठा व्हायला लागला. राजकुमार सिद्धार्थ गोतम याच्या शिक्षणाची अतिशय उत्तम व्यवस्था वडील शुद्धोदन यांनी के ली. लहानपणापासून सिद्धार्थचा स्वभाव अतिशय हळवा आणि संवेदनशील होता.
कुणाचंही दुःख बघून तो अतिशय व्याकूळ व्हायचा. इतर राजकुमारांप्रमाणे तलवारबाजी, शिकार आणि लढाई यात न रमता सिद्धार्थने वेगळ्या वाटेवर चालणं पसंत केलं. त्याच्या बालमनाला अनेक प्रश्न पडायचे. आपल्या मनातील विविध प्रश्न विचारून तो अनेकांना कोड्यात टाकायचा. लहानपणापासूनच त्याला ध्यान करायची खप आवट वडील शुद्धोदन शेतात नांगरणीचा उत्सव (हलोत्सव) साजरा करत असताना त्याने शेतातच पहिल्यांदा ध्यान केलं. राजकुमार सिद्धार्थ टा इतर राजकुमारांपेक्षा खूपच वेगळा होता.
वयाच्या १६ व्या वर्षी यशोधरा नावाच्या एका गुणवान मुलीशी त्यांचं लग्न लावण्यात आलं. वाढत्या वयाबरोबर सिद्धार्थला पडणारे प्रश्न त्याला अधिकच अस्वस्थ करायला लागले. त्याचे ध्यान आता त्याला वेगळ्या वाटेवर घेऊन जाईल की काय, अशी भीती सगळ्यांना वाटत होती. माणूस दुःखी का आहे ? त्याला दुःखातून मुक्त होता येईल का? त्यासाठी त्याने काय केलं पाहिजे ? असे अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात गोंधळ घालत होते.
पुढे वयाच्या २९ व्या वर्षी आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी सिद्धार्थ घराचा आणि सगळ्या राजवैभवाचा त्याग करून बाहेर पडला. मोकळ्या आकाशाखाली, मुक्त वातावरणात तो खूप खूप भटकला. फिरता-फिरता त्याने विविध प्रकारचे अनुभव घेतले. स्वतःवर अनेक प्रयोग केले. अनेकदा ध्यान केले. आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी अक्षरशः प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
अखेर त्याच्या प्रयत्नांना यश आले. वयाच्या ३५ व्या वर्षी वैशाखी पौर्णिमेला पिंपळाच्या झाडाखाली बसून असलेल्या सिद्धार्थला आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे सापडली. यालाच ‘बोधिप्राप्ती’ असे म्हणतात. बोधिप्राप्त झालेले युवराज सिद्धार्थ आता बद्ध म्हणून ओळखले जाऊ लागले. सत्यापर्यंत पोहचलेल्या बुद्धांना लोक ‘तथागत बुद्ध’ म्हणून ओळखू लागले. अशाप्रकारे सिद्धार्थ गोतम नावाचा एक सर्वसामान्य माणूस आपल्या प्रयत्नांमुळे, स्वतःच्या कष्टांमुळे जगातील सर्वात ज्ञानी पुरुष तथागत बुद्ध बनले.
पुढे आपल्याला मिळालेले ज्ञान इतरांना देऊन, त्यांना दुःखमुक्त करण्यासाठी ते सतत ४५ वर्षे प्रवास करीत राहिले, पायी चालत राहिले. यालाच ‘चारिका’ असे म्हणतात. ते गावोगाव फिरायचे. तेथील लोकाशी चर्चा करायचे. लोकांना दुःखातून मुक्त होण्यासाठी मार्गदर्शन करायचे. माणूस आपल्या वागणुकीत योग्य बदल करून जीवनातील अनेक प्रश्न सहजपणे सोडवू शकतो, असा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यांच्या उपदेशाचे पालन करणारे आणि विशिष्ट संस्कार झालेले त्यांचे शिष्य ‘भिक्खू’ म्हणून ओळखले जायचे.
भिक्खूच्या समूहाला ‘संघ’ म्हटले जायचे. बुद्धांचा उपदेश, त्यांची शिकवण ही ‘धम्म’ म्हणून ओळखली जाऊ लागली. चारिका करत ४५ वर्षे गावोगाव फिरणाऱ्या बुद्धांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. अनेक लोकांनी त्यांच्यावर टीका केली, त्रास दिला. एकदा तर अंगुलिमाल नावाच्या एका क्रूर दरोडेखोराशी त्यांची गाठ पडली.
पण कशालाही न घाबरता बुद्ध आपले काम करतच राहिले. अखेर वयाच्या ८० व्या वर्षी इ.स.पू. ४८३ ला कुशीनगर येथे त्यांनी शेवटचा श्वास घेतला. आपल्या प्रयत्नांनी बुद्ध बनलेल्या या महामानवाने अवघ्या जगावर आपली छाप पाडली. अशा या श्रेष्ठ महामानवाच्या जीवनातील विविध प्रसंग आणि त्यांचा उपदेश आपण गोष्टींच्या रूपात पाहूया.