जवाआगळ काशी परळी वैजनाथ

परळी वैजनाथ हे बारा ज्योर्तिलिंगापैकी एक श्रेष्ठ स्थान आहे. इतर ज्येर्तिलिंगांपेक्षा या स्थानाचे वैशिष्ट्य असे सांगतात की, फक्त येथेच शंकर पार्वतीसह वास करतो. त्यामुळे या क्षेत्राला ‘जवाआगळ काशी किंवा अनोखी काशी’ म्हणजे काशीपेक्षा जवभर श्रेष्ठ मानतात.

बारा ज्योर्तिलिंगांपैकी पाच ज्योर्तिलिंगे महाराष्ट्रातच आहेत. त्यापैकी तीन मराठवाड्यात, तर नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यात प्रत्येकी एक आहे. हे तीर्थक्षेत्र मराठवाड्यातील बीड जिल्ह्यांत आंबेजोगाई तालुक्यात मनमाड-काचीगुडा या लाईनवरील परभणी स्टेशनपासून जाणाऱ्या फाट्यावर आहे. पण औरंगाबादहून बसने जाणे जास्त सोयीचे आहे. या तीर्थस्थानापासून मुंबई ५०२ कि.मी. पुणे ३०० कि. मी. बीड १००कि.मी. आहे.

देवी अहिल्याबाई होळकर यांना झालेल्या दृष्टांताप्रमाणे त्रिशूला देवीच्या डोंगरातून दगड आणून त्यांनी सांप्रतच्या मंदिराची निर्मिती केली. भव्य मंदिर एका टेकडीवर बांधलेले आहे. शिवलिंग आणि नंदी प्राचीन आहे. येथे शिवशक्तीसह वास करीत आहे.. जेव्हा समुद्रमंथनातून चौदा रत्ने निघाली. त्यातील धन्वंतरीने श्रीविष्णूच्या आज्ञेवरुन येथील ज्योर्तिलिंगात प्रवेश केला. म्हणून त्यास ‘वैद्यनाथ’ हे नांव प्राप्त झाले.

परळी हे स्थान शिवाचे आहे, तसेच हरि-हर मीलनाचे स्थान आहे. त्यामुळे येथे शिवमहोत्सव साजरा होतो, तसाच कृष्णमहोत्सवही होतो. हरिहर तीर्थाचे पाणी वैद्यनाथाच्या दैनिक पूजेसाठी आणले जाते. मंदिरात स्वयंभू लिंग असून मंदिराचा गाभारा आणि सभामंडप एका पातळीवर आहे. अन्यत्र गाभारा खोल असतो. या मंदिराची बांधणी हेमाडपंथी आहे. मंदिराभोवती कोट व आतील बाजूस ओवऱ्या आहेत.

मंदिराला उत्तर, दक्षिण आणि पूर्व अशी द्वारे आहेत. गाभाऱ्यातील पिंडी शाळिग्राम शिळेची असून ती हातभर उंच आहे. तिचा व्यास दोन हात आहे. गाभाऱ्यात चार नंदादीप अखंड तेवत असतात. देवाची दररोज चार वेळा पूजा होते. प्रात:पूजेनंतर लिंगावर मुखवटा बसवतात. सकाळची सूर्यकिरणे वैजनाथाच्या शाळुकेवर पडत असतात. महाशिवरात्री व श्रावणमासी यात्रेकरु बहुसंख्येने येतात. त्यावेळी देवास वस्त्रालंकारांनी सजवतात, आणि दूरवरुन गोदावरीचे पाणी आणून रुद्राभिषेक होतो.

विजयादशमी, वैकुंठचर्तुदशी व वर्षप्रतिपदेस गुढी उभारतात. वैकुंठ चर्तुदशीला मध्यरात्री महापूजा बांधण्यात येते. विजयादशमीस उत्सवमूर्ती पालखीत घालून सीमोल्लंघनाला नेली जाते. कोजागिरी ते त्रिपुरी पौर्णिमा त्या काळात नित्य पूजेचा प्रेक्षणीय सोहळा पाहाण्यास मिळतो. परळीत अनेक मंदिरे, आश्रम, समाधीस्थळे आहेत. गोपीनाथ, दत्त, कालिका, विठ्ठल, व्यंकटेश, बालाजी मंदिर इत्यादी असून बिनसोंडी गणपतीचे दर्शन आधी घेऊन मग वैजनाथाचे दर्शन घेण्याची पद्धत आहे.

Leave a Comment