फत्तेखानाची फटफजिती

जिंजीच्या लष्करी छावणीत रात्रीच्या वेळी शहाजीराजे गाढ झोपले असताना मुस्तफाखान. बानी घोरपडे, बाळाजी हैबतखान इत्यादी सरदारांनी राजांना कपटाने पकडले. आदिलशाहाला ही बातमी समजताच त्याने शहाजीराजांना विजापूरात हजर करण्याची मुस्तफाखानास आज्ञा केली. दरम्यानच्या काळात मुस्तफाखान मरण पावल्यामुळे सेनापती खान महंमद याने हे काम अफजलखानास सांगितले.

अफजलखान एकदम खूश झाला. त्याने शहाजीराजांच्या हातापायात बेड्या घातल्या. आपला पराक्रम सगळ्यांना कळावा; म्हणून खानाने शहाजीराजांना हत्तीवर बसवून अगदी वाजत गाजत, सर्वांना दाखवीत विजापूरात आणले आणि बादशहाच्या हुकमानुसार त्यांना तुरुंगात डांबले. शहाजी ताब्यात आल्यामुळे आदिलशाह अतिशय खूश झाला होता. तो स्वत:शीच म्हणाला, “आता फर्रादखानाने बंगरुळ व बंगरुळचा किल्ला ताब्यात घेतला की, शहाजीचा थोरला मुलगा संभाजी व त्याची बायकामुले आपल्या ताब्यात येतील. फत्तेखान शिवाजीचा निकाल लावून फत्ते होऊन येईल.

जरी शिवाजी त्याच्या हाती लागला नाही, तरी त्याचा बाप, भाऊ आपल्या ताब्यात असल्यावर तो दाती तृण धरून आपल्याला शरण येईल व त्याचे स्वराज्य आपल्या स्वाधीन करील.” तिकडे बेलसरनजीकच्या छावणीत असलेल्या फत्तेखानाला वाटत होते, आता शिवाजी पुरंदर गडावर ठाण मांडून बसला असला, तरी आपल्या सैन्यापुढे त्याचा निभाव लागणार नाही. शिवाय जय्यत तयारीनिशी गेलेल्या हैबतरावाने सुभानमंगल गड जिंकला आणि फाजलखान व अशरफखान यांनी शिवाजीचे शिरवळ ठाणे जिंकले की, त्या शिवाजीला व त्याच्या मावळ्यांना पळता भुई थोडी होईल.

असे तो फत्तेखान मनात मांडे खात होता. …पण झाले काय? कावजीने पुरंदरावरून जाऊन हैबतरावांचा पुरा चुराडा केला. तिकडे शिवाजी महाराजांनी पुरंदरगडाचा अगदी कडेकोट, पक्का बंदोबस्त केला. गड झुंजता केला. या फत्तेखानाला चांगलाच धडा शिकवावयास हवा असे गडावरील सर्वांनाच वाटू लागले. कोणालाही खानाची भीती वाटत नव्हती. फत्तेखानावर अचानक झडप घालायची, त्याच्याशा गनिमीकाव्याने लढायचे असे शिवाजी महाराजांना वाटत होते. सर्वांना महाराजांचा हा मनसुबा एकदम पसंत पडला. मग काय? महाराजांच्या सैन्याच्या तुकड्या हल्ला करावयास तयार झाल्या.

शिवाजी महाराज सर्व सैनिकांना म्हणाले, “फत्तेखान या गडावरच चाल करून येणार याची पक्की बातमी आमच्याकडे आहे, पण त्याला येथे येऊन लढण्याची संधी देण्यापेक्षा तो बेलसरच्या छावणीत बेसावध असताना आपणच त्याला आपल्या सामर्थ्याचा दणका दिला तर?’ महाराजांची ही योजना सर्वांना एकदम पसंत पडली. मग काय विचारता? फत्तेखानाच्या छावणीवर एकदम अचानक धाड टाकण्याची तयारी झाली. मराठ्यांच्या फौजा खानाच्या छावणीच्या रोखाने दौडत निघाल्या. कसलाही आवाज न करता सैनिक बेलसरच्या परिसरात घुसले. फत्तेखान खरोखरच बेसावध होता.

मराठ्यांनी छावणीवर एकदम हल्ला केला. खानाच्या बेसावध फौजेची दाणादाण उडाली. सगळीकडे आरडाओरड, धावाधाव सुरू झाली. खानाच्या फौजेला सज्ज व्हायला वेळही मिळाला नाही. खान दचकून जागा झाला. त्याने पाहिले तो काय? मराठे सैतानासारखे नाचत होते. बेभान होऊन कापाकापी करीत होते. सावध झालेला फत्तेखान लष्कर घेऊन पुढे सरसावला. त्याने सर्व ताकदीनिशी मराठ्यांवर जोरदार चढाई केली. फत्तेखानाची लष्करी ताकद फार मोठी होती. मराठ्यांनी शत्रूची फार मोठी कापाकापी केली; तरीही फत्तेखानाच्या सैन्याशी उघड्या मैदानावर युद्ध करणे कठीण आहे हे ओळखून मराठी सैन्य मागे फिरले व पुरंदरच्या झाडीत पसार झाले. फत्तेखानाने शिवाजी महाराजांची व त्यांच्या सैन्याची मोठीच दहशत घेतली होती, पण उसना आव आणून तो आपल्या सैनिकांना म्हणाला, “या मावळ्यांना उघड्या मैदानावर आपल्याशी युद्ध करणे शक्य नाही; म्हणून ते मावळे माघार घेऊन पुरंदर गडावर गेले आहेत.

त्या शिवाजीची आपल्याशी समोरासमोर युद्ध करण्याची हिंमत नाही; म्हणून त्याने आपल्यावर छुपा, भ्याड हल्ला केला, पण आपण सावध होताच त्याने पळ काढला, पण तरीही आपण ह्या भ्याड हल्ल्याने खचून जाण्याचे कारण नाही. आपले बाळाजी हैबतराव यांनी त्या शिवाजीच्या ताब्यातला सुभानमंगल गड जिंकला आहे व फाजलखान व अशरफखान यांनी शिरवळ ठाणे ताब्यात घेतले आहे. खरे तर तो शिवाजीच घाबरला आहे.

आपण पुरंदर गडावर जाऊ नये; म्हणून त्याने त्याच्या सैन्याला आपल्यावर छुपा हल्ला करण्यास पाठविले.’ फत्तेखान असे बोलत असतानाच फाजलखान व अशरफखान फत्तेखानाकडे आले व माना खाली घालून म्हणाले. “बाळजी हैबतराव युद्धात मारला गेला व आपल्या हाती आलेला सुभानमंगल गड व शिरवळचे ठाणे पुन्हा त्या शिवाजीने ताब्यात घेतले.” ही बातमी ऐकताच फत्तेखानाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. क्रोधाने हिरवा पिवळा झालेला तो आपली प्रचंड फौज घेऊन पुरंदरगडाकडे धावत सुटला.

फत्तेखान फौजेसह गडाच्या रोखाने येत आहे हे गडावरील टेहळेकरी मावळ्यांना दिसताच सगळ्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला. मावळे येणाऱ्या पाहण्यांचे स्वागत करण्यास जय्यत तयारी करून बसले होते. फत्तेखानाचे सैन्य गड चढू लागताच महाराजांनी इशारा दिला. इशारा मिळताच गडावरून तोफांचा, बंदुकांचा, बाणांचा धडाका सुरू झाला. गडावरून मावळ्यांनी मोठमोठे धोंडे, भल्या मोठ्या गुंडी खाली ढकलून देण्यास सुरुवात केली. मोठमोठाले दगड गडगडत जाऊन खानाच्या सैन्यावर पडू लागले. त्या दणक्यात अनेक सैनिकांची डोकी फुटली.

अनेकांचे हातपाय मोडले. अनेक जण ठार झाले. काही मावळे गोफणीतून दगड गोटे फेकू लागले. या माऱ्याने खानाच्या फौजेचा भयंकर संहार झाला. खानाच्या सैन्याचा धीरच खचला. डोंगरावर जिकडे तिकडे रक्तबंबाळ झालेल्या प्रेतांचा खच पडला. डोंगर चढता चढता त्यांची छाती फुटायची वेळ आली. त्यातच वरून दगडांचा मारा सुरू होता. फत्तेखानाचे सैनिक मोठ्या निकराने गड चढत होते. फत्तेखानाचे अडीच तीनशे सैनिक गारद झाले होते; त्यामुळे सैनिकांचे धैर्य खचून ते माघार घेऊ लागले. का हे लक्षात येताच शिवाजी महाराजांनी गडाचा दरवाजा उघडला व मावळ्यांना इशारा केला.

मग महाराजांचे सैन्य फत्तेखानी फौजेवर तुटून पडले. भीमाजी वाघ, बाजी जेधे, गोदाजी जगताप, बाजी पासलकर इत्यादी महाराजांचे शिलेदार समोर येणाऱ्या प्रत्येक शत्रूला यमलोकाची वाट दाखवीत होते. गोदाजी जगतापने समोर आलेल्या मुसेखानावर भाला फेकून त्याला ठार मारले. आता मात्र फत्तेखानाच्या फौजेचा धीर पार सुटला. पुरंदरगड जिंकण्याची बात सोडा! स्वत: फत्तेखान व त्याचे सैनिक जीव वाचविण्यासाठी पळत सुटले.

मावळ्यांनी त्यांचा पाठलाग करून अनेकांचा फन्ना उडविला. फत्तेखानाचे मूठभर सैनिक जिवंत सुटले. या झटापटीत शिवाजीमहाराजांचा जिवाचा जिवलग असा बाजी पासलकर मात्र धारातीर्थी पडला… महाराजांना फार फार वाईट वाटले. फत्तेखान आपले धुळीने माखलेले तोंड खाली घालून विजापूराकडे पळत सुटला. पुरंदर गड जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या फत्तेखानाची पार फटफजिती झाली. त्याचा सणसणीत पराभव सामाजलय झाला. शिवाजी महाराज विजयश्री घेऊन आपल्या मावळ्यांसह गडावर परत आले.

Leave a Comment