विशेष पुण्यकारक गया

बिहार म्हणजे पूर्वीचे मगध वा गोंडवन. एक काळ असा होता की, येथे सोन्याचा धूर निघत होता. एवढा वैभवसंपन्न भाग होता. याला निसर्गाचे वरदान आहे तसेच प्रसिद्ध गणिती आर्यभट्ट, तत्त्वविद्येचे महान पंडित मंडनमिश्र, वाचस्पती मिश्र व उदयनाचार्य बिहारचेच.

बिहारला सांस्कृतिक समृद्धीचा वारसा आहे. गयेचे विष्णूपद्ममंदिर, वैद्यनाथधाम, येथील शिवमंदिर ही बिहारमधील श्रेष्ठ तीर्थस्थाने होत. सोनपूर येथील हरिहर मंदिर ही प्रसिद्ध असन कार्तिक पौर्णिमेपासून महिनाभर यात्रा भरते. रामायणकालापासून बिहारची भमी प्रसिद्ध आहे. त्यातील ‘गया’ हे पुण्यकारक क्षेत्र आहे. ते जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण असून अनेक महामार्गाने पाटणाला जोडले असून पाटण्यापासून ९८ कि. मी. अंतरावर आहे.

गया हे हिंदूचे प्रख्यात तीर्थक्षेत्र मानले जाते. तशीच पुना नदी, च्यवन भार्गवांचा आश्रम व राजगृह (जरासंधाची राजधानी) ही विशेष पुण्यकारक म्हटली आहेत. त्या क्षेत्रास विष्णूगया किंवा पितृगया म्हणतात. गया हे अत्यंत प्राचीन असे गांव असून पितृपक्षात असंख्य हिंदू श्राद्ध करण्यासाठी या ठिकाणी येतात. गयामध्ये प्राचीन काळची असंख्य मंदिरे होती. त्याचे कुर्कीहर येथे पाला राजवटीतील कलापूर्ण नमुने पाहाण्यास मिळतात.

या तीर्थक्षेत्राची पण आख्यायिका ऐकावयास मिळते. गयासूर या असूराने कठोर तप करुन विष्णूला प्रसन्न केले आणि सर्वात पुण्यवान असावे असा वर मागितला. विष्णूने तथास्तु म्हटले. त्यामुळे लोक गयासुराला स्पर्श करुन पुण्यात्मे बनून स्वर्गात जाऊ लागल्यामुळे यमपुरी ओस पडली. यमाने हे गा-हाणे विष्णूला सांगितले. विष्णू मग भूमीवर उतरले व यज्ञासाठी त्याचे शरीर मागितले. गयासुराने हो म्हटले व आडवा झाला.

ब्रह्मदेवासह सर्व देव त्याच्या शरीरावर उभे राहिल्यावर गयासुराचे स्पंदनच थांबले. हे पाहून देवांनी प्रसन्न होऊन वर मागण्यास सांगितले. तेव्हा गयासूर म्हणाला, ‘जोपर्यंत पृथ्वी, तारे, सूर्य अस्तित्वात आहेत, तोपर्यंत हे क्षेत्र माझ्या नावाने प्रसिद्ध व्हावे. ज्याचे इथे सपिंड श्राद्ध होईल, ते लोक ब्रह्मलोकात जावेत व इथे येणाऱ्याच्या महापातकांचाही नाश व्हावा.’ गयेत यात्रेकरुला सात दिवस श्राद्धादी कृत्ये करावी लागतात.

पितपक्षातोश्राद्ध करण्यासाठी यात्रेकरुंची गर्दी होते. गयेत अक्षय्यवट असून तो तिन्ही लोकात प्रख्यात आहे. पितरांसाठी तिथे दिलेले सर्व काही अक्षय्य होते. तिथे स्नान करुन जो देवता व पितर यांचे तर्पण करील, त्याला अक्षय्य लोक मिळतील व त्याच्या कुलाचा उद्धार होईल असे शास्त्रात म्हटले आहे. गयेत ४५ श्राद्धवेदी आहेत.

ब्रह्मसरोवराच्याजवळ एका टेकडीवर मंगलागौरीचे मंदिर आहे. त्यापुढे वर अविमुक्तेश्वरनाथाचे प्राचीन मंदिर आहे. मंदिरात भगवंताची चर्तुभूज मूर्ती असून ज्याचे श्राद्ध करणारा कोणी नसतो, त्याने स्वत:साठीच दह्यात तीळ मिसळून तीन पिंड भगवंताच्या उजव्या हातात ठेवावे असा पण विधी आहे. विष्णूपद मंदिराजवळच श्री गदाधर मंदिर आहे. येथे विष्णूची शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेली प्रसन्न मूर्ती आहे. श्रीगदाधर हे गयेचे ग्रामदैवत आहे.

Leave a Comment