रक्षाबंधन माहिती, इतिहास मराठी । Raksha Bandhan Information in Marathi

हॅलो मित्रांनो कशे आहात तुम्ही आज मी तुम्हाला रक्षाबंधन माहिती, इतिहास मराठी । Raksha Bandhan Information in Marathi सांगणार आहे तर चला बघुयात.

रक्षाबंधन माहिती, इतिहास मराठी । Raksha Bandhan Information in Marathi

आणखी वाचा – मंगळागौरी

रक्षाबंधन मराठी । Raksha Bandhan Information in Marathi

रक्षाबंधन श्रावण पौर्णिमा हा दिवस रक्षाबंधन या नावाने प्रसिद्ध आहे. हा सण कौटुंबिक आहे. तसा तो राष्ट्रव्यापी आहे. आपल्या भारताच्या सर्व प्रांतांतील सर्व लोक अत्यंत आनंदाने, उत्साहाने हा सण साजरा करतात. रक्षाबंधन ही भारतीय संस्कृतीची एक सुंदर परंपरा आहे. या पौर्णिमेला ‘पोवती पौर्णिमा’ असेही म्हणतात. कापसाच्या सुताची नवसुती करून तिला आठ, बारा, किंवा चोवीस गाठी मारतात व त्यांच्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू, महेश, सूर्य इत्यादी देवतांचे आवाहन करतात. हे पोवते प्रथम देवास वाहून नंतर तसलीच पोवती कुटुंबातील माणसांच्या मनगटावर बांधली जातात.

रक्षाबंधनाची सुरुवात केव्हा व कशी झाली याबद्दल निश्चित पुरावा नाही. परतु त्याविषयी एक आख्यायिका अशी आहे : पूर्वी देव-दानवांची वारंवार युद्धे होत असत. परंतु दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नसे. देवांचा पक्ष अत्यंत दुर्बल होऊ लागला. दानवांचा राजा वृत्रासूर त्याने देवांचा राजा इंद्र यास युद्धाचे आव्हान दिले. इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला. त्या वेळी इंद्राला युद्धात विजय मिळावा म्हणून इंद्राची पत्नी शची हिने इंद्राला राखी बांधली व युद्धाला पाठविले. त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला युद्धात विजय मिळाला. त्या दिवशी राखीचे महत्त्व मान्य केले गेले.

तेव्हापासून रक्षाबंधनाचा सण सुरू झाला. त्या दिवशी श्रावण पौर्णिमा होती. युद्धात अभिमन्यूचे रक्षण व्हावे यासाठी कुंतीमातेने त्याला राखी बांधली होती. तर मेवाडची वीरांगना कर्मवती हिने आपले व आपल्या राज्याचे रक्षण व्हावे यासाठी दिल्लीचा बादशहा हुमायून यास राखी पाठविली होती. हुमायूनला राखीचे महत्त्व कळले. त्याने आपले जुने शत्रुत्व विसरून कर्मवतीच्या राज्याचे रक्षण केले. जगज्जेता होऊ पाहणाऱ्या सिकंदराच्या पत्नीने महाराज पुरूच्या हातावर राखी बांधली होती. त्यामुळे सिकंदर पुरूच्या तावडीत सापडला असतानाही त्याने सिकंदरला सोडून दिले.

इतिहासकाळात अनेक रजपूत स्त्रिया शत्रूच्या गोटात जाऊन आपल्या पतीविरुद्ध लढणाऱ्या वीरांच्या हातावर राखी बांधत असत. त्यामुळे युद्धप्रसंग टळत. भारतीय समाजात ऐक्य आणि प्रेमभाव वाढीस लागावा, परस्परांशी मैत्री वाढावी यासाठी रक्षाबंधनाचा सण रजपूत लोकांत रूढ झाला. आजकाल मात्र बहीण-भावाच्या पवित्र प्रेमाचा सण म्हणून हा रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. या दिवशी बहिणीने आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याचे औक्षण करावयाचे असते. राखी बांधतांना बहीण म्हणते –

येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः ।
तेन त्वामनुबध्नामि रक्षे मा चल मा चल ।।

(दानवांचा राजा बली याच्या हातात शक्राचार्यांनी जशी रक्षा (राखी) बांधली होती तशीच ही राखी मी तुझ्या हातात बांधत आहे.) या राखीबंधनामुळे बहिणीच्या रक्षणाचे बंधन भाऊ स्वतःवर घालून घेतो. राखी बांधताना बहीण आपल्या भावाला सुख, शांती, दीर्घायुष्य लाभावे अशी मनोमन प्रार्थना करते. बहीण भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्याकडून केवळ स्वतःच्या रक्षणाची इच्छा करते असे नाही; तर सकल स्त्री-जातीला आपल्या या भावाचे रक्षण मिळावे अशी उदात्त इच्छा असते. त्याचप्रमाणे आपल्या भावाने बाह्य शत्रूवर व स्वतःच्या मनातील विकारांवर, वाईट विचारांवर विजय मिळवावा, त्यापासून सुरक्षित राहावे ही भावना देखील त्या राखी बांधण्यात असते.

राखीबंधन म्हणजे स्त्रीकडे पाहण्याच्या दृष्टीत बदल. आपल्या समाजातील सर्व स्त्रिया ह्या आपल्या माता-भगिनी आहेत. त्यांच्याकडे तशाच पवित्र भावनेने पहावयास हवे. त्यांचे रक्षण करणे, संकटकाळी धावून जाणे, त्यांना सर्व प्रकारची मदत करणे हे आपले पवित्र कर्तव्य आहे, हे ही राखी बांधून घेणाऱ्याने लक्षात ठेवावयाचे असते. स्त्री-पूजा हे भारतीय संस्कृतीचे खास वैशिष्ट्य आहे. म्हणून या पवित्र दिवशी सख्ख्या बहिणीने आपल्या सख्ख्या भावाला राखी बांधावीच; परंतु सख्खा भाऊ नसेल तर इतर नात्यांनी असलेल्या भावाला राखी बांधावी.

बहीण-भावाच्या नात्याचे बंधन देशाच्या, धर्माच्या, जातीपातीच्या बंधनापासून अगदी अलिप्त असते. ते अमर्याद असते. काही प्रांतांत नोकर आपल्या मालकाला, ब्राह्मण आपल्या यजमानाला, मुलगी आपल्या वडिलांनासुद्धा राखी बांधते. आपल्यापेक्षा श्रेष्ठ, बलवान, समर्थ माणसाला राखी बांधून आपल्या रक्षणाची विनंती करणे, हीच यामागची भावना आहे. या दिवशी संघशाखेत एक स्वयंसेवक दुसऱ्या स्वयंसेवकाला राखी बांधतो. आपण दोघे एकमेकांचे रक्षण करू व राष्ट्रसेवेचे कार्य पुढे नेऊ. राष्ट्रकार्यात आपण सगळे एक-संघ, एकरस होऊ या.

आपले ध्येय एक, मार्ग एक आहे. ही त्या राखी बांधण्यामागची उदात्त भावना आहे. दरवर्षी हा रक्षाबंधनाचा सण आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. बाजारातून रंगीबेरंगी, भपकेदार भारी किंमतीच्या राख्या विकत आणल्या जातात. त्या बांधल्या जातात. पण या रक्षाबंधनाच्या मागचा उदात्त अर्थ लक्षात घेतोच असे नाही. रक्षाबंधन म्हणजे स्त्रीकडे पाहण्याच्या दृष्टीत बदल. रक्षाबंधन म्हणजे बहिणीच्या, समाजातील सर्व स्त्रियांच्या रक्षणाची जबाबदारी, रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या उदात्त, पवित्र प्रेमाचा अखंड वाहणारा झरा. रक्षाबंधन म्हणजे राष्ट्ररक्षणासाठी समाजाने एकसंघ, एकरस बनणे. राखी बांधताना, बांधून घेताना ही पवित्र भावना मनात ठेवली तरच खऱ्या अर्थाने रक्षाबंधन सण साजरा केला असे मानता येईल.

काय शिकलात?

आज आपण रक्षाबंधन माहिती, इतिहास मराठी । Raksha Bandhan Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Comment