१३ रामायण महाभारतातील गोष्टी । 13 Ramayan Mahabharat Stories in Marathi

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला १३ रामायण महाभारतातील गोष्टी । 13 Ramayan Mahabharat Stories in Marathi सांगणार आहे तर चला बघुयात.

१. श्रावण बाळ

अयोध्येचा राजा दशरथ. तो एकदा शिकारीला गेला. दिवसभर फिरला. त्याला शिकार मिळाली नाही. रात्र झाली. दशरथ राजा झाडावर बसला. शिकारीची वाट पाहू लागला. बुडबुड असा आवाज झाला. दशरथाने बाण सोडला. “आईगऽ मेलोऽ” असा – आवाज ऐकू आला. दशरथ राजा झाडाखाली उतरला. तळ्याकाठी गेला. तेथे एक मुलगा पडला होता. दशरथाचा बाण त्याला लागला होता. “बाळा कोण रे तू ?” ” माझे नाव श्रावण.” “इथे कशाला आला होतास?” श्रावण बाळ विवळत होता. तो कण्हत कण्हत म्हणाला, “मी आहे श्रावण बाळ. माझे आईवडील म्हातारे आहेत. आंधळे आहेत. आम्ही काशीयात्रा करून आलो. त्यांना खूप तहान लागली. मी पाणी घेण्यास इकडे आलो. पण -अरेरे ! राजा, हे पाणी घे. माझ्या आईवडिलांना दे. त्यांना माझा नमस्कार सांग.” श्रावण बाळ गेला. दशरथाने झारी घेतली. तो हळूहळू चालू लागला. श्रावणाचे आईवडील होते तेथे तो गेला. पावले वाजली. म्हातारा म्हणाला, “आलास बाळ? बोलत का नाहीस? रागावलास का? किती रे कष्ट घेतोस! आमची सेवा किती करतोस!” दशरथ राजा म्हणाला. “आई, बाबा, आधी हे पाणी प्या.” दशरथाचा आवाज ऐकला, म्हातारा दचकला, तो म्हणाला, “तू कोण? आमचा बाळ कोठे आहे?” ” मी दशरथ राजा आहे. माझ्या हातून बाळ मारला गेला.” ते ऐकताच, ती दोन म्हातारी माणसे धाडकन जमिनीवर पडली. मरता मरता म्हणाली, ” राजा दशरथा, आमचा घात केलास ! आम्ही पुत्रशोकाने मरत आहोत, तसा तू ही ‘पुत्र पुत्र’ म्हणत मरशील. मुलाचे नाव घेत घेत जाशील दशरथ अयोध्येला परत आला. त्याने वसिष्ठ गुरुजींना सांगितले. वसिष्ठ म्हणाले, “ठीकच झाले. तुला मुलगा नव्हता, तो आता होईल. तू यज्ञ कर ! देवाची सेवा कर ! हा शाप तुला वरदान ठरेल.”

तात्पर्य

१) कोणतेही काम करताना न बघता करू नये, त्याचे दुष्परिणाम स्वतःबरोबर इतरांनाही भोगावे लागतात.
२) आपल्याकडून झालेल्या चुकांची कबुली देऊन शिक्षा भोगण्यास तयार राहावे, शिक्षा भोगताना पुन्हा ती चूक न करण्याचा निश्चय करावा.
३) एखादी वाईट घटना घडली तरी त्यात चांगले शोधण्याची वृत्ती अंगी बाळगावी.
४) आपल्या आई-वडिलांची सेवा करण्यास सदैव तयार राहावे.

२. शाब्बास बाळांनो

दशरथाकडे विश्वामित्र आले. दशरथाने त्यांचे स्वागत केले. “या मुनिमहाराज बसा.” विश्वामित्र म्हणाले, ‘राजा, आम्ही यज्ञ करणार आहोत, पण राक्षस आम्हांला त्रास देतात. तुझी मुले राम आणि लक्ष्मण दोघेही शूर आहेत. त्यांना माझ्याबरोबर पाठव.” “पण, गुरुजी राम लक्ष्मण ही लहान मुले आहेत आणि राक्षस खूप दांडगे असतात.” “राजा, तू काळजी करू नकोस. राम फारच शूर आहे. तो राक्षसांना मारील. आमच्या यज्ञाचे रक्षण करील. ‘नाही’ म्हणू नकोस.” विश्वामित्रांनी आग्रह केला. दशरथ राजा कबूल झाला. राम आणि लक्ष्मण विश्वामित्रांबरोबर वनात गेले. त्यांना खूप आनंद झाला. दाट दाट झाडी, भयंकर जंगल. विश्वामित्र चालले होते. इतक्यात काय झाले ? अल्लल डु असा आवाज आला. त्यामागोमाग एक राक्षसीण आली. ती फारच प्रचंड होती. तिचे नाव ताटका. ती ओरडून म्हणाली, “मी या बाळांना खाणार !’ राम म्हणाला, “गुरुजी, या बाईला मारू का ? .. “हो. हो. दुष्टाला मारलेच पाहिजे!” विश्वामित्र म्हणाले. रामाने बाण मारले. दुष्ट ताटका धाडकन पडली. राक्षसिणीचा नाश झाला. रामाचा पराक्रम फार मोठा. गुरुजींनी शाबासकी दिली. मग ते तिघे पुढे गेले. तपोवनात यज्ञ सुरू झाला. राम आणि लक्ष्मण आले. सर्व ऋषींना आनंद झाला. त्यांनी यज्ञ सुरू केला. पाच सहा दिवस झाले. सातव्या दिवशी राक्षस आले. त्यांच्या झुंडीवर झुंडी आल्या. त्यांनी खूप धिंगाणा केला. राक्षस त्रास देऊ लागले. मग रामाने खूप बाण सोडले, खूप राक्षस मारले. राक्षसांना रामाची भीती वाटली. काही राक्षस पळून गेले. मग शांतपणे यज्ञ पूर्ण झाला. राम-लक्ष्मण फारच शूर. त्यांनी यज्ञाचे रक्षण केले. सर्वांनी त्यांची वाहवा केली. विश्वामित्र म्हणाले, “दुष्टांचा नाश केलास, ऋषीमुनींना आनंद दिलास, शाबास रामा, शाबास लक्ष्मणा!”

तात्पर्य

१) इतरांना मदत करण्यासाठी नेहमी समर्थ असावे.
२) संकटाला धैर्याने सामोरे जावे.

३. तू राजा हो !

आता राम मोठा झाला. तो राज्याचा कारभार पाहील. म्हणून समारंभ सुरू झाला. अयोध्येत खूप थाट केला, पण कैकेयी म्हणाली, “रामाला राज्य देऊ नका. माझा भरत राजा होईल, रामाला वनवासात पाठवा.” दशरथ राजाला वाईट वाटले, पण कैकेयीने हट्टच धरला. ही गोष्ट रामाला कळाली. तो म्हणाला, “ठीक आहे. भरत माझा भाऊ आहे. तो राजा होईल. मी वनात जाईन.” राम आणि सीता वनात गेले. बरोबर लक्ष्मण गेला. दशरथ राजाला खूप दुःख झाले. “राम राम” म्हणत त्याने प्राण सोडला. आजोळाहून भरत आला. आईचा हट्ट त्याला समजला. त्याला खूप राग आला. तो संतापला आणि म्हणाला. “आई, हे काय केलेस ! मला राज्य नको. मी रामाला परत आणणार, त्यालाच गादीवर बसवणार.” भरत वनात गेला. तो रामाला भेटला. भावाभावांची भेट झाली. भरत म्हणाला, “रामा अयोध्येला परत चला, आईने उगीच हट्ट घेतला. त्यामुळे वडिलांचा घात झाला. मला राज्य नको. मी तुमची सेवा करीन. त्यातच मला आनंद आहे.” रामाने भरताची समजूत घातली. तो म्हणाला, “भरता, तू राजा हो, मी आईची आज्ञा पाळीन. चौदा वर्षे वनात राहीन, मग अयोध्येला परत येईन.” असे खूप बोलणे झाले. शेवटी भरताने ठरविले, रामाच्या पादुका न्यायच्या, त्या सिंहासनावर ठेवायच्या. रामाच्या नावाने राज्य चालवायचे. रामाने ते कबूल केले. भरताने रामाच्या पादुका घेतल्या. रामाला कडकडून मिठी मारली. दोन भावांचे ते प्रेम ! त्यांच्या डोळ्यांतून अणूंचे पूर वाहू लागले. भरत परत आला. रामाच्या नावाने राज्य करू लागला. लोक म्हणाले, “वाहवा! याला म्हणतात भाऊ !”

तात्पर्य

१) आईने दिलेल्या आज्ञेचे पालन करणे हे आपले कर्तव्य असते.
२) भाऊ-बहिणींसाठी त्यागी वृत्ती व निस्सीम प्रेम ठेवावे.
३) मोठ्यांना सांगितलेल्या कामात चांगले वाईट न शोधता आज्ञाधारकतेने काम करावे.
४) पैसा, प्रतिष्ठा, सत्ता या सर्व गोष्टीपेक्षा प्रेम हेच महत्त्वाचे असते हे नेहमी लक्षात ठेवावे.

४. सीतेचा हट्ट

राम, लक्ष्मण आणि सीता असे तिघे रानात गेले. त्यांनी झोपडी बांधली. ते मजेत राहू लागले. तेथे राक्षस येत. खूप । त्रास देत, पण रामाने त्यांचा नाश केला. राक्षसांचा राजा रावण. त्याला रामाची गोष्ट कळाली. मग त्याने युक्ती केली. सोन्याचा हरीण सोडून दिला. झोपडीजवळ हरीण चरत की होता. सीतेने तो पाहिला. तिला तो फार आवडला. ती म्हणाली, “ मला हा हरीण पाहिजे !” रामाने धनुष्यबाण घेतला. तो हरिणाच्या पाठीस लागला. हरिणाने रामाला खूप दूर नेले. शेवटी रामाने बाण सोडला. तो कपटी हरीण मारला. मरता मरता हरीण ओरडला. “ हा सीतेऽ हे लक्ष्मणाऽ धावा, धावा !” सीतेने ती आरोळी ऐकली. तिने लक्ष्मणाला तिकडे पाठविले. “राम संकटात आहेत त्यांना मदत करा.”असा तिने हट्टच घेतला. मग लक्ष्मण निघून गेला. सीता एकटीच राहिली. रावणाने संधी साधली. तो साधू बनून आला. त्याने सीतेला उचलून नेले. तो थेट लंकेला गेला. इकडे राम परत आला. वाटेत त्याला लक्ष्मण भेटला. ती दोघे झोपडीत आली. पाहतात तर काय झोपडीत सीता नाही. कोठे गेली सीता ? खूप खूप शोध केला. पण छे ! सीता सापडली नाही. मग रामाला खूप दुःख झाले. “सीते, सीते,” असे म्हणत राम लक्ष्मण फिरू लागले. त्यांना एक पक्षी दिसला. त्याचे नाव जटायू. तो तडफडत पडला होता. त्याच्याजवळ राम गेले. जटायू म्हणाला. “रामा, लंकेचा राजा रावण त्याने सीता चोरून नेली. मी त्याच्याशी युद्ध केले. पण त्या राक्षसाने माझे पंख तोडले. लंकेला जा. सीतेला सोडवून आणा !” राम लक्ष्मण लंकेकडे निघाले. सीतेने हट्ट घेतला. त्याचा परिणाम असा झाला.

तात्पर्य

१) मुलांनो हट्टीपणा अधिक केल्याने आपलेच नुकसान होते. तसेच इतरांनाही त्रास होतो. म्हणून हट्टीपणा करू नये.
२) संकटकाळी घाबरून हताश न होता वेळीच योग्य निर्णय घेऊन पुढच्या कामास लागावे.

५. रामाचा सेवक

राम आणि लक्ष्मण दक्षिणेकडे चालले. वाटेत वानरांचे राज्य लागले. वाली आणि सुग्रीव हे दोन भाऊ; पण त्यांच्यात भांडण होते. सुग्रीवाचा मित्र मारुती. मारुती रामाला भेटला. रामाने सुग्रीवाला मदत केली. दुष्ट वालीला ठार मारले. सुग्रीव रामाचा मित्र बनला. तो म्हणाला, “आपण सीतेला सोडवून आणू.” ती कामगिरी मारुतीने घेतली. रामाची अंगठी घेऊन तो निघाला. वाटेत मोठा समुद्र लागला. मारुतीने समुद्र ओलांडला. तो थेट लंकेत गेला. अशोकवनात सीता होती. भोवती राक्षसिणींचा पहारा होता. मारुती झाडावर बसला. त्याने सीतेपुढे अंगठी टाकली. सीतेने ती अंगठी ओळखली. तिला नवल वाटले. मग मारुतीने ओळख दिली. “मी रामाचा सेवक आहे. आम्ही लवकरच लंकेला येऊ. दुष्ट रावणाला ठार मारू. तुम्हाला सोडवून नेऊ.” सीतेला आनंद झाला. मारुतीला भूक लागली होती. त्याने झाडांची फळे खाल्ली. अशोकवनाचा नाश केला. रखवालदार जंबू माळी मारुतीवर धावून आला. मारुतीने त्याला ठार मारले. रावणाला ही बातमी कळाली. त्याने हुकूम सोडला. “त्या वानराला धरून आणा.” मग खूप झटापट झाली. इंद्रजिताने मारुतीला धरले, मारुतीला रावणापुढे उभे केले. रावण ओरडला, “त्याच्या शेपटीला चिंध्या बांधा. याच्या शेपटीला आग लावा.” राक्षसांनी मारुतीचे शेपूट पेटवून दिले. मारुती तसाच उंच उडाला. त्याने साऱ्या लंकेला आग लावली. घरे धडाधड जळू लागली. सगळीकडे धावपळ झाली. सोन्याची लंका जळून गेली. मारुती समुद्रावर आला. समुद्र ओलांडून परत आला. त्याने रामाची भेट घेतली. सारी हकीगत रामाला सांगितली. मग वानर सैन्य लंकेकडे निघाले. त्याने समुद्रावर सेतू बांधला. शक्ती आणि भक्ती यामुळे ते काम पार पडले. रामाने रावणाला निरोप पाठविला, पण रावण काही ऐकेना. शेवटी युद्ध सुरू झाले.

तात्पर्य

१) प्रत्येक काम करताना आपली पूर्ण शक्ती वापरून श्रद्धेने काम करावे म्हणजे तुम्ही नक्कीच विजयी व्हाल.
२) योग्य वेळी योग्य निर्णय घेता येणे हे फार महत्त्वाचे असते.

6. सुखाचे राज्य

रावणाचा भाऊ कुंभकर्ण. मोठा अगडबंब राक्षस. पण रामाने त्याला ठार मारले. रावणाचा मुलगा इंद्रजित तो फार शूर. पण लक्ष्मणाने त्याला ठार केले. रावण खूपच चिडला. त्याने लक्ष्मणाला घायाळ केले. मारुतीने द्रोणागिरी आणला. त्यावर औषधी वनस्पती होती. ती लक्ष्मणाला दिली. लक्ष्मण पुन्हा सावध झाला. राम आणि रावण यांची जोराची लढाई झाली. रावण फारच बलवान होता; पण रामापुढे त्याचे काहीच चालेना. रामाने रावणाला बाण मारला. रामाचा बाण म्हणजे दिव्यशक्ती. रावण धाडकन पडला. रामाने रावण मारला. दुष्टांचा नाश झाला. रामाला जय मिळाला. सर्वांना आनंद झाला. रामाने सीतेला सोडविले. राम अयोध्येला निघाले. रावणाचा तिसरा भाऊ बिभीषण. रामाने त्याला लंकेचे राज्य दिले. बिभीषण रामाचा भक्त होता. चौदा वर्षे पूर्ण झाली. राम, लक्ष्मण, सीता, सुग्रीव, हनुमान आणि बिभीषण सगळे अयोध्येला आले. भरत रामाची वाट पाहत होता. भरताला खूपच आनंद झाला. भावाभावांची भेट झाली. सगळी अयोध्या आनंदात न्हाली. अयोध्येत मोठा थाट केला. रामाला गादीवर बसविले. रामराजा फारच थोर. त्याने उत्तम राज्य केले. सारी प्रजा सुखी झाली. कोठेच काही कमी नाही. जिकडे तिकडे आनंदी आनंद, असे सुखाचे राज्य असले की त्याला म्हणतात रामराज्य! ही रामाची कथा म्हणजेच रामायण. वाल्मीकी ऋषींनी लिहून ठेवले. श्रावणबाळाची सेवा, राम-लक्ष्मणाचा शूरपणा, भरताचा बंधुभाव, कपटी रावणाचा दुष्टपणा, मारुतीची शक्ती आणि भक्ती, शेवटी दुष्टांचा नाश आणि रामाचे यश या गोष्टी आपण लक्षात ठेवू. मोठेपणी मोठे रामायण आणखी वाचू !

तात्पर्य

१) कोणत्याही संकटाला शौर्याने सामोरे जावे व आपली पूर्ण शक्ती लावून काम करावे.
२) इतरांच्या सुखासाठी काम करण्यास शिकावे.

7. द्रोणाचार्यांनी घेतलेली परीक्षा

द्रोणाचार्य : मुलांनो इकडे या !
मुले : (पाचसात मुले येऊन वंदन करून) काय काम आहे गुरुजी?
आचार्य : आज मी तुमची परीक्षा घेणार आहे.
मुले : वा. फार छान. विचारा प्रश्न !
आचार्य : प्रश्न विचारणार नाही. काम सांगणार.
मुले : जशी आपली इच्छा.
आचार्य : अरे पण तुमचे धनुष्यबाण कुठे आहेत ?
मुले : कामाच्या वेळी धनुष्यबाण कशाला ?
आचार्य : धनुष्यबाणांचेच काम आहे आणि त्याच कामात परीक्षा आहे.
मुले : जशी आपली इच्छा.
आचार्य : जा पळा. धनुष्यबाण आणा आपापले.
मुले : जशी आज्ञा (मुले जातात.)
आचार्य : वाहवा. कसा छान नकली पोपट केला आहे हा ! रंग किती सुरेख! हा हुबेहूब खराच पोपट दिसतो ! याचे डोळे किती चमकदार आहेत! हं. आता हा पोपट त्या झाडावर बसवून येतो. पाहू या परीक्षा. (तो पोपट घेऊन आत जातात.) (मुले धनुष्यबाण घेऊन येतात. थोडी गडबड चालते.)
मुले : अरे, गडबड बडबड बंद करा. गुरुजी आले!
आचार्य : हं. छान ! आता हे पाहा. तुमची परीक्षा आहे ! नीट लक्ष देऊन काम करा. यश मिळवा.
मुले : पण काम कोणते करायचे?
आचार्य : सांगतो. सांगतो. ते पाहा समोर ते झाड दिसते ना? ते ते उंच झाड. सर्वात मोठे आहे ते.
मुले : हो, हो, ते उंच झाड. मोठे झाड. दिसले झाड.
आचार्य : त्या झाडाच्या फांदीवर पोपट बसला आहे.
मुले : हो हो दिसला! दिसला तो पोपट! वा सुंदर!
आचार्य : त्या पोपटाच्या डाव्या डोळ्यावर तुम्हाला नेमका बाण मारायचा आहे ! आले का लक्षात?
मुले : त्या पोपटाच्या डाव्या डोळ्यावर नेमका बाण मारायचा! हो हो आता आले लक्षात!
आचार्य : चला. एकेकजण पाळीपाळीने या ! दुर्योधना, पहिला मान तुला. चल पुढे ये! धनुष्याला बाण जोड. पोपटाच्या डाव्या डोळ्यावर नेम धर ! धरलास नेम ? हं आता थांब. तुला समोर काय काय दिसते आहे ?
दुर्योधन : गुरुजी, मला समोर आकाश दिसते आहे. ते मोठे झाड दिसते आहे. फांदीवर पोपट आहे.
आचार्य : थांब जरा. बाण सोडू नकोस. इकडे उभा राहा.
दुर्योधन : पण गुरुजी. माझी परीक्षा
आचार्य : झाली तुझी परीक्षा. इकडे बाजूला उभा राहा. आता धर्मराज तुमची पाळी. पुढे या असे. हं. धनुष्याला बाण जोडा, नेम धरा. धरला? हं! आता सांगा तुम्हाला समोर काय काय दिसते?
धर्मराज : समोर मला झाड दिसते आहे. मोठे झाड! फांद्या दिसतात. पोपट दिसतो. फळे दिसतात!
आचार्य : छान, थांबा जरा. बाण सोडू नका. इकडे बाजूला उभे राहा. तुमची परीक्षा झाली. आता भीमाची पाळी. भीमदादा या पुढे !
दुशासन : गुरुजी या आडदांड भीमाने मला धक्का दिला.
आचार्य : काय भीमा? अरे परीक्षेच्या वेळीही हे असे?
भीम : गुरुजी मी पुढे येत होतो तर मध्ये हाच आडवा आला.
आचार्य : असू दे ! चल. धनुष्याला बाण जोड ! नेम धर. तुला समोर काय काय दिसते?
भीम : मला समोरचे सगळेच दिसतात. आकाश, ढग, झाडे, फांद्या, पोपट, फळे, पण माझ्या मागचे मात्र दिसत नाही.
आचार्य : पुरे पुरे. झाली तुझी परीक्षा. इकडे बाजूला दूर उभा राहा. कोणाला धक्काबुक्की करू नकोस. आता अर्जुना तू पुढे ये. नेम धर, तुला काय दिसते?
अर्जुन : गुरुजी मला फक्त त्या पोपटाचा डावा डोळाच दिसतोय. बाकीचे काहीच दिसत नाही.
आचार्य : शाब्बास. सोड बाण. वाहवा. यशस्वी. धनंजया, तू पास झालास. मुलांनो, मन एकाग्र केले की मगच नेम लागतो. यश मिळते. तुमचे मन एकाग्र होते की नाही याचीच ही परीक्षा होती! अर्जुन एकटाच उत्तीर्ण झाला. धन्य धनंजय! शेवटी सर्व मुले ओरडतात धनंजय पास झाला.

तात्पर्य

१) कोणतेही काम करताना एकाग्रतेने करावे. म्हणजे त्या कामात आपणास यश मिळते.
२) आपल्या क्षेत्रातील संपूर्ण ज्ञान आपणास अवगत असावे.

8. आपण सारे भाऊभाऊ

पांडव वनवासात होते. त्यांचे खूप हाल होते. तरीही ते मजेत राहत. याचे कौरवांना वाईट वाटे. कौरवांना वाटले, वनात जावे. आपला थाट पांडवांना दाखवावा म्हणजे त्यांना लाज वाटेल. ते आपल्याला शरण येतील. कौरवांनी हत्ती, घोडे बरोबर घेतले. ते थाटात वनात गेले. वाटेत त्यांना गंधर्व भेटले. त्यांच्याशी कौरवांचे भांडण जुंपले. गंधर्व मोठे बलवान होते. त्यांनी कौरवांना कैद केले. आलो कशाला आणि झाले काय असे कौरवांना होऊन गेले. पांडवांना ती गोष्ट कळली. धर्मराजाने मग घाई केली. “जा रे भीमा, अर्जुना जा, आपले भाऊ घेऊन या !” भीम म्हणाला, “हे बरे झाले. दुष्ट कौरव स्वर्गाला गेले! आम्हांला ऐट दाखवायला आले, मध्येच मोडली खोड. हे छान झाले!’ “नाही नाही भीमा, कौरव आपले भाऊ आहेत. त्यांना सोडवून आणलेच पाहिजे. घराण्याचे नाव राखलेच पाहिजे. आपण आपसात भांडतो, तेव्हा ते शंभर व आपण पाच; पण परक्यांनी हल्ला केला तर आपण सारे एकशेपाच !” धर्मराजाचे बोलणे साऱ्या पांडवांना पटले. शत्रूशी लढायला सारे उठले. पांडव फारच पराक्रमी. गंधर्वांशी लढले. त्यांचा पराभव केला. कौरव भावांना सोडवले. धर्मराजापुढे दुर्योधन उभा राहिला. त्याने मान खाली घातली. तो लाजला आणि थिजला. धर्मराज म्हणाले, “दुर्योधना, चला भोजनाला जाऊ. कितीही झाले तरी आपण सारे भाऊ भाऊ !”

तात्पर्य

१) आपल्याशी कुणी वाईट वागले म्हणून आपण वाईट वागू नये तर त्यांच्याशी चांगले वागावे म्हणजे त्यांना त्यांच्या वाईट कामाबद्दल दुःख होईल व ते चांगले वागतील.
२) जे दुसऱ्यांबद्दल वाईट चिंततात किंवा वाईट वागतात त्यांना स्वतःलाच वाईट अनुभव येतात.

9. भीम आणि मारुती

पाच पांडव, पाच भाऊ. मधला भाऊ भीम. तो फार दांडगा होता. त्याला सारेजण भीत! भीमाला वाटले, मी फार बलवान ! माझ्यासारखा कोणी नाही. वा फारच एकदा गंमत झाली. भीम झाली गेला फिरायला. रानात एक वानर होते. ते शेपूट पसरून बसले होते. भीम म्हणाला, “अरे ए वानरा, वाटेत काय बसलास? माझी वाट सोड. बाजूला हो!” वानर म्हणाले, “काय करू बाबा, मी झालो म्हातारा. मला उठवत नाही. तूच माझी शेपटी उचल. ती बाजूला कर, तुझी वाट मोकळी कर.” भीमाला राग आला. तो शेपटी उचलू लागला. पण काय गंमत. त्याला ती शेपटी उचलेना. त्याने दातओठ खाल्ले दोन्ही हात लावले. खूप मा जोर केला; पण शेपटी काही हलेना. वानर हसत म्हणाला, “एवढीशी शेपटी उचलेना; मग तू कसला बलवान?” भीमाला लाज वाटली. त्याने मान खाली घातली. भीमाचा अभिमान गेला. त्याने वानर नीट पाहिला. तो होता मारुती. भीम खाली वाकला. मारुतीपुढे नमला. हात जोडून म्हणाला, “रामदुता, क्षमा करा. माझा अभिमान दूर करा.” मारुतीने क्षमा केली. भीमाला एक गोष्ट सांगितली, “दीनांचे रक्षण कर. शक्तीचा उपयोग कर. उगाच आडदांड बनू नको. त्रास कुणाला देऊ नकोस.”

तात्पर्य

१) कोणत्याही गोष्टीचा गर्व बाळगू नये.
२) आपल्या बुद्धीचा चांगल्या कामासाठी उपयोग करावा. शक्तीच्या गर्वात राहून त्याचा दुरुपयोग करू नये.
३) आपल्याकडून झालेल्या चुकांची क्षमा मागावी त्यासाठी व्यक्तीमध्ये नम्रता, विनयशीलता असावी.

10. चिंधी

सुभद्रा आणि द्रौपदी. दोघी कृष्णाच्या बहिणी. पण कृष्णाला द्रौपदी फार आवडे. सुभद्रेला त्याचे वाईट वाटे. सुभद्रेकडे एकदा कृष्ण आला. भूक लागली होती त्याला. सागर सुभद्रेने त्याला एक आंबा दिला. तो कृष्णाने विळीने चिरला. चिरता चिरता कृष्णाचे बोट कापले. खूप रक्त भळभळ वाहू लागले. तितक्यात द्रौपदी तेथे आली. तिने झटकन आपली पैठणी फाडली. कृष्णाच्या बोटाला तिने ती चिंधी बांधली. ते पाहून सुभद्रा लाजून गेली. ती म्हणाली, “कृष्णा, द्रौपदी खरी बहीण आहे. तिचेच प्रेम तुझ्यावर जास्त आहे. भावाच्या रक्तापुढे द्रौपदीला भरजरी पैठणीची किंमत नाही. मी मात्र वेडी. मी घरात जुनीच चिंधी शोधीत बसले. कृष्णा मला क्षमा कर.” “ताई, ते सारे सोडून दे. मला आधी खायला दे. दोघी बहिणी मला आवडतात. दोघीही माझ्यावर प्रेम करतात!” मग तिघे घरात गेले. त्यांनी गोड गोड जेवण केले.

तात्पर्य

१) प्रेमापुढे पैशाची किंमत कधी ठेवू नये.
२) पैशापेक्षा माणसे व नाती संबंध महत्त्वाची असतात हे कायम लक्षात ठेवावे.
३) वेळेचे भान ठेवून निर्णय घेणे व त्याला अनुसरून कृती करण्याला खूप महत्त्व असते.

11. बाळ प्रल्हाद

हिरण्यकशिपू राक्षस. तो सर्वांना त्रास देत होता. त्याचा मुलगा प्रल्हाद. तो फार चांगला होता. प्रल्हाद देवाचे नाव घेई. हिरण्यकशिपू त्याला त्रास देई. “देव आपले शत्रू आहेत. आपला नाश करीत आहेत.” वडिलांना प्रल्हाद म्हणायचा, “वाईट वागणे सोडा.” पण ते त्यांना आवडेना. ते प्रल्हादाचा छळ करू लागले. वडिलांनी प्रल्हादाला तेलाच्या कढईत टाकले. डोंगरावरून लोटले. तरीही प्रल्हाद मेला नाही. त्याने देवाचे नाव सोडले नाही. एके दिवशी काय झाले. प्रल्हादाला वडिलांनी विचारले.. “तू देवाचे नाव घेतोस, तो देव आहे तरी कोठे ?” इथे आहे, तिथे आहे, देव सगळीकडे आहे. आपला अभिमान सोडला पाहिजे. देवाची भक्ती केली पाहिजे.” जवळच एक खांब होता. हिरण्यकशिपू म्हणाला, “या खांबात आहे का देव?” “आहे आहे !” प्रल्हाद मामले म्हणाला. हिरण्यकशिपूने खांबाला लाथ मारली. खांब कडाकड मोडला. खांबातून देव प्रगट झाला. नरसिंहाचे रूप पाहून राक्षस घाबरला. नरसिंहाने हिरण्यकशिपूला धरले. मांडीवर घेऊन ठार मारले. प्रल्हाद म्हणाला, “देवा हे काय केले. माझ्या वडिलांना असे का मारले?” “जो नेहमी वाईट वागतो. त्याला देव अशीच शिक्षा करतो. नेहमी चांगले वागले पाहिजे. जगावर उपकार केले पाहिजेत. बाळ प्रल्हादा, तू मला आवडतोस. चांगला वागतोस. देवाला भजतोस. तू लोकांवर उपकार कर. सारे जग सुखी कर.” प्रल्हादाने ते कबूल केले. मग नरसिंह निघून गेले. लोकांनी प्रल्हादाचे कौतुक केले. प्रल्हादाचे नाव साऱ्या जगात झाले.

तात्पर्य

१) “ज्याचे जैसे कर्म तैसे फळ देते रे ईश्वर” हे नेहमी लक्षात ठेवून नेहमी चांगले वागले पाहिजे.
२) इतरांच्या कल्याणासाठी आपला काही वेळ, पैसा खर्च करावा.
३) तसेच देवावरची श्रद्धा कायम ठेवावी.

12. कृष्णाचं सामर्थ्य

श्रीकृष्ण आणि गोकुळातले त्याचे सगळे सवंगडी दररोज आपली गाई, गुरे चरायला वृंदावनात घेऊन जात असत. तेथे गेल्यावर गाई गुरांना चरायला सोडून श्रीकृष्ण आणि जरा त्याचे सवंगडी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत असत. कधी आपली मुरली वाजवून कान्हा सगळ्यांना मंत्रमुग्ध करून टाकत असे. उन्हाळ्याचे दिवस होते. यमुना नदीचा भव्य डोह जवळच होता. बऱ्याच गोपाळांना खूप तहान लागली होती. ते आपली गाई-गुरे घेऊन डोहाजवळ आले. ते तिथले पाणी प्यायले; पण पाणी पिताच सगळे मृत्युमुखी पडले. याचं कारण असं होतं की, यमुनेच्या डोहात ‘कालिया’ हा नागांचा राजा राहत होता. तो अत्यंत विषारी होता. त्याच्यामुळे यमुनेचे पाणी विषमय झालं होतं. काही गोपाळ धावतच कृष्णाकडे आले. श्रीकृष्णाने पाहिलं विषमय पाणी ‘प्यायल्यामुळे आपले अनेक सवंगडी आणि गाई-गुरे मरून पडली आहेत. त्याने आपल्या अमृतदृष्टीने सगळ्यांना जीवदान दिलं. सगळेजण उठून बसले. श्रीकृष्णाने ठरवलं की, कालियाला आपण इथून हाकलून द्यायचं. कालिया इतका भयंकर विषारी होता की, यमुना नदीवरून उडणारे पक्षीही त्याच्या विषारी फुत्कारांमुळे मरून पडतं. काठावरील सुंदर वृक्षवेली, फळे, फुले सगळंच करपून गेलं होतं. गरुडराजाच्या भीतीने कालियानाग यमुनेच्या डोहात लपून बसला होता. कारण फार वर्षांपूर्वी यमुनेतल्या जलचरांच्या विनंतीवरून सौभरी ऋषींनी गरुडाला शाप दिला होता की, यमुनेच्या काठी तू आलास तर मरून पडशील. त्यामुळे गरुडराज तिथे येऊ शकत नव्हता. या संधीचा कालियाने फायदा घेतला होता. कृष्णाने यमुनेच्या डोहात उडी मारली. डोहाच्या तळाशी कालिया लपला होता. श्रीकृष्णाने त्याला धरून जोरात ओढलं. कालिया चवताळला, दोघांमध्ये भीषण युद्ध सुरू झालं. कालिया आपले विषारी फुत्कार कान्हांवर सोडू लागला. त्याच्या सर्वांगास त्याने विषारी दंश केला. अर्थात श्रीकृष्णसुद्धा चांगलाच संतापला. त्याने कालियाला जोरदार ठोसे मारायला सुरुवात केली. त्याचा प्रचंड फणा ठोसे मारून त्याने वेडावाकडा करून टाकला. कालिया काही कमी नव्हता. त्याने श्रीकृष्णाला आपला विषारी विळखा घातला आणि घट्ट आवळायला सुरुवात केली. कन्हैयानेही आपल्या योगमायेने आपले शरीर इतके फुगवले की कालियाचा विळखा गळून पडला. दोघेही शक्तिमान असल्याने त्वेषाने युद्ध करत होते. इकडे यमुनेच्या काठावर कृष्णाचे सवंगडी उभेच होते. खूपच वेळ झाला तरी कृष्ण पाण्याच्यावर येईना. हे बघून सगळे घाबरले. काही गोपाळ गोकुळात नंद यशोदेला बोलवायला पळाले. बातमी ऐकून सगळं गोकुळच यमुनाकाठी जमा झालं. यशोदा कान्हाच्या काळजीने रडू लागली नंदबाबांनाही काय करावं समजेन समजूत घालू लागले. इकडे श्रीकृष्णाने कालियाला गरगर फिरवून त्याचे शेपूट हातात पकडले आणि त्याच्या फण्यावर उभे राहिले. नागराजाने आता हार पत्करली, त्याची बायका मुलेही श्रीकृष्णाला शरण आली आणि कालियाच्या जीवदानाची भीक मागू लागली.. कालिया यमुनेच्या पाण्यावर आला. त्याच्या फण्यावर बाळकृष्ण उभा होता. आजूबाजूला त्याची बायका मुले हात जोडून उभी होती. याच वेळी आकाशातून देवदेवता श्रीकृष्णावर पुष्पवर्षाव करीत होते. श्रीकृष्णाने शरण आलेल्या कालियाला ‘तुला कोणीही त्रास देणार नाही’ असा वर दिला. कान्हाने नागराजाला समुद्रात धाडून दिले आणि यमुनेचे पाणी अमृतमय केले. हे सगळ दृश्य पाहून गोकुळवासी आनंदित झाले. यशोदामातेने बाळकृष्णाला हृदयाशी घट्ट कवटाळून धरले. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.

तात्पर्य

१) संकटात धैर्याने सामोरे जावे.
२) इतरांना मदत करण्यासाठी नेहमी समर्थ असावे.

13. कृष्णाला शिक्षा

श्रीकृष्ण चांगलाच खोडकर होता. यशोदामातेस आणि गोकुळच्या गोपींना त्याच्या खोड्यांचा चांगलाच प्रसाद मिळत होता. श्रीकृष्णाची बालसेना एखाद्या गोपीकडे जाऊन तिच्या घरातले सगळे दूध, लोणी फस्त करून टाकत. सगळ्या गोपी यशोदेकडे नेहमी श्रीकृष्णाच्या काही ना काही तक्रारी घेऊन येत असत. एकदा यशोदा अशीच श्रीकृष्णाला मांडीवर घेऊन अंगणात बसली होती. ती त्याला प्रेमाने काहीतरी समजावून सांगत होती. घरात चुलीवर भाजी शिजत ठेवली होती. भाजी करपल्याचा वास आल्याने यशोदेने झटकन कृष्णाला खाली ठेवले आणि ती आत पळाली. आई आपल्याला टाकून गेली, याचा छोट्या कृष्णाला खूपच राग आला. रागारागाने त्याने शिक्यावरची मडकी फोडली. अंगणातला पाण्याचा हंडा ओतून दिला. काही वेळाने यशोदा बाहेर आली. हे सगळं दृश्य पाहून ती चांगलीच संतापली. ती कृष्णाला म्हणाली ‘कृष्णा’ आजपर्यंत सगळ्या गोपी माझ्याकडे तुझ्या तक्रारी घेऊन येत; पण मी त्या खऱ्या मानल्या नाहीत, आज मात्र माझी खात्रीच पटली आहे की तू गावात सगळ्यांना त्रास देतोस. थांब तुला चांगली शिक्षाच करते. अंगणातच एक मोठे उखळ होते. यशोदेने एक दावे आणले आणि श्रीकृष्णाला उखळाला बांधून ठेवले. एवढ्यात आजूबाजूच्या गोपी तिथे जमा झाल्या होत्याच, त्या म्हणाल्या यशोदे या माखनचोराला चांगली शिक्षा कर आम्ही तुला सांगत होतो, पण तुझा विश्वास बसत नव्हता ना! आता कळलं ना, कसा आहे तुझा हा नटखट कान्हा! सगळ्या गोपी उखळाला बांधलेल्या श्रीकृष्णाला चिडवू लागल्या. थोड्या वेळाने सगळ्या निघून गेल्या, यशोदाही घरात गेली. इकडे श्रीकृष्ण उखळ ओढत ओढत हळूहळू अंगणाच्या एका टोकाकडे जाऊ लागला. तेथे दोन अतिप्रचंड वृक्ष शेजारी शेजारी उभे होते. त्या दोन वृक्षांमधून श्रीकृष्ण पलीकडे जाऊ लागला. त्या दोन वृक्षांमध्ये छोटीशी फट होती. त्या फटीत उखळ अडकले. श्रीकृष्णाने जोर लावून ते ओढल्याबरोबर काडकाड असा मोठा आवाज करून ते दोन्ही प्रचंड वृक्ष भुईसपाट झाले. आणि काय आश्चर्य, त्या दोन वृक्षांमधून दोन तेजस्वी पुरुष बाहेर आले. श्रीकृष्णासमोर ते हात जोडून उभे राहिले. ते दोन तेजस्वी पुरुष श्रीकृष्णाला म्हणाले हे कन्हैय्या! आम्ही दृष्ट गंधर्व होतो. आमचे नाव यमल आणि अर्जुन असे आहे. मागील जन्मी आम्ही अत्यंत धनाढ्य अशा कुबेराचे पुत्र होतो. आम्हाला आमच्या श्रीमंतीचा आणि रूपाचा खूपच गर्व होता. एकेदिवशी आम्ही मदिरा पिऊन अप्सरांबरोबर जलक्रीडा करीत होतो. त्याच वेळी देवर्षी नारदमुनी तेथून चालले होते. आम्ही त्यांना पाहिले, पण आम्ही आमच्याच मस्तीत दंग होतो. आम्ही आमची जलक्रीडा थांबवली नाही. तसंच नारदमुनींना अभिवादनही केलं नाही. आमचं हे असभ्य वर्तन पाहून देवर्षी संतापले. त्यांनी संतापाच्या भरात आम्हा दोघांना शाप दिला की, तुम्ही दोघे वृक्ष व्हाल. हा शाप ऐकल्यावर मात्र आम्ही घाबरलो. आम्ही नारदमुनींचे पाय धरले. खूप गयावया करू लागलो. खूप क्षमायाचना केली. यापुढे वाईट वागणार नाही, आम्हाला उ:शाप द्या असे म्हणून त्यांचे पाय घट्ट पकडून बसलो. नारदमुनींना आमची दया आली. त्यांनी उश्शाप दिला की, श्रीविष्णू-ज्यावेळी कृष्णावतार घेतील त्यावेळी त्यांच्या पदस्पर्शाने तुमचा हा शाप नाहीसा होईल व परत तुम्ही गंधर्व बनून सुखी जीवन जगाल! श्रीकृष्णा तुझ्यामुळेच आज आमचा उद्धार झालेला आहे. असे बोलून श्रीकृष्णाला साष्टांगनमन करून दोघे गंधर्वलोकी निघून गेले. पडलेल्या वृक्षांचा प्रचंड कडकडाट ऐकून यशोदामाता तसेच आजूबाजूचे गोप, गवळणी तेथे गोळा झाल्या होत्या. यशोदेने चटकन कृष्णाला उचलून छातीशी धरले. बाळा आता मी तुला शिक्षा करणार नाही. कृष्णाला उराशी घट्ट कवटाळून त्याचे पापे घेत ती सारखी म्हणू लागली. तिच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या होत्या. श्रीकृष्णावरचे संकट टळले म्हणून सगळे आनंदित झाले.

तात्पर्य

१) इतरांची खोडी केली तर आपलेच नुकसान होत असते.
२) श्रीमंतीचा आणि रूपाचा कधीही गर्व करू नये. आपलेच नुकसान होत असते.
३) नेहमी क्षमाशील असावे.

काय शिकलात?

आज आपण १३ रामायण महाभारतातील गोष्टी । 13 Ramayan Mahabharat Stories in Marathi या पोस्ट मध्ये पाहिल्या आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Comment