रांझेकर पाटलाचे हातपाय तोडले

विजापूरात भर दरबारात शिवबाने जो अपूर्व बाणेदारपणा दाखविला तो पाहून शहाजीराजांची खातरी पटली. हे तेज अंधारात कोंडता येणार नाही. या शिवबाचा जन्मच मुळी निराळ्या कार्यासाठी आहे. तो स्वयंप्रकाशी आहे. आपल्याला जे जमले नाही ते हा करून दाखवील. आई भवानीची आणि शंकराचीही हीच इच्छा असेल. प्राण गेले तरी हा कुणाचीही गुलामगिरी स्वीकारणार नाही. याला पुण्याच्या डोंगरदऱ्यात सोडणेच योग्य ठरेल.

शिवबा विजापुरातल्या वातावरणाने अगदी गुदमरून गेला. या विजापुरातून आपण केव्हा एकदा बाहेर पडतो असे शिवबाला झाले होते. शहाजीराजांनी शिवाजीला पुण्याला पाठविण्याचे ठरविले. जिजामाता, दादोजी कोंडदेव आणि इतर पाच-सात विश्वासू अधिकाऱ्यांसह शिवबा पुण्यास आला. तो पुण्यास आला तो स्वराज्यस्थापनेचं वेड’ शतपटीनं भक्कम करूनच. शिवबा पुण्यात आला. लाल महाल पुन्हा गजबजला.

चैतन्यानं भरून गेला. दादोजी आपले वृद्धत्व विसरून नव्या दौलतीचा थाट मांडण्यासाठी कामाला लागले. शिवबाला बरोबर घेऊन मावळात फिरू लागले. मावळ खोऱ्यातले मराठा, देशमुख, देशपांडे, पाटील, कुलकर्णी आपल्याशी निष्ठेने बांधले गेले, तर मावळपट्टी बादशहालाच काय यमालाही जिंकता येणार नाही. अशी दादोजींची खातरी होती. ते वतनदारांना सांगत होते, ‘स्वत:च्या वतनासाठी आपापसांत लढू नका.

तुमच्या बायका, मुलींच्या अब्रूवर, तुमच्या धर्मावर, मालमत्तेवर घाला घालणाऱ्या, देशद्रोही, धर्मद्रोही शत्रूच्या विरुद्ध दंड थोपटून उभे राहा. तुमच्या रक्षणकर्त्याच्या मागे सर्व शक्तीनिशी ठामपणे उभे राहा.’ शिवबाचा बाणेदारपणा, त्याचे सर्वांशी प्रेमाने बोलणे, त्याचा आत्मविश्वास पाहून मावळ खोऱ्यातील तरुण पोरे भारावून गेली. शिवबा सांगेल ते करावयास एका पायावर उभी राहिली. शिवबाला हे जाणवत होते की, आपले हे तरुण मित्रच उद्याचे राज्यकर्ते होणार आहेत. तो आपल्या मित्रांना सांगत असे, ‘आपले राज्य व्हावे. हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे.’ शिवबा हा सगळ्या तरुणांचे स्फूर्तिस्थान होता.

शिवबाच्या मार्गदर्शनाखाली ही तरुण पोरे शस्त्रास्त्रांचे शिक्षण घेऊ लागली. शत्रूशी गनिमीकाव्याने कसे युद्ध करायचे, शत्रूने पाठलाग केला, तर त्याला कसे चकवायचे, केव्हा युद्ध करायचे, केव्हा माघार घ्यायची यात ही तरुण पोरे तरबेज होऊ लागली. शिवबाने प्रत्येकाच्या मनात परकीय राज्यकर्त्यांच्या विषयी कमालीची चीड आणि स्वातंत्र्याची दुर्दम्य इच्छा निर्माण केली.

आता शिवबाच्या नावाने जहागिरीचा कारभार सुरू झाला. शहाजीराजांचे पाठबळ व मार्गदर्शन त्याला मिळत होते. राखावी बहुतांची अंतरे। राज्य येते तदनंतरे।। हे शिवबाला चांगले समजत होते. जुलूम, जबरदस्ती, अन्याय, अनीती यांविषयी शिवबाला अत्यंत चीड होती. कोणत्याही स्त्रीचा झालेला अपमान त्याला जराही सहन होत नसे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तंत्र देवता: ॥ ‘जेथे स्त्रीची पूजा होते तेथे देवता वास्तव्य करतात’ या वचनावर त्यांची पूर्णश्रद्धा होती.

स्त्रीचा अवमान झाला म्हणूनच रावणसत्ता नष्ट झाली; द्रौपदीची अवहेलना झाली म्हणूनच कौरव नष्ट झाले’ हे त्यांनी ऐकले होते. आणि एकेदिवशी एक भयंकर प्रकार घडला. अतिभयंकर! आणि तोही शिवाजींच्या जहागिरीत! रांझ्यात! रांझे म्हणजे जिजाबाईंच्या खासगी खर्चासाठी असलेले खेडशिवापूरजवळचे गाव. रांझेगावचा बाबाजी गुजर पाटील अतिशय उन्मत्त झाला होता. रांझे गाव म्हणजे आपली स्वत:ची जहागिरी आहे असे तो समजत होता. गावातील तरण्याताठ्या पोरीबाळी म्हणजे आपली खासगी मालमत्ता असे तो समजत असे.

एके दिवशी रांझे गावातील एक विवाहित तरुणी कपडे धुण्यासाठी नदीवर गेली होती. नदीवर ती एकटीच असल्याचे पाहून पाटलाने बळजबरीने तिची अब्रू लुटली; त्यामुळे त्या तरुणीने नदीच्या डोहात उडी टाकून जीव दिला. तिचे वडील शिवरायांच्या वाड्यावर आले व घडलेला प्रकार त्यांनी रडत रडत शिवरायांना सांगितला. हे ऐकताच शिवरायांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. संताप संताप झाला. परस्त्रीला मातेसमान मानणाऱ्या शिवबांच्या मुलखात पाटलासारख्या एका जबाबदार माणसाने रावणी गुन्हा केला होता. शिवरायांना हे सहन होणे शक्यच नाही.

असल्या अपराधाला शिवरायांकडे क्षमा नाहीच. कामाला . शिवरायांनी येसाजीला ताबडतोब रांझ्यास जाऊन त्या हरामखोर पाटलाला पकडून आणण्यास सांगितले. येसाजी रांझेकर पाटलाला पकडून आणावयास गेला असता पाटील मोठ्या गुमीत त्याला म्हणाला, अरे, तुझा तो कोण पोरसवदा स्वत:ला राजा समजतो, पण त्याला सांग हा रांझेकर पाटील पिढीजात पाटील आहे. येथे माझी सत्ता चालते.

मी माझ्या गावात वाटेल ते करीन. त्या शिवाजीला नसती उठाठेव हवी कशाला?” येसाजीने परत जाऊन शिवरायांना त्या पाटलाचा निरोप जसाच्या तसा सांगितला. तो निरोप ऐकताच भयंकर चिडलेल्या शिवरायांनी आपल्या ढालाईतांना रांझे गावी जाऊन त्या पाटलाला पकडून आणावयाची आज्ञा केली. त्या ढालाईतांनी बाबाजी पाटलाला पकडून फरफटत आणले व शिवरायांपुढे उभे केले. शिवरायांनी पाटलाच्या गुन्ह्याची शहानिशा केली.

पाटलाचा गुन्हा शाबीत झाला. मग शिवरायांनी कडाडून हुकूम सोडला, “ह्या हरामखोराचे हातपाय तोडा.” सेवकांनी तसे करताच शिवरायांच्या आज्ञेनुसार पाटलाची गाढवावरून धिंड काढली आणि त्याचे पाटीलकीचे वतन काढून घेतले. गुन्हेगाराबद्दल शिवरायांचा राग, चीड काय असते हे लोकांनी पाहिले ; त्यामुळे दुष्टदुर्जनांना मोठीच दहशत बसली.

Leave a Comment