शहाजीराजांची सुटका

पुरंदर गड जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या फत्तेखानाचा पार फज्जा उडाला. पराभत होऊन तो पळुन गेला. शिवाजी महाराज विजयश्री घेऊन विशाळगडावर आले. शिवाजी महाराजांचा विजय झाल्यामळे गडावर सर्वांना अतिशय आनंद झाला. तोफांचा धडाका सुरू झाला. हत्तीवर साखर वाटण्यात आली. तिकडे फत्तेखान व बजाजी नाईक निंबाळकर इत्यादी त्यांचे सहकारी उरले सुरले सैनिक घेऊन विजापुरास परत आले. शिवाजीने व त्याच्या मावळ्यांनी फत्तेखानास युद्धात चारी मुंड्या चीत केले. सगळा खजिना लुटला. मुसेखानास ठार मारले हे समजताच आदिलशाहवर वीज कोसळली. त्या वेळी स्वत:ला सावरून आदिलशाह स्वत:शीच म्हणाला, ‘तो शिवाजी वाटेल ते करो, पण त्याचा बाप शहाजी आमच्या ताब्यात आहे.

आता अमुक मुदतीच्या आत तुम्ही तुमच्या जहागिऱ्या व तुम्ही जिंकलेले किल्ले व प्रदेश आमच्या स्वाधीन करून आम्हाला शरण या. तसे नाही झाले, तर आम्ही तुमच्या बापाचे काय करू ते सांगता येणार नाही. अशी सज्जड ताकीद दिली, तर तो शिवाजी नाक घासून आमच्या पायाशी येईल.’ …पण आदिलशाहचा हा केवळ भ्रम होता. शिवाजी महाराज कोण आहेत हे त्याला नीट समजले नसावे. विशाळगडावर आनंदाचे वातावरण होते. तरीही एक मोठी काळजी होती. शहाजीराजे आदिलशाहच्या तुरुंगात होते. त्यांना कसे सोडवायचे याची सर्वांना काळजी लागली होती.

जिजामातांचे सौभाग्य तुरुंगात होते. त्यांच्या कुंकवाला ग्रहण लागले होते. शिवाजी महाराज मोठ्या काळजीत पडले होते. काय करावे? कसे करावे? याचा विचार करीत असता त्यांना एकदम नामी युक्ती सुचली. महाराज पट्टीचे राजकारण धुरंधर होते. अनेकांना त्यांनी चकविले होते. अनेकांना पाणी पाजले होते. शिवाजी महाराजांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी एक अजब आणि बिनतोड युक्ती काढली त्यांनी दिल्लीचा मोंगल सुलतान शाहजहान याला एक पत्र पाठविले. ‘आमचे वडील शहाजीराजे यांना दगा करून तुरुंगात ठेवले आहे.

जर आपण आमच्या वडिलांच्या सुटकेसाठी मदत केलीत, तर आम्ही दोघे आपल्या चरणांशी रुजू होऊन आपली सेवाचाकरी करू.’ शहाजीराजांच्या सुटकेसाठी विजापूरच्या आदिलशाहला व दिल्लीच्या शाहजहानला शह देण्याची महाराजांची मुत्सद्देगिरी मोठी अजब व अचाटच होती, कारण विजापूरचा आदिलशाह काय आणि दिल्लीचा बादशहा काय दोघेही तसे महाराजांचे शत्रूच होते. मी बादशहाची चाकरी करणार नाही. मी स्वराज्य स्थापन करीन असे म्हणणारा शिवाजी बादशहाचा गुलाम होण्यास कसा तयार झाला? याचे अनेकांना आश्चर्य वाटले, पण त्यांना माहीत नव्हते; शहाजीराजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांची ही लोणकढी थाप होती.

दिल्लीच्या बादशहाला हे मधाचे बोट लावले होते. शिवाजी महाराजांच्या या बतावणीची बातमी समजताच आदिलशाह भयंकर घाबरला. शिवाजी आणि मोंगल बादशहा एकत्र आले, तर त्यांना तोंड देणे कठीण जाईल हे आदिलशाह ओळखून होता. त्यापेक्षा आता शहाजीराजांना सन्मानपूर्वक सोडून देणे हेच शहाणपणाचे ठरेल. असा विचार करून आदिलशाहने शहाजीराजांची सुटका केली व त्यांना दरबारात आणून त्यांचा सन्मान केला. महाराजांच्या करामतीमुळे आदिलशाहचा सगळा डाव त्याच्याच अंगाशी आला. ‘करायला गेलो एक आणि झाले भलतेच’ अशी त्याची गत झाली.

आदिलशाह शहाजीराजांचा सत्कार करून त्यांना म्हणाला, “शिवाजीच्या ताब्यात असलेला कोंढाणा गड, संभाजीच्या ताब्यात असलेले बंगरुळ व त्या नजीकचा कंदी गड आमच्या ताब्यात द्या व पूर्ववत आमच्या सेवेत रुजू व्हा. झाले गेले विसरून जा.” आपल्या सुटकेत थोडक्यासाठी अडथळा येऊ नये असा विचार करून शहाजीराजांनी बादशहाची मागणी मान्य केली. शहाजीराजांची सुटका झाली. शहाजीराजांचा खात्मा करण्यास उतावीळ झालेल्या बाजी घोरपडे व अफजलखान यांचा अगदी चडफडाट झाला.

शहाजीराजांची सुटका झाल्याची बातमी समजताच राजगडावर आनंद ओसंडून वाहू लागला. शिवाजी महाराजांच्या डावपेचाची, त्यांच्या चातुर्याची सर्वांनी तोंडभरून प्रशंसा केली. वडिलांची सुटका झाल्यामुळे शिवाजी महाराजांना अतिशय आनंद झाला. त्यांचा अत्यंत आवडता गड कोंढाणा शत्रूला द्यावा लागला याचे त्यांना खूप वाईट वाटले, पण एक ना एक दिवस कोंढाणा पुन्हा स्वराज्यात येईल याची त्यांना खातरी होती. पुरंदरच्या लढ्यात ज्यांनी अतुल पराक्रम केला त्या सर्व मावळ्यांचा महाराजांनी मोठ्या प्रेमाने सत्कार केला.

Leave a Comment