भद्रायूला राज्य देऊन वज्रबाहू व सुमती हिमालयातील केदार क्षेत्री गेले. तेथे ते दोघे शिवाची भक्ती करू लागले. एक दिवस ‘भद्रायू’ त्याची पत्नी ‘कीर्तिमालिनी’ हिच्यासह शिकारीसाठी रानात गेला असता त्याला दुरून लोक मोठ्यांदा ओरडत, धावत येत असलेले दिसले. एक ब्राह्मण “वाघ आला, वाघ आला.
वाचवा’ असे म्हणत धावत येत होता. भद्रायूने धनुष्याला बाण लावला. तितक्यात वाघाने त्या ब्राह्मणाच्या बायकोवर झडप घातली आणि तिला तोंडात धरून वेगाने निबिड अरण्यात उचलून नेली. ब्राह्मण रडत भद्रायूला म्हणाला, “राजा, माझी पत्नी तुझ्या डोळ्यादेखत वाघाने नेली. तू तिचे रक्षण करू शकला नाहीस. माझी पत्नी तू मला परत आणून दे. तुझ्या शौर्याचा मी धिक्कार करतो.”
भद्रायू म्हणाला, “मी तुझे दुसरे लग्न करून देतो. माझी धनसंपत्ती व राज्य देतो. पण त आक्रोश करू नकोस.” ब्राह्मण म्हणाला, “मला दुसरे काही नको. मला माझी पत्नी हवीय.” आणि तो मोठमोठ्याने ऊर पिटून घेऊ लागला. त्याचे दुःख पाहून भद्रायू म्हणाला, “हे ब्राह्मणा, तू इतका आक्रोश करू नकोस. मी तुला माझी पत्नी ‘कीर्तिमालिनी’ देतो.” तेव्हा ब्राह्मण म्हणाला, “दे. तुझी पत्नी मला दान म्हणून दे.” राजा म्हणाला, “मला वाघाला बाण मारता आला नाही. हे ब्राह्मणा, मी तुला कीर्तिमालिनी दान म्हणून देतो आणि स्वत:ला आगीत जाळून घेतो.”
राजाने तेथल्या तेथे संकल्प करून कीर्तिमालिनी त्याला दान म्हणून दिली. त्या ब्राह्मणाने दान घेतले मात्र तत्क्षणी तो ब्राह्मण कीर्तिमालिनीसह गुप्त झाला. मग राजाने तेथल्या तेथे अग्री प्रदीप्त केला. त्याच्या मोठमोठ्या ज्वाला झाल्या. राजाने स्नान करून भस्म व रुद्राक्ष घातले आणि अनिकुंडात उडी टाकली. अग्रीच्या ज्वाला उंच आकाशात गेल्या आणि अग्नीतून शिवपार्वती प्रगट झाले.
शिवशंकर भद्रायूला म्हणाले, “तुझ्या भक्तीने मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. वर माग.” राजा म्हणाला, “हे शिवशंकरा, त्या ब्राह्मणाची पत्नी आपण परत आणून द्यावी.” शिव म्हणाला, “अरे मीच तो ब्राह्मण आणि ही पार्वतीमाता त्या ब्राह्मणाची पत्नी. मीच वाघ होऊन तिला नेली. तुझ्या भक्तीने प्रसन्न होऊन आम्ही शिवपार्वती तुला दर्शन देत आहोत. तुझी पत्नी कीर्तिमालिनी ही बघ.” असे म्हणून शंकराने राजाला कीर्तिमालिनी दाखविली.
शिवशंकर म्हणाले, “तुझी आणखी काय अपेक्षा आहे?” राजा म्हणाला, “वज्रबाहू, सुमती, पद्माकर, सुनय यांना कैलासात स्थान द्या.” “तथास्तु.” शंकर म्हणाले. शंकर-पार्वती आशीर्वाद देऊन गुप्त झाल्यावर भद्रायू व कीर्तिमालिनी नगरात आले व भद्रायूने दीर्घकाळ राज्य केले. हे भद्रायू आख्यान यश व आयुष्य वाढविणारे आहे. याच्या श्रवणाने सगळ्यांचे कल्याण होते.