शिवाचे महान क्षेत्र त्र्यंबकेश्वर

नाशिक जिल्ह्यात नाशिकहून १८ मैलावर ब्रह्मगिरी पर्वत असून तो सह्याद्री पर्वत शृंखलेत आहे. या पर्वताच्या पायथ्याशी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नगर वसले आहे. हे शिवाचे महान क्षेत्र असून बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक आहे. नाशिकप्रमाणे येथेही कुंभमेळा भरतो. पाचशे वर्षांपूर्वी येथे वस्ती नव्हती.

देवळाच्याजवळ त्र्यंबक नावाचे एक लहानसे खेडे होते. श्रीमंत नानासाहेब पेशवे त्यावेळी येथे आले तेव्हा त्यांना ब्रह्मगिरी पर्वताची संरक्षण पहाडी, मजबूत पार्श्वभूमी, समृद्ध हिरवाकंच निसर्गपरिसर आणि प्राचीन तीर्थक्षेत्र असा तिहेरी संगम भावला. त्यांनी या तीर्थस्थानाचा विकास केला.

नानासाहेब पेशव्यांनी पूर्वीच्या जीर्ण मंदिराच्या जागी त्र्यंबकेश्वराचे सध्याचे भव्य मंदिर उभारले. त्रिकाल पूजा व नैवेद्यासाठी खर्चाची व्यवस्था करुन ठेवली. गौतमाला भेटण्यासाठी साक्षात् भगवान त्र्यंबक रुपाने भूतलावर आले आणि त्र्यंबकेश्वराच्या ज्योर्तिलिंगात स्वत:ला सामावून तेथे राहिले. त्यामागील आख्यायिका अशी आहे. त्

र्यंबक म्हणजे तीन डोळ्याचा देव. ज्या स्थानी मानवाला मार्गदर्शन केले ते स्थळ म्हणजे गौतमी तट. अशा या भागाला गौतमी तट नांव पडले. गौतमऋषींनी अनेक संकटात सापडलेल्या जनतेला मदतीचा हात पुढे केला आहे. एकदा सर्वत्र दुष्काळ पडला. पावसाचा एक थेंब वरुन खाली पडला नाही. त्यामुळे लोक चिंताग्रस्त झाले.

अशा वेळी गौतमऋषींनी येथील लोकांना संकटमुक्त केले. त्यांनी वरुणदेवाची उपासना करुन त्याला प्रसन्न केले आणि धो धो पाऊस पाडला. म्हणून जनतेने त्याचे आभार मानावयास पाहिजे होते. तरीही काहीजण गौतमाचा व अहिल्येचा द्वेष करीत. त्यांना त्रास देण्याचा चंगच बांधला होता. एकदा तर कहरच झाला. लोकांनी त्यांच्या शेतात गाय घुसवली. गाय शेतातील उभे पीक खाऊ लागली.

गौतमाला हे कळताच त्यांनी दंड फेकून मारला. त्याच्या माराने गाय मेली व गोहत्त्येचे पाप गौतमाला लागले. लोकांना कारणच मिळालं. त्यानी गौतमाची निंदा करुन त्याच्यावर बहिष्कार टाकला. गौतम प्रायश्चित घेण्यास तयार झाले. प्रायश्चित्त मिळाले, तीन वेळा पृथ्वी प्रदक्षिणा, तीन वेळा गंगास्नान करुन येण्यास सांगितले. ते हताश होऊन ब्रह्मगिरीवर गेले आणि देवाला म्हणाले, ‘भगवंता, या देहाचा काय उपयोग.

मला येथून घेऊन चल.’ त्यावेळी गौतमाचे व अहिल्येचे करुण रुदन व प्रार्थना ऐकून शंकर प्रसन्न झाले. त्यावेळी तीन डोळ्यांचा त्र्यंबकेश्वर तेथे आला. त्यांनी दोघांच्या डोळ्यातील अश्रू पुसले. गौतम म्हणाला, ‘तीन वेळा गंगा स्नान करायला हवे आहे.’ भगवंताला दया आली. त्याने स्त्रीवेषात सोबत आलेल्या गंगेला हाक मारली व म्हटले, ‘गंगे, गौतमाला पावन करण्यासाठी तू येथे राहिली पाहिजे.’ गंगा म्हणाली, ‘जे लोक गौतमासारख्यालाही त्रास देतात.

मला पण हे दुर्जन त्रास देतील. म्हणून तुम्ही पण माझ्याबरोबर राहात असाल तर मी राहीन.’ गंगेच्या विनंतीला मान देऊन भगवंतांनी येथे वास केला. तो हा भगवान त्र्यंबकेश्वर, त्र्यंबकेश्वराच्या मंदिराभोवती चिरेबंद तट व मंदिराला सोन्याचे कळस आहेत. येथील शिवलिंग शाळुकेश्वर नाही, तर गाभाऱ्यातील पिंडीचे जागी खोलगट भाग आहे. त्यात अंगुष्टमात्र तीन लिंगे आहेत.

दररोज पूजेनंतर चांदीचा मुखवटा व विशेषप्रसंगी सुवर्णाचा पंचमुखी मुखवटा वापरतात. शिवासमोर शुभ्र पाषाणाचा नंदी आहे. मंदिराचे महाद्वार पूर्वाभिमुख असून उत्तर व पूर्व दरवाजे मोठे आहेत. देवळाच्या बाहेरील भिंती सुंदर शिल्पाकृतींनी सजविलेल्या आहेत. प्रवेशद्वारांच्या घुमटींना बाहेरच्या बाजूंनी कोरलेली कमळे दिसतात.

मुख्य दालनाच्या मध्यभागी चौथऱ्यावर संगमरवरी कासव आहे. कोनाड्यात अष्टभैरवाच्या मूर्ती आहेत. तटबंदीपासून मंदिरापर्यंत चारही बाजूचे प्रांगण फरसबंदी आहे. दर सोमवारी देवासाठी सायंकाळी पालखीची मिरवणूक कुशावर्तावर नेली जाते व षोडशोपचारे पूजा-अर्चा केली जाते. त्र्यंबकेश्वर पुण्यक्षेत्र असल्याने येथे काही धार्मिक विधींना विशेष महत्त्व आहे. नागनारायण-बळी फक्त येथेच करतात.

पिशाश्चयोनीपासून मुक्ती मिळावी म्हणून त्रिपिंडी श्राद्ध केले जाते. तसेच महत्त्वाचे उपनयन संस्कार विधी त्र्यंबकेश्वरक्षेत्री करण्याची प्रथा आहे. स्कंदपुराणात कश्यप ऋषीने सांगितल्यानुसार श्रीरामाने सिंहस्थ पर्वणी काळात कुशावर्तावर वडील दशरथाचे श्राद्ध व तीर्थविधी केला होता. संत ज्ञानेश्वराचे वडील विठ्ठलपंत व आई रखमाबाई यांनी त्र्यंबकेश्वरला एक वर्षभर अनुष्ठान केले होते. येथे केलेले दान, जप, हवनच्या पुण्यफळांनी मनुष्य महापातकाने मुक्त होऊन त्याला मोक्ष प्राप्त होते. असे हे पवित्रस्थान आहे.

Leave a Comment