शिवसंभव

व्या शतकाच्या सुरुवातीची हिंदुस्थानातील राजकीय परिस्थिती अत्यंत अस्थिर होती. निजामशाहीचा दिवाण, मलिक अंबर मरण पावल्याने आता निजामशाही कशी टिकणार अशी चिंता निर्माण झाली. विजापूरचा आदिलशाह दिवंगत झाल्यावर त्याचा मुलगा मुहम्मद गादीवर आला. दिल्लीत शाहजहान हा मोंगल बादशहा गादीवर बसला. तो दक्षिणेत आला व विजापूरच्या आदिलशाहची मदत घेऊन निजामाच्या राज्यावर चालून गेला. भानवडी गावाजवळ निजामशाहचे सैन्य आणि मोंगल-आदिलशाही सैन्याचे घनघोर युद्ध झाले.

शहाजीराजे निजामशाहीतर्फे लढत होते. त्यांच्या अतुलनीय पराक्रमामुळे मोंगल व आदिलशाही सैन्य पराभूत होऊन पळून गेले. आपल्याला हा विजय केवळ शहाजीराजांमुळेच मिळाला अशी निजामशाहीची खातरी पटली; त्यामुळे दरबारात शहाजीराजांचा दबदबा वाढला. पण त्यामुळे दरबारात इतर सरदार त्यांचा पदोपदी अपमान करू लागले; म्हणून शहाजीराजे निजामशाही सोडून आदिलशाहीत गेले. बादशहाने त्यांचे स्वागत करून त्यांना ‘सरलष्कर’ हा किताब दिला. सगळीकडे लढाया चालू होत्या… प्रजा मरत होती.. रयतेच्या घरादारांची राखरांगोळी होत होती…

दिवसाढवळ्या तरण्याताठ्या बायकामुली पळविल्या जात होत्या, पण बादशहांच्या पदरी भाकरीच्या तुकड्यासाठी चाकरी करणाऱ्या शहाण्णवकुळी मराठ्यांना कशाचेही सोयरसुतक नव्हते. त्यांची मनेच मेली होती. सगळीकडे अस्थिर, असुरक्षित परिस्थिती होती; त्यामुळे शहाजीराजे अगदी उद्विग्न झाले. निजामशाही सोडली तरी इतर शाह्या तरी कुठे चांगल्या होत्या? कुठेही जा, गुलामगिरी सगळीकडेच. शहाजीराजे या गुलामगिरीला विटले होते. त्यांनी ही गुलामगिरी, हुजरेगिरी झुगारून देण्याचे ठरविले. आता बंड. हे धाडस फार मोठे होते.

शहाजीराजे आदिलशाही सोडनं पुण्यास आले. पण्याची जहागिरी मालोजीराजाच्या वळपासून त्यांच्याच ताब्यात होती. तीनशे वर्षांनंतर पुण्यात पहिला दिवस उगवला तो स्वातंत्र्याचा शहाजीराजांनी पुण्याभोवतीचा प्रदेश भराभर ताब्यात घेतला. हा प्रदेश आदिलशाहचा हाती या वेळी शहाजीराजांपुढे मोठा प्रश्न उभा राहिला तो म्हणजे जिजाऊच्या सुरक्षिततेचा. जिजाबाई गरोदर होत्या व बाळंतपणासाठी त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवणे आवश्यक होते. विचार करता त्यांना एकदम आठवण झाली ती किल्ले शिवनेरीची. हा मोठा बुलंद, भक्कम किल्ला. त्या गडाचे किल्लेदार विजयराव विश्वासराव होते. ते होते नात्यातले व पूर्ण विश्वासातले. त्यांच्या घराण्यातील दुर्गाबाई ह्या जिजाबाईंच्या सख्ख्या जाऊबाई; शरीफजीराजे भोसल्यांच्या पत्नी.

शहाजीराजांनी ठरविले. जिजाबाईंना विश्वासरावांच्या हवाली करायचे. त्यांचे माहेरपणही होईल व लाडक्या लेकीसारखे बाळंतपणही होईल. शहाजीराजे जिजाबाईंना घेऊन अगदी सुरक्षितपणे शिवनेरीवर गेले. त्यांनी जिजाबाईंना विजयराव विश्वासराव यांच्या स्वाधीन केले. त्यांनी नारोपंत मुजुमदार, मल्हारभट उपाध्ये, गोमाजी नाईक इत्यादी अत्यंत विश्वासातले, हुशार व घरच्या मायेचे वयोवृद्ध कारभारी यांनाही बरोबर नेले होते. याशिवाय जिजाऊंच्या सुरक्षेसाठी काही सैनिकही तेथे ठेवले. विजयराव विश्वासराव व त्यांची पत्नी हे दोघे जिजाऊंची अगदी जिवापाड काळजी घेत आहेत हे पाहून शहाजीराजे अगदी निश्चिंत झाले.

शिवनेरी गडावर जाताच जिजाबाईंनी ‘शिवाई देवी’ ला नवस केला. ‘मला पुत्र झाल्यावर मी त्याला तुझे नाव देईन.’ जिजाबाई म्हणजे मूर्तिमंत सौदामिनी. त्या सर्वसामान्य स्त्रियांप्रमाणे नव्हत्याच. त्यांना तहान लागली होती स्वराज्याची. स्वत:चे स्वतंत्र राज्य त्यांना हवे होते. त्यांना सतत वाटत होते, ‘आपण अस्सल मराठे, क्षत्रिय. संतसज्जनांचे, रयतेचे रक्षण करणे आपले ब्रीद आहे.

आज सगळी पृथ्वी यवनाक्रांत झाली आहे. तिला मुक्त करून धर्मसिंहासनाधी स्थापना करावयास हवी.’ जिजाबाईंना गुलामगिरीची, पारतंत्र्याची चीड होती. त्यांना हवे होते स्वराज्य; त्यांना हवे होते सार्वभौम राजसिंहासन. त्यांना सतत वाटत होते, ‘या अठरापगड, मावळमराठ्यांना एकत्र करून जुलमी, अन्यायी, परक्या सुलतानांविरुद्ध उठणारा, त्यांना नेस्तनाबूत करणारा कोणीतरी यशवंत, प्रतापवंत महापुरुष निर्माण व्हावा. असा पुरुषोत्तम जन्मास येईल काय? जिजाबाईंची मनोदेवता सांगत होती, ‘हो, नक्कीच येईल.’ याच वेळी शिवनेरीवर एक वाईट बातमी आली.

शहाजीराजांनी पुणे, सुपे जहागिरीलगतचा काही आदिलशाही प्रदेश आपल्या जहागिरीत सामील करून घेतला म्हणून त्याचा बदला घेण्यासाठी आदिलशाहने पुण्यावर हल्ला करून पुण्याची राखरांगोळी केली. स्वराज्य संपले… जिजाबाई व शहाजीराजांना ही बातमी समजली. जिजाबाईंचा संताप, संताप झाला.. अशा मन:स्थितीत असलेल्या जिजाऊंना डोहाळे लागले ते ‘आपण घोड्यावर मांड ठोकन बसावे. दऱ्याखोऱ्यातून दौड करावी. रोज नवनव्या गडांवर जावे. हाती ढालतलवार घ्यावी. शत्रूशी युद्ध करावे.’ बघता बघता फाल्गुनी पौर्णिमा आली.

गडावर होळ्या पेटल्या. जिजाऊंना आता फारशी हालचाल करता येईना. जिजाऊंना नववा महिना लागला… संपत आला… गडावरील दर्दी, वृद्ध सुइणी समजल्या, की आज उद्या एवढ्यातच… गडावर सगळ्यांची लगबग सुरू झाली. विश्वास व अनुभवी वैद्य आले. सगळे जण जागता पहारा करीत होते. जिजाऊंची, बाळंतिणीची खोली सजविली गेली. भिंतीवर स्वस्तिक चिन्हे काढली. जमिनीवर चंदन शिंपडले.

फाल्गुन वद्य तृतीयेची पहाट. जिजाऊंच्या पोटात दुखू लागले. त्यांना बाळंतिणीच्या खोलीत नेण्यात आले. आता सर्वांची काळजीने घालमेल सुरू झाली. उत्सुकता क्षणाक्षणाला वाढू लागली. प्रत्येक क्षण तासासारखा वाटू लागला. खोलीच्या बाहेर प्रत्येक जण दुसऱ्याला खुणेने विचारीत होता, “काय?”, “काय?”, “कधी?” आणि बघता बघता संध्याकाळ झाली. खोलीचा पडदा हलला. खोलीतून काही बायका हसत हसत बाहेर आल्या. “काय? काय?’ असे विचारताच. “मुलगा! मुलगा!! मुलगा!!!” जिजाऊ सुखरूप प्रसूत झाल्या. पुत्ररत्न झाले! ही गोड बातमी गडावर पसरली.

सगळे जण आनंदाने नाचू लागले. मंगलवाद्ये वाजू लागली. नगारा दणाणू लागला. तोफा कडाडू लागल्या. हत्तीवरून साखर वाटली. युगायुगांनंतर हा शुभ क्षण, भाग्याचा क्षण आला होता. ही शुभवार्ता शहाजीराजांना कळविण्यात आली. ‘शके १५५१ फाल्गुन वद्य तृतीया शुक्रवार, सूर्यास्त होता होता, उच्चीचे पाचग्रह अनुकूल असता शिवनेरी किल्ल्यावर जिजाबाईंच्या उदरी पुत्र जन्मला. त्या दिवशी तारीख होती १९ फेब्रुवारी १६३०. जिजाबाईंना पुत्र झाला! शहाजीराजांना, सह्याद्रीला, महाराष्ट्राला पुत्र झाला!’ कारभाऱ्यांनी ज्योतिष पंडितांना बोलावून आणले. ज्योतिषांनी बाळराजांची कुंडली मांडली.

बाळाचे भविष्य जाणून घेण्यासाठी सर्व जण ज्योतिष्यांच्या भोवती बसले. ज्योतिषी म्हणाले, “या पृथ्वीचे भाग्य उदयास आले. अत्यंत सौभाग्यशाली, थोर मुहूर्तावर हा कुमार जन्मास आला आहे. हा सुपुत्र दिग्विजय करेल. अनेक मोठमोठी अद्भुत साहसे करेल. याची कीर्ती दिगंती पोहोचेल. हा गिरिदुर्ग, जलदुर्ग, स्थलदुर्ग निर्माण करेल. हा चिरंजीव होईल!” – फार पूर्वी भगवती देवी प्रकट होऊन मालोजीराजांना म्हणाली होती, ‘मी देवी आहे. तुझा शुद्ध भाव पाहून मी तुझ्यावर कृपा करावी म्हणून प्रकट झाले आहे. तुझ्या कुळी प्रत्यक्ष शिवसांब अवतार घेऊन धर्मस्थापना करील.

देवब्राह्मणांना पीडा झाली आहे, ती तो दूर करील. तुझ्या वंशात अवतार पुरुष शककर्ता होईल. तो दुष्टांचा संहार करून धर्मरक्षण करील व तुझ्या वंशात सत्तावीस पुरुष राज्य करतील.’ बाराव्या दिवशी बाळाचे मोठ्या थाटामाटात बारसे झाले. ‘कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या’ म्हणत बाळाला पाळण्यात ठेवले. शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाऊंनी नवस बोलला होता; म्हणून बाळाचे नाव ठेवले ‘शिवाजी’ ठेवण्यात आले. तीनशे वर्षांनंतर महाराष्ट्रात स्वातंत्र्याचा उष:काल झाला! शिवसंभव झाला!

Leave a Comment