शिवरायांवर दुहेरी संकट

शिवाजी महाराजांनी सुरतेला साफ लुटले व ती कुबेर दौलत घेऊन ते विशाळगडाच्या रोखाने दौडत निघाले. सोन्याची लंकाच त्यांना मिळाली होती. त्यांना आता ओढ लागली होती राजगडाची. गडावर असलेल्या जिजामातांची! जिजामाता महाराजांचे परमदैवत होते, सर्वस्व होते. ‘सुरतेच्या यशस्वी मोहिमेमुळे मांसाहेबांना किती आनंद होईल?’ या सुखद विचारात महाराज राजगडाकडे निघाले होते.

खरोखर दैवाचा खेळ किती विचित्र असतो? मनुष्याच्या वाट्याला निर्भेळ सुख कधीच येत नाही. सुख आणि दुःख यांचा पाठशिवणीचा खेळ सतत चालू असतो. शिवाजी महाराज मोठ्या उत्साहाने राजगडावर आले, पण हाय रे दैवा! राजगडावर वीज कोसळली होती. वज्राघात झाला होता. शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांना अपघाती मृत्यू आला होता. मांसाहेबांचे सौभाग्य हरपले होते. त्यांचे सौभाग्याचे कुंकू पुसले गेले होते.

शहाजीराजे कर्नाटकातील होदीगेरे या गावी मुक्कामाला होते. त्यांना शिकारीचा मोठा नाद होता. हिंस्र श्वापदांची शिकार करण्यात ते तरबेज होते. गाण एके दिवशी त्यांना जंगलात शिकारीला जाण्याची इच्छा झाली. त्यांनी शिकारीला निघण्याची आपल्या खाशा मंडळीस आज्ञा केली. राजे शिकारीला निघाले. होदीगेरेच्या जंगलात शिकार टेहळीत ते घोड्यावरून हिंडत होते… अचानक त्यांना पळत असलेले श्वापद दिसले… शहाजीराजांनी घोड्यावरून त्याचा पाठलाग सुरू केला… घोडा वेगाने धावत होता… धावता धावता त्याचा पाय एका रानवेलीत अडकला… घोडा धाडकन् जमिनीवर आदळला…

शहाजीराजे एकदम दूर फेकले गेले… त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार बसला व दुर्दैवाने त्यातच त्यांचा अंत झाला. या वेळी त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा एकोजी होता. त्याने त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले व ही दःखद घटना राजगडावर कळविली. ही बातमी राजगडावर येताच आकाशातून जणू वीजच कोसळली. मांसाहेबांवर दुःखाचे आकाशच कोसळले. गडावर सगळीकड रडारड सुरू झाली. मांसाहेबांच्या कुंकवाचा करंडाच घरंगळला. त्यांच्या सौभाग्याचे कुंकूच सांडले. शिवाजी महाराजांना ही बातमी समजली तेव्हा त्यांना अतिशय दुःख झाले.

प्रसंगी वज्रापेक्षाही कठोर मन असलेले महाराज जेव्हा मांसाहेबांना भेटले तेव्हा त्यांना भडभडून आले. मासाहेबाना मिठी मारून ते लहान मुलासारखे रडू लागले. ते करुण दृश्य पाहून सगळा राजगड गदगदून हुंदके देऊ लागला. अशा प्रसंगी कोणी कोणाचे सांत्वन करायचे? आणि सांत्वन तरी काय करणार? मांसाहेबांनी महाराजांना सांगून टाकले, “आम्ही जाणार! आम्ही सती जाणार!” मांसाहेबांचे हे शब्द ऐकताच शिवाजी महाराज कमालीचे अस्वस्थ झाले. बैचेन झाले. तात गेले, माय निघाली. दुःखाचा दुहेरी कडा महाराजांवर कोसळल.

मांसाहेबांचा महाराजांना केवढा आधार होता! अनेक बिकट प्रसंगी त्या महाराजांना अचूक सल्ला देत. त्या महाराजांना प्रेरणा देत. मांसाहेब म्हणजे महाराजांचा आशीर्वाद होता. हिंदवी स्वराज्य व्हावे. रयतेचे, स्वकीयांचे राज्य व्हावे हे मांसाहेबांचे स्वप्न होते. ते स्वप्न साकार होत असतानाच त्या आपल्याला पोरके करून जात आहेत हे पाहून महाराजांचा धीर खचला. मांसाहेबांच्या कुशीत शिरून महाराज ढसढसा रडू लागले. ते कळवळून म्हणाले, “मांसाहेब, मांसाहेब मला टाकून जाऊ नका. मला पोरके करू नका.”

महाराज पुन:पुन्हा विनवीत होते, पण मांसाहेबांचा निर्धार ढळण्याचे लक्षण दिसेना. तेव्हा महाराज अगतिक होऊन म्हणाले, “मांसाहेब, माझी तुम्हाला शपथ आहे मला सोडून गेलात तर!” …आणि मांसाहेब द्रवल्या. वज्रापेक्षाही कठोर असलेल्या मांसाहेब शिवबासाठी फुलापेक्षाही कोमल झाल्या, त्यांनी आपला निश्चय बदलला. सर्वांना अतिशय आनंद झाला. यमदूत हात हालवीत परत गेले.

Leave a Comment