कोकणची काशी श्री क्षेत्र कुणकेश्वर

श्री शंकराने जगाच्या कल्याणार्थ विष प्राशन करुन पचविले म्हणून त्याला ‘निळकंठ’ म्हणतात. गंगेला आपल्या जटेत सामावून तिच्या प्रपातापासून जगाचे रक्षण केले म्हणून त्याला गंगाधर’ संबोधले जाते. अशा या शिवाची मंदिरे भारतभर आहेत. त्यातील हे कुणकेश्वर शिवमंदिर समुद्र किनाऱ्यावरील प्राचीन असे मंदिर आहे.

निसर्ग सौंदर्य अप्रतिम आहे. इ.स. ११०० पूर्वी बांधले असल्याचे कागदोपत्री पुरावे सापडतात. या ठिकाणचे लिंग स्वयंभू आहे. लिंगाभोवती कुणक वृक्षांची गर्द झाडी होती. म्हणून या शंकराला कुणकेश्वर नांव पडले असावे. या मंदिरासंबंधी एक आख्यायिका आहे ती अशी. एका ब्राह्मणाची गाय रोज चरत चरत या भागात येई व राईतील शिवलिंगावर आपल्या अमृतमय दुधाचा पान्हा सोडत असे. त्या शिवलिंगाला आपल्या दुधाने न्हाऊघालून आपल्या जीवनाचे सार्थक ते मुके जनावर करत असे.

मात्र ही गाय आपल्या धन्याला दूध देऊ शकत नसे. त्यामुळे या गायीच्या दूधाचे काय होते हे त्या ब्राह्मणाला कळेना. म्हणून त्या ब्राह्मणाने गायीवर लक्ष ठेवले तर ती गाय आपला पान्हा दगडावर सोडते हे त्याच्या लक्षात आले म्हणून ब्राह्मणाने त्याच्या जवळील काठीचा वार गायीवर केला. परंतु काठीचा फटका गायीला न लागता दगडाला लागला. त्या दगडातून रक्त वाहू लागले. ते पाहून ब्राह्मण आश्चर्यचकित झाला. त्याला तो दगड साधासुधा दगड नसून ते शिवलिंग आहे हे समजले.

दगडास शरण जाऊन तिथे ब्राह्मणाने पूजाअर्चा, दिवाबत्ती सुरु केली. दुसरी कथा अशी की, अज्ञातवासात असतांना शिवभक्त पांडव कोकणातून प्रवास करीत असता कुणकेश्वर येथील स्वयंभू शिवलिंग व रम्य परिसर पाहून मोहून गेले. या क्षेत्राला प्रती काशी निर्माण केल्यास जनताजनार्दनाला प्रत्यक्ष काशीक्षेत्री जाण्याचे प्रयास कमी पडतील असे मनात योजून त्यांनी एका रात्रीत १०८ शिवलिंग निर्माण करावयाचा निर्धार केला.

हा निर्धार अंर्तज्ञानाने काशी विश्वेश्वराला उमगताच आपले माहात्म्य कमी होऊ नये म्हणून त्याने कोंबड्याचे रुप धारण करुन पहाटेची बांग दिली. त्याबरोबर पांडवांनी प्रात:काल झाल्याचे समजून १०८ शिवलिंग निर्मितीचे कार्य मध्येच सोडून ते पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाले. पांडव निर्मित शिवलिंग आजही समुद्रामध्ये आपल्या अस्तित्वाची साक्ष देतात.

म्हणून भाविक कुणकेश्वराला कोकणची काशी म्हणतात. या मंदिराची बांधणी द्रविडीयन पद्धतीची असून सागराच्या लाटांनी मंदिराची हानी होऊ नये म्हणून मंदिराभोवती अजस्त्र शिळांचा वापर केला आहे. मंदिरात ठिकठिकाणी कोरीव नक्षीकाम व निरनिराळ्या आकृत्या मंदिराच्या सौंदर्यात भर घालून प्राचीनतेची साक्ष देतात.

मंदिराचे अंत:द्वार व गाभारा आकाराने लहान असला तरी स्वयंभू पिंडीभोवतीची शाळुखा मोठी मनमोहक आहे. मंडप ही मंदिराला साजेसा आहे. या मंदिरात श्रीदेव नारायण, गणपती, जोगेश्वरी, श्रीदेवी आदी अनेक देव आहेत. या मंदिराच्या पूर्वेस सुमारे दोन कि. मी. अंतरावर एक गुहा असून त्यात कोरीव लेणी आहेत. या ठिकाणी १८ कोरीव मुखवटे असून ते देखील अतिशय सुंदरपणाने कोरलेले आहे.

या ठिकाणी शिवलिंग व नंदीपण आहे. मंदिराचा जीर्णोद्धार तसेच देखभाल करण्याचे काम कुणकेश्वर ग्रामस्थ भाविक व दानशूर व्यक्तींच्या मदतीने करीत आहेत. समुद्राचे खारे वारे, वातावरणातील प्रदूषण यामुळे स्वयंभू शिवलिंगाची होणारी झीज भरुन काढण्यासाठी वज्रलेप समिती स्थापन केली आहे. देवगड तालुक्यातील कुणकेश्वर ग्रामी समुद्रकिनारी व डोंगराच्या पायथ्याशी हे स्वयंभू शिवलिंग आहे.

Leave a Comment