निर्मळचा श्री विमलेश्वर महादेव

श्री ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. तिचे रक्षण, पालनपोषण व्यवस्थित व्हावे म्हणून श्री विष्णूने दशावतार धारण केले. अशा या अवतारात भगवान श्री परशुरामाची सहाव्या अवतारात गणना होते. विशेष म्हणजे संपूर्ण मानवरुप असलेला हा पहिला अवतार आहे. परशुराम तपश्चर्या करीत असतांना खवळलेल्या समुद्राने आपली मर्यादा सोडली.

ऋषीमुनी, बहुजन भयभीत झाले व त्यांनी रक्षणासाठी परशुरामाची करुणा भाकली. त्यांचे संकट निवारण्यासाठी परशुरामाने तात्काळ धनुष्यबाण लावला आणि आपल्या शस्त्र, मंत्र सामर्थ्याने खवळलेल्या समुद्राला शूर्पारक बंदरापर्यंत हटवले. ह्या परशुराम निर्मित नवभूमीला पुढे नवे कोकण नाव पडले. हे पुण्यक्षेत्र पालघर जिल्ह्यातील, वसई तालुक्यामधील निर्मळ क्षेत्री आहे.

वसई गावापासून सुमारे ९ कि.मी. वर आहे. नालासोपारा स्टेशनपासून सुमारे चार मैलावर आहे. श्री निर्मळेश्वर महादेवाच्या मंदिराकडे जाताना दोन तलाव-सरोवरे लागतात. उजव्या बाजूला विमल तलाव तर डाव्या बाजूला निर्मळ तलाव आहे. विमल तलावाच्या बाजूला छोटी मंदिरे आहेत. या परिसराला निर्मळ ‘ म्हणण्याचे कारण म्हणजे येथे परशुरामाने दोन राक्षसांचा बाणाने वध केला.

हे दोन राक्षस म्हणजे नरकासूर व विमलासूर होत. या दोन राक्षसांच्या मगरमिठीतून त्यांनी या स्थानाला सोडवले. त्यामुळे हे ठिकाण पवित्र निर्मळ झाले. म्हणून या गावाला ‘निर्मळ’ हे नांव पडले. दोन तलावासंबंधी पौराणिक आख्यायिका आहेत त्या अश्या लोमहर्षण ऋषीची कन्या वैतरणी नदीच्या तीरावर तपश्चर्या करीत होती. तुंगार पर्वतावरुन विमलासूर दैत्याने तिला पाहिले आणि तिच्या सौंदर्यावर तोमोहित झाला.

ऋषिकन्या त्याच्याशी विवाह करण्यास तयार होईना म्हणून त्याने तिच्यावर हात टाकला. या राक्षसापासून सुटण्यासाठी तिने शिवाचा धावा केला, तिचा धावा ऐकून शिव द्रवला. शिवाज्ञेनुसार परशुरामाने त्या दैत्याचा वध केला. त्याचे शिर हसत हसत वैतरणेच्या काठी पडले. परशुरामाने त्या शिराला विचारले, ‘की तू का हसतोस?’ त्यावर त्या शिराने परशुरामाची खूप स्तुती केली.

या स्तुतीने प्रसन्न होऊन परशुरामाने वर दिला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या तलावाला ‘विमलतीर्थ’ असे नांव दिले. अशीच आख्यायिका निर्मळतीर्थासंबंधी सांगतात. निर्मळ तलावाच्या थोडे पुढे गेल्यावर सुळेश्वर महादेवाचे व सुळेश्वरी देवीचे मंदिर आहे. देवी नवसाला पावते अशी श्रद्धा आहे. वरील मंदिराच्या पुढे गेले की, रस्त्याच्या डाव्या बाजूला १०० ते १२५ फूट उंचीची टेकडी आहे. त्यावर मंदिर आहे.

टेकडी चढून जाण्यासाठी पायऱ्यांची सोय आहे. तुळशी वृंदावने व दीपमाळ आहे. मंदिर कोट बांधून बंदिस्त केले आहे. कोटाच्या आतील भागात विश्रांतीसाठी दगडी बैठका असून मोठे प्रांगणही आहे. येथे शिवमंदिर असून या मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंग आहे. या लिंगाची पूजाअर्चा केली जाते.

हा आद्य श्री निर्मळेश्वर महादेव होय. या सभा मंडपात पंढरीनाथाचे मंदिर असून महाविष्णू पंचायतन आहे. त्यात उद्धव, नारद, बलराम, रुक्मिणी, अक्रूर, महाविष्णू, सत्यभामा, गरुड यांच्या पाषाणमूर्ती आहेत. तसेच छोट्या देव्हाऱ्यात कार्तिकस्वामीची सहा मुखांची मूर्ती व दुसरीत ब्रह्मदेवाची, गणपतीची मूर्ती आहे. कार्तिकस्वामींचा उत्सवही साजरा होतो.

विमलेश्वर महादेवाच्या बाजूला श्रीमत् जगत्गुरु श्री शंकराचार्य विद्याशंकर भारती ह्यांची समाधी आहे. त्यावर चांदीचा पत्रा चढवला आहे. या शंकराचार्याची हकीगत अशी की, हे शृंगेरी पीठाचे आठवे शंकराचार्य विद्याचरणस्वामी होत. ते येथे धर्म प्रचारार्थ आले असता या भागातील सामवेदी ब्राह्मण समाजाने त्यांचा गौरव केला. या नवकोकणात शंकराचार्यांचे पाऊल लागल्याने सर्व जनता प्रफुल्लित झाली.

प्रचारकार्यार्थ निर्मळ या ठिकाणी आचार्यांचा मुक्काम असता. त्यांनी येथे देह विसर्जन केला. त्यांच्या स्मरणार्थ समाधी बांधली गेली. या समाधी दर्शनार्थ येथे दरवर्षी कार्तिक एकादशीला यात्रा भरते. येथे एक प्राचीन अश्वत्थ वृक्ष आहे. त्या वृक्षाच्या बुंध्यात एक पिंड आहे. त्यामुळे पितरांसाठी पिंडदान करण्यास हे क्षेत्र पवित्र मानले जाऊ लागले.

Leave a Comment