श्रीहरीची सोन्याची द्वारका

जे लोक द्वारकेला जाऊन गोमती नदीत स्नान करतात आणि श्रीकृष्णाचे दर्शन घेतात, ते आपल्या कुलासहीत वैकुंठात जातात. जो मनुष्य संकटकाळी आपल्या गावी राहूनदेखील पश्चिम दिशेला हात जोडून द्वारकापुरीचे स्मरण करील त्याला निश्चित मोक्ष प्राप्त होईल. कारण गोमतीसारखी दुसरी नदी नाही. कृष्णासारखी दुसरी देवता नाही.

स्वर्ग, मृत्यू व पाताळ या तिन्ही लोकात द्वारकेसारखी नगरी नाही अंशी ही द्वारका. हिंदूंच्या सात मोक्षदायक पुऱ्यांमध्ये आणि चार पवित्र धामांमध्ये द्वारकेची गणना होते. भगवान श्रीकृष्णाची नगरी म्हणून हिंदूंना द्वारकेविषयी प्राचीन काळापासून आकर्षण वाटत आले आहे. द्वारकेत गोमतीच्या जलाने स्नान, गोमयाचे लेपन, गोदान, गोपीचंदनाचा टिळा आणि गोपीनाथाचे दर्शन या पाच प्रकारांचे विशेष महत्त्व मानले जाते.

रामानुजाचार्य, मध्वाचार्य, वल्लभाचार्य, ज्ञानेश्वर इत्यादी महापुरुषांनी द्वारकेची यात्रा केली. आद्य शंकराचार्याने शारदापीठ नामक धर्मपीठ द्वारकेत स्थापन केले. असे हे प्राचीन क्षेत्र जामनगर जिल्ह्यांत असून जामनगरपासून १४८ कि. मी. अंतरावर अरबी समुद्र किनारी वसले आहे. महेसाणा-विरमगांव-ओखा मार्गावरील हे एक स्टेशन आहे. अहमदाबादपासून द्वारका २३५ मैलावर आहे.

द्वारका नगरीच्या स्थापनेविषयी पुराणात कथा आहे. कंसवधामुळे कंसाचा सासरा जरासंघ याने सूड उगवण्याकरता मथुरेवर सतरा वेळा हल्ले केले. श्रीकृष्णाने ते सर्व परतवून लावले. पण युद्धामुळे मथुरेच्या लोकांना सतत त्रास होत होता, तो होऊ नये म्हणून पश्चिमेस सौराष्ट्रात बारा योजने सागर हटवून द्वारका नगरीची स्थापना केली आणि श्रीकृष्ण, बलराम यादवांसह द्वारकेत राहू लागले. युद्धातून पळून आले, म्हणून ते येथे रणछोडराय’ या नावाने प्रसिद्ध झाले.

महाभारत, हरिवंश आणि वायू, विष्णू, भागवत, वराह, स्कंद इत्यादी पुराणात द्वारकेची विस्तृत वर्णने आढळतात. द्वारका ही भगवान श्रीकृष्णाची ५००० वर्षापूर्वीची राजधानी. मथुरा सोडल्यानंतर कृष्णाने द्वारकेत शंभर वर्षे व्यतीत केली. विष्णूच्या १०८ दिव्य देशांपैकी द्वारका एक आहे. या क्षेत्रात अनेक मंदिरे आहेत. पण त्यातील द्वारकाधीश मंदिर मुख्य आहे. हे मंदिर गोमतीच्या काठी असून द्वारका शहराच्या मध्यभागी आहे.

द्वारकाधीश म्हणजे द्वारकेचा राजा असा जो कृष्ण त्याचे हे मंदिर. ह्या मंदिराभोवती तट असून, ते सातमजली आहे. गोमती नदीच्या बाजूने छपन्न पायऱ्या चढून आपण स्वर्गद्वारातून मंदिरात प्रवेश करतो. नंतर दर्शन झाल्यावर मोक्षद्वाराने बाहेर पडतो. या मंदिराच्या शिखरावर ८४ फूट लांबीचा ध्वज फडकत असतो. ध्वजावर सूर्य व चंद्र यांची प्रतिके कोरलेली आहेत. प्रवेशद्वारातून आत येताच विशाल सभामंडप लागतो.

पुढे चौक असून त्याच्यापुढे मंदिराचा गाभारा आहे. गर्भगृहात रणछोडरायाची सुमारे मीटरभर उंचीची चर्तुभूज मूर्ती रजत पीठावर उभी आहे. ती गंडकी पाषाणाची काळ्या रंगाची असून विविध दागिने व रेशमी वस्त्रांनी झाकलेली आहे. मूर्तीचे हाती शंख, चक्र, गदा, असून मस्तकावर मोरमुकुट, कानांत कुंडले व रत्नाचा हार अशा स्वरुपात मूर्तीचे दर्शन घडते. मूर्तीपुढे चांदीची प्रभावळ असून प्रखर दिव्यांच्या झोतात ती झळाळून जाते.

सभामंडपाच्या कोपऱ्यात बलरामाची मूर्ती असून अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत. द्वारकाधीशासमोर त्याची आई देवकी हिचे मंदिर आहे. द्वारकाधीशाची पहिली आरती सकाळी ७ वाजता होते. नंतर संपूर्ण शृंगार झाल्यावर साडेदहा वाजता शृंगार आरती होते.

१२ वाजता ‘राजभोग’ होऊन साडेबारा वाजता मंदिर बंद होते. सायंकाळी ५ वाजता उत्थापन होते आणि संध्या आरती साडेसात वाजता होते. देवाची शयन आरती रात्री साडेआठ वाजता होऊन रात्री मंदिर साडेनऊ वाजता बंद होते. मंदिर दर्शनासाठी सकाळी ६ वाजल्यापासून खुले होते. श्रीकृष्णजयंती व गोपाळकाला उत्सव मोठ्या प्रमाणात होतो. असंख्य भाविक दर्शनाला येत असतात.

Leave a Comment