सागर तीरावरील श्रीक्षेत्र गणपतीपुळे

रत्नागिरी जिल्ह्यात सागर तीरावर गणपतीपुळे हे रम्य स्थान वसले आहे. रत्नागिरीपासून १५-२० कि. मी. च्या अंतरावर असलेले स्थान पूर्वी मालगुंड या गावाचा एक भाग होता. कोकणातले श्री गजाननाचे हे स्वयंभू देवस्थान डोंगराच्या पायथ्याशी तसेच समोर अथांग सागर आहे. पश्चिमाभिमुख असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे. या गणपती संबंधी अनेक आख्यायिका ऐकावयास मिळतात.

सांगली, मिरज, जमखंडी, येथील एकेकाळच्या पटवर्धन संस्थानिकांचे पूर्वज हरभट पटवर्धन यांनी येथे तपस्या करुन आपले संपूर्ण कुटुंब मोठ्या उर्जितावस्थेत आणले. इ.स. १६०० च्या पूर्वी काही वर्षे मोगलाई अमल चालू असता या गावचे खोत भिडे यांच्या स्वप्नात श्री गणपतीने आपण येथे केवड्याच्या वनात राहात असल्याचा दृष्टांत दिल्यामुळे हे स्थान शोधण्यात आले.

दृष्टांत असा देण्यात आला की, मी गणेशगुळे या गावी गंडस्थळ व दंतयुक्त स्वरुपात आहे. पुळ्यातील हा छोटा डोंगर (टेकडी) हे माझे निराकार रुप आहे. त्यानंतर एक गाय ज्या ठिकाणी आपला पान्हा सोडत होती त्या ठिकाणी जी शिला आढळली, तेच हे गजाननाचे स्वयंभूस्थान होय. म्हणूनच पुळ्यातील गणपतीला प्रदक्षिणा घालताना सर्व डोंगराला प्रदक्षिणा घालावी लागते.

या प्रदक्षिणेचे अंतर एक ते दीड कि. मी. इतके आहे. ज मंदिराच्या बाजूलाच नाभिमुख असून संपूर्ण डोंगर हा निराकाररुपी श्री गणेश आहे. हा गणपती जागृत व नवसाला पावणारा म्हणून प्रसिद्ध असून मंदिरात दगडी गाभारा आहे. दोन गंडस्थळे, खाली नाभी व दोन हात एवढेच गणेशाचे रुप पाहावयास मिळते. दरवर्षी २ ते ८ फेब्रुवारी व २ ते ८ नोव्हेंबर या दिवसात बरोबर अस्तमानाच्यावेळी भगवान सूर्य नारायणाची किरणे काही मिनिटे गाभाऱ्यातील स्वयंभू देवतेवर पडल्यामुळे आगळेच दृश्य निर्माण होते.

याच जिल्ह्यातील गणपतीगुळे हे पण तीर्थक्षेत्र आहे. दोन्ही ठिकाणी गणेश चतुर्थीला गणेश मूर्ती बसविण्याची पद्धत नाही. येथील गणपती ही एक द्वारदेवता होय. शेजारील कोतवडे गावचे एक गरीब भिक्षुक ब्राह्मण हरभट यांनी पेशवाईच्या आरंभीच्या काळात गरिबीने गांजल्यामुळे २१ दिवस कडकडीत उपासना केली. २१ व्या दिवशी श्री गजाननांनी हर टांत देऊन सांगितले की, देशावर जा.

तुझी उर्जितावस्था तेथे होईल. त्यानंतर पेशवाईच्या काळात हे पटवर्धन घराणे उदयास आले. पुढे पटवर्धन संस्थानिकांनी हे आपले कुलदैवत मानले. पेशवेही या गणपतीला इष्ट दैवत मानीत. श्रीमंत माधवराव पेशवे व सौ. रमाबाई यांनी या देवळाजवळ धर्मशाळा बांधली. देवतेसमोरचा नंदादीप नानासाहेब पेशवे यांचा आहे. चिमाजी आप्पा यांनी देवस्थानचा नगारखाना बांधला.

सरदार गोविंद बुंदेले ह्यानी प्रदक्षिणेची पारवाडी बांधली. पुढे पटवर्धन संस्थानिकांनी येथे नित्य पूजा, अनुष्ठान, नैवेद्य, पुराण व चौघडा एवढी व्यवस्था लावून दिली. भाद्रपद व माघातील उत्सवात तसेच प्रत्येक संकष्टी चतुर्थीस श्रींची पालखी निघते. अंगारकी चतुर्थीला भक्तांची गर्दी होते.

Leave a Comment