श्री शनैश्वराचे स्वयंभू जाज्वल्य देवस्थान श्रीक्षेत्र शिंगणापूर

महाराष्ट्र प्रांतात व प्रांताबाहेर शनिमहाराजांची अनेक स्वयंभू जागृत अशी अधिष्ठाने आहेत. पुणे औरंगाबाद राजमार्गावर नगरपासून उत्तरेस ३५ कि. मी. अंतरावर घोडेगांव हे ठिकाण आहे. घोडेगाव या बाजाराच्या गावापासून पश्चिमेस ६ कि. मी. अंतरावर व सोनई, ता. नेवासा या गावापासून पूर्वेला ५ कि. मी. अंतरावर शिंगणापूर गांव आहे. श्री शनैश्वराची स्वयंभू मूर्ती असून मूर्तीची उंची ५ फूट ९ इंच व रुंदी १ फूट ६ इंच आहे.

या स्वयंभू मूर्तीबाबत असे सांगितले जाते की फार वर्षापूर्वी मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे ओढा असलेल्या, पानसनालाला महापूर आला. या महापुरात एक मूर्ती वाहून आली. ती पानसनाच्या बोरीच्या झाडाला अडकून राहिली. जेव्हा पूर ओसरला तेव्हा तेथील गुराखी मुलांना प्रचंड मूर्ती दिसली. त्यातील एका गुराखी मुलाने आपल्या हातातील काठी मूर्तीला जोरात टोचली आणि आश्चर्य म्हणजे ज्या ठिकाणी काठी टोचली होती त्या जागेतून रक्तस्त्राव होऊ लागला.

हे पाहून मुले घाबरुन घरी परतली. ही गोष्ट त्यांनी वडिलधाऱ्या माणसांना सांगितली. म्हणता म्हणता ही वार्ता गावात पसरली. त्याच रात्री एका भाविकाच्या स्वप्नात शनिमहाराजांनी दृष्टांत दिला. त्या भाविकांची इच्छा होती की, या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा स्वत:च्या जागेत करावी, अशी होती. परंतु सध्या ज्या ठिकाणी मूर्ती आहे त्या ठिकाणाहून मूर्ती तसूभर हालली नाही व सध्या मूर्ती ज्या स्थळी आहे त्याचठिकाणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी लागली.

कालांतराने या मूर्तीच्या चौफेर ३ फूट उंचीचा चौथरा बांधण्यात आला. तरीसुद्धा मूर्तीची उंची पूर्वीइतकीच म्हणजे ५ फूट ९ इचच राहिली. हा पण एक चमत्कार मानला जातो. शनिमहाराजांना कोणाचे छत्र मान्य नाही किंवा ते कुणाच्या छत्राखाली, अधिपत्याखाली वागले नाहीत. म्हणून की काय शनिमहाराज शिंगणापूर येथे अष्टौप्रहर ऊन, वारा, थंडी व पाऊस आणि सर्व ऋतूत मस्तकावर कोणतेही छत्र धारण न करता उभे आहेत.

महाराष्ट्रामध्ये शनिमहाराजांची अनेक ठिकाणे आहेत. परंतु शिंगणापूर या ठिकाणचे तीर्थक्षेत्राचे स्थान जगावेगळे आहे. शनिदेव हे दैवत श्री शंकराप्रमाणे सौम्य नसून कडक आहे. उज्जैनीचा राजा विक्रमाने शनिदेवाची निंदा केल्यामुळे राजा विक्रमाला साडेसात वर्षे खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. अशा कितीतरी गोष्टी शनिमहात्म्यात वाचावयास मिळतात. दर्शनाला जाण्यापूर्वी शूर्चिभूत होणे आवश्यक आहे.

आंघोळीसाठी देवस्थानाजवळ एक विहिर आहे. तसेच नळाची व्यवस्था असून या पाण्याचा वापर फक्त देवाच्या धार्मिक विधीसाठीच केला जातो. डोक्यावर काहीही न घालता देवाचे दर्शन घेणे अत्यावश्यक आहे. दर्शनाला आल्यानंतर ओल्या वस्त्राने पाणी घालण्यात येते व अभिषेक केला जातो. अभिषेक करण्यासाठी त्याठिकाणी ब्राह्मण मंडळी आहेत. शनैश्वर हे दैवत जहाल असून त्याला संतुष्ट करण्यासाठी भक्तिभावाने पूजा करावी.

अभिषेक शक्यतो तेलाचाच केला जातो. तो आवर्तण, रुद्र, लघुरुद्र व महारुद्र प्रकारात केला जातो. त्यांनी मनोकामना पूर्ण होते. पूजेसाठी श्रीफळ, खारीक, खोबरे, सुपारी, हळद-कुंकू, गुलाल, निळ, खडीसाखर, रुईचे फूल, तांदूळ, काळे कापड, दही, दूध, पेढे इत्यादी वापरतात. तसेच पीडा, कष्ट, संकट नाहिसे होण्यासाठी बिबा, टाचणी, खिळा, उडीद, व साळीचे तांदूळ वाहातात म्हणजे पीडा नाहिशी होते अशी श्रद्धा आहे.

अनेक भक्तगण आपल्या शक्तीनुसार नवसपूर्तीचा प्रयत्न करतो. दर शनिअमावस्येला या ठिकाणी मोठी यात्रा भरते. शनिजयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. शिंगणापूर येथील एकाही घराला चौकट नाही. कुठल्याही घरात कपाट, सुटकेस, कडी-कोयंडा, कुलूप ठेवायचे नाही किंवा लावायचे नाही अशी शनिमहाराजांची सक्त आज्ञा आहे. अनेक स्त्रियांना नवसाला देव पावल्याची उदाहरणे आहेत.

Leave a Comment