पीठांपैकी एक सिद्धपीठ वैष्णोदेवी

वैष्णोदेवी हे पवित्र हिंदू मंदिर उदमपूरपासून जवळच आहे. तर वैष्णवी देवीला जाण्यासाठी जम्मूपासून ४८ कि. मी. अंतरावर ‘कतरा’ या गावापर्यंत बसने जाता येते. आता रेल्वेची सोय झाली आहे. यात्रा करायची झाल्यास कतरा’ येथे एक दिवस मुक्काम करावा लागतो. कतरापासून अंदाजे १३.५ कि. मी. अंतर मात्र पायी किंवा डोलींनी जाता येते. मात्र यात्रा नोंदणी केंद्रावरुन यात्रा तिकीट घेऊन पुढे जाता येते. वर चढण्यास पायऱ्या आहेत.

ही देवी एवढ्या दुर्गम भागात येऊन का राहिली या विषयी कथा सांगितली जाते. भैरव नामक दैत्याची नजर सुंदर अशा वैष्णोदेवीकडे गेली आणि तिच्याशी लग्न करण्याची इच्छा त्याच्यात उत्पन्न झाली. परंतु देवीला त्याच्याशी लग्न करावयाचे नव्हते. भैरव आपल्या सामर्थ्याने आपला हेतू साध्य करील ही शंका मनात येताच त्याला चुकविण्यासाठी डोंगरात पळून गेली व अदकनवारी याठिकाणी लपून बसली.

भैरव तिचा शोध घेत तिथवर पोहचणार हे पाहून ती डोंगरावर उंच उंच चढत राहिली. शेवटी एका गुहेजवळ भैरवाने तिला गाठलेच. मग मात्र देवीने आपले उग्र रुप प्रकट केले व भैरवाशी झुंज देऊन त्याला ठार मारले. मग ती गुहेत शिरली व कायमची तिथेच राहिली. या त्रिकूट पर्वताच्या गुंफेत प्राकृतिक रुपाने म्हणजे तीन पिंडाच्या रुपाने येथे तीन देवी विराजमान आहेत. पुढे राजा दक्ष याच्या घरी देवी, सती तथा वैष्णोवी या नावे प्रगट झाली.

यौवनात पदार्पण केल्यावर तिचे लग्न भगवान शंकराशी झाले आणि ते शिव व शक्ती रुपाने राहू लागले. काही कालांतराने ती सती तथा शक्ती सीतेचे छद्म रुप धारण करुन श्रीरामाची परीक्षा पाहावयास गेली. हे पाहून शंकर रुष्ट झाला व घोर तपश्चर्येस अरण्यात निघून गेला. कालांतराने ती सती तथा शक्ती पार्वती बनून हिमालयात शंकराबरोबर वास करु लागली.

तेथे जसे सिद्ध, तपस्वी, किन्नर, देवता व पुण्यात्मे शंकराची सेवा करीत तशी पार्वतीही सेवा करु लागली. तीच वैष्णवदेवी असे या भागातील लोक मानतात. मनोभावे पूजा-अर्चा करतात. शंकराचे म्हणजेच महादेवाचे पुढे ब्रह्मा, विष्णू, महेश झाले. तसे वरील देवी सरस्वती, लक्ष्मी, काली झाल्या. त्याचे एकत्रीकरण म्हणजे वैष्णवीदेवी. वैष्णोदेवी ही एका गुहेत असून १७४७ मीटर उंचीवर आहे.

यात्रेकरुला देवीच्या दर्शनासाठी या गुहेतून ५० फूट जावे लागते. तेथे तीन प्रतिकात्मक रुपे आहेत. देवीची मूर्ती नाही. या मूर्तीच्या चरणांशी निरंतर जलप्रवाह वाहातो. गुहेच्या बाहेर मोठा चबुतरा असून त्याला विष्णूचा दरबार असे म्हणतात. यात्रेकरु त्यावर होम करतात. वर्षभर इथे यात्रा चालू असते. वैष्णोदेवीच्या मंदिरात अखंड दिवा तेवत असतो. हे भारतातील मोजक्या मंदिरांपैकी एक आहे की जेथे देवीची तिन्ही रुपे एकाच ठिकाणी पूजली जातात.

वैष्णोदेवी मंदिरात गणेश, ब्रह्मा-विष्णू-महेश इत्यादींच्याही मूर्ती आहेत. मंदिरात प्रतिदिनी सकाळ-संध्याकाळ आरती होते. वैष्णोदेवीची पूजा १०८ नावाने केली जाते. वैष्णवी देवीच्या स्थानाला ५१ पीठांपैकी एक सिद्धपीठ मानतात. कार्तिक पौर्णिमेला भक्तांची गर्दी होते. वैष्णोदेवीची यात्रा केल्यावर यात्रेकरुला खाली उतरुन कतरा गावातील भुवनेश्वरीची पूजा करावी लागते. ती केल्याने यात्रा सुफल होते. वैष्णोदेवी भक्तांची मनोकामना पूर्ण करते, अशी भक्तांची श्रद्धा आहे.

Leave a Comment