सुमित्रेची कथा

गौतम ऋषींनी मित्रसह राजाला आणखी एक कथा सांगितली. ते म्हणाले, “गोकर्ण क्षेत्राहून परत येताना आम्हाला मार्गात एक (चांडाळ ) स्त्री पाहायला मिळाली. ती कुष्ठरोगी होती. तिच्या हातापायाची बोटे झडली होती. ती मार्गात कडेला धुळीत लोळत पडली होती. तिचा मृत्यू जवळ आला होता. तोच आम्हाला आकाशातून एक विमान खाली उतरताना दिसले. त्या विमानात चार शिवदूत बसले होते. ते चारही शिवदूत तेजस्वी होते. त्यांचे ते विमान त्या चांडाळ स्त्रीला शिवलोकी नेण्यासाठी आले होते.

ते पाहून आम्ही चकित झालो व त्या शिवदूतांना आम्ही प्रश्न केला, “ही स्त्री इतक्या दुर्धर रोगाने पिडलेली असता तुम्ही हिला शिवलोकी का बरे नेता? तिने कोणते पुण्य केले आहे?” तेव्हा त्यातला एक शिवदूत म्हणाला की, ही चांडाळ स्त्री पूर्वजन्मी एका ब्राह्मणाची मलगी होती. तिचे नाव ‘सुमित्रा’. तिला तिच्या सौंदर्याचा गर्व होता. बालपणी ती विधवा झाली. त्यामुळे ऐन तारुण्यात तिला पुरुषांच्या सहवासाची चटक लागली. वडील तिला खूप बोलले. त्यांनी तिला शिक्षा केली. तरी तिची पुरुषांची चटक कमी होईना. एका पुरुषापासून तिला गर्भ राहिला.

तिच्या वडिलांना हे कळल्यावर त्यांनी तिला घरातून हाकलून दिले. तिच्या सौंदर्यावर मोहित होऊन एका धनवान शूद्राने तिच्याशी विवाह केला. शूद्राच्या घरी सतत मद्यमांस असे. ती भरपूर मांसाहार करी आणि भरपूर मद्य पिऊन झिंगे. एकदा खूप दारू प्यायल्यामुळे तिला खूप भूक लागली. तशीच झोकांडे खात ती उठली. बकरा मारण्यासाठी ती अंधारात मागील दारी गेली आणि तिने एका गाईच्या वासराच्या मानेवरूनच सुरी फिरवली. वासरू मारल्याचे लक्षात आल्यावर तिला वाईट वाटले. पण पोटातील मद्य तिला स्वस्थ बसू देईनात.

तिने वासरू शिजवले. त्याचे मांस खाल्ले आणि माझे वासरू वाघाने मारले म्हणून ती शोक करू लागली. काही काळानंतर सुमित्रा मरण पावली. यमाने तिला नरकात नेले. तिच्या पाप-पुण्याचा हिशेब करून तिला चांडाळ स्त्रीचा जन्म दिला. ती गांवोगाव भीक मागून पोट भरत होती. शिवरात्रीचा दिवस अनेक यात्रेकरू गोकर्ण क्षेत्री चालले होते. तीसुद्धा भीक मागत त्यांच्याबरोबर चालली होती. गोकर्ण क्षेत्री आल्यावर ती भद्रकालीच्या देवळाच्या पायरीशी बसून भीक मागू लागली. पण तिच्या कुष्ठरोगामुळे कोणीही तिच्याजवळ फिरकत नव्हते.

तितक्यात तेथे एक शिवभक्त आला. त्याने तिच्या हातात एक बेलाचे पान ठेवले. तिला वाटले आपल्याला काहीतरी खायला मिळाले. तिने ते तोंडाशी नेले. पण ते बेलाचे पान आहे हे कळताच तिने रागाने दूर भिरकावून दिले. ते वाऱ्याने उडून नेमके शिवशंकराच्या पिंडीवर पडले. शिवरात्रीला तिला उपास घडला. बेलाचे पान शिवाला वाहून तिने पूजन केले. त्यामुळे तिची सर्व पापे नष्ट झाली. म्हणून आम्ही तिला शिवलोकी नेत आहोत. बघता बघता त्या चांडाळ स्त्रीला दिव्य शरीर प्राप्त झाले आणि ती विमानात बसून शिवलोकी गेली.

कथा सांगून झाल्यावर गौतम ऋषी मित्रसह राजाला म्हणाले, “राजा, तू गोकर्ण क्षेत्री जा. शिवरात्रीच्या दिवशी तू शंकर-पार्वतीची बेलाची पाने वाहून पूजा कर. तू ब्रह्महत्येच्या पातकातून व शापातून मुक्त होशील.” राजाने गौतम ऋषींना साष्टांग नमस्कार केला व तो ‘गोकर्ण महाबळेश्वर’ क्षेत्राकडे जाण्यासाठी निघाला.

Leave a Comment